भगवान बुद्धांची शिकवण भाग ५०
आर.के.जुमळे
दि.१.२.२०२४
बौद्ध जीवनमार्ग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात खंड चवथा भाग तिसरा, ‘बौद्ध जीवनमार्ग’ या विषयाचा उल्लेख केला आहे.
सत्, असत् आणि पाप
चांगले (good, कुशल) कार्य करीत राहा. वाईट (अकुशल, evil) कर्मात सहयोगी बनू नका. पापकर्म(sin) करू नका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे.
माणसाने एकदा कुशल कर्म केले की, परत परत कुशल कर्म करीत राहिले पाहिजे. कुशल कर्म इतके अविरत करीत राहावे की, त्यायोगे अंत:करणातील सर्व इच्छाही कुशल कर्माकडे लागाव्यात. कुशल कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे.
कुशल कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने पात्र भरते. थोड्याथोड्या कुशल कर्माने कुशल कर्म वाढत राहते.
जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे.
जे कर्म केल्याने पश्चात्तापाची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले असे समजावे.
जर मनुष्य चांगले कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे, त्यांत आनंद मानावा. चांगल्या कर्मांचा संचय आनंदकारक असतो.
जोपर्यंत कुशल कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात; परंतु त्यांचे चांगले कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात.
‘ते मला बरोबर साधणार नाही’ असे माणसाने कुशल कर्मासंबंधी कधीच बोलू नये. थेंब थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे कुशल कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो.
चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा (सदाचाराचा) सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो. परंतु शीलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो.
दुष्टपणाला, वाईट गोष्टींना (evil) हे क्षुद्र समजू नका. ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने भांडे भरते. थोडे अकुशल घडता ते वाढत राहते.
ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नाही.
जर मनुष्य दुष्टपणे वा चुकीचे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते.
पापाला अनुसरू नका. याबाबतीत अनवधानी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. दुर्विचारांचे दमन करुन परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो कुशल कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये, वाईट गोष्टींमध्ये रममाण होते.
जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो ते काम करणे इष्ट नव्हे.
पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते. परंतु ज्या वेळी त्याची पापे परिपक्व होतात त्या वेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही.
अकुशल मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने वाईट गोष्टींना कमी लेखू नये. थेंबाथेंबाने भांडे भरते. अगदी अल्प, अल्प दुष्कृत्ये करता करता, मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो.
माणसाने आपले विचार दुष्ट कर्मापासून परावृत्त करून चांगल्या कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी.जर माणूस कुशल कर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन वाईटामध्ये रममाण होते.
माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते.
कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणारे या जगात धन्यता पावतात, आनंदी राहतात.
कामुकतेने दुःख निपजते. कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यांपासून विमुक्त होतो.
भूक हा सर्वांत वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वांत मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की, निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते.
ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित, स्वपोषित पाप हे कर्त्याचा नाश करते.
ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो, तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहचवितो.
दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात. परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१.२.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत