अशोक सवाई
मी माझे वैयक्तिक कामं आटपून दुपारी कासारवाडी रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. तेव्हा वातावरणाचा दुटप्पीपणा माझ्या लक्षात आला. उन्हात असलं की चटके बसायचे आणि सावलीत आलं की गारवा वाटे. म्हणजेच हिवाळ्याचे उन्हाळ्यात जाण्याचे संक्रमण सुरू झाले होते. कासारवाडी हे मुंबई पुणे लोहमार्गावरील अप ॲन्ड डाऊनचे फक्त दोनच प्लेटफॉर्म असलेले छोटे रेल्वे स्टेशन. इथे पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या स्थानिक लोकल गाड्या शिवाय दुसऱ्या कोणत्याही गाडीचा थांबा नाही. पुणे मुंबई कडे जाणारे चाकरमानी व काॅलेजचे विद्यार्थी/विद्यार्थीनी सोडले तर या लोकलला फारसे दुसरे प्रवासी नसतात. लोकलला फर्स्टक्लास, जनरल, लेडीज व अपंगांसाठी कम्पार्टमेंट असतात. लेडीज व जनरल कम्पार्टमेंटच्या मध्ये जाळी असली की, काॅलेज कुमार जाळीजवळ येवून पोरीसोरींच्या रोखाने टिवल्याबावल्या करत असतात. पण मुलीही त्याविषयी फारशा गंभीर नसतात. हे तरूणाईतील मॅन्युअल अंडरस्टॅंडिग असते.
मी प्लेटफॉर्मवर आलो तेव्हा लोकलला अजून अर्धा पावून तास तरी वेळ होता. तिला वेळ असला, ती लेट झाली किंवा कॅन्सल झाली की, मला भलतंच बरं वाटत असते. उन, वारा, पाऊस, थंडीतही प्लॅटफॉर्मशी जन्माचे नाते असणाऱ्या पैकी मळकट, फाटक्या गोधडीत पहुडलेले दोन-चार जन आणि लोकलचे टाइम्स माहिती नसलेले तीन-चार प्रवासी सोडले तर दुसरं कुणही नव्हतं. ते प्रवाशी ही आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर अंगठे नाचवत टाईम पास करत बसलेले.
हलकीशी हवा वहात असल्याने प्लेटफॉर्म वरील झाडांची पाने सळसळत होती. झाडावर कोणते तरी वेगवेगळे पक्षी आराम फर्मावत होते. मधूनच चिमण्या प्लेटफॉर्मवर येवून चोचीत काहीतरी उचलून भूर्रर्रर्र… उडून जात. मध्येच कुत्रीमागे एखादा कुत्रा लाडे लाडे धावताना दिसायचा ती थांबली की हाही गडी थांबत असे ती धावायला लागली की हाही तिच्या मागे धावत असे. अधेमधे कोठेतरी तरी दुरून एखाद्या ढोराचा हंबरण्याचा आवाज येत होता. तिथे जर पक्षीप्रेमी सलीम शेख व निसर्गप्रेमी मारूती चितमपल्ली असते तर त्यांचा निरिक्षण करण्यात अर्धा पाऊण तास कसा गेला असता ते त्यांनाही कळले नसते. असो.
प्लेटफॉर्मवर कुणाच्या तरी सौजन्याने जिथं धातूच्या खुर्च्या बसवल्या होत्या, त्या पैकी एका खुर्चीवर मी जावून बसलो. बाजूला बॅग ठेवली, रूमाल काढला चेहरा पुसला, चष्मा पुसला, बाटलीतलं घोटभर पाणी पिऊन बॅगेतील वर्तमान पत्र उघडलं. गाडीला वेळ असल्याने माझं बरं वाटण्याचं कारण हे होतं. वाचना सारखा आनंद नाही. पण कादंबरी किंवा भाकड कथांच्या काल्पनिक दुनियेत जिव रमत नाही. निदान त्या कथा कादंबऱ्या सत्यतेशी जवळचे नाते सांगणाऱ्या तरी असायला पाहिजे. पर्यायी सोपे शब्द असतांना त्या कथा कादंबऱ्यातील विनाकारण जिभेला पिळ देवून शब्दाला विद्रृप करणारे शब्दही आवडत नाहीत. अशा शब्दातील विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचू शकत नाही.
मोठ्ठा भोंगा वाजवून एक एक्सप्रेस धाड धाड करत मुंबईच्या दिशेने निघून गेली. तिच्या हवेनं पेपर विस्कळीत झाला. तो ठिकठाक केला, तेवढ्यात तिथे एक बाई आली. सडसडीत बांध्याची, मळकट साडीतील, रंगाने सावळी असली तरी नाक नक्ष ठिकठाक होते. डोक्यावर भलं मोठं पोतं होतं. पोतं भंगाराचं असावं. अन् पाठीवर करकटल्या कपड्यात बांधलेलं तान्ह लेकरू. नजर इकडे-तिकडे फिरवून माझ्या तिन-चार फुटाच्या अंतरावर ती खाली बसली. पोतं हातानं खाली ढकललं. पाठीवरची गाठ सोडून तान्ह्याला मांडीवर घेऊन पदरानं चेहऱ्यावरचा घाम पुसत होती. पदराच्या टोकाला कसली तरी खोच पडून पदर थोडासा फाटलेला होता बहुदा भंगार गोळा करताना पदर कुंपणाच्या काटेरी तारेत अडकून फाटला असावा.
ही भंगार गोळा करणारी महिला भंगार गोळा करण्यासाठी किती आणि कुठे कुठे पायपीट करीत असेल हे तिच्या जिवालाच माहिती. वाचक हो बघा म्हणजे वाचा हो… आर्थिक दृष्टीने संपन्न असलेल्या समाज घटकाच्या दृष्टीने घरातील निरुपयोगी झालेल्या वस्तू दुसऱ्या गरीब घटकातील जिवांचे पोट जगवत असते. त्याला भंगार म्हणतात साहेब… देशात असे भंगारावर जगणारे लाखो कुटुंब असतील.
सरकारे येतात जातात. ऐन निवडणुकीच्या वेळी आम्ही गरीब जनतेसाठी अमुक करू तमुक करू बोलून तोंडाची वाफ हवेतच सोडून जातात. पण समाजातील शेवटचा गरीब घटक जिथं होता तिथंच राहत आलेला आहे. बरं कष्टाचे, मेहनतीचे, उन्हातान्हात, पाण्या-पावसात पोटासाठी राब राब राबणारी ही मंडळी दुसरे कुणीही नसून एससी/एसटी/ओबीसी समाजातील माणसे ही बहुजन समाजातील आपलीच माणसे असतात. यांपैकी एक तरी सवर्ण असेल असे वाटत नाही. संवेदनशील मनांनी थोड्या वेळ डोळे बंद कले तर वरील समाजाचे चित्र त्या बंद डोळयात स्पष्ट दिसते. असो.
हं तर त्या भंगार वाल्या महिलेला बघितल्यावर मानवतेच्या भावनेतून मला तिची दया येत होती. वाचनातून लक्ष उडालं होतं. तिनं बाटलीचं झाकन उघडलं झाकनातच पाणी घेऊन बाळाला पाजत होती. भुकेलेल्या पोटाची भूक अपूर्ण दुधामुळे भागणार नाही याची कदाचित तिला जाणिव असावी म्हणून ती बाळाची अर्धी भूक पाण्यानच भागवत होती. तिनही गटागटा दोन-चार घोट घशात ओतले, झाकण लावून बाटली बाजूला ठेवली, अन् बाळाला पदराआड घेतलं.
मी सहज विचारलं, एवढं मोठं ओझं घेऊन तुम्ही कुठं जाणार? डोळ्यासमोर आलेली केसांची बट काना मागे सारत पापण्यांची दोन वेळा उघड झाप करून माझ्याकडे तिनं एक तिरकी नजर टाकली. पण उत्तर नाही. "माझ्यासाठी मानाचे शब्द वापरणारा हा विचित्र प्राणी कोण?" कदाचित असा तिला प्रश्न पडला असावा किंवा परपुरुषांशी बोलू नये असे कदाचित तिला वाटत असावे. किंवा तिच्या शरिरावर पुरुषांच्या भिरभिरणाऱ्या नगरांचा तिला कटू अनुभव असावा. किंवा अजून दुसरं काही कारण असावं, पण उत्तर मिळालं नाही. महिला कलेक्टर असो किंवा भंगार गोळा करणारी असो दोन्ही महिलांचा मान सारखाच असतो त्यात दुजाभाव करता येणार नाही. आणि कुणी तो करू ही नये. असे माझे मत आहे.
तीनं प्लॅस्टिकच्या पिशवीतून डबा काढून उघडला. डब्यात एक कांदा, मोजून दोन तीन मिरच्या अन् भाकर होती. सोबत भाजी होती की नाही हे सांगता येणार नाही. पुन्हा दयेचे भाव मनात दाटले.
तिनं कांदा कागदावर घेऊन खाली ठेवला. मध्येच पदरही सावरत होती. कांद्यावर मुठीचा दणका हाणला पण दणका कांद्याच्या निमुळत्या भागावर बसला त्यामुळं त्यानं एक मोठ्ठी उडी घेऊन प्लॅटफॉर्म च्या खाली पडला बाईचा सावळा चेहरा कसा तरीच झाला. आता मला रहावलं नाही मी उठून निघालो आणि पाच-सहा मिनिटांनी परतही आलो. हं हे घ्या... वडापावाचं पार्सल तिच्या दिशेनं धरुन म्हणालो. तिनं दोन वेळा आळीपाळीने पार्सल आणि माझ्याकडे पाहिलं. घ्या हो... तुमच्या कांद्यानं जिव दिला म्हणून आणलं. आणि बाई खळाळून हसली. सावळा चेहराही फुलला वडापाव हातात घेऊन बोलली "दादा लै उपकार झालं बगा तुमचं... लै... भुक लागली व्हती बगा".... खावा आरामशीर खावा. भुकेच्या पोटाला दोन घास दिले याचं मोठ्ठं समाधान मिळालं. तिनं पुन्हा पदर ठिकठाक केला. तिचं तान्हूलं पिता-पिताच झोपी गेलं होतं. तीनं खालीच कपड्यावर बाळाला झोपवलं. "तुमी कुठं जाणार हाय जी?" देहूरोडला. अन् तुम्ही? "चिंचवडला जावून गोदामात हे भंगार देवून मालकाकडनं पैसं घेवून घराकडं निघायचं." बाई बोलती झाली. किती मिळतात पैसे? "कवा दिडसे मिळत्यात कवा कवा दोनशे बी" नवरा कुठं जातो कामाला? "मनात आलंय की जातो कवा कवा नाई तं मंग ढोसून पडतुया घरात." ती पोटाची भूक शमवत बोलू लागली. अजून कोण कोण आहेत घरात? "सासू हाय एक मोठी लेक बी हाय". अन् सासरा? "नाय" सासूबाई काय करतात? "घरातलं सार आवरून लेकीला साळत सोडतीया आन् दोन तीन घंट्यासाठी लोकाची धूनीभांडी करून" पोरगी साळेतनं आल्यावर तिला बी सांभाळतीया तिचा बिचारीचा लय आधार हाय बगा" सासू विषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करणारी ही बहुधा दुर्मिळ सून असावी. अधूनमधून ती तिच्या बाळाकडेही लक्ष ठेवत होती. मुलगी कोणत्या वर्गात शिकते? "दुसरीला हाय जी" बरं वाटलं ऐकून. मुलीला शिकुन काय करणार? मी तिला तिचं अंतर्मन बोलतं करण्यासाठी मुद्दाम असा प्रश्न केला. तेव्हा ती म्हणाली आमची जिंदगी वाया गेली तिची नाय जावू देणार. शिकून सवरून मोठ्ठं करून तिला सायबीन करीन" मी तिचे मनात कौतुक केले. एका भंगारवाली महिलेचे स्वप्न देखील किती उच्च असू शकतात हे तिच्या बोलण्यातून कळले. तेव्हा ती एक वडापाव कागदात गुंडाळून पिशवीत ठेवत होती ते पाहून मी म्हटलं खावा की तो बी. "नाय जी लेकी साठी ठीवते." मायची माया बघा कशी असते? तिची सर कुणी दुसरं करू शकते का?
तिनं उरलं सुरलं बाटलीतील पाणी पिऊन संपवलं. गाडी यायला अजून आठ दहा मिनिटं होती. प्लॅटफॉर्मवर हळूहळू गर्दीही वाढत होती. तिनही आवरतं घेतलं. एवढं मोठं ओझं घेऊन व बाळाला सांभाळून तुम्ही कशा जाणार? "आजचं थोडच हाय, रोजचीच जिंदगी हाय जी आमची, सवय झाली आता काय बी वाटत नाय बगा"
हे भंगार कुठं घेवून जाणार? “चिंचवडच्या भंगार गोदामात” अन् राहायला कुठे आहात? “तिथच चिंचवड झोपड पट्टीत” तिथं सर्व भंगारचाच धंदा करतात का? “सारे नाय करत, कुणी सेंगाच्या गाडीवर धंदा करत्यात, कुणी मजूरी करत्यात. कुणी बिगारी काम करत्यात, कुणी लोकाची धुनी भांडी करत्यात असं सारे आपला आपला कामधंदा करत्यात” समाजातील अगदी शेवटच्या घटकाचं जिवन जाणून घेवून त्यांचे हलाखीचे सामाजिक जिवन लिखाणातून इतर समाजा समोर पोहचवण्याची माझी इच्छा होती पण गाडी येण्याची वेळ झाली. आणि तिचेही पाय घराकडे ओढ घेत होते. तिनं बाळाला पुन्हा पाठीशी घट्ट बांधून घेतलं. चुंबळ डोक्यावर ठेवली तेवढ्यात गाडी प्लॅटफॉर्मला लागली. तिनं आवाज दिला “दादा पोत्याला हात लावा की जरा” मी पोतं उचलून सरळ डब्यात टाकलं. मात्र पोतं उचलून डब्यात टाके पर्यंत माझी चांगलीच दमछाक झाली होती. खरच स्त्रियांमध्ये इच्छा शक्ती, मनोबल, संयम, चिकाटी, कष्टाचे काम करण्याची उर्जा या साऱ्या गोष्टी निसर्गाने त्यांना एकाच वेळी कशा दिल्या हा विचार मनात येत असताना मागोमाग तीही डब्यात शिरली. छोटासा भों… करून गाडी हालली. तेव्हा तिचा कृतज्ञतेचा हात हलतांना दिसला. मी मागे वळलो अन् लक्षात आलं अरेच्चा! आपल्यालाही याच गाडीनं जायचं होतं. पुन्हा मागे वळून पाहिलं तर गाडीनं प्लॅटफॉर्मचं शेवटचं टोक सोडलेलं होतं. खंत न बाळगता मी पुन्हा पुर्वीच्या खुर्चीत येवून बसलो पुढच्या गाडीची वाट पहात. अन् पुन्हा पेपरची घडी उघडली…
- अशोक सवाई.
देहूरोड, पुणे.
91 5617 0699.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत