महामानवाचे महापरिनिर्वाण

भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ ला महापरिनिर्वाण झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे प्रकांड पंडीत, बंडखोर शूरविर होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे आधुनिक भारताच्या निर्मात्यांचे दुःखद जाणे होते. साहजिकच संपूर्ण भारत देश दुःखसागरात बुडाला. देशविदेशातील अनेक मानवतावादी जनसमुदाय दुःख सागरात लोटला गेला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी व चाहत्यांच्या दुःखाला सिमाच नव्हती. त्याकाळी आजच्या सारखी प्रसारमाध्यमे व प्रवासाचे साधने नसतानाही रेडीओवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाच्या एका बातमीने देशभरातून मिळेल त्या साधनांनी वाहनांनी १५ ते २० लाखांचा समुदायाने अंत्यदर्शनासाठी मुंबई गाठली होती. आलेला प्रत्येक जण अक्षरशः ओक्षाबोक्षा रडत होता. अनेक जण अक्षरश: जमिनीवर दुःखावेगाने लोळत होते. डोके आपटून घेत होते. अक्षरशः मुंबई विविध क्षेत्रांतील माणसांनी फुलून गेली होती. मुंबईच्या रस्तोरस्ती माणसांचा जनसागर होता. कधीच न थांबणारी मुंबई ७ डिसेंबरला अक्षरशः थांबली होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कार्यमग्न होते. त्यांच्या तत्कालीन अनेक सहकार्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांचा दिनक्रम लिहून ठेवलेला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रविवार २ डिसेंबरला सकाळी सव्वा सातला बिछान्यातून उठले, चहा घेतला कार्ल मार्क्सचे ‘दास कॅपिटल’ या ग्रंथातील मजकूर परत डोळ्यांखालून घातला. Buddha & His Dhamma ‘ या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले नानकचंद रतू टाईप करत होते. हे काम संध्याकाळपर्यंत चालले. दिनांक ४ डिसेंबरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सकाळी ८-४५ ला उठले. ११ वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी विचारविनिमय करण्याची विनंती केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना यासंबंधी आपण उद्या रात्री ८-३० च्या नंतर चर्चा करू असे सांगितले. दिनांक ५ डिसेंबर १९५६ ला नानकचंद ऑफिस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले. तसा बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. बाबासाहेबांना झोप लागत नव्हती ते अस्वस्थ होते. अशा परिस्थितीतही बाबासाहेब मधूनमधून ‘Buddha & His Dhamma ‘ या ग्रंथांचा मजकूर लिहित होते ३-४ कागद लिहून झाले होते. तेव्हा नानकचंद संध्याकाळी ५-३० आले त्यावेळी बाबासाहेबांचा चेहरा म्लान झालेला व अस्वस्थ असलेले त्याला दिसले त्यांनी नानकचंदला लिहिलेले कागद टाईप करण्यास दिले. त्यानंतर काही वेळ गेल्यावर संध्याकाळी बाबासाहेब डोळे मिटून हळू आवाजात ‘बुद्धं शरणं गच्छामि ‘ त्रिशरण म्हणू लागले. नंतर त्यांनी नानकचंद ला ‘बुद्ध भक्तिगीते ‘हि रेकॉर्ड लावायला सांगितली व त्या गीतांबरोबर आपणही गुणगुणू लागले नोकराने जेवण आणले तेव्हा बाबासाहेब म्हणाले ‘ जेवणाची इच्छा नाही ‘ पंरतु नानकचंद ने आग्रहाने जेवावयास उठवले डायनिंग हॉलच्या दोन्ही बाजूंना भिंतींच्या कडेने ग्रंथांची कपाटे ओळीने लावलेली होती. त्या ग्रंथांच्या कपाटांना पाहत पाहत बाबासाहेबांनी एक दीर्घ निःश्वास सोडला आणि हळूहळू चालत डायनिंग टेबलापाशी गेले. इच्छा नसतांना दोन घास खाल्ले नंतर नानकचंद ला डोक्याला तेल लावून मसाज करायला सांगितले मसाज संपल्यावर ते काठीच्या साहाय्याने उभे राहिले आणि एकदम मोठ्यांदा म्हणाले ,” चल उचल कबीरा, तेरा भवसागर डेरा.” त्यावेळी ते फार थकलेले दिसत होते, चेहराही एकदम निस्तेज झाला होता. त्यांना झोप येऊ लागली तेव्हा नानकचंद ने जाण्याची परवानगी मागितली . ते म्हणाले ” जा आता . पण उद्या सकाळी लवकर ये. लिहिलेला मजकूर टाईप करावयाचा आहे .” नानकचंद निघाले तेव्हा रात्रीचे ११-१५ झाले होते.
दिनांक ६ डिसेंबर १९५६ ला नानाकचंद सकाळी नेहमीपेक्षा उशीराच उठेल ते सायकल बाहेर काढतात तोपर्यंत तर दारावर सुदाम उभा राहिला म्हणाला ‘माईसाहेबांनी (डॉ.सविता आंबेडकर) तुम्हांला लागलीच बोलावले आहे. नानकचंद तसेच निघाले त्यांनी सुदामला विचारले एवढ्या घाईने का बोलावले आहे ? आणि बंगल्यावर पोहचल्यावर ते बाबासाहेबांच्या बिछान्याजवळ गेले आणि म्हणाले ” बाबासाहेब मी आलोय ! असे भांबवून मोठयांदा ओरडले . साहेबांच्या अंगाला हात लावला त्यांना ते गरम असल्याचा भास झाला म्हणून ते छातीचा मसाज करू लागले ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा कळून चुकले कि, बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रचंड ग्रंथ आटोपलेला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेल्याचे पाहून नानकचंद रत्तू मोठ्यांनी रडू लागले. बंगल्यातील सर्व जण गोळा झाले. माळ्याने तर बाबासाहेबांच्या पायावर लोळण घेतली आणि तोही रडू लागला.
पुढची व्यवस्था करायची म्हणून नानकचंद यांनी ९ वाजता फोन करण्यास सुरवात केली व सर्वांना हि बातमी कळविली आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह मुंबईस राजगृह येथे विमानाने आणण्यात येणार आहे हि बातमी मुंबईतील लोकांना कळली तेव्हा लोकांचे थवेच्याथवे विमानतळाकडे जाऊ लागले. दिल्लीहून बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन विमान मुंबईला निघाले.
सांताक्रूझ विमानतळावर रात्री उतरले .तिथे आधीच सगळी व्यवस्था करण्यात आली होती .अॅम्ब्यूलन्स विमानतळावरून राजगृहाकडे जाण्यास निघाली. हजारो लोक थंडीत कुडकुडत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातात हार घेऊन व डोळ्यातून अश्रूंना वाट करून देत उभे होते. वंदना घेत घेत अॅम्ब्यूलन्स हळूहळू चालत राजगृहाला आली. तेव्हा राजगृहापुढे जमलेल्या लाखो लोकांच्या तोंडून एकच आर्त स्वर निघाला .’बाबा ! ‘ आणि ते रडू लागले स्त्रियांचा आक्रोश तर विचारायलाच नको ! मातांनी आपली मुले बाबांच्या चरणावर घातली. काहींनी भिंतीवर डोकी आपटली, कित्येकजणी मुर्च्छित पडल्या. हिंदू कॉलनीतील सवर्ण हिंदूंना बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत तीन-चार तास उभे राहावे लागले. हिंदू कॉलनीतील लोकांनी आमच्या वस्तीतील ज्ञानियांचा राजा गेला ! आमच्या हिंदू कॉलनीचे भूषण हरवले ! असे उद्गार काढले.
एवढी लाखोंची जरी गर्दी तेथे जमली होती तरी लोक अत्यंत शिस्तीने अत्यंदर्शनासाठी उभे होते. बाबांचा पार्थिव देह राजगृहात आणल्यानंतर बौद्ध भिक्षूंनी धार्मिक विधी पार पाडला हा विधी अत्यंत साधा होता. नंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहावर शुभ्र वस्त्रे चढविण्यात आली पार्थिव देहाजवळ असंख्य मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. त्यांच्या उशाला बुद्धांची एक मूर्ती होती. दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे दोन लाख लोकांनी अंत्यदर्शन घेतले.
बाबासाहेबांच्या दुःखद निधनामुळे सुमारे दोनलक्ष कामगारांनी हरताळ पाळला. त्यामुळे पंचवीस कापड गिरण्या पूर्णपणे बंद होत्या.दुकाने बंद केली होती. शाळा कॉलेजमधील बंद होते. फुलांनी सजविलेल्या ट्रकवर बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला त्या मागे बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती. पार्थिवाशेजारीच त्यांचे पुत्र यशवंतराव उपाख्य भय्यासाहेब आंबेडकर व पुतणे मुकुंदराव आंबेडकर बसले होते. दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी अंतिम दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. एवढी मोठी प्रचंड गर्दी ! पण बेशिस्त वर्तनाचा एकही प्रकार कुठेही घडला नाही.
अशाप्रकारे डॉ. बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली परळ नाक्यापासून एल्फिन्स्टनरोडकडे निघाली तेव्हा जिकडे तिकडे माणसांशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते.बरोबर दिनांक ७ डिसेंबर ५ वाजता महायात्रा दादरच्या चौपाटीवर आली. डॉ.बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देण्यासाठी भागेश्वर स्मशानभूमीतच समुद्राच्या बाजूच्या भिंतीलगत एक वाळूचा प्रचंड चौथरा तयार करण्यात आला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पार्थिव शरीर ट्रकच्या खाली उतरविण्यात आले मेणबत्यांचे तबके घेतलेले चार भिक्षु पुढे होते. बाबासाहेबांचे पार्थिव सर्वांना दिसेल अशाप्रकारे एका उंच ठेवण्यात आले. मुंबई सरकारतर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुंबईतील व बाहेरगावची अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होती. भिक्षूंनी धार्मिक विधीस प्रारंभ केला ते करूण दृश्य पाहतांना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांचा हा विधी आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यानंतर बाबासाहेबांचे शव चंदनाच्या चितेवर चढविले आणि डॉ.बाबासाहेबांच्या पार्थिवाला सशत्र पोलीस दलाने बंदुकीने बार काढून मानवंदना दिली व बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला पुत्र यशवंतराव यांच्या हस्ते संध्याकाळी ७-१५ वाजता अग्नी देण्यात आला. पार्थिवाला अग्नी देताच अनुयायांना संयम आवरता आला नाही ते चीतेकडे धावले ओक्साबोक्शी रडू लागले . व त्यांनी पुन्हा ‘ बाबांचे ‘ शेवटचे दर्शन घेतले. आणि काही क्षणात बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंतात विलीन झाला.
रविवार दिनांक ९ डिसेंबरला सकाळी ८ वाजता दादर चौपाटीवर विस्तीर्ण वाळूच्या पटांगणात जाहीर शोकसभा झाली अध्यक्ष भदंत कौसल्यायन हे होते. अनेक वक्ते उपस्थितीत होते. अनेकांची भाषणे झाली श्रीमती रेणू चक्रवर्ती यांनी भाषणात हे उद्गार काढले ‘ आम्हा तरुण सभासदांना डॉ.आंबेडकर यांच्या सान्निध्यात राहण्याचा अगर त्यांच्यबरोबर काम करण्याचा सुयोग मिळाला नाही. डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना व हिंदू कायद्याची संहिता जी मुळ तयार केली होती , ती उकृष्ट होती. आणि जोपर्यंत या दोन कृती भारतात अस्तीत्वात राहतील तोपर्यंत आंबेडकरांच्या अद्वितीय बुद्धीमत्तेचा व कर्तुत्वाचा स्मृतीदीप भारतात तेवत राहील .हिंदू समाजातील पिडीत व दलित लोकांना त्यांनी ज्ञानाची संजीवनी पाजून जिवंत केले आणि आपल्या मानवी हक्कांसाठी लढण्यास उभे केले. त्याचप्रमाणे त्यांनी पददलितांबद्दलची वरिष्ठ वर्गाची दृष्टी बदलून टाकली हे त्यांचे अनुपम थोर राष्ट्रकार्य होय.
त्यानंतर आचार्य प्र.के. अत्रे यांचे भाषण झाले ते म्हणाले या महान नेत्याच्या मृत्युच्या मृत्यूने आज मृत्यूचीच किव वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले स्वत:चेच हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत ? मग त्याने इतिहास निर्माण करण्याऱ्या एका महान जीवनाच्या या ग्रंथावर, इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली ? भारताला महापुरुषांची वाण कधी पडली नाही परंतु असा युगपुरुष शतकाशतकात तरी होणार नाही. झंझावातालाही मागे सारणारा महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड असा बंडखोर शूरवीर बहाद्दर महापुरुष आज विद्वतेचा महासागर या महासागरा शेजारी विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत. महामानवास माझे त्रिवार अभिवादन व कोटी कोटी प्रणाम. 🙏
बालासाहेब लोणे,
नांदेड 9421756489
राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन फक्त चैत्यभूमीतून!
काल दुपारी एका जवळच्या मित्राचा अचानक फोन आला. काय करतोस? त्यानं विचारलं! काही नाही रे, सहा डिसेंबरच्या कार्यक्रमाचं थोडं लिखाण करतोय! मी त्याला म्हणालो. त्यावर त्यानं दुसरा प्रश्न केला सहा डिसेंबरला कुठं आहेस? मी त्रासिकपणे त्याला म्हटलं मूर्ख आहेस का? पाच आणि सहा डिसेंबरला मी चैत्यभूमीला असणार! ये भेटू आपण तेथेच! त्यावर तो म्हणाला, नको रे,खूप गर्दी असते,नाका तोंडात धूळ जाते, आम्ही घरूनच अभिवादन करू! मी त्याला म्हणालो, मी काही बोलण्याआधीच फोन ठेव,तसा त्यानं फोन ठेवला.
नको रे,खूप गर्दी असते, नाका तोंडात धूळ जाते, आम्ही घरूनच अभिवादन करतो! असे पांढरपेशी शब्द आज सहजगत्या ऐकायला मिळतात. डॉ. बाबासाहेब आणि क्रांतिस्फूर्ती रमाईच्या त्यागातून सृजनशील झालेली पिढी (काही अपवाद वगळता) आज चळवळीपासून दूर जात आहे. त्यांना त्यांचा व्हाइट कॉलर समाज म्हणजे आपलं विश्व वाटतं. अशी लोकं जेंव्हा मरतात तेंव्हा त्यांच्या मयतला जितकी लोकं येतात त्यापेक्षा चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मुलांच्या जन्मदिवसाला जास्त असतात.
आम्ही घरूनच अभिवादन करू! ही एक नवी जमात तयार होत आहे. नको रे बाबा, नाकातोंडात धूळ जाते. असं म्हणणाऱ्यांना कुठं ठाऊक आहे कि, चैत्यभूमीची धूळ ज्यांच्या नाकातोंडात जाते, तेच लोक वर्षभर आंबेडकरी आंदोलन जगवतात, अन्याय,अत्याचारा विरुद्ध लढतात म्हणून तुमची लेकरं चांगलं शिक्षण घेतात,तुम्ही शांतपणे झोपता,सुट्ट्या एन्जॉय करता.
सध्या समाज माध्यमांवर काही संघटनांनी आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मुंबईत वस्ती पातळीवर दिवसभराच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचे संदेश फिरत आहेत. खरं पाहता अशा लोकांच्या बुद्धीची कीव येते. एका बाजूला इथला प्रतिगामी चैत्यभूमी वरील गर्दी कमी करण्यासाठी हरतऱ्हेने प्रयन्त करीत आहे. त्यासाठी त्यांनी सहा डिसेंबर दिनी बाबरी मशिद पाडली. दंगली घडविल्या तरी देखील जनता पुढील वर्षी आपल्या उद्धारकर्त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलीच!मुंबईतील वस्ती पातळीवर महापरिनिर्वाण दिनी वय दहा ते पंधरा वर्षे वयाच्या मुला मुलींचे दिवसभराचे कार्यक्रम राबवून हे बुद्धीशत्रू काय साध्य करू इच्छितात? अशा कार्यक्रमाचं वारं भविष्यात मुंबई आणि आसपासच्या परिसरात पसरलं तर जी मुलंमुली महापरिनिर्वाण दिनी वस्ती पातळीवरील कार्यक्रमात दिवसभर अडकून राहिली आहेत, त्यांना चैत्यभूमी आणि सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाचं महत्व कधी कळणार? हिच मुलं मुली जेंव्हा वीस पंचवीस वर्षांची होतील तेंव्हा तुम्हांला विचारतील सहा डिसेंबर महापरिनिर्वाण म्हणजे काय, त्या दिवशी चैत्यभूमी वर काय असतं? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? केवळ आपलं अस्तित्व सिद्ध करण्याच्या धडपडीत आंबेडकरी समाजातील काही बुद्धिशत्रू लोकं मुंबईत वस्ती पातळीवर कार्यक्रमाचं आयोजन करून चैत्यभूमी वरील जमाव कमी करू पाहत आहेत. जे येथील ब्राह्मणी व्यवस्थेला अपेक्षित आहे. जनतेने अशांना वेळीच ओळखलं पाहिजे. वस्ती पातळीवरील कार्यक्रमात अडकुन न राहता चैत्यभूमीत येऊन
स्वच्छ चैत्यभूमी अभियान, शांत चैत्यभूमी अभियान,भारतीय लोकसत्ताक संघटनेचे एक पुस्तक अभियान यांसारख्या अभियानाला मदत करता येऊ शकते.त्याशिवाय चैत्यभूमी येथे जगाच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी काहीतरी उपाय करता येईल. म्हणूनच आता एकच निर्धार काहीही असो, सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी इतर कोणत्याही कार्यक्रमचं आयोजन मुंबईत वस्ती पातळीवर न करता आपल्या लेकरांसह चैत्यभूमीवर यायचं, तेथील धूळ त्यांच्या नाकातोंडात जाऊ द्या,त्यातूनच त्यांना आंबेडकरी चळवळीचे संस्कार मिळू द्या. त्यांना कळू द्या,आपल्या उद्धरकर्त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोणीही कोणालाही कोणत्याही प्रकारचे आमंत्रण न देता स्वयं शिस्तीने,स्वयं प्रेरणेने येणारा समाज किती प्रगतशील आहे. त्याच चैत्यभूमीतुन आंबेडकरी चळवळीची सूत्र त्यांच्या खांद्यावर द्या! चैत्यभूमीतूनच त्यांना आंबेडकरी चळवळीची जाणीव होऊ द्या! या जाणिवेसाठीच राष्ट्र निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन फक्त चैत्यभूमीतून!
राजवन्त
(पनवेल) 9702262353
नमो बुद्धाय 🪷 जयभीम
🪷भवतु सब्ब मङ्गलं !!🪷
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत