महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

आर्य अष्टांगिक मार्ग भाग ३०

भारतीय संस्कृतीत ईश्वराचा व आत्म्याचा संबंध जोडल्या गेलेला आहे. भगवान बुध्दांने मानवाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी ईश्वर व आत्मा यांचा धर्माशी जोडलेला संबंध नाकारला. वासेठ्ठ आणि भारद्वाज या ब्राम्हणाशी झालेल्या चर्चेत भगवान बुध्दांने म्हटले आहे की, खूनी, चोर, डाकू, लुटारु, व्यभिचारी, व्यसनी, फसवे असे अनेक तर्‍हेचे लोक असतात. जर ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्‍तीमान आणि सर्वव्यापी आहे तर या सर्व गोष्टींमध्ये एकतर तोच विद्यमान आहे. अथवा अशा अनिष्ट गोष्टींचा तो पुरस्कर्ता तरी आहे. असेही नसेल तर अशाप्रकारचा ईश्वर आंधळा तरी आहे. समाजात रुढ झालेल्या ईश्वरविषयक संकल्पनेला त्यांनी विरोध केला आहे. सृष्टी ही ईश्वरनिर्मित नसून उत्क्रांत झालेली आहे असे त्यांचे ठाम मत होते. दु:खाचे कारण शोधण्यासाठी भगवान बुध्दांनी वापरलेले सूत्र म्हणजे निरिक्षण, प्रयोग व विश्‍लेषण. हेच सूत्र आधुनिक संशोधनासाठी वैज्ञानिक वापरतात. म्हणजेच भगवान बुध्दांचा तर्कशुध्द, बुध्दीनिष्ट स्वतंत्र विचार आणि स्वानुभूतीप्रामाण्य आणि त्यांनी सत्य शोधण्यासाठी वापरलेले सूत्र यांच्या आधारावरच जगातील सर्व शास्त्रज्ञांनी आपले शोध लावलेले आहेत. म्हणून आपण असे म्हणू शकतो की, भगवान बुध्द हे वैज्ञानिक विचाराचे आद्यजनकच नाहीत तर ते आधूनिक विज्ञानाचे प्रणेते सुध्दा आहेत. मज्झिमनिकायातील सम्मादिठ्‍ठी’ या सुत्तात सम्यक दृष्टीचे विश्‍लेषण केले आहे. अकुशल व कुशलाचे मूळ यात सांगितले आहे. ते असे- १) प्राणी हिंसा करणे २) चोरी करणे ३) मिथ्याचार करणे ४) खोटे बोलणे ५) चुगली करणे ६) कठोर बोलणे ७) व्यर्थ बडबड करणे ८) अभिध्या करणे (लालच करणे) ९) व्यापाद करणे (प्रतिहिंसा करणे) व १०) मिथ्या दृष्टी (खोटी धारणा) बाळगणे हे अकुशल आहे. अकुशलाचे मूळ लोभ, द्वेश व मोह आहे. तथापि १) प्राणी हिंसा न करणे २) चोरी न करणे ३) मिथ्याचार न करणे ४) खोटे न बोलणे ५) चुगली न करणे ६) कठोर न बोलणे ७) व्यर्थ बडबड न करणे ८) अभिध्या न करणे (लालच न करणे) ९) व्यापाद न करणे (प्रतिहिंसा न करणे) व १०) मिथ्या दृष्टी (खोटी धारणा) न बाळगणे हे कुशल आहे. कुशलाचे मूळ अलोभ, अद्वेश व अमोह आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात एका खेडवळ ब्राम्हणाला धम्मदिक्षा देतांना एक संवाद आला आहे. ते ब्राम्हण भगवान बुध्दांना सांगतात की, “आम्ही निरनिराळ्या ‌ऋतुनुसार सूर्य, चंद्र, प्रजन्य आणि अग्नी यांची पूजा करतो व त्यांना होमहवन करतो. तसेच एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रम्हलोकांत त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्ममरणाच्या फेर्‍यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो.” तेव्हा भगवान बुध्द म्हणतात की, “जे थोतांडाचा अवलंब करुन असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्‍गती प्राप्त होत नाही. परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्य मानणे, ही खरी सम्यक दृष्टी होय. हिच्यामुळेच तुम्हाला सद्‍गती लाभेल.”२) सम्यक संकल्पअष्टांगिक मार्गातील दुसरा मार्ग सम्यक संकल्प हा आहे. जीवनातील अत्युच्च ध्येय प्राप्‍तीसाठी सम्यक संकल्प अत्यंत महत्वाचे आहे. जीवनामध्ये ध्येय प्राप्‍तीचा संकल्प मोलाचे कार्य करतो. इतर धर्मामध्ये ध्येय प्राप्‍तीसाठी ज्याला मिथ्या संकल्प म्हणता येईल असे देवाची आराधना करण्याचा संकल्प करतात. तथापि भगवान बुध्दांनी साधकाला सम्यक संकल्पाचा जो उद्देश सांगितला तो निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे. निर्वाण हा जीवनातील अत्यंत श्रेष्ट अवस्था आहे. सार्‍या समस्‍येचे मूळ तृष्णा आहे. तृष्णेच्या मागे सारे प्राणी धावत असतात. जीवनामध्ये दु:ख उत्पन्न करणार्‍या राग, द्वेष आणि मोह यामध्ये ते गुरफटून जातात. त्यांना पराजित करण्याचे व त्यातून मुक्‍त होण्याचे कार्य केवळ सम्यक संकल्पामुळे होऊ शकते. दु:खाचे मूळ तृष्णा आहे. निर्वाण तृष्णेचा नाश करतो. तृष्णेचा नाश करण्याचे कार्य सम्यक संकल्पच करु शकते. म्हणून मिथ्या संकल्पाऎवजी भगवान बुध्द सम्यक संकल्पाकडे घेऊन जातात. सम्यक संकल्पात उदात्त आणि प्रशंसनीय अशी ध्येये, महत्वाकांक्षा आणि आकांक्षा याचा समावेश होतो. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावीत हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. मनामध्ये चांगले अथवा वाईट विचार येत असतात आणि म्हणून या विचारांना योग्य अशी दिशा देण्याच्या दृष्टीने सम्यक संकल्प अत्यंत महत्वाचे अंग आहे. जगामध्ये दु:ख आहे आणि या दु:खाला दूर करणे हा सम्यक संकल्पाचा मुख्य हेतू आहे. जीवनात यशस्वी होण्याकरीता जशी सम्यक दृष्टी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे यशस्वी होण्याच्या मार्गाला प्राप्‍त करण्यासाठी सम्यक संकल्पाची आवश्यकता आहे. बुध्द, धम्म आणि संघ या त्रिसरणाचे अनुसरण करणे, पंचशीलाचे पालन करणे, अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिताला आपल्या जीवनात रुजविणे याकरीता सम्यक संकल्प आवश्यक आहे. श्रध्दा, वीर्य, स्मृती, समाधी व प्रज्ञा हे पाच बळ प्राप्‍त करण्याकरीता सम्यक संकल्पाची अत्यंत आवश्यकता असते. जीवनात भगवान बुध्दांपासून ते भिक्‍खू-भिक्‍खूणी, उपासक-उपासीका यांनी जे यशाचे अत्युच्च शिखर गाठले ते सम्यक संकल्पामुळेच गाठले.

क्रमशः आर.के.जुमळे दि.१२.१.२०२४टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!