महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

काय बसपा आणि वंचित मोट बांधू शकतील?

आर.के.जुमळे

बहुजन समाज पार्टी व वंचित बहुजन आघाडी हे दोनच पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्रात आंबेडकरी विचारांनी प्रभावित झालेले पक्ष आहेत. त्यामुळे आंबेडकरी जनता या दोन पक्षांवर आपली नजर ठेवून आहेत. बाकी गटातटांना फारसं कुणी भाव देत नाही.
असं असलं तरीही या दोन पक्षांनी पुढाकार घेऊन सर्व गटातटांची व महाविकास आघाडीपासून दुरावलेल्या लहान-मोठ्या प्रादेशिक पक्षांची मोट बांधली तर आंबेडकरी जनता या नवीन आघाडीला एखाद्या वेळी समर्थन देवू शकतील. त्यामुळे आंबेडकरी राजकारण जीवंत राहण्याची उमेद निर्माण होईल.
पण जर या दोन पक्षांनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ‘स्वबळावर’ची भाषा वापरली तर लोकसभेप्रमाणे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही.
आता आंबेडकरी जनतेला कळून चुकलं आहे की, कितीही उठापठक केली तरी बहुजन समाज पार्टी व वंचित बहुजन आघाडीचा ‘स्वबळावर’ एकही आमदार निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही. उलट मत विभागणीचा फायदा भाजप आघाडीलाच होतो आहे, म्हणून आंबेडकरी जनतेची मते परत महाविकास आघाडीकडे वळणार हे कोण्या भविष्यकारांनी सांगायला पाहिजे असं नाही.
आंबेडकरी जनतेनी भाजपच्या हिंदूत्ववादी धोरणाचा मोठा धसका घेतला आहे. त्यांचे जर खरंच ‘४०० के पार’ खासदार निवडून आले असते तर ज्याप्रमाणे भाजपचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे व लल्लू सिंग यांनी संविधान बदलण्याबाबतचे वक्तव्य केले होते, त्यानुसार संविधानाला हात लावायचा त्यांनी जरूर प्रयत्न केला असता. पण ‘४०० के पार’ शक्य होवू शकले नसल्याने त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. यात आंबेडकरी जनतेचा पण मोठा वाटा आहे. आंबेडकरी जनता महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे मोठ्या प्रमाणात वळल्यामुळे भाजप आघाडीला जबरदस्त झटका बसला, हे सर्वविदितच आहे.
लोकसभेच्या निवडणुकीनंतरही भाजपाच्या नेत्यांचे वक्तव्य येणे सुरूच आहे. तेलंगणा राज्याचे भाजपा आमदार टी.राजासिंह यांनी भिवंडी येथील धर्मसभेत म्हणाले की,
“लोकसभा निवडणुकीत भाजपाने ‘४०० पार’ जागा जिंकल्या असत्या तर आपला भारत देश नक्कीच हिंदूंराष्ट्र घोषित झाला असता.” त्यामुळे आंबेडकरी समाज लोकसभेप्रमाणे आताही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पण महाविकास आघाडीकडे वळला तर नवल वाटणार नाही.
हे खरं आहे की, महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्हीही पक्षांना पददलित व उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी मोठा कळवळा आहे असे म्हणता येणार नाही. याबाबत त्यांचा इतिहास तपासला तर त्यांचं चरित्र दृष्टोत्पत्तीस पडायला वेळ लागत नाही. परंतु आजच्या घडीला हिंदू राष्ट्र निर्मितीच्या दिशेने भाजपाची जी वाटचाल सुरू आहे, त्यामुळे भयभीत झालेली आंबेडकरी जनता भाजप आघाडीच्या विरोधात मैदानात ठाकला, हेही तेवढंच खरं आहे.
एक हिंदी गाणं आहे, ‘मिले न फूल तो कांटों से दोस्ती कर ली’ अशीच अवस्था आंबेडकरी जनतेची झाल्यासारखी वाटत आहे.
एक मात्र खरं की, आंबेडकरी जनतेला भाजप आघाडी मुळातच नको, हे स्पष्ट झाले आहे.
दुसरं असं की आंबेडकरी जनता कित्येक वर्षांपासून सत्तेपासून वंचित आहे. म्हणून या मोठ्या वर्गाला सत्तेत सहभागी व्हायची लालसा निर्माण होणं साहजिकच आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीने जर महाविकास आघाडीशी जुळवून घेतलं असतं तर लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना फायदा मिळाला असता व ते सत्तेत सहभागी झाल्याचं चित्र दिसून आलं असतं. पण ते घडू शकलं नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
ह्यावेळी महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जर बसपा म्हणा किंवा वंचित म्हणा, महाविकास आघाडीचा भाग असता, तर आंबेडकरी जनतेला राज्याच्या सत्तेत वाटा मिळाला असता. पण त्यावर आता चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही.
अशा परिस्थितीत विधानसभेच्या निवडणुकीत या आंबेडकरी पक्षांना जरी त्यांनी इच्छा प्रकट केली तरीही महाविकास आघाडी सामिल करून घेतील की नाही मोठा प्रश्नच आहे.
आर.के.जुमळे
दि.१४.७.२०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!