रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण, डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आण्णा यांच्या आयुष्यावर आधारलेला चरित्रपट ‘कर्मवीरायन’ रिलिज.
अख्ख्या पुण्यात एकूण ९३ सिनेमागृहे असणाऱ्या पुण्यात फक्त ४ स्क्रीनवर तो झळकला–सचिन तिरोडकर.
INOX…नो
PVR….नो
सिझन मॉल मगरपट्टा…नो
फिनिक्स मार्केट सिटी विमानगर…नो
बॉलीवूड खराडी….नो
शेवटी अख्ख्या पुण्यात एकूण ९३ सिनेमागृहे असणाऱ्या पुण्यात फक्त ४ स्क्रीनवर तो झळकला….१९ जुलै रोजी.
ज्या सिनेमागृहांनी त्याला आश्रय दिला त्यांचे सर्वप्रथम मी एक चाहता म्हणून मी आभार मानतो…. त्यामध्ये सिटीप्राईड कोथरूड, सिटीप्राईड सिंहगड रोड, आयनॉक्स वाकड व वैभव हडपसर यांचा समावेश होतो. त्यांच्याही खानदानात कुणालातरी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यात या महान विभूतीचा वाटा असावा आणि त्याच शिक्षणावर त्यांच्या आर्थिक साम्राज्याचा वटवृक्ष डौलत असावा म्हणून उपकाराची जाणीव ठेऊन एखादा स्क्रीन दिला असावा…book my show वर काहींनी आज जाहीर केलेले शो उद्या कॅन्सल केलेले दिसले…दुर्दैव आपले दुसरं काय….असो!
आता कालपासून सर्च करत असलेल्या सिनेमागृहांपैकी मोठ्या सिनेमगृहांनी आश्रय न दिल्यामुळे मी आपला मोर्चा वैभव मल्टिप्लेक्स हडपसर कडे वळवला. वैभव थेटर मालकाने या सिनेमाला अगदी प्राईम टाइम दिला असल्याने त्यांचे खास अभिनंदन.
मी कोणत्या सिनेमाबद्दल बोलत आहे हे ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी सांगतो….
‘शिक्षणाची गंगा पददलित,गोरगरिबांच्या दारापर्यंत घेऊन जाणारे आधुनिक भगीरथ, फुले शाहू यांचा वारसा समर्थपणे सांभाळणारे, गाडगेमहाराज, डॉ.आंबेडकर, प्र.के अत्रे यांचे सहकारी, आशिया खंडात सर्वात जास्त ७४८ शाळा काढणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण, डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आण्णा यांच्या आयुष्यावर आधारलेला धनंजय भावलेकर दिग्दर्शित चरित्रपट ‘कर्मवीरायन’ परवा रिलिज झाला.
योगायोगाने काल माझ्याकडे आलेल्या आईबाबांना घेऊन मोठ्या आशेने मी वैभव मल्टिप्लेक्स हडपसरची वाट धरली. शो सायंकाळी साडेसहाचा होता. पोहोचायला सव्वा सहा झाले. तिकीट मिळते की नाही यासाठी घाईघाईने बॉक्स ऑफिस वर गेलो.
“तीन कर्मवीरायन द्या” मी.
तेथील कर्मचारी सीट क्रमांक मला न विचारताच तिकीट देऊन मोकळा झाला.
“अहो सीट क्रमांक मला विचारायचे तरी.” मी म्हणालो.
“कोठेही बसा आपलाच थेटर आहे” तो मोठ्या चेष्टेने म्हणाला.
मी समजायचे ते समजलो.
त्याने कॉम्प्युटर स्क्रीन माझ्याकडे फिरविला पाहतो तर काय! तिकीट काढणारा मी फक्त दुसरा व्यक्ती होतो! म्हणजे माझ्याआधी फक्त एका व्यक्तीने तिकीट काढले होते.
मी समजायचे ते समजलो….!
वेळ सायंकाळी 6.20 ची
“अहो आत सोडा की.”
थांबा हो थोडं, शो दहा मिनिटे लेट आहे.
“ठीक आहे…” मी
वेळ 6.45
“अहो, आता तरी सोडा.” मी
“ठीक आहे आता जा.” कर्मचारी म्हणाला
आत गेल्यावर एका पूर्णपणे मोकळ्या थेटरने आमचे स्वागत केले. अजून पाच मिनिटे वेळ गेला. पूर्वी तिकीट काढणारे एका कुटुंबातील चार जण, आम्ही तीन जण आणि शेवटच्या पाच मिनिटांत आलेले दोन जण अशा नऊ प्रेक्षकांसमोर कर्मवीर आण्णा आपला जीवनपट उलगडू लागले.
ज्या आण्णांनी गोरगरिबांची मुले शिकावीत म्हणून आयुष्यभर चप्पल घातली नाही. सुटाबुटाचा त्याग केला,फकीर राहिले, ज्या रयत माऊलीने स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेऊन वसतिगृह चालविले. अशा महर्षींवर चित्रपट खरे तर ५० वर्षांपूर्वीच यायला हवा होता. तो आला नाही हे आपले दुर्दैव,आणि आता आला आहे तर असे मोकळे थेटर हे आणखी मोठे दुर्दैव…!
जो विचारांचा वारसा नवीन पिढीला समजणे आवश्यक आहे. तो जर आपण देत नसू तर आपण स्वतःचे आणि पुढच्या पिढीचे पर्यायाने समाजाचे खूप मोठे सामाजिक नुकसान करत आहोत.
रयत शिक्षण संस्थेच्या ज्या ‘साधना कॅम्पस, हडपसर येथे मध्ये सुमारे २५००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत…शेकडो शिक्षक त्यांना शिकवत आहेत. त्या साधना कॅम्पस पासून फक्त 1 किलोमीटर आहे हो वैभव थेटर!….!
साधनामध्ये हजारो रयतसेवक, विद्यार्थी असूनही फक्त एका सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्या शिवाय कोणीही इकडे फिरकले नाही…हे कसले दुर्दैव?
आता तुम्ही म्हणाल, कर्मवीर आण्णांबद्दल निष्ठा व्यक्त करण्यासाठी चित्रपटच पहिला पाहिजे हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही चित्रपटाची जाहिरात करत आहात काय? दिग्दर्शक तुमचा मित्रा आहे काय? यामागे तुमचा स्वार्थ दिसतोय? आम्ही आण्णांची पुस्तके वाचतो. त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो.
अशा अर्ध्या विचारवंतांसाठी सांगतो की, दृकश्राव्य माध्यमातून जेवढे प्रभावी संस्कार होतात तेवढे इतर कोणत्याच माध्यमातून कधीच होणार नाहीत. अण्णा त्यांचे काम करून १९५९ सालीच स्वर्गवासी झाले. त्यांच्या विचारांचा वारसा चालविण्याचे…तो वारसा पुढील पिढीवर बिंबविण्याचे काम आपले आहे हे कसे काय विसरू शकतो आपण
मोठमोठ्या मॉल मध्ये मुलांना फिरायला घेऊन जाणे त्यांना बीभत्स चित्रपट दाखविण्यापेखा असे सामाजिक चित्रपट दाखविल्याने होणारे सामाजिक अभिसरण खूप मोठे असेल…आज ती काळाची गरज बनली आहे. उद्या आपली मुले शिकतील.. मोठी होतील…श्रीमंतही होतील परंतु ती ‘माणूस’ बनतील की नाही याची गॅरंटी आपल्याकडे नाही. ही गॅरंटी प्राप्त करण्यासाठी असे चित्रपट महत्वाचे आहेत.
मोठ्या मॉलमधील मल्टिप्लेक्सची कालची ‘बॅड न्यूज’, ‘कल्की’ या सिनेमांची तिकिटे पाहा… तीनशे रुपयंपासून सहाशे पर्यंत विकली गेली…शो हाऊसफुल झाले….आणि कर्मवीरांवर ही आणीबाणी ?
बरं अण्णांच्या चित्रपटात काम केलेले कलाकार काही सामान्य दर्जाचे नाहीत. किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांनी आण्णांचे पात्र अतिशय प्रभावीपणे साकारले आहे. तसेच त्यांचा प्रभावी तसेच धीरगंभीर आवाज थेट काळजात शिरतो...त्यांच्या भाषणांवर आईने थेटरात वाजवलेल्या टाळ्या माझ्या थेट काळजात शिरल्या. विशेष म्हणजे शेतात राबणारी माझ्या आई माहेरची साडी (१९९४) नंतर प्रथमच थेटरमध्ये आली होती.
सुशांत शिरसाठ, उपेंद्र लिमये, राहुल सोलापूरकर,आनंद इंगळे, प्रवीण तरडे, अनंत जोग, उषा नाईक, देविका दफ्तरदार यांच्या प्रभावी अभिनयाने साकारलेली ही अत्यंत प्रभावी कलाकृती आहे . त्याकडे पाठ फिरविणे म्हणजे त्यांच्या भूमिकांना, त्यांच्यातील कलाकारीला न्याय न देणे असेच म्हणावे लागेल.
जे रयत मधून जे शिकले नाहीत त्यांना मी अजिबात दोष देणार नाही कारण त्यांच्या ह्रदयापर्यंत आण्णा कदाचित पोहोचले नसतील. परंतु शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या, दऱ्याखोऱ्यांत खितपत पडलेल्या ज्यांच्या उशापर्यंत आण्णांनी शाळा आणल्या. त्या दर्जेदार शिक्षणामुळे जे साहेब झाले, व्यापारी, उदयोगपती झाले….मोठे झाले… श्रीमंत झाले…त्यांना अण्णांचा चारित्रपट…हा वारसा.. कुटुंबाला दाखवायला १२०/- रुपयांचे तिकीट खर्चण्याची मानसिकता नाही त्यांना खरा दोष आहे.
शेवटी काय आणांच्या वटवृक्षाला विसरलेल्या आम्ही स्वार्थी पारंब्या असेच म्हणावे लागेल.
चित्रपट अजून दोन दिवस चालेल. आज दिनांक २१ रोजी पुण्यातील फक्त २ सिनेमागृहात आहे. पुणे तेथे काय उणे असणाऱ्या पुण्यात ही अवस्था तर बाकी महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी. अजून वेळ गेलेली नाही. संख्येने सुमारे 10 कोटी असणाऱ्या माझ्या सर्व रयत सेवक गुरुवर्य, रयत बंधूभगिनींना, तसेच महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक मराठी वारसा जपला पाहिजे ही मनोमन इच्छा असणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकास विनंती आहे.. की,जेथे उपलब्ध होईल तेथे हा चित्रपट सहकुटुंब पाहावा. चित्रपटाला प्रोत्साहन द्यावे. चित्रपटाला प्रतिसाद मिळाला नाही तर असे सामाजिक चित्रपट काढण्याचे धाडस भविष्यात दिग्दर्शक करणार नाहीत हे अजूनच नुकसान कारक ठरेल.
शेवटी निर्णय आपला…! कारण पुस्तकी कायद्याने कोणालाच असे कम्पलसरी,अनिवार्य करता येणार नाही.आणि ह्रदयाची, मनाची,काळजाची भाषा पुस्तकी कायद्याला समजत नाही. असो…
“माझ्या संस्थेत तयार झालेला विद्यार्थी बाजारात बंद्या रुपयाप्रमाणे खणखणला पाहिजे.” असे आण्णा म्हणायचे.
तो खणखणाट आता G Pay, फोन पे, च्या जमान्यात खरंच दुर्मिळ झाला आण्णा!
माफ करा आण्णा!😌
सचिन तिरोडकर..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत