बौद्धांनी नवनिर्मितीचा विचार करावा !
🔲 समाज माध्यमातून साभार
सध्या बौद्धांनी दिवाळी साजरी करू नये अशा मथळ्याखालील लेख तसेच दिवाळी बौद्धांचीच अशा मथळ्याखालील लेख सुद्धा वाचायला मिळत आहेत. त्यामुळे बौद्धांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. बौद्ध लोक गोधळलेल्या स्थितीत आहेत की, बौद्धांनी दिवाळी साजरी करायची की करू नये? मित्रांनो हा एकच विषय नाही, असे अजून काही विषय आहेत तिथे बौद्ध समाज निर्णय घेऊ शकला नाही. ते विषय म्हणजे,
१) बाबासाहेबांनी विपश्यना स्वीकारली की नाकारली?
२) धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ ऑक्टोबर की विजयादशमी?
३) बौद्धांनी जनगणनेत फक्त बौद्ध लिहावे की बौद्ध लिहून आपली पूर्वाश्रमीची जातही लिहावी.
अशा विषयामुळे बौद्ध समाज कधीच संघटीत होऊ शकणार नाही. बौद्ध समाज अशाच विषयात गुंतून राहावा, त्याचे लक्ष प्रबुद्ध भारत निर्माण करणे व शासनकर्ती जमत बनणे याकडे जाऊ नये, यासाठीच अशा विषयांचे नियोजन असते की काय? अशी आता शंका येऊ लागली आहे. कारण संघर्ष हा बुद्धिजम व ब्राम्हणवाद मधील आहे.
आज हिंदूंचे मान्यताप्राप्त असणारे काही सण हे बौद्धांचेच आहेत असे सांगण्याचा आपल्यातीलच काही अती-विद्वान मंडळी प्रयत्न करीत आहेत. यावर या विद्वान मंडळींना मला एकच सांगायचे आहे की, पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदीर पूर्वीचे बुद्ध विहार आहे हे माहीत असताना सुद्धा, जेव्हा रमाईने पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली तेव्हा बाबासाहेबांनी त्यांची ती इच्छा कधीच पूर्ण केली नाही; कारण ते पूर्वीचे जरी बुद्ध विहार होते, परंतु आता ते हिंदूंचे विठ्ठल मंदीर आहे, आणि या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता, त्यांच्या सावलीचाही देवाला विटाळ होत होता, दुरूनच दर्शन घ्यावे लागत होते. ही वर्तमान परिस्थिती बाबासाहेबांनी स्वीकारली आणि म्हणूनच त्यांनी आपल्या लाडक्या रामुची इच्छा पूर्ण केली नाही. परंतु त्यांनी रामुला अश्वासन दिले की, आपण नवीन पंढरपूर निर्माण करू, जिथे सर्वांना प्रवेश असेल, कोणाशीही भेदभाव होणार नाही.
या उदाहरणावरून स्पष्ट दिसते की, बाबासाहेब हे नवनिर्मितीच्या विचारांचे होते. त्यामुळे आजच्या बौद्धांनी बाबासाहेबांचा नवनिर्मितीचा विचार डोळ्या समोर ठेऊन बौद्धांची स्वतंत्र अशी नवी संस्कृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता काळ बराच लोटला आहे. त्यामध्ये अनेक घडामोडी झालेल्या आहेत. यातूनच आम्हाला आमच्या नव्या संस्कृतीचा विचार करावा लागणार आहे. यावर विचार केल्यास बाबासाहेब म्हणाले होते की, शाहू महाराजांचा जन्मदिवस सणासारखा साजरा करा.
आपण सुरवात करूया. १ जानेवारी तसेच बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीमाई, रमाई, तथागत बुद्ध, सम्राट अशोक यांची जयंती सण म्हणून आम्ही साजरा करू शकतो. धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ ऑक्टोबर की विजयादशमी हा वाद करीत बसण्या पेक्षा १४ऑक्टोबरला प्रबोधन करू आणि विजयादशमी दिनाला सण म्हणून साजरा करू. हे आम्ही करू शकलो तर बौद्धांची एक स्वतंत्र अशी नवी संस्कृती निर्माण होऊ शकेल.
‘हिंदू धर्म हा नष्ट धर्म आहे’ असे भाकीत बाबासाहेबांनी केलेले आहे. हिंदू धर्म हा तेव्हाच नष्ट धर्म होईल जेव्हा बौद्ध लोक आपल्या धम्मानुसार व २२ प्रतिज्ञानुसार आपले आचरण करतील. असे जेव्हा होईल तेव्हा हिंदुधर्मातील जात मानसिकतेला व जातिव्यवस्थेला कंटाळलेला सर्वप्रथम मागासवर्गीय हिंदू, बौद्ध धम्मात प्रवेश करील. आणि त्यानंतर हळूहळू इतर प्रवर्ग बौद्ध धम्मात आपली घर वापसी करतील. तेव्हा हिंदुस्थान नष्ट झालेला असेल व नवा प्रबुद्ध भारत उदयास येईल. अशी स्थिती ज्यावेळी निर्माण होईल तेव्हा आजची हिंदूंची जी मंदिरे आहेत ती पूर्वीची आपली बुद्ध विहारे आपोआप होतील. त्यासाठी आम्हाला कोणताच संघर्ष करण्याची गरज भासणार नाही. तेव्हा आपले लक्ष प्रबुद्ध भारत निर्मितीकडे ठेवा. बाबासाहेबांचे प्रबुद्ध भारताचे मिशन हाती घ्या. आज जे हिंदूंचे आहे ते पूर्वी बौद्धांचेच होते, कारण देशच १२०० वर्ष बौद्ध राष्ट्र होता हे जरी खरे असले तरी वर्तमानातील वास्तव स्वीकारून बौद्धांनी आपली नवी संस्कृती निर्माण करण्याचा संकल्प केला पाहिजे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत