डॉ.बाबासाहेंबाचा २२ प्रतिज्ञा देण्या मागील उद्देश काय होता?
अशोक सवाई.
आज ६८ वा धम्मचक्र प्रवर्तक दिन आहे. आजच्याच दिवशी म्हणजे दि. १४ आक्टोबर १९५६ रोजी बरोब्बर ६७ वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी नागपूर येथे अस्पृश्य व शुद्र समजल्या जाणाऱ्या स्त्री-पुरुषांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली होती. त्या नागपूर शहराला आज साऱ्या जगात दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाते. पण त्याही आधी सम्राट अशोकांनी साधारण २३ शे वर्षापूर्वी विजया दशमी लाच पहिले धम्मचक्र गतीमान केले होते. त्याला अशोका विजया दशमी असेही म्हणतात.
जगाच्या इतिहासात कमी जास्त प्रमाणात अनेक रक्तरंजित क्रांत्या-प्रतिक्रांत्या झाल्या. परंतु बाबासाहेबांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता रक्त विरहित जी बौद्ध धम्म दीक्षा क्रांती घडवून आणली तिला जगात तोड नाही. आजही जग या क्रांतीमुळे मोठे अचंबित आहे. जगाच्या इतिहासात बाबासाहेबांच्या या क्रांतीला फार मोठे स्थान दिले जाते. जगात जेव्हा जेव्हा जागतिक इतिहास शिकवला जातो तेव्हा तेव्हा तिथे बाबासाहेबांचे नाव आल्याशिवाय राहत नाही. हे भारतीय समाजासाठी पर्यायाने भारत देशासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.
भारतीय समाजाला, पर्यायी देशाला एका नव्या दिशेला घेऊन जात असताना त्यासाठी बाबासाहेबांना आपल्या चार अपत्यांना गमवावे लागले. व शेवटी रविवार दि. २६ मे १९३५ रोजी आपली प्रिय पत्नी रमाबाईला सुद्धा (बाबासाहेब आवडीने रामू म्हणत) गमवावे लागले. माता रमाईचे जीवन म्हणजे एक अतिशय दु:खभरी कहाणी होती. पण त्याआधी बाबासाहेबांनी देशात हिंदू धर्मातील विषमता दूर करण्यासाठी सन १९२० पासून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. सतत अहोरात्र त्यावर त्यांनी काम केले. चिंतन, मनन केले. हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी जगाच्या इतिहासातील अनेक पुरावे देवून सतत सन १९३५ पर्यंत लाख परीने प्रयत्न केले. परंतु हिंदू धर्माचे ठेकेदार म्हणवणाऱ्यांनी त्यांचे एक नाही ऐकले. शेवटी त्यांना दि. १३ आक्टोबर १९३५ रोजी नाशिक मधल्या येवला येथे धर्मांतराची घोषणा करावी लागली. आणि पुढे बरोब्बर २१ वर्षांनी म्हणजे १४ आक्टोबर १९५६ या दिवशी आपल्या अनुयायां सोबत बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. ही एक फार मोठी क्रांतिकारी ऐतिहासिक घटना त्या दिवशी बाबासाहेबांनी घडवून आणली. पण त्या २१ वर्षात त्यांनी जगातील विविध धर्माचा अभ्यास करून ठेवला होता. आणि शेवटी ते आपल्या अनुयायां सोबत बौद्ध धम्माला शरण गेले. व आपल्या बौद्ध अनुयायांना जगातील १२८ बौद्ध राष्ट्रांशी जोडून ठेवले. (जगातील छोट्या मोठ्या देशात कमी जास्त प्रमाणात बौद्ध अनुयायी असलेले देश)
स्वातंत्रपूर्व काळात मनुस्मृती प्रमाणे भारतीय समाजाला चार वर्णात म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, व शुद्र अशा चार वर्णात विभागून ठेवले होते. पण शुद्राच्या खाली ही अजून एक वर्ण होता. या वर्णात महार, मांग, ढोर, चांभार वगैरे जातींचा समूह होता. हा पुर्वाश्रमीचा (आता त्यांना अनुसूचित जाती अशी भरभक्कम व सन्मानिय संविधानिक ओळख प्राप्त झाली) समूह वरील चार वर्णाच्या बाहेर असल्याने या समूहाला पंचमा किंवा अस्पृश्य म्हटले जात असे. पुर्वाश्रमीचे अस्पृश्य/आत्ताचे बौद्ध अतिशय दरिद्री जीवन जगत होते. खायला अन्न मिळत नव्हते, अंगावर कपड्याच्या रूपात करकटल्या चिंध्या होत्या. शिळ्या भाकर तुकड्या साठी सवर्णांच्या दारोदारी भटकावे लागे. तेव्हा सवर्ण मंडळी त्यांच्याविषयी अपार दया दाखवत दुरूनच त्यांच्या भगोण्यात (भगोणं म्हणजे भीक घेण्यासाठी असलेले तत्सम भांडे) कुत्र्यासारखे शिळ्या भाकरीचे तुकडे फेकत. कधी कधी ते जमिनीवर ही पडत ते तुकडे उचलून आपल्या अंगावरील कपडे वजा चिंध्यांना पुसून अस्पृश्य लोक पुन्हा आपल्या भगोण्यात ठेवत असत. तेव्हा भीक देणाऱ्याला झुकून 'जोहार मायबाप' म्हणावे लागे. असे म्हटले की, भीक देणाऱ्याच्या चेहऱ्यावर उपकार कर्त्याची भावना झळकत असे. एखाद्या दिवशी महारांना भरपूर भीक मिळाली की ते अधाशासारखे छाती पर्यंत खात बसत. त्याचे कारण असे की, आपल्याला पुढची भीक मिळेल की मिळणारच नाही याची त्यांना भ्रांत पडत असे.
सवर्णांच्या दारात एखादी गाय किंवा ढोर मेले की अस्पृश्य वस्तीत दिवाळी सारखा आनंद व्हायचा. सवर्णांच्या अंगणातून ढोर ओढून नेण्याचा हक्क फक्त महारांना होता. महारांनी त्यांचे मेलेले ढोर ओढून नेल्यावर ब्राह्मण मंडळी आपले अंगण गोमुत्र/गंगाजल शिंपडत मंत्र म्हणून अंगण शुद्ध केल्याचा (?) विधी पार पाडत असत. कारण मेलेले ढोर ओढत नेण्यासाठी महार त्यांच्या अंगणात आल्यामुळे त्यांचे अंगण बाटत असे म्हणून हा शुद्धतेचा विधी करून घेत. मेलेले ढोर ओढून नेण्याचा महारांचा मोबदला काय तर मेलेल्या ढोरावर महारांचा हक्क बस फत्त एवढाच मोबदला. त्यापलीकडे काही नाही. इकडे मेलेले ढोर अस्पृश्यांच्या वस्तीत आणले की त्याची चिरफाड केली जाई व मांसाचे वाटे करून घराघरात वाटले जाई. कधी कधी वस्तीत वाटणीवरन आपसात भांडणे होत असत. पण भांडणे जास्त ताणली जात नसत. त्यानंतर ते आपल्या पुढच्या कामाला लागत. ढोराच्या पोटातील अवयव म्हणजे वजडी, फुफ्फुस, काळीज व आंतडी वगैरे भागांच्या लंब्या लंब्या चिरोट्या करून त्या दोरीवर कपडे वाळत घातल्या सारखे वाळत घालायचे. मांड्यांच्या मांसाचे छोटे छोटे तुकडे करून ते लोखंडी सळईत घालून त्या तुकड्यांना कोळशाच्या धगीवर आंच देत. त्यानंतर तुकडे रेतीतील जाड खड्यांमध्ये मस्त भाजून घेऊन थंड झाल्यावर ते तुकडे व वाळून झालेल्या चिरोट्या गाडग्यांच्या उतरंडी मध्ये साठवून ठेवत. या वाळलेल्या चिरोट्यांना 'चान्या' म्हटले जाई व भाजलेल्या मांसाच्या तुकड्यांना 'चुणचुणं' म्हटले जात असे. ज्या दिवसी खायला काही मिळाले नाही की ते थोड्याशा तेलात तिखट मीठ घालून चुणचुणं व चान्यांचे तुकडे भाजून किंवा त्याचे कालवण करून खात असत. हा प्रकार म्हणजे आजचे समुद्री सुकट होय. जसे वाळलेले मासे, वाळलेले बोंबील, वाळलेले झिंगे अशा प्रकारचे ते वाळलेले मांसाचे तुकडे होते. तेव्हाचे महार गोमांस किंवा गोवंश ढोराचे मांस जरी खात असले तरी त्यांनी आजच्या गोअंधभक्तां सारखे शेण किंवा गोमुत्र खाण्यापिण्याचा घाणेरडा प्रकार कधीही केला नाही.
अस्पृश्य लोक गावकुसाबाहेर झोपड्यांच्या गलिच्छ वस्तीत गलिच्छपणे राहत. यांना कधी कुठे आंघोळ करायला मिळाली की तो त्यांना सणासुदीचा दिवस वाटत असे. वाचक हो विचार करा. त्या काळात तलाव, ओढे, विहिरी सर्व सवर्णांनांच्या मालकीचे असल्याने ते पाणी अस्पृश्यांसाठी वर्ज्य होते. (म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि २० मार्च १९२७ या दिवशी महाड मधील चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह घडवून आणला) जिथे अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्याची मनाई नव्हे पाण्याला शिवण्याची देखील मनाई होती. तिथे सवर्ण मंडळी त्यांना स्वच्छता ठेवण्यासाठी पाण्याचा वापर करू देणार होते का? पाण्याअभावी अस्पृश्य लोक अस्वच्छ व गलिच्छ जीवन जगत होते. त्यांच्या अस्वच्छतेमुळे किंवा गलिच्छपणामुळे सवर्ण लोक त्यांची घृणा/तिरस्कार/बाट करत असत. त्यातही सोवळे आवळे धारी ब्राह्मण अतिशय कर्मठ होते. रस्त्यावर चालतांना अस्पृश्यांनी रस्ता बाटवू नये म्हणून त्यांच्या कमरेला झाडू लटकवला, रस्त्यावर थुंकू नये व त्यांच्या थुंकीने रस्ता बाटू नये म्हणून त्यांच्या गळ्यात गाडगे अडकवले,
कुल्ह्याला घंटी बांधली होती. चालताना घंटी आपोआप वाजायची. (सवर्ण मंडळी त्या अस्पृश्य माणसाची घंट्या फकीर आला रे… असा मोठा हाकारा देत हेटाळणी करत व इतर त्यांच्या सजातीय मंडळींना सावध करत असत) त्याचे कारण असे की, कर्मठ ब्राम्हणांना अस्पृश्य येत असल्याची सुचना मिळावी यासाठी. अस्पृश्य असल्याची ओळख पटावी म्हणून हातापायात जाड काळा धागा बांधणे सक्तीचे केले होते. (आत्ताचे त्यांचे लाडावलेले बाळे तोच धागा हातापायात फॅशन म्हणून घालतात. त्यांच्या पूर्वजांच्या म्हणजे ज्यांनी अस्पृश्यांसाठी अमानुष प्रथा निर्माण केल्या त्यांच्या गालावर ही काळाने ओढलेली अदृश्य चपराक होय) अस्पृश्यांना पायात चपला, जोडे घालणे वर्ज्य होते. देशाच्या काही भागात आजही मागासवर्गीय माणसांना व कुठल्याही जातीच्या स्त्रियांना सवर्णांच्या समोर चपला जोडे न घालण्याचा अलिखित दंडक आहे. रस्त्यावर विरुद्ध दिशेने कर्मठ ब्राह्मण येत असला की इकडच्या अस्पृश्य माणसाने रस्त्याच्या दूर जावून खाली बसावे. त्याचे कारण असे की, अस्पृश्यांच्या शरीराला स्पर्शून गेलेला नैसर्गिक वारा सोवळ्या ओवळ्याचे वस्त्र घातलेल्या कर्मठ ब्राह्मणाच्या अंगाला झोंबू नये म्हणून. हा त्या काळचा भयानक व अमानुष नियम होता. जो जगाच्या पाठीवर कुठेही नव्हता. कुत्रे, मांजरे, गुरेढोरे व अन्य जनावरांना भारतीय जमीनीवर मुक्त संचार करण्यास व कोणत्याही जलस्त्रोतांमधून पाणी पिण्याचा अधिकार होता पण माणसा सारखा माणूस या सर्वांपासून वंचित ठेवला होता. आम्ही किशोरवयीन असताना आमचे आजा आजी अस्पृश्यांच्या या काळजाला चरे पाडणाऱ्या कहाण्या सांगत असत. काय वाटत असेल तेव्हा आम्हाला? विचार करा. हा त्या वेळच्या अस्पृश्य समाजाचा थोडक्यात इतिहास आहे. आणि इतिहासाला खोटे बोलण्याची किंवा हातचे राखून किंवा लपवा छपवी करून बोलण्याची सवय नाही. तो जेव्हा जेव्हा बोलतो किंवा त्याला बोलण्याची गरज भासते तेव्हा तेव्हा इतिहास नीडरपणे सत्यच बोलतो. हे आजच्या नव तरुणाईने लक्षात ठेवले पाहिजे. आजच्या नवीन पिढीला इतिहासाची कल्पना नसेल म्हणून इतिहासाचे वाचन केले पाहिजे. असे माझे नेहमी आग्रहाचे सांगणे असते. अस्पृश्य लोकांचा इतिहास इतका मोठा आहे की तो जर सलगपणे मांडला किंवा लिहिला गेला तर त्याचे खंडीभर खंड निघू शकतात. असो.
बाबासाहेबांचा २२ प्रतिज्ञा देण्याचा उद्देश काय होता हा प्रश्न अनेकांना पडला असेल पडत असेल. बाबासाहेब अस्पृश्य समूहाच्या महार जातीत जन्मले होते. त्यांनी अस्पृश्य किंवा महारांचा वरील इतिहास अगदी जवळून पाहिला होता. अनुभवला होता. ते आपल्या अस्पृश्य समाजाविषयी अत्यंत चिंतीत होते. बाप लोक आपल्या मुलांची जेवढी काळजी घेत नसतील तेवढी काळजी बाबा आपल्या अस्पृश्य समाजाची घेत होते. समाजाची व्यथा, त्यांचे दारिद्र्य, त्यांची दयनीय अवस्था हे सर्व बाबांच्या डोळ्यासमोर होते. त्यांनी खूप खोलवर विचार करून बौध्द धम्माबरोबर पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाला २२ प्रतिज्ञा देण्याचा निर्णय घेतला. त्यामागे त्यांचा तर्कसंगत विचार होता. त्यांच्या २२ प्रतिज्ञां मध्ये बौद्ध धम्माचा सारा सार सामावलेला आहे. बौद्ध धम्म दिक्षा घेण्याआधी बाबासाहेबां समोर अनेक प्रश्न होते. माझा अस्पृश्य समाज हा अडाणी, अशिक्षित आहे. आर्थिक परिस्थितीने एकदम शेवटच्या स्थानावर किंवा शुन्यवत आहे. पोटासाठी दुसऱ्याच्या शिळ्या भाकर तुकड्यावर जगतो आहे. त्याला धड बोलीभाषा बोलता येत नाही. सवर्ण समाज त्यांचा तिरस्कार करतो, बाट करतो. त्यांचे शिक्षण नसल्यासारखे आहे. मग हा समाज वाचून, शिकून सवरून शहाणा कधी होईल? धम्माला कधी समजून घेईल? व नंतर त्याप्रमाणे आचरण कधी करेल. त्यानंतर स्वाभिमानाने केव्हा जगण्यासाठी समर्थ होईल? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. समजा आज आपण त्यांना बौद्ध धम्म दिक्षा दिली आणि एकाएकी हिंदू धर्म सोडून त्यांनी बौद्ध धम्माचा स्विकार केला तर ते लगेच त्याप्रमाणे आचरण कसे करू शकतील? आपले स्वाभीमानी जीवन कधी जगू शकतील? गोंधळून जातील बिचारे! आपण गेल्यावर त्यांना योग्य मार्गदाता नाही मिळाला तर कळपातील हरवलेल्या कोकरा सारखी त्यांची सैरभैर स्थिती होईल. यामुळे ते पुन्हा देव, देवतांच्या, कर्मकांडाच्या दलदलीत फसतील. आणि हिंदू धर्मातील ठेकेदार त्यांच्यावर सूड उगवल्या प्रमाणे त्यांचे हाल हाल केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा प्रतिकार तर सोडाच त्यांना ब्र सुध्दा काढता येणार नाही. त्यांचा कोणीही वाली असणार नाही. बौद्ध धम्माचा सार असलेल्या या २२ प्रतिज्ञा त्यांना धम्म दीक्षे बरोबर दिल्या तर ते लगेच समजतील किंवा समाजात जे थोडेफार शिक्षीत लोक आहेत ते त्यांना समजून सांगतील व त्याप्रमाणे ते आपले स्वाभिमानी जीवन जगण्यास सुरू करतील. व पुढे शिक्षण घेऊन नौकरी, उद्योग, व्यवसाय करून आपले समृद्ध जीवन जगू शकतील असा बाबांना विश्वास होता. आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा देण्यामागचा हा फार मोठा व महत्त्वाचा उद्देश बाबासाहेबांचा होता. मायबाप आपल्या लेकरांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी जेवढी काळजी घेत नसतील तेवढी काळजी बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी व देशासाठी घेतली होती. त्यांची हिंदू कोड बिलांसाठीची तळमळ सुद्धा असीच होती. म्हणून ज्यांना बाबासाहेब कळले ते आपल्या मातापिता व गुरू पेक्षाही त्यांना उच्च स्थानी मानतात. म्हणून आज बहुजन समाजाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने तर सुरू आहेच शिवाय आपल्या मूळ बौद्ध धम्माच्या दिशेने वेगाने होत असलेली दिसत आहे. खास करून महाराष्ट्र व उत्तर भारतात. १४ एप्रिल, (बाबाहेबांची जयंती) १४ आक्टोबर, (बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना धम्म दीक्षा दिली तो दिवस किंवा सम्राट अशोकांची विजया दशमी) ६ डिसेंबर (बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण निर्वाण झाले तो दिवस) या तीन महत्त्वाच्या दिवसी भारतातील बहुजन वर्ग मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माचा स्विकार करताना दिसतात. परदेशी लोक तर खास उडण खटोले बुक करून नागपूरच्या धम्म दीक्षा भूमीवर धम्म दीक्षा घेण्यासाठी येतात. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे. तर हा डॉ. बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेचा महिमा आहे.
आमचे एक बा. ना. धांडोरे नावाचे जेष्ठ साहित्यिक स्नेही आहेत. ते सद्या पंढरपूरला वास्तव्यास आहेत. त्यांना मी आदराने बानाजी म्हणतो. आमच्या फोनवरील संवादातून बाबांच्या २२ प्रतिज्ञांचे त्यांनी खूप सहज सुंदर शब्दात वर्णन केले. ते म्हणाले 'धनुष्याच्या ताणलेल्या प्रत्यंचा च्या सहाय्याने जो धनुर्धारी बाण सोडतो तेव्हा त्या धनुर्धारी जवळ सोडलेल्या बाणाची कोणतीही निशाणी राहात नाही पण बाण जिथे जावून भिडतो तिथे मात्र त्या बाणाची निशाणी कायम स्वरूपी उमटत असते. बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञांचे ही असेच आहे. बाबासाहेबांनी आपल्याला २२ प्रतिज्ञा दिल्या. परंतु का दिल्या हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या २२ प्रतिज्ञां मुळेच आज भारत बौद्धमय होण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. म्हणजेच बाणाची निशाणी कायम स्वरूपी उमटत चालली आहे' अशा सुंदर शब्दात त्यांनी २२ प्रतिज्ञांचे वर्णन केले. वाचकांच्या माहितीसाठी सांगतो. बानांजी जेष्ठ साहित्यिक आहेत त्यांचा एक 'नागवंश' नावाचा कथासंग्रह आहे. तो संग्रह महार लोकांच्या शौर्य गाथांवर आधारित असून त्याला ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी आहे. खूपच वाचनीय असा त्यांचा कथासंग्रह आहे. मी पूर्ण वाचून झाल्याशिवाय सोडला नाही. मला खूपच भावला. वाचकांना तो संग्रह वाचण्याची इच्छा झाल्यास मी इथे त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे. बा. ना. (बाबुराव नामदेव) धांडोरे (जेष्ठ साहित्यिक) पंढरपूर. संपर्क क्रमांक
९९ ७०६० ५२५०
आज बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दीक्षा देऊन ६७ वर्षे झाली आहेत. येत्या थोड्याच वर्षांत भारत बौद्धमय होण्याचे त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण होण्याचे दिसून येत आहे. हिंदुत्ववाद्यांनी कितीही हिंदूत्वाचा ढोल बडवला तरीही. अभ्यासू तरुणाईने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सत्याची चाल ही संथ गतीची असते परंतु शाश्वत असते. ती असत्याला कधीही/कुठेही/केव्हाही नेस्तनाबूत करून आपले अस्तित्व अनंत काळासाठीचे आहे हे सिद्ध करते.
तळटीप: माता रमाईचे महानिर्वाण रविवार दि. २६ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता झाले. (संदर्भ: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, चरित्र लेखक, चांगदेव भवानराव खैरमोडे, खंड ६, पान नं. ५९) चां. भ. खैरमोडे हे बाबासाहेबांचे समकालीन चरित्र लेखक होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९०४ चा आहे. बाबासाहेबांचा सहवास त्यांना लाभला होता. ते बाबासाहेबांचे खंदे कार्यकर्ते होते. बाबासाहेबांच्या घरी त्यांचे जाणे येणे होते. यावरून त्यांनी माता रमाईच्या महानिर्वाणाची तारीख आपल्या खंडात नमूद केली ती विश्वसनीय आहे. २७ मे ही व्हॉटसॲप वरून फिरणारी महानिर्वाणाची तारीख खरी वाटत नाही. ती गुगल सर्च ची तारीख वाटते.
आजच्या या धम्मचक्र प्रवर्तकाच्या दिवसी प्रज्ञा सूर्य क्रांति कारकाला नतमस्तक होवून अभिवादन! व आपणा सर्वांना सदर दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!
जयभीम… जय संविधान… जय भारत!
🙏🙏🙏
-अशोक सवाई.
91 5617 0699
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत