मुख्यपानविचारपीठसंपादकीय

कोल्हापुरचे शाहु महाराज आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत का करावीसी वाटली ?

नेहमीच एका वर्गाकडुन दोन्ही महाराजांनी बाबासाहेबांना मदत केली असे हिणवण्यात येते.
पण याची पार्श्वभूमी जाणुन घेण्याचा ते प्रयत्न करत नाहीत.

महाराजा सयाजीराव गायकवाड आणि शाहु महाराज हे दोघेही वेदोक्ताचे बळी ठरले होते
या दोघांनाही शुद्र म्हणुन हिणवले गेले होते.

शाहु महाराजांचा वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणांनी भेदभाव केल्याचे प्रकरण जगजाहीर आहे पण सयाजीराव महाराजांबरोबर सुद्धा असाच भेदभाव झाला होता.

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड १८८७ साली युरोप प्रवासासाठी जायला निघाले होते. त्यावेळी त्यांना सनातनी ब्राम्हण मंडळींनी विरोध केला. विलायतेला जाणे म्हणजे काळ्या पाण्यावरचं अनिष्ट वर्तन.. यामुळे राजपुरुषास आणि राज्यास
संकटास तोंड द्यावे लागेल, असा प्रचार ब्राम्हणांनी बडोद्यात सुरू केला.
तरीसुद्धा सयाजीरावांनी इंग्रज अधिकारी इलियट याच्या मदतीने पहिल्या युरोप प्रवासाची आखणी केली.

पण प्रवासाहुन बडोद्यात परतल्यानंतर ब्राम्हण पुरोहित मंडळींनी महाराजांकडुन प्रायश्चित करवून घेतले. या सगळ्या गोष्टी महाराजांनी मनाविरुद्ध केल्या खऱ्या
पण त्यांनी या प्रथेविरुद्ध कायदेशीर बंदोबस्त करण्याची मनोमन ठरवले होते.

याच काळात जोधपूरचे शिवदत्त जोशी बडोद्यात आले होते. राजवाड्यातील देवघरात धार्मिक कृत्ये पुराणोक्त पद्धतीने होतात, हे बघून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. हि बाब त्यांनी महाराजांच्या लक्षात आणुन दिली.
पण मराठ्यांना वेदांच्या पठण-श्रवणाचा
अधिकार नाही यावर कर्मठ सनातनी ब्राम्हण ठाम होते.
मराठे क्षत्रिय नसून ते शूद्रचं आहेत. त्यामुळे मराठ्यांच्या घरी केली जाणारी धर्मकृत्ये आणि विधी वेदोक्तऐवजी पुराणोक्त पद्धतीनेच केले जावेत असा त्यांचा आग्रह होता

बडोदा देवघर शाखेचे प्रमुख राजाराम गोसावी होते. त्यांचे साथीदार राजारामशास्त्री टोपले सयाजीरावांना गीताग्रंथ वाचून दाखवायचे काम करायचे. महाराजा सयाजीराव टोपलेशास्त्रींना म्हणाले,
“आम्ही क्षत्रिय आहोत. आमच्या देवघरात वेदोक्त पद्धतीने पुजापाठ सुरुवात करा”
त्यावर टोपलेशास्त्री म्हणाले,
“पण त्याकरिता
क्रात्यस्तोम यज्ञ करावा लागेल.”
टोपले वेदोक्त पद्धतीने कर्म करण्यास तयार झाले, हे ऐकून बडोद्यातील कर्मठ सनातनी ब्राह्मणांनी टोपलेशास्त्रींचा विरोध केला.
धर्म आणि राजआज्ञा या विवंचनेत अडकलेल्या टोपलेशास्त्रींनी अखेर आपल्या नोकरीचा राजीनामा दिला

यानंतर गो. स. सरदेसाई, रामचंद्र धामणस्कर आणि काही धर्मपंडितांशी सयाजीरावांनी चर्चा केली. आणि १५ ऑक्टोबर, १८९६ वेदोक्त पद्धत सुरु करण्याचा हुकूम काढला. “१८९८ ला राजपुत्रांची मुंजही केली. काही कर्मठ मंडळींनी विरोध केला, काहीं ब्राम्हण पुरोहितांनी महाराजांचा उघडपणे उपमर्द व आज्ञाभंग केला; पण या अविवेकाकडे महाराजांनी क्षमावृत्तीने दुर्लक्ष केले.

बडोद्यानंतर वेदोक्त-पुराणोक्त वाद कोल्हापूरमध्ये सुरू झाला.

नारायण राजोपाध्ये
छत्रपतींचे पुरोहित होते. त्यांना या
कामासाठी वार्षिक ३०,००० रुपयांचे वेतन, दिवाणी- फौजदारी आणि महसूलविषयक काही न्याय-निवाड्यांचे अधिकारही
होते. जेव्हा शाहू छत्रपतींच्या लक्षात आले की, कोल्हापुरातील ब्राह्मणवर्ग मराठ्यांकडे करणारे सर्व विधी पुराणोक्त पद्धतीने करत
आहेत. आणि याचे कारण ते मराठ्यांना शूद्र मानतात.

विरोधकांना एका फटक्यात नमविणाऱ्या शाहूंनी महाराजांनी यावेळी मात्र ब्राह्मण वर्गाची मनधरणी केली, राजवाड्यात वेदोक्त पद्धतीने विधी करावेत म्हणून सांगू लागले. राजोपाध्ये आणि त्यांना साथ देणारी सनातनी मंडळी मात्र हट्ट सोडायला तयार नव्हती. प्रो. विजापूरकरांनी या ब्राह्मणमंडळींची बाजू उचलून धरली. यातुन मार्ग काढावा यासाठी छत्रपती शाहूंनी या वेदोक्त प्रकरणात सयाजीराव गायकवाडांची मदत घेतली होती.

पण काही केल्या राजपुरोहित राजोपाध्ये राजाचेही ऐकायला तयार नव्हते , हे बघून ६ मे, १९०२ रोजी शाहू महाराजांनी राजोपाध्यांना नोकरीतून
काढून टाकले. त्यांचे दिवाणी, फौजदारी, महसूलविषयक हक्क काढून घेतले. यानंतर कोल्हापुरात वेदोक्त संघर्ष टोकाला पोहोचला.
प्रो. विजापूरकर, भाऊशास्त्री लेले, धर्मपंडित म्हणू लागले की शाहू महाराज हे क्षत्रिय नाहीत.
तर काही मोजके ब्राम्हण चिंतामण वैद्य आणि वाईचे महादेव शास्त्री शाहूंच्या बाजूने उभे राहिले होते.

यानंतर या वादात बाळ गंगाधर टिळकांनी उडी मारली, त्यांनी सनातनी ब्राम्हणांचा पक्ष उचलून धरला आणि हा ब्राह्मण- बाह्मणेतर वाद आणखी चिघळत गेला.

छत्रपती शाहूंनी यापूर्वी टिळकांच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीला मदत केली होती. ते या संस्थेचे अध्यक्ष होते, तरीसुद्धा टिळकांनी शाहु महाराजांचा अपेक्षाभंग केला. समाजपरिवर्तनाच्या संदर्भात टिळकांची भूमिका नेहमीच कट्टर ब्राम्हणी सनातनी ठरत आलेली दिसते.

याच काळात डिप्रेस्ड क्लास मिशन अखिल भारतीय अधिवेशन घेण्यात आले होते या अधिवेशनाचे अध्यक्ष महाराज सयाजीराव गायकवाड होते.
या अधिवेशनात मी माझ्या वैयक्तिक जीवनात स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद बाळगणार नाही अशा निवेदनावर सर्वांनी सह्या केल्या; पण टिळकांनी मात्र यावर सही केली नाही.

टिळक म्हणत, समाजसुधारणेत राजसत्तेने कायद्याचा वापर करू नये.
यानंतर पुढे टिळकांनी आपली भूमिका बदलली. तरी पण शाहूराजे व मराठे जात शूद्रच; यावर ते ठाम राहीले
पण शाहू छत्रपती आहेत म्हणून त्यांना वेदोक्त पद्धतीने संस्कार करण्याचे अधिकार आहेत. पण इतर मराठ्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही असं टीळकांचं मत होतं

या प्रकरणात शाहू महाराजांच्या मित्रमंडळीनी शाहुमहारांजांना हे प्रकरण सबुरीने प्रकरण हाताळा आणि निर्णय घ्या नाहीतर महाराष्ट्र ब्राह्मण आणि मराठे असा संघर्ष वाढत जाईल अशी विनंती केली.

कोल्हापूरचा आणि बडोद्याचा वेदोक्ताचा हा संघर्ष हा फक्त राजसत्ता आणि धर्मसत्तेतला संघर्ष नव्हता, तर तो तथाकथित धर्मपंडितांनी वर्णव्यवस्थेनुसार निर्माण केलेला उच्च आणि नीच असा संघर्ष होता

यामुळे छत्रपती शाहू महाराजांना आणि सयाजीराव गायकवाडांना राजकीय आणि आरोग्याच्या दृष्टीने खुप त्रास सहन करावा लागला.

आपल्या सारख्या राजांनाचं जर शुद्र ठरवुन शुद्रांसारखी हिन वागणुक दिली जात असेल. तर वर्षानुवर्षे अस्पृश्य ठरवलेला सोशित आणि वंचित समाजाचे काय हाल होत असतील. अशी भावना त्यांनी व्यक्त केली
आणि याच प्रेरणेतून महाराजा सयाजीराव आणि शाहु महाराजांनी मागासलेल्या जाती-जमातीच्या मुलांना शिकवून संघटित केले पाहिजे असे ठरविले. अठरापगड जातींच्या मुलांसाठी कोल्हापूर आणि बडोद्या वेगवेगळी वसतिगृहे सुरू केली, शाळा उभारल्या

महाराज सयाजीरावांनी परदेशी शिक्षणासाठी अस्पृश्य जातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली.
आणि या शिष्यवृतीचे पहीले लाभार्थी ठरले…डाॅ. बाबासाहेब आंबेडकर..

मराठा राजांना शूद्र ठरवणारे वेदोक्त प्रकरण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासुन सुरु झाले. त्यानंतर ते छत्रपती घराण्याशी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सुरूच राहिले
नंतर साताऱ्याचे महाराज प्रतापसिंह यांच्या कार्यकाळातही त्यांना वेदोक्त प्रकरणाचा सामना करावा लागला
पुढे बडोद्याच्या महाराज सयाजीरावांपासुन, छत्रपती शाहुमहारांजापर्यंत

आणि आता हल्लीचं मार्च २०२३ मध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी सयोंगिताराजे यांना शुद्र ठरवुन नाशिकच्या काळाराम मंदिरातल्या ब्राम्हणांनी वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला होता..

धर्माने लादलेल्या वर्णव्यवस्थेनुसार इथल्या महाराजांनासुध्दा अपमानजनक हीन वागणुक मिळाली.
त्यामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना महाराज सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहु महाराज यानी मदत केली हे हिणवण्यापेक्षा
त्यांना बाबासाहेबांना मदत करावीशी का वाटली ?
याचा विचार सर्वांनी केला पाहीजे.

— एक मुकनायक स्वसिस

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

2 Comments

Leave a Reply to दैनिक जागृत भारत Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!