कोपर वेस्ट परिसरात धोकादायक इमारत कोसळली.

पश्चिमेतील कोपर भागातील लक्ष्मण पावशे ही चाळीस वर्षांपूर्वीची धोकादायक इमारत मंगळवारी संध्याकाळी अचानक कोसळली. तळमजला अधिक दोन मजली असलेल्या या इमारतीत सहा कुटुंबे राहत होती. या वेळी इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी बाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. काही दिवसांपूर्वीच पूर्वेतील एक धोकादायक इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.
चाळीस वर्षांपूर्वीची ही इमारत असून यात ९ सदनिका होत्या. इमारत धोकादायक झाल्याने बहुतांश रहिवासी घर खाली करून गेले होते; मात्र ६ कुटुंबे या ठिकाणी राहत होती. मंगळवारी सायंकाळी इमारतीचे काँक्रीट हळूहळू पडत असल्याचे दिसताच रहिवासी तात्काळ आरडाओरड करत घराबाहेर पडले. त्यानंतर काही क्षणांत इमारत कोसळली. हा वर्दळीचा रस्ता आहे; मात्र त्या वेळेस तेथून कोणी जात नव्हते. इमारत कोसळल्यामुळे काँक्रीटचा धुरळा काही वेळ परिसरात पसरला होता. इमारत कोसळताच या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचारी, वाहन चालकांची पळापळ झाली. धोकादायक इमारत कोसळल्याची माहिती मिळताच ह प्रभागाच्या सहायक आयुक्त स्नेहा करपे या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. सुरक्षेचा उपाय म्हणून काही वेळ या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस दाखल झाले. रात्रीत या इमारतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत