दिन विशेषधमचक्र प्रवर्तन दिन विषेशांकमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

८ मे – भदंत महास्थविर चंद्रमणी स्मृतिदिन

जन्म – ६ जून १८७३ (ब्रह्मदेश)
स्मृती – ८ मे १९७२

पूज्य चंद्रमणी यांचा जन्म १८७३ मध्ये ब्रह्मदेशातील आराकान प्रांतात झाला. ब्रह्मदेशातील बहुसंख्य लोक बौद्ध. ते भारताकडे पवित्र भावनेने पाहतात, कारण तेथे गौतम बुद्धाने आपला धर्म प्रस्थापित केला व तो जगातील इतर भागांत पसरत गेला. ब्रह्मदेश हा अशा भागांपैकी एक भाग होय. पूज्य चंद्रमणी १६ वर्षांचे असताना (१८८९) भारतात बौद्ध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी आले.

ज्या भारतात बौद्ध धर्म निर्माण झाला त्या धर्माला भारतात बहुसंख्येने अनुयायी नसावेत, हे दृश्य पाहून पूज्य चंद्रमणी यांना अत्यंत आश्चर्य आणि दुःख वाटले. भारतात राहून बौद्ध धर्मप्रसाराचे कार्य करण्याचे त्यांनी ठरविले आणि ते १८८९ पासून भारतातच राहिले. भगवान बुद्ध यांचे महानिर्वाण ज्या गावाच्या शिवेत झाले ते कुशीनगर हे गाव त्यांनी आपल्या कार्याचे केंद्र बनविले. या ठिकाणी त्यांनी बुद्ध जयंती आणि बौद्ध धर्मीयांची संमेलने भरविण्याचा पायंडा घातला. आणि त्यानंतर भारतातील इतर ठिकाणी हे कार्यक्रम होऊ लागले. बौद्ध धर्माचे उच्च शिक्षण आणि वाङ्मय प्रसार या कामासाठी त्यांनी शेकडो तरुण तरुणींना प्रोत्साहन दिले. काहीजणांना सिलोन, जपान, ब्रह्मदेश वगैरे बौद्धधर्मीय देशांत पाठवून त्यांना बौद्ध धर्माचे उच्चतम शिक्षण घेण्यास लावले. या तरुणांपैकी दोघांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांनी अनेक ग्रंथ लिहून आपल्या विद्वत्तेचा फायदा जगाला करून दिला. ते दोन बौद्ध पंडित म्हणजे आनंद कौसल्यायन आणि राहुल सांकृत्यायन. राहुल सांकृत्यायन यांनी तिबेट मध्ये राहून बौद्ध धर्माची हजारो हस्तलिखिते मिळविली आणि ती भारतात दहा बारा गाढवांच्यावर लादून आणली. बौद्ध धर्मावरील जगातील अधिकृत लेखकांच्या पंक्तीमध्ये राहुल सांकृत्यायनांचे स्थान फार वरचे आहे, ते त्यांच्या प्रदीर्घ अभ्यासामुळे व प्रयत्नांमुळे. पूजनीय चंद्रमणी यांनी कुशिनारा येथे धर्मशाळा, दवाखाने, स्तूप वगैरे बांधले. गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी शाळा काढल्या. त्यांनी कुशिनारा येथे ज्या इमारती बांधल्या त्यांची किंमत चाळीस वर्षा पूर्वी सात लाख रुपये होती. पूजनीय चंद्रमणी यांनी ब्रह्मी आणि हिंदी भाषेत बौद्ध धर्मावर विद्वत्ताप्रचुर असे अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांपैकी धम्मपद, मंगलसूक्त, भगवान बुद्धाचे चरित्र, बुद्धाचे उपदेश, वगैरे ग्रंथ प्रमुख आहेत.

अशा ऐंशी वर्षांच्या आणि महाविद्वान बौद्ध भिक्खूच्या हातून दीक्षा घेण्याचे बाबासाहेबांनी ठरविले. बाबासाहेबांनी त्यांना पत्र लिहून नागपूरच्या धम्मदीक्षा सोहळ्याचे आमंत्रण दिले. पूजनीय चंद्रमणी यांनी बाबासाहेबांचे आमंत्रण स्वीकारले आणि भारतातील ऐतिहासिक धम्मदीक्षा त्यांच्या हातून झाली.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खंड १२

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!