गुरु-शिष्यांनी वादळ निर्माण केलं

लेखांक ३
शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी ज्योतीबा फुले रायगडावर गेले. तेथे झाडाझुडपात व काट्यात लपलेला शिवाजीची समाधी शोधून काढली व तो परिसर साफ केला. त्यावर फुले वाहिली. ग्रामभटाने हे पाहिले व त्यांनी ते फुले पायांनी उधळले. त्यांनी शेतकर्यांचा रक्षणकर्ता असे शिवाजीराजे यांचे चित्र रंगवून पोवाडा रचला.
जमीनदार व सावकारच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी शेतकर्यांची चळवळ चालविली. याच वेळेस त्यांनी शेतकर्यांचा आसुड हा ग्रंथ लिहीला.
नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये गिरणी कामगाराची चळवळ सुरु केली.
१८७७ साली पडलेल्या दुष्काळात त्यांनी लहान मुलांसाठी अन्नछत्र उघडले.
१८७७ साली चळवळीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘दीनबंधु’ नावाचे मुखपत्र सुरु केले. त्या मुखपत्राचे संपादक सुरुवातीला कृष्णराव भालेकर व नंतरच्या काळात नारायण मेघाजी लोखंडे होते.
ज्योतीबा फुले यांनी प्रंचड लेखन केले. त्यांनी शेतकर्यांचे आसुड, गुलामगिरी, ब्राम्हणाचे कसब, तृतीय रत्न, शिवाजींचा पोवाडा, सार्वजनिक सत्य धर्म, अखंड इत्यादी अनेक प्रकारचे ग्रंथ, नाटक व काव्यलेखन केले. आयुष्याच्या अखेरीस ते आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्यांचा उजवा हात काम करीत नव्हते. म्हणून त्यांनी डाव्या हाताने ‘सार्वजनिक सत्य धर्म’ हा ग्रंथ लिहिला.
पत्रकारिता, ग्रंथलेखन, साहित्यलेखन, काव्यलेखन, तत्वज्ञान, कामगार चळवळ, शेतकरी आंदोलन, स्त्री मुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन, जाती निर्मुलन, अनिष्ट प्रथा निर्मुलन आरोग्य, शिक्षण इत्यादी अनेक स्तरावर महात्मा फुलेंची चळवळ प्रहार करत पुढे जात होती.
ब्राम्हणांनी दोन मारेकर्यांना ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी सुपारी देऊन पाठविले होते. परंतू ज्योतिबा फुलेंच्या विनयशील वागणूकीमुळे ते दोघेही त्यांना शरण गेले. त्यातला एक धोंडीराम कुंभार याला काशीला पाठविले. तेथे त्यांनी ग्रंथाचा व शास्त्राचा अभ्यास करुन पंडीत झाला. दुसरा रोडे रामोशी ज्योतिबाचा अंगरक्षक झाला.
राजेशाहीमध्ये सत्तेच्या सर्व किल्ल्या ब्राम्हणाकडेच होत्या. नावाचा क्षत्रिय राजे असले तरी त्यांची सत्ता ब्राम्हणाच्या सल्ल्याने चालत असायचे.
ज्योतीबा फुलेंच्या काळात जरी सत्ता ब्रिटिशांची असली तरी त्यांच्या प्रशासनात ब्राम्हणच होते. समाजातील उच्च स्थानामुळे सत्तेला आपल्या कलाप्रमाणे राबविण्यात ते यशस्वी झालेत. ऎनकेन प्रकारे सत्तेवर ब्राम्हणाचे वर्चस्व राहिल्यामुळे सर्वसामान्य लोक आणि शेतकरी नाडल्या जात होते. त्यांच्या अशिक्षितपणाचा, अडाणीपणाचा फायदा घेऊन कोर्ट कचेरीच्या कामात त्यांना कसे नागविल्या जात होते, ते ज्योतीबांनी ‘ब्राम्हणाचे कसब’ आणि ‘शेतकर्यांचा आसूड’ या ग्रंथात लिहिले आहे.
ब्राम्हणांनी मनुस्मृती व वेद निर्माण करुन ते देवनिर्मित आहेत असे लोकांना सांगितले. त्यामाध्यमातून चातुर्वण्य व्यवस्था व जातीची उच्च-निच अशी उतरंड तयार केली. त्यामुळे बहुजन समाज एकत्र येऊ शकला नाही. पाप, पुण्य, नशीब, दैव अशा भोळसर कल्पना त्याच्यात बिंबवील्यात. त्यामुळे ब्राम्हणांकडून होणारे अन्याय अत्याचाराला ते निमुटपणे सहन करीत असत.
हिंदुधर्माच्या ग्रंथावर ते टिका करीत असे. रामायणाला लोकांची मने रिझविण्यासाठी त्यावेळच्या गप्पाड्या नाटक्यांनी कल्पून रचिलेला नितीहीन इतिहास होय. गोपीकांचे वस्त्र पळविणारा, गोपपत्नी राधेसोबत रममान होणार्या कृष्णाला महाभारतातील नितिभ्रष्ट पात्र समजत असत.
विटलो खोट्या धर्मा।
त्यागिले निच कर्मा॥ असे त्यांनी एका काव्यात म्हटले आहे.
त्यांनी फक्त ब्राम्हणी समाज व्यवस्था किंवा हिंदु समाज व्यवस्था किंवा जाती व्यवस्था या विरोधात विद्रोह केला असे नसून त्यांनी ज्या धर्म शास्त्रांचा आधार घेऊन ही व्यवस्था निर्माण केली त्या धर्म शास्त्रांच्या सत्यतेच्या विरुध्द सुध्दा आव्हान दिले.
ज्योतीबा फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथात रामायण व ‘भागवत’ यातील गोष्टी खर्या व विश्वसनिय नाहीत असे लिहिले आहेत. ‘रामायणात परशुरामाचे धनुष्य सिता जर सहज उचलून खेळत असेल व तोच धनुष्य उचलताना जर रावण पडत असेल तर रावणापेक्षा सिता ही शक्तीशाली असली पाहिजे. मग रावण सितेला कसा काय पळवून नेऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला.
तसेच ब्राम्हण असलेल्या भृगु ॠषीने विष्णु-आदिनारायणाला लाथ मारतो तेव्हा भृगु ॠषीच्या पायाला लागले असेल म्हणून विष्णु त्याचे पाय चोळतो. याचा अर्थ ब्राम्हणाने प्रत्यक्ष देवाला जरी लाथ मारली तरी तो सहन करतो. मग आपण तर शुद्रच आहोत, मग आपल्याला ब्राम्हणाने लाथ मारल्यानंतर हु की चु करु नये, असा त्याचा भावार्थ आहे असे फुलेंनी ग्रंथात लिहिले आहे.
ब्राम्हण हे ईराणी आर्यभट असून परकीय आहेत. त्यानी आपली सत्ता टिकविण्यासाठी वेदापासून पुराणापर्यंत निर्मिती केली. आक्रमण करुन आलेल्या आर्यानी शक्ती, विश्वासघात व धार्मिक प्रचार या माध्यमातून स्थानिक जनतेवर त्यांनी विजय मिळविला. विष्णुचे नऊ अवतार म्हणजे आर्यांनी प्राप्त केलेल्या विजयाच्या निरनिराळ्या अवस्था होत्या असे ज्योतीबा फुलेंनी ग्रंथात लिहिले आहे.
इंग्रज आहेत तोपर्यंत शुद्राने जल्दी करुन भटाच्या दास्यत्यातून मुक्त व्हावे असे गुलामगिरी या ग्रंथामध्ये लिहिले आहे.
मनुस्मृतीचे कोणीतरी एखादा शुद्र दहन करील असे भाकीत ज्योतीबा फुले यांनी व्यक्त केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुची आज्ञा मानून २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे महाड येथे दहन केले.
शुद्र-अतिशुद्रास रसातळाला नेणारा त्यांचे जीवन, भावविश्व बेचिराख करणारा असा हिंदुधर्म असल्यामुळे त्यांनी ’सार्वजनिक सत्य धर्माची’ स्थापना केली.
२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या स्थापनेमागे त्यांचे ३ उद्देश होते-
१. शुद्र व अतीशुद्र यांची ब्राम्हण पुरोहिताकडून होणारी पिळवणूक बंद करणे.
२. त्यांना त्यांच्या मानवी हक्काची व अधिकारांची शिकवणूक देणे आणि
३. ब्राम्हणी शास्त्रांच्या आणि धार्मिक गुलामगिरीतून त्यांना मुक्त करणे.
हाच उद्देश समोर ठेऊन ज्योतीबा फुले यांनी आपल्या कार्याची दिशा आखली होती.
सत्यशोधक समाजाची स्थापना करुन सनातन्याचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली. तसेच सत्यशोधक समाजाचे संघटन करण्याचे कार्य हाती घेतले. या संघटनेचा पुणे, मुंबई व खेडोपाडी प्रचार व प्रसार करण्य़ात आला. ब्राम्हणाच्या हातून लग्न व इतर कोणतेही विधी करण्याचे काम या संघटनेने थांबवून आपल्याच कार्यकर्त्याद्वारे ते सत्यशोधक पध्दतीने विधी करीत असत. संघटनेने अनेक सत्यशोधक विवाह अत्यंत कमी खर्चात व साधेपणाने घडवून आणले.
८ मार्च १८६४ रोजी त्यांनी शेणवी जातीच्या विधुर-विधवांचा पुनर्विवाह घडवून आणला.
ख्रिचन, मुस्लिम, मांग व ब्राम्हण यांनी भावासारखे राहावेत असे फुले म्हणत असत.
ख्रिस्त महमंद मांग ब्राम्हणासी।
धरावे पोटाशी। बंधुपरी॥
यावरुन ते मानवतेवर किती प्रेम करायचेत ते दिसते. एकाच घरात एक भाऊ मुस्लिम, एक ख्रिस्ती, आणि एक बौध्द असावा अशी त्यांची सर्व धर्म समभावाची व व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना होती.
ज्योतीबा म्हणतात-
‘थोडे दिन तरी मद्य वर्ज करा।
तोच पैसा भरा। ग्रंथासाठी॥’
१८८० मध्ये त्यांनी दारु विक्रीला विरोध केला होता.
प्रत्येक सरकारी खात्यात ब्राम्हणेत्तर लोक असल्याशिवाय जनतेला खरे सूख मिळणार नाही. म्हणून ते प्रत्येक खात्यात सर्व जातीच्या लोकांचा भरणा असला पाहिजे असे ते प्रतिपादन करीत. विशेषत: शिक्षण खात्यात सर्व जातीच्या शिक्षकांची नेमणुक करावी असे ते सरकारकडे मागणी करीत असे. म्हणजेच प्रत्येक जातीला त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात त्यांची भागिदारी असावी असा त्यांनी विचार मांडला होता. हाच विचार घेवून राजश्री शाहू महाराज यांनी त्याच्या संस्थानात ब्राम्हणेतरांना ५० टक्के आरक्षण दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गियांना आरक्षण मिळण्यासाठी कठोर संघर्ष केला व भारतीय घटनेमध्ये तशी तरतुद केली.
२ मार्च १८८८ रोजी पुणे येथे ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सत्कार प्रसंगी ज्योतीबाने शेतकर्याच्या पोषाखात जाऊन म्हणाले की, ‘येथे जमलेले हिरेमोती व मौल्यवान कपडे घातलेले लोक हे हिंदुस्थानचे खरे प्रतिनिधी नाहीत. खरा हिंदुस्थान खेड्यात आहे. तो उपाशी, गरीब, बेघर व उघडा-नागडा आहे. त्याला शिक्षण देणे आवश्यक आहे. ही जाणीव आपण आपली माता महाराणी व्हिक्टोरिया यांना करुन द्यावी.
ज्योतीबांनी इंग्रज नोकरशाहीलाही धारेवर धरले होते. इंग्रज अधिकारी ऎषारामी बनला आहे. हाताखालील ब्राम्हण अधिकार्यावर विश्वास ठेऊन इंग्रज अधिकारी शेतकर्यांची पिळवणूक करीत असतो. इंग्रजी राजवटीत ब्राम्हण अधिकारी अधिकच जुलमी व भ्रष्टाचारी बनली आहे.
ग्रामीण शेतकरी–कष्टकरी जनतेचे आता दुहेरी शोषण होत आहे. एकीकडे इंग्रज व दुसरीकडे ब्राम्हण यांच्याकडून त्यांची भयंकर नागवणूक होत आहे.
म्हणून ज्योतीबा फुले म्हणतात-
‘सत्ता तुझी राणीबाई। हिंदुस्तानी जागृत नाही॥
जिकडे तिकडे ब्राम्हणशाही। डोळे उघडूनी पाही॥ .
मुंबईच्या सभेत त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली.
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या त्यागमय जीवनाचा बोध घेऊन सामाजीक कार्यामध्ये तन, मन धनाने सहयोग दिला पाहिजे. फुले-शाहु-आंबेडकरांच्या चळवळीचा सैनिक बणण्याऐवजी प्रतिक्रांतीवाद्याचा सैनिक बनून मानवतेचा बळी तर घेत नाही ना, यावर आपण लक्ष ठेवायला शिकले पाहिजे. हा बोध ज्योतीबा फुलेंच्या जीवन आणि कार्यामधून घेता येईल.
२८ नोव्हेंबर १८९० ला ज्योतिबा यांनी प्राण सोडला. बहुजनाःचा एक सूर्य अस्तास गेला. मात्र दुस-याच वर्षी १४ एप्रिल १८९१ साली डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने दुसऱ्या सूर्याचा उदय झाला.
क्रमशः
लेखक- आर. के.जुमळे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत