महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

‘नास्तिक्या’ची परंपरा…

रविवार लोकसत्ता
लोकरंग पुरवणीतून25/08/2024
नास्तिकता भारतातल्या मातीतली. नास्तिकतेचा जन्मच भारतात झालेला. नास्तिकतेच्या परंपरा इथे हजारो वर्षांपासून चालत आलेल्या! म्हणजेच नास्तिकता ही कुठूनही आयात केलेली गोष्ट नव्हे. पण हल्ली श्रद्धा आणि धर्मपरंपरांचे महत्त्व बिंबविण्याचे प्रयत्न जाणूनबुजून होत आहेत. या परिस्थितीतही नास्तिकतावादी चळवळीद्वारे विवेकी जगण्याचा पुरस्कार डॉ. शंतनू अभ्यंकर सातत्याने ठाम भूमिका घेऊन करीत राहिले. विज्ञानवादी दृष्टिकोन आणि प्रगल्भ विचारधारा असलेला हा कार्यव्रती गेल्या आठवड्यात आपल्यातून गेला. देशातील निरीश्वरवादी परंपरेचे चिंतन करणाऱ्या लेखासह तरल शब्दचित्राद्वारे डॉ. अभ्यंकरांना आदरांजली…

डॉ. प्रदीप पाटील

वेदांच्या आधी कोणतेही वेद नव्हते आणि देवही नव्हते. उत्क्रांतीत माणूस बनण्याआधी मागे मागे जात राहिलो तर चिम्पांझी, गोरिला वगैरे ग्रेट एप होते. त्याही अगोदर एप होते ते, गिबन्स, सियामांगस. त्याही मागे सिमिएन्स. कुठेच देवाचा पत्ता नाही. भारतात सांगितल्या जाणाऱ्या त्रेतायुगाचा विज्ञानाने सांगितलेल्या दगडाचे युग, तांब्याचे युग आणि लोखंडाचे युग याच्याशी शून्य संबंध आहे. त्रेतायुगातले देवावतार घ्यावे म्हटले तर विज्ञानाप्रमाणे त्या वेळी रानटी अवस्थेतले ऑस्ट्रेलोपिथिकस आणि होमो सेपियन्स होते. खचितच ते ‘देव’ नव्हते. लोमेकवियन हत्यारं जी दगडी होती ती वापरून ते झाडाचा पाला, फळे, किडे, मध, मांस, मासे, अंडी खात, हे घडले लाखो वर्षांपूर्वी.

अशीच एक संस्कृती रशिया, युक्रेन आणि युरेशियात प्रसवली होती ४-५ हजार वर्षापूर्वी! यामना संस्कृती. तिच्यातून फुटून दोन हजार वर्षांपूर्वी तयार झाली सिंथास्टा संस्कृती. त्यातील मंडळींनी इराण-अफगाणिस्तानच्या दिशेने जाऊन वसवली ‘अँड्रोनोव्हो’ संस्कृती. ही गोष्ट तांबे युगातली. त्यातील काही जण घुसले इराणमध्ये तर काही जण भारतात. गाई-गुरे-मेंढ्या-घोडे घेऊन फिरणारी ही मंडळी ‘इंडो-आर्यन’ होती. इराणात गेलेल्यांचा अवेस्ता हा धर्मग्रंथ झाला. झोराष्ट्र हा धर्म. झरतृष्ट हा देव-देवदूत. भारतात आलेल्या आर्यांचे धर्म ग्रंथ वेद बनले आणि इंद्र हा देव. हेच ते आर्यावर्त.

इथे आलेल्या आर्यांचा संघर्ष इथल्या संस्कृतीतल्यांशी सुरू झाला. द्रविडांशी झाला. या धुमश्चक्रीत अनेक देवांची निर्मिती होत गेली आणि ते देव नाकारणाऱ्यांची देखील! उदाहरण घेऊ या अयोध्येचे. अयोध्येत बाबर येण्यापूर्वी १५ शतके अगोदर अयोध्या ही ‘कोसल’ राज्य समजली जायची. मगध, वत्स, अवंती अशी राज्ये आजूबाजूला. कोसल राज्यासाठी युद्ध व्हायची ती इथल्या व आर्य लोकांत आणि आपल्याच भाईबंदातदेखील. त्या वेळी आर्य हे सिंधू नदी ओलांडून भारतात आले होते, म्हणून अपभ्रंशाने सिंधूचे हिंदू बनले. या कोसल राज्यात प्राबल्य होते हिंदू, जैन, बौद्ध, आजीवक आणि चार्वाकांचं! यांच्या तत्त्वज्ञानाच्या परंपरा होत्या. हिंदूंच्या किंवा वैदिकांच्या ऋषी आणि इतरांच्या मुनी-भिख्खूमध्ये तत्त्वज्ञानाचे घनघोर युद्ध चाले. या संस्कृती संघर्षात नास्तिक पंथ आघाडीवर होते. हे नास्तिक पंथ म्हणजे जैन, बौद्ध, आजीवक आणि चार्वाक. यांच्यापैकी चार्वाक आणि आजीवकांनी कर्म सिद्धांत नाकारला, पुनर्जन्म नाकारला. चारही जणांनी देव नाकारला. वैदिक देव हे मानवानेच निर्माण केलेत, त्यांचे अस्तित्व नाही हे थेटपणे सांगितले. तेही इ.स. पूर्व पाचव्या शतकात. कर्मकांडे, माया, ब्रह्मज्ञान, आत्मा, अज्ञात सर्वोच्च शक्ती, साक्षात्कार, अंतिम सत्य हे सारे नाकारले चार्वाकांनी!! प्रबळ असलेल्या वैदिकांनी म्हणूनच या नास्तिक परंपरांचा सातत्याने द्वेष केला. छळ केला.

चार्वाकांनी भौतिकवादाचा पुरस्कार केला. पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट स्वीकारायची नाही, हे तत्त्वज्ञान जोरदारपणे मांडले. ‘यज्ञात आहुती दिल्याने आकाशातले देव प्रसन्न होतात’ हे म्हणणे बिनपुराव्याचे आहे हे निक्षून सांगितले. ‘प्रत्यक्ष प्रमाण’ या सिद्धांतावर जोर दिला. याच विचारातून पुढे वैज्ञानिक पद्धतीचा उदय झाला. विज्ञान अवतरले. जगाचे जगणे सुसह्य केलेल्या विज्ञानाची उत्पत्ती ही नास्तिक परंपरेची निर्मिती आहे; देव-धर्म मानणाऱ्यांची नव्हे. महावीरांनी श्रमण संस्कृतीचा पुरस्कार केला. देव नाही हे तर सांगितलेच, पण मनगट आणि श्रम या आधारेच जगणे महत्त्वाचे आहे हे पटविले. बुद्धाने धर्म किंवा संघटित धर्मविधींचा उपयोग ‘शून्य’ आहे हे निक्षून सांगितले. आत्मा, देव नाकारत ‘प्रत्यक्ष अनुमाना’वर जोर दिला. आजीवक पंथाचे पुरस्कर्ते होते सहा. पैकी पुराण कस्सप याने कर्मसिद्धांत आणि देव नाकारत ‘न-नैतिकतावाद’ मांडला. मक्खली गोशाला याने ‘नियतीवाद’ मांडला. पकुधा कक्कायनने ‘अनंतवाद’ मांडला. निगंठ नाथपुत्त याने ‘संयमवाद’ मांडला. संजय बेलाहिपुत्त याने ‘अज्ञेयवाद’ मांडला. आणि अजिता केसकांबली याने ‘भौतिकवाद’ मांडला- ज्याला लोकायत तत्त्वज्ञान म्हटले जाते. चार्वाकांचा भौतिकवाद आणि हिंदूंचा देववाद यांच्यात कडवा संघर्ष झालाय. आजही तो चालूच आहे.

नास्तिक परंपरांच्या या शिकवणीतून अन् तत्त्वज्ञानातून आधुनिक नीतिशास्त्र आणि ‘लॉजिक’ यांचा उदय झाला आहे. भारतातच नव्हे, तर जगातदेखील नास्तिक परंपरा ही वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच तत्त्वज्ञान निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेली आहे. अनेक पाश्चात्त्य तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिकांनी नास्तिक परंपरेच्या तत्त्वज्ञानांचा आधार घेत नवनवीन सिद्धांताना जन्म दिलाय. भारतातल्या ज्या हिंदू व जगभरातल्या इतर धर्मीय चिंतकांनी देव आणि दैव नाकारून मुक्त विचार केला ते वैज्ञानिक शोध लावू शकलेत. त्यांच्या शोधांचा पाया हा ‘चिकित्सा आणि पुरावे’ हाच नास्तिक विचारांचा होता.

भारतात वैदिकांच्या आणि हिंदू परंपरेच्या प्रचार-प्रसाराचे कार्य प्रचंड प्रमाणात शंकराचार्यांपर्यंत केले गेले. त्याच्या परिणामी, देव, दैव, प्रारब्ध, प्राक्तन, कर्मकांडे अशा मानसिकतेचा समाज इथे घडत राहिला. आजही आहे. वेद, उपनिषदे, पुराणे यांनी येथील समाजात पोकळ व निरर्थक कर्मकांडे करत अढळ स्थान पटकावले असले तरी त्यामुळे ‘चिकित्सा’ करण्याची मनोवृत्ती त्याने नष्ट केली.

गेल्या काही शतकांत ज्ञानेश्वर, तुकाराम, आदी संतांनी ‘हिंदू परंपरा’ या चौकटीत राहून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. जो आवश्यक होताच; परंतु चिकित्सा करणे आणि प्रत्यक्ष पुरावा या गोष्टी महत्त्वाच्या असल्याने त्या संतांच्या सुधारणावादी दृष्टिकोनातून निर्माण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे इथली मानसिकता फारशी बदलली नाही. धर्म या चौकटीतला देव आणि दैव हा वैज्ञानिक दृष्टिकोन विरोधी विचार आहे. तो स्वीकारून बदल घडविणे यातून फारसे काही साध्य होत नाही. म्हणून धर्म आणि देव ही संकल्पनाच सोडून देणे जेव्हा घडते तेव्हा मुक्त विचारपद्धती ही वैज्ञानिक वृत्ती घडवते- जे भारतात घडले नाही.

देव आणि कर्मकांडात आयुष्यभर गुंतून राहणे ही हिंदू मानसिकता आहे. ज्यामुळे मानसिक परावलंबित्व तयार होते. ज्यातून भीती आणि भ्रम याला बळी पडण्याचे मानसिक दौर्बल्य तयार होते. असा समाज घडणे हे सर्वार्थाने धोकादायक असते. हीच देव-दैवाची मानसिकता जेव्हा समाजात सतत रुजवून तिला प्रतिष्ठा देण्याची खेळी केली जाते; तेव्हा खुद्द नास्तिक परंपरांनीही स्वत:चे देव करण्याचे अविवेकीपण प्रस्थापित केले आहे. महावीर आणि बुद्ध यांना देव करून दैवी कर्मकांडे करणे हे हिंदू मानसिकतेच्या स्वीकारातून घडते. हिंदू सण, उत्सव, यात्रा अशा अनेक मार्गांनी हे वर्षानुवर्षे रुजविले गेले आहे.

नास्तिकता ही स्वावलंबी मानसिकता घडवते- ज्यामुळे विवेकी समाज निर्मितीसाठी ते आधारवडाचे कार्य करते. ही समज निर्माण होण्यासाठी ‘रॅशनॅलिटी’चा स्वीकार अपरिहार्य आहे हे आता लक्षात येत आहे. नास्तिकता आता अशी प्रगल्भ होत जाणेच हिताचे आहे.

धर्म आणि कर्मकांडेे टाळून एक नवा अर्थ घेऊन आज नीती आणि दैनंदिन जगणे जगावे असा एक विचार प्रवाह आलाय, ज्याला ‘अध्यात्म किंवा स्पिरिच्युअॅलिटी’ म्हटले जाते. वास्तवात ‘अध्यात्म’ कशाला म्हणायचे याची ठोस व्याख्या नाही, त्यामुळे या आयामातून भलत्याच अवैज्ञानिक गोष्टी तयार झाल्या. पूर्व संवेदन (प्रीकॉग्निशन), अतिंद्रिय शक्ती (क्लेव्होयन्स), अतींद्रिय संवेदन (ईएसपी), वगैरे… पण प्रगत विज्ञानापैकी न्यूरोसायन्सेस व न्यूरोसायकॉलॉजीने या गोष्टी अवैज्ञानिक म्हणून घोषित केल्या आहेत. याचा अर्थ, नास्तिक विचारधारा प्रगत अवैज्ञानिक गोष्टींनाही पुराव्यासहित खोडून काढते हे दाखवून देते.

आज नास्तिकता ही फक्त धर्मापुरती मर्यादित राहिली नाही. आज नास्तिकता ही चिकित्सावादात माहीर झालीय. स्केप्टीसिझम असे त्याचे रूप आहे. ही चिकित्सा पारंपरिक उपचार पद्धतींचीही होत आहे. जसे की आयुर्वेद, होमिओपॅथी, अॅक्युपंक्चर, युनानी, इत्यादी परंपरांचा अवैज्ञानिकपणा उघड करत आहे. याही पुढे जाऊन आर्थिक शोषण, सामाजिक विषमता, राजकारण या समस्यांना प्रश्न विचारून त्यांची पोलखोल करण्याचे धैर्य दाखवत आहे. देव-व दैवी शक्ती मानणारे ‘कर्माची फळे भोगतील नंतर’ असे सांगत इथली शोषण व्यवस्था ‘जैसे थे’ ठेवतात. या उलट नास्तिकता या साऱ्या शोषण व्यवस्थांचा यथोचित भेद आणि वेध घेऊन विवेकी समाज व्यवस्था निर्माण करते.

विवेक किंवा ‘रॅशनॅलिटी’ ही नास्तिकतेची देणगी आहे. नास्तिक झाल्याशिवाय ‘रॅशनल’ होता येत नाही. कारण इथलं आपलं जगणं हे दैवी शक्ती चालवत नसून, इथली मानवी नियम व्यवस्था, नैसर्गिक नियम आणि भौतिक साधने सुकर किंवा कष्टप्रद करतात असे ‘रॅशनॅलिटी’ मानते. सत्य काय आहे हे शोधण्यासाठी पुराव्याची गरज असते. ‘रॅशनॅलिटी’ ते प्रत्यक्ष करून दाखवते.

‘वागायचे कसे’ हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा देवाची आज्ञा, गुरूचे संदेश आणि आदेश, परंपरा-रूढींचे पाळणे, यातून देव-दैववादी लोक आयुष्यभर भक्त बनून वागत राहतात. यात रॅशनल काहीही नसते. नास्तिकतेतून निर्माण झालेल्या ‘रॅशनॅलिटी’ने लॉजिक आणि वर्तनविज्ञानाने सुंदर वागता येते हे प्रत्यक्ष दाखवून दिले आहे. म्हणूनच आजचा संघर्ष हा ‘स्पिरिच्युअल सायकॉलॉजी’ विरुद्ध ‘रॅशनल सायकॉलॉजी’ असा बनला आहे. आणि अर्थातच ‘रॅशनॅलिटी’ ही अधिकाधिक प्रभावी ठरते आहे.

आजचे आधुनिक भौतिक जग हे नास्तिक परंपरेने विज्ञानाच्या माध्यमातून सहजतेने जगण्यासाठी प्रदान केलेले आहे. याच नास्तिक परंपरेने मोह, माया, अध्यात्म, वगैरे तत्त्वज्ञानांना बाद ठरवून ‘रॅशनल’ आणि विवेकी जगण्याचे तत्त्वज्ञान दिले आहे.

आज नास्तिक चळवळीला हे जाणवते आहे की ‘रॅशनॅलिटी’ असल्याशिवाय नास्तिकता अपुरी आहे. नास्तिकता हा धर्म होऊ शकतो. पण ‘रॅशनॅलिटी’चा धर्म करायला जर कोणी धजावलेच तर ते सहजगत्या अविवेकी ठरेल. कारण स्वत:चीच कठोर झाडाझडती घेणे, चिकित्सा करणे हे ‘रॅशनॅलिटी’त केंद्रस्थानी आहे. आणि तो पंथ किंवा धर्म होणे शक्य नाही.

pradpat12@gmail.com

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!