आंबेडकरी साहित्याची रेकॉर्ड ब्रेकिंग विक्री
तुम्ही कधी चैत्यभूमीला गेलाय का?
म्हणजे सहा डिसेंबरलाच तिथं जायला हवं असं नाही, वर्षभरात कधीही, कोणत्याही दिवशी गेलाय का?
चैत्यभूमीला लागूनच साधारण वीसेक स्टॉल्स आहेत. त्यातले दोनेक स्टॉल्स फुल-मेणबत्ती विक्रेत्यांचे, दोन-चार बाबासाहेब अन बुद्धाच्या फ्रेम्स विकणाऱ्यांचे, दोनेक आंबेडकरी कलावंतांच्या भीमगीतांच्या सीडी विकणाऱ्यांचे आणि कमीतकमी १० स्टॉल्स हे पुस्तक विक्रेत्यांचे आहेत. वर्षाचे ३६५ दिवस या स्टॉल्सवर फक्त आणि फक्त आंबेडकरी, पुरोगामी साहित्याची विक्री होत असते.
चैत्यभूमीच्या आवारातच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा एक गाळा आहे. या गाळ्यात काही निवडक पुस्तकं विक्रीला ठेवलेली असतात. पण खरी पुस्तक विक्री होते ती बाहेर जे लाकडी स्टॉल्स मांडलेले आहेत, तिथेच! पटेकर, राजू उके, केदारे गुरुजी, सुधाकर मोहिते, अनिल खैरे हे तिथले काही प्रमुख विक्रेते. त्यांमध्ये सर्वांत जुने आहेत पटेकर साहेब. सर्वांमध्ये अनुभवाने आणि वयानेही ज्येष्ठ. पूर्वी ते चैत्यभूमीला लागूनच असलेल्या स्मशानभूमीत कामाला होते. पण आता ते आणि त्यांची मुलं पूर्णवेळ पुस्तक विक्रीचं काम करतात. काही पुस्तकांचं मुद्रण-प्रकाशनही त्यांनी केलंय. राजू उके यांच्या पुस्तक विक्री कौशल्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. स्टॉलवर येणाऱ्या प्रत्येकाला पुस्तकाची ओळख कशी करून द्यावी, त्याला पुस्तकातील विचारसार कसा सांगावा, त्याच्या बुद्धीला झेपेल अन खिशाला परवडेल ते पुस्तकच कसं त्याच्या समोर धरायचं, यांसारखी पुस्तक विक्रीची म्हणून जी काही कौशल्यं आहेत, त्यांमध्ये राजू उके ‘द बेस्ट’ आहेत. त्यांना पुस्तकं विकताना बघणं हा एक शिकण्यासारखा अनुभव असतो. अशीच गोष्ट मोहिते आणि खैरे यांची. प्रत्येकाशी संवाद साधत त्याला हवं ते पुस्तक उपलब्ध करून देण्यात ते कायम तत्पर असतात. विशेष गोष्ट म्हणजे, या सर्व विक्रेत्यांकडील पाच-दहा पुस्तकांचा अपवाद सोडला, तर जवळपास सर्वच पुस्तकं सारखीच असतात. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून या सर्वांचा उदरनिर्वाह-चरितार्थ संपूर्णपणे पुस्तक विक्रीवरच आहे.
आंबेडकरी साहित्य विक्रेत्यांचं हे जाळं फक्त चैत्यभूमी परिसरापुरतं मर्यादित नाही. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये किंवा अगदी एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणीही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी संबंधित कुठलाही सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय कार्यक्रम असला तरी आंबेडकरी साहित्य विक्रेते तिथे हजर होतात. मुलुंडचे केशव कांबळे, वडाळ्याचे हेमंतकुमार दाभोळकर, कल्याणचे सोमनाथ भोसले यांच्यासारखे अनेक लहान-मोठे पुस्तक विक्रेते आहेत. भोसले यांचं तर एका गाडीवर फिरतं पुस्तक विक्री केंद्र आहे. जिथं कुठे आंबेडकरी कार्यक्रम असेल तिथं हे विक्रेते दोन मोठ्या पिशव्यांमध्ये पुस्तकं घेऊन उपस्थित असतात. पुण्यामध्ये वाघचौरे, नाशिकमध्ये केदारे, औरंगाबादमध्ये देवकर, कोल्हापूरमध्ये अर्जुन देसाई अशी आंबेडकरी, पुरोगामी पुस्तक विक्रेत्यांची एक फळीच आहे. या प्रत्येक पुस्तक विक्रेत्याचा त्या त्या परिसरातील बहुतेक समविचारी व्यक्ती व संस्थांशी अत्यंत चांगला संपर्क असतोच.
हे सर्व पुस्तक विक्रेते नेमकी कोणती पुस्तकं विकताहेत, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यांच्यामार्फत विकलं जाणारं प्रत्येक पुस्तक हे एकतर बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांच्या चळवळीशी, राजकारणाशी संबंधित असलेलं पुस्तक असतं. किंवा आंबेडकरी, पुरोगामी चळवळीला पूरक मानल्या जाणाऱ्या इतर विचारवंतांनी (उदाहरणार्थ- महात्मा फुले, पेरियार, कांशीराम, प्रबोधनकार ठाकरे आदी) लिहिलेली किंवा त्या विचारवंतांबद्दल लिहिलेली पुस्तकं असतात. ‘खमंग ढोकळा कसा बनवाल?’ किंवा ‘चालून वजन कसं कमी कराल?’, या प्रकारचं एकही पुस्तक यांपैकी एकाही पुस्तक विक्रेत्याकडे तुम्हाला कधीही म्हणजे कधीही सापडणार नाहीत. आता गेल्या काही वर्षांपासून व्यावहारिक जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणारी काही पुस्तकं मात्र हळूहळू दिसू लागली आहेत. पण त्यांचं प्रमाणही नगण्यच आहे.
सुगावा प्रकाशन, वर्धा प्रकाशन, सुगत प्रकाशन, संबोधी प्रकाशन, सिद्धार्थ प्रकाशन, समता प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित साहित्य या विक्रेत्यांकडे नेहमी उपलब्ध असतं. अनेक प्रकाशकांकडील पुस्तकांची टायटल्स सारखीच असतात. उदाहरणार्थ, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’, ‘जातिसंस्थेचे विध्वंसन’ अशी सर्व पुस्तकं या सर्वच प्रकाशकांनी काढलेली आहेत आणि सर्वच जण आपापल्या परीनं त्यांची विक्री करत असतात.
या प्रकाशनांपैकी पुण्यातल्या सुगावा प्रकाशनाची अनेक अभ्यासकांनी विशेष नोंद घेतलेली आहे. त्याला कारणही आहे. सुगावाचे संस्थापक प्रा. विलास आणि उषाताई वाघ यांनी मराठी आंबेडकरी पुस्तकांच्या जगतात जे योगदान दिलं आहे, हा एका स्वतंत्र लेखाचाच नव्हे, तर पुस्तकाचा विषय आहे. ‘माझा अण्णाभाऊ साठे’ या पुस्तकाच्या प्रकाशनापासून झालेला सुगावा प्रकाशनाचा प्रवास आजही सुरू आहे. रावसाहेब कसबे यांचं ‘आंबेडकर आणि मार्क्स’, डॉ. सुखदेव थोरात यांचं ‘बाबासाहेब आंबेडकर नियोजन, जल व विद्युत विकास भूमिका व योगदान’, गं. बा. सरदार यांचं ‘गांधी आणि आंबेडकर’, कॉ. शरद पाटील यांची ‘मार्क्सवाद आणि फुले-आंबेडकरवाद’, ‘दासशुद्रांची गुलामगिरी’, ‘अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ अशी एकाहून एक सरस अशी वैचारिक पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आहेत. बाबासाहेबांच्या जीवन-कार्याचे अभ्यासक चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेल्या ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ चरित्राचे १५ खंडही सुगावाने प्रकाशित केले. शेकडो लहान-मोठ्या पुस्तिकाही त्यांनी प्रकाशित केल्या. त्यांच्या कामाची ओळख करून घ्यायची असेल तर त्यांच्यावर प्रकाशित झालेला गौरवग्रंथ ‘प्रबोधनपर्व’ जिज्ञासूंनी आवर्जून वाचायला हवा.
आंबेडकरी साहित्याच्या प्रसारात लोकवाड्मय गृह या प्रकाशन संस्थेचंही नाव घ्यावं लागेल. ही जरी डाव्या विचारांची प्रकाशन संस्था असली तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी संबंधित असलेली काही उत्कृष्ट पुस्तकं प्रकाशित करण्याचा मान लोकवाङमयकडे जातो. गंमतीची गोष्ट म्हणजे, गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तिकेसह अनेक डाव्या विचारवंतांनी लिहिलेली वैचारिक पुस्तकं सर्वाधिक वाचली जातात ती आंबेडकरी समाजातच. (याच धर्तीवर असंही म्हणता येईल की, ‘नवता’ने प्रकाशित केलेली प्रबोधनकार ठाकरे यांची सर्व पुस्तकंही आंबेडकरी समाजातच सर्वाधिक वाचली जाताहेत.) त्यामुळे सहा डिसेंबरला शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी लोकवाङमय गृहाचा स्टॉल असतोच आणि त्यांच्या पुस्तकांची विक्रीही खणखणीत होते. लोकवाङमय गृहाने प्रकाशित केलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रचरित्र हे बाबासाहेबांवरचं आजवरचं सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन आहे, याबाबत कुणाचं दुमत असू नये.
ग्रंथाली या प्रकाशन संस्थेचाही यासंदर्भात आवर्जून उल्लेख करावाच लागेल. गेल्या चाळीसेक वर्षांत ग्रंथालीने अनेक दलित आत्मचरित्रं प्रकाशित केलेली आहेत. लक्ष्मण माने (उपरा) , नरेंद्र जाधव (आमचा बाप आन आम्ही), आयदान (उर्मिला पवार), जगायचंय प्रत्येक सेकंद (मंगला केवळे) यांसारखी ग्रंथालीने प्रकाशित केलेली काही पुस्तकं तर अशी आहेत की, ती त्यांना दरवर्षी (काही तर तीन-तीन महिन्याला) छापावीच लागतात. उदाहरणार्थ, ‘आमचा बाप आन आम्ही’ या पुस्तकाची सध्या १९९वी आवृत्ती (पुनर्मुद्रण) बाजारात आहे. ‘आयदान’चे ११ वे पुनर्मुद्रण आहे, तर ‘उपरा’ व इतर अनेक पुस्तकांची ३०-४० हून अधिक पुनर्मुद्रणं झाली आहेत. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, ग्रंथालीने ज्या बौद्ध, दलित, आदिवासी लेखकांची आत्मचरित्रं प्रकाशित केली आहेत, त्यांनाच चैत्यभूमीवर मागणी असते. त्यांच्या इतर पुस्तकांशी चैत्यभूमीवर येणारी जनता स्वत:ला रिलेट करू शकत नाही ! लोकवाङमय गृहाप्रमाणे ग्रंथालीचाही दरवर्षी चैत्यभूमी परिसरात स्टॉल असतोच आणि त्यावर रांग लावून विक्रेते रोखीने पुस्तकं घ्यायला उभे असतात!
सहा डिसेंबरला शिवाजी पार्कमध्ये जे स्टॉल्स असतात त्यातील किमान १०० स्टॉल्स हे पुस्तक विक्रीचे असतात. याशिवाय, रस्त्यावर किंवा समुद्राच्या वाळूत जिथं जागा मिळेल, तिथं दैनिकांचे कागद किंवा सतरंजी अंथरून पुस्तक विक्री करणारे वेगळेच. त्यांची संख्याही किमान १००च्या घरातच असेल. विक्रेत्यांची ही संख्या जास्त असेल, पण कमी निश्चितच नसेल.
चैत्यभूमी परिसरातली महापरिनिर्वाण दिनानिमित्त (दीड-दोन दिवसांत) होणारी पुस्तक विक्री ही तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुप्पट (किंवा अगदी तिप्पटही) असते, असं माझं निरीक्षण आहे.
ते कुणाला मान्य होईल अथवा अमान्य. पण तेच सत्य आहे!
लेखक- कीर्तीकुमार शिंदे…
(लेखक नवता बुक वर्ल्डचे संचालक आहेत.)
साभार…!
विजय तारा नामदेव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत