राज्यात 34 जिल्ह्यांत सुसज्ज रुग्णालये, एक महिन्यात 19,695 कर्मचारी भरती:आरोग्यावरील खर्च दुप्पट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारणे तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी युद्धपातळीवर पावलं टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य विभागाला दिले आहे. येत्या पंधरा दिवसांत सचिवांच्या समितीने नवीन वैदयकीय महाविद्यालयांच्या जोडीने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त जिल्हा रुग्णालये उभारण्याबाबत आराखडा तयार करण्याचे सांगतांनाच वर्ष २०३५ पर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी एक आरोग्याचे सर्वंकष व्हिजन तयार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.
जिल्हा नियोजनमधून औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. वेळ न गमावता जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील औषध खरेदी, वैद्यकीय उपकरण खरेदी दरपत्रकानुसार तत्काळ करून घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही जिल्ह्यातून रुग्णालयांमधून औषधे नाहीत, अशी तक्रार येता कामा नये, याची काळजी घेण्याच्याही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहे.
सार्वजनिक आरोग्यावरील खर्च वाढविणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक देखील आली पाहिजे. पंधराव्या वित्त आयोगाने दिलेला निधी पुढील मार्चपर्यंत खर्च करायला हवा. आरोग्याच्या पायाभूत सुविधांवरील अपेक्षित खर्च देखील झाला पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. रुग्णवाहिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य संस्थांचे बांधकाम, वैद्यकीय उपकरणांसाठी ८३३१ कोटी निधी पुरवणी मागणीसह मंजूर करण्यात येत असून १२६३ कोटी अतिरिक्त निधी देखील लागणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.याशिवाय हडको कडून १४१ आरोग्य संस्थांच्या बांधकामासाठी ३९४८ कोटी निधी मंजूर झाला असून तो देखील वेळेत खर्च करायला हवा. आशियाई विकास बँकेकडून ५१७७ कोटींचे कर्ज नवीन आरोग्य संस्थांसाठी मिळणार आहे. केंद्र सरकार पाहिजे तेवढं निधी द्यायला तयार आहे. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण या विभागांना मिळालेला निधी जास्तीत जास्त ३१ मार्च पर्यंत खर्च करावा असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत