भगवान बुद्धांची शिकवण भाग ४६

अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म…
भगवान बुध्दांनी एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे –
बुध्दांना एका पंडितानं विचारलं की, तथागत आपण लोकांना सांगता- देव नाही, आत्मा नाही, स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही.
बुध्द म्हणाले, तुम्हाला असे कुणी सांगितले की, मी असे बोललो?
पंडित म्हणाला, नाही असे कुणी सांगितले नाही.
मग मी असे बोललो असे सांगणारी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का ?
पंडीत म्हणाला नाही.
मग असे मी कुणाला सांगताना तुम्ही ऐकले आहे का ?
पंडित म्हणाला नाही. पण तथागत मी लोकांच्या चर्चेतून तसेच ऐकले आहे. तसे नसेल तर तुम्ही काय सांगता ?
तथागत म्हणाले, मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो .
पंडित म्हणाला मला सोपे करुन सांगा.
मग तथागत म्हणाले, माणसाला पाच बाह्य ज्ञानेंद्रीय आहेत, ज्या द्वारे माणूस सत्य जाणतो.
१) डोळे, २)कान, ३)नाक, ४) जीभ आणि ५) त्वचा
माणूस डोळ्यांनी बघतो,
कानाने आवाज ऐकतो,
नाकाने वास घेतो,
जीभेने चव घेतो,
आणि त्वचेन स्पर्श जाणतो.
या पंच ज्ञानेंद्रीयांपैकी कधीकधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रीयांचा वापर करुन माणूस सत्य जाणतो.
पंडित विचारतो कसे ?
पाणी डोळ्यांनी दिसते पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते. गोड की खारट कळायला जीभेची मदत घ्यावी लागते.
पंडित म्हणाला बरोबर. पण मग देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय ?
तथागत म्हणाले, तुम्ही हवा पाहू शकता ?
पंडित म्हणाला नाही.
याचा अर्थ हवा नाही असा होतो का ?
पंडित म्हणाला नाही.
हवा दिसत नसली तरी ती आहे. कारण तिचं अस्तित्व नाकारता येत नाही. आपण श्वासोच्छवास करताना हवा आत-बाहेर सोडतो. वा-याची झुळूक आली की आपल्याला जाणवते. झाड, पान हवेने हलताना ते दिसतात.
तथागत म्हणाले, आता मला सांगा देव तुम्हाला पंच ज्ञानेंद्रीयांनी जाणवतो का ?
पंडित म्हणाले नाही .
तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे ?
पंडित- नाही.
तुमच्या आईवडिलांनी पाहिल्याचं सांगितलंय ?
पंडित- नाही.
मग पूर्वजांपैकी कुणी पाहिल्याचं ऐकलत ?
पंडित- नाही.
मग तथागत म्हणाले, आजवर कुणीच पाहिलं नाही.
आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रीयांनी जे जाणता येत नाही, ते सत्य नाही. त्याला गृहीत धरणं योग्य आहे काय?
ज्ञानी पंडिताला ब-यापैकी पटायला लागलं होतं, तरी त्यानं प्रश्न विचारला…
तथागत ठीक आहे, पण मग आपण जीवंत आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे. हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही ?
तथागत पंडिताला म्हणाले, तुम्ही सांगता- आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही.
पंडित म्हणाला, हो. बरोबर आहे.
मग तथागत म्हणाले, मला सांगा माणूस मरतो म्हणजे काय ?
पंडित म्हणाला, आत्मा त्या माणसातून निघून गेला की माणूस मरतो.
मग मला सांगा आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो ?
पंडित- आत्मा शरीर सोडतो.
का सोडतो आत्मा शरीर ?
कंटाळा आला म्हणून ?
पंडित- माणसाचं आयुष्य संपल्यावर.
तथागत म्हणाले, तसं असेल तर सगळी माणसं शंभर वर्ष जगली पाहिजे .
अपघात, आजार झाल्यावरही उपचार न करता जगली पाहिजे.
पंडित- तथागत बरोबर आहे तुमचं. पण माणसात जीव आहे त्याला काय म्हणाल ?
तथागत म्हणाले तुम्ही पणती पेटवता. एका भांड्यात तेल अन् तेलात वात असते. ही वात पेटवायला अग्नी देता. बरोबर ?
पंडित- बरोबर .
मग मला सांगा वात कधी विझते ?
पंडित- तेल संपतं तेव्हा.
तथागत- आणखी ?
पंडित- तेल आहे; पण वात संपते तेव्हा.
तथागत- आणखी ?
पंडितजी काहीच बोलले नाहीत.
तेव्हा तथागत म्हणाले पाणी पडले, वारा आला, पणतीच फुटली तर पणती विझू शकते. मानव देह ही एक पणती समजा आणि जीव म्हणजे आग (उर्जा )
सजीवाचा देह चार तत्वांनी बनलेला आहे .
१) पृथ्वी – घनरुप पदार्थ (माती)
२) आप – द्रवरुप पदार्थ (पाणी,स्नीग्ध तेल )
३) वायु – वारा
४) तेज – उर्जा, उष्णता
या चार पैकी एक पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो. उर्जा बनणं थांबते.
यालाच म्हणतात माणूस मरणे.
आणि
सजीव माणूस मेल्या नंतरचा जो आत्मा आहे, तुम्ही म्हणता तो देवासारखाच अस्तीत्वहीन आहे.
देव आहे की नाही, आत्मा आहे की नाही या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवीत नाही.
धम्म माणूस जन्मल्यापासून मरे पर्यंत माणसानं कसं जगावं याच मार्गदर्शन करतो. काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते सांगतो. धम्म जीवंतपणी स्वर्ग उपभोगण्याची माणसाला संधी उपलब्ध करतो आणि जीवंतपणी याच जन्मात अज्ञानामुळे नरक भोगावा लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो.
अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म…
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२८.१.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत