मतपत्रिके बरोबर सेल्फी !मतदानाचा नवा ट्रेंड
शांताराम ओंकार निकम
नुकतीच २६ जुन २०२४ ला कोकण विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणूक झाली.
या निवडणुकीत एकूण ९८८६० मते होती.एकुण १३ उमेदवारांनी भाग घेतला त्यापैकी भाजपचे उमेदवार माजी आमदार निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्यातच खरी लढत झाली.
बाकीचे उमेदवार कशासाठी निवडणूक लढवत होते ,हे त्यांचे त्यांनाच माहीत.
गेल्या दहा वर्षांपासून या निवडणुकीतही उमेदवारांनी मतदारांना वाईट सवय लावायला घेतली आहे.
या मतदारसंघात मतदान लाखाच्या आतबाहेर असते.त्यामुळे काही काम न करता पैशांच्या जोरावर मते विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
निवडणूक आयोगाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे.
ही निवडणूक महायुती आणि महाआघाडी या दोघांसाठी प्रतिष्ठेची होती. त्याप्रमाणे त्यांनी काम केले आहे.
या मतदार संघातील अंबरनाथमधील भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा सुजाता भोईर यांनी चक्क मतदान केंद्रात मोबाईल नेऊन भाजपच्या उमेदवाराला मतदान करून त्याचा सेल्फी घेऊन समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला.
वास्तविक पाहता मत हे दान असून ते गुप्त असले पाहिजे. पण येणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेचे तिकीट मिळावे यासाठी सुजाता भोईर यांनी केलेली ही धडपड दिसत आहे.
सुजाता भोईर यांनी मतपत्रिकेसोबत सेल्फी काढून समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला ही एकच घटना नाही .तर उल्हासनगरमध्ये मतदारांनी मतदान करताना भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासमोर एक रेघ ओढून त्या मतपत्रिकेचा फोटो काढून तो कॅमेरामधील फोटो भाजपच्या कार्यकर्त्यांना दाखवायचा म्हणजे मग भाजप कार्यकते त्या मतदाराला एक हजार ते तीन हजार रुपये देत होते.आणि त्यांच्या जवळ असलेल्या यादीत ज्या मतदाराला पैसे दिले गेले तिथे हिशेबासाठी नुसते पी लिहीत होते.
याप्रमाणे खात्रीशीर मतदान झाल्याचे त्यांना कळत होते.
जर असेच मतदाराला पैसे दिले गेले आणि त्याने मत दिले नाही किंवा दुसरेच कोणाला देऊन आला तर? यासाठी ही तजवीज केली होती.
पण प्रश्न असा आहे की,मतदान केंद्रात जर मोबाईल, कॅमेरा घेऊन जाण्याची परवानगी नसताना उल्हासनगर अंबरनाथ मधील मतदानकेंद्रावर मतदार मोबाईल घेऊन कसे काय जात होते?
तेथील मतदान अधिकारी काय करत होते? मतदान कर्मचारी काय करत होते? पोलीस काय करत होते?
अशाच प्रकारे निवडणूका होत असतील तर त्या घेतल्या तरी का जातात?
मतपत्रिकेचा फोटो मोबाईल मध्ये काढून आणण्याचे काम दिवसभर सुरू होते?निवडणूक आयोगाला ही बाब माहीत नसेल का?
‘कानून सबुत मांगता है’ असे असेल तर आंबरनाथमधील भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा सुजाता भोईर यांचा निरंजन डावखरे यांना मत दिलेला फोटो समाज माध्यमांवर फिरतो आहे,त्यांच्यांवर निवडणूक आयोग काय कारवाई करणार आहे?
प्रत्येक मतदान कक्षात सीसी टीव्ही असतात त्यांचे फुटेज मिळतील सबुतच हवा असेल तर.
१
अलीकडे मतदान प्रक्रिया ही अतिशय घाणेरडी झाली आहे.धनदांडगे उमेदवार निवडणूक लढवतात.निवडणुकीत उमेदवारांना करावयाच्या खर्चाची मर्यादा असते.पण ती फक्त नावाला असते.खर्च त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने होत असतो.
मतदारांना पैशांचे अमिश दाखवले जाते.आपल्या हस्तकांकरवी पैसे वाटप केले जातात.मतांची किंमत शंभर ते पाच हजारांपर्यंत केली जाते.
मतदारांनाही सवय झाल्याने ते सरळ ‘काय रेट सुरू आहे ‘अशी विचारणा कार्यकर्त्यांना करतात.
पूर्वी गरीब लोक पैशाच्या लालसेने शंभर ते पाचशे रुपये घेऊन मतदान करायचे, झोपडपट्टीमध्ये एखाद्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याकडे उमेदवार पैसे द्यायचे मग तो कार्यकर्ता प्रत्येक मतदाराला पैसे द्यायचा.हे गरीब लोकांमध्ये चालायचे.
पण आता पदवीधर मतदार संघातही मतदार पैशाशिवाय मतदानाला बाहेर पडताना दिसत नाहीत .
शासनाने मतदानासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली होती तरीही अनेकांनी मतदान केले नाही.म्हणून मतदान कमी झाले .
कल्याणमध्ये मतदार मतदान करून आल्यानंतर हजार दोन हजार घेण्यासाठी रांगेत उभे होते म्हणतात.त्यातले काही मतदार चारचाकी घेऊन आले होते.बोला आता.
ज्या मतदारांना उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना पैसे देण्यासाठी ताटकळत ठेवले त्यांनी पैसे तर त्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून घेतले पण मतदान चिडून दुसरीकडे केले,असे सुद्धा अनेक ठिकाणी झाले आहे.
टी. एन. शेषन यांच्यासारखा खमक्या निवडणूक आयुक्त असला पाहिजे.शेषन यांनी दबंग उमेदवारांना ,मंत्र्यांना, आमदार,खासदारांना धडा शिकवला होता.त्यांच्यापुढे कोणाचेच काही चालायचे नाही,अतिशय निःपक्षपातीपणे त्यांनी काम केले,त्यामुळे माझ्यासारखे सर्वसामान्य घरातील उमेदवार त्यांच्या काळात निवडून आले.
शेषन यांच्या पूर्वीच्या काळी,मतदान प्रक्रियेत धुमाकूळ होता. प्रचंड दहशत होती,मते विकत घेतली जात होती, बूथ कॅपचर होत होते.ते शेषन यांनी थांबवले.
आता पुन्हा तोच खेळ सुरू झाला आहे.फक्त प्रकार बदलले आहेत.
निवडणुक आयोग याबाबतीत काय निर्णय घेते, हे पाहू या.
एक जुलै २०२४ ला निकाल आहे.
ज्यांनी पैसे वाटले ते निवडून येतात की, आणखी कोणी बाजी मारून जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चर्चा तर पैसे वाटणाऱ्यांचीच आहे.
शांताराम ओंकार निकम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत