दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
जगामध्ये भारताची प्रतिमा मलिन करणाऱ्या “मिडिया”वर तात्काळ बंदी घाला!

महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते भिवंडी.
सोमवार दि.12 मे 2025.
मो.नं. 8888182324.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिडीयाने वर्ष 2014 पासून जनमाणसात असणारी आपली विश्वसार्हता गमावली असल्याचे मी अनेक लेखांमधून म्हटले आहे. *ब्रेंकींग न्यूज देण्याच्या घाईत मनाला वाटेल तसे बातम्या देण्याचा बेजबाबदारपणा मिडियाने दाखविला आहे. हे सर्व कमी होते की काय तर युध्दाच्या खोट्या अतिरंजक बातम्या देऊन जगात भारताची प्रतिमा मलिन करुन टाकली आहे.* अशा बातम्या देताना त्या खोट्या होत्या हे सिध्द होऊनही सरकार त्यांच्यावर कारवाई करत नसेल, तर सरकारच्या संमितीनेच अशा खोट्या बातम्या पेरल्याचे सिध्द होत आहे.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने अचानक पाकिस्तान वर हल्ला केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. संध्याकाळी सुरु झालेले युध्द रात्री उशीरापर्यंत सुरु होते. पाकिस्तानची राजधानी कराची ताब्यात घेईपर्यंत बातम्या येऊ लागल्या. पाकिस्तानच्या विविध शहरात भारताने बाँब वर्षाव केल्याने तिथे हाहःकार माजल्याचे दाखविले गेले. तसेच पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख बंकर मध्ये लपल्याचे आणि लष्कर प्रमुखाला पदुच्युत करुन ताब्यात घेईपर्यंत मिडिया पोहचली. या बातम्या दाखविताना मिडिया प्रतिनिधी प्रत्यक्ष जागेवर हजर होती असे भासवले गेले. तसेच पाकिस्तानचे सर्व हल्ले कसे परतावून लावले हे व्हिडिओ गेमचे चित्र दाखवून फसविले गेले. *हे सर्व पाहत असताना मनात शंकेची पाल चुकचुकली की, पाकिस्तान बेचिराख होऊन भारताच्या ताब्यात येण्याची वेळ आली तरी अजून चीन व अमेरीका गप्प का? पाकिस्तान कितीही चूकीचा असला तरी चीन व अमेरिका त्याच्या बाजूने सदैव उभे राहणारे आता गेले कुठे? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला.* त्याच रात्री मी लेख लिहीला असता तर सैनिकांचा अपमान केला म्हणून देशद्रोहाचा खटला दाखल केला गेला असता. खरेतर भारताने पाकिस्तानच्या काही अतिरेकी तळांवर बाँब हल्ला केला होता. याला युध्द म्हणत नसून चकमक म्हणतात. अशा चकमकी सिमारेषांवर नेहमीच घडत असतात. यावेळी फक्त त्याची व्याप्ती थोडी मोठी होती. म्हणून मिडियाने त्याला थेट युध्दाची उपमा देऊन टाकली. खरेच भारताने युध्द छेडले का, याची अधिकृत घोषणा केली का, याची खातरजमा करण्याची गरज मीडियाला वाटली नाही.
भारताच्या सैनिकांच्या शौर्यावर शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अनेक युध्दांचा अनुभव असलेले आणि सशक्त तिन्ही दल असताना जगात कोणत्याही देशाशी दोन हात करण्याची ताकद आपल्या सैनिकांमध्ये आहे. *पण, सिमेवर आपले सैनिक जीवाची बाजी लावून लढत असताना त्यांचे मनोबल वाढविण्याएवजी सैनिकांच्या वेशातील बॅनर लावून पंतप्रधानांचा जयजयकार करणे कितपत योग्य आहे? युध्द म्हणजे विध्वंसच, युध्दाने कोणाचाच फायदा होत नाही, आणि आता तर अणूयुध्द, म्हणजे न परवडणारेच, याने विनाशच. म्हणून जगाला "युध्दाची नव्हे तर बुध्दाची गरज आहे" असे नेहमीच म्हटले जाते. (योगायोगाने आज बुध्द पोर्णिमाच आहे) पण स्वसंरक्षणासाठी आपली सैनिकी ताकद मजबूत हवीच.* शहरात सुरक्षित ठिकाणी राहून युध्द हवे म्हणणाऱ्यांनी एकदा सिमावर्ती भागात जाऊन तेथील जनजीवन पहावे. ज्या गोष्टीसाठी भारताने अतिरेकी तळांवर हल्ले केले त्याचा मूळ असेलेले ते सहा अतिरेकी कुठे आहेत? हा राज ठाकरेंचा सवाल योग्यच आहे ना?
मिडियाच्या जोरावर खोटे युध्द पुकारुन त्याचा शेवट काय, तर युध्द विराम? ते ही याची घोषणा कोणी केली तर, अमेरीकेने. यांना काय अधिकार युध्द थांबवण्याचा? *एकुणच मिडियाने खोटे युध्द जगाला दाखवून भारताची प्रतिमा जगात मलिन केली आहे. त्यामुळे ज्या ज्या चँनेलने या खोट्या बातम्या दाखविल्या त्या चँनेलवर तात्काळ कायमस्वरूपी बंदी घालावी.* नाहीतर या खोट्या बातम्या सरकार पुरस्कृतच होत्या असेच मानले जाईल!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत