माणसातील राजा आणि राजातील माणूस’ – छत्रपती शाहू महाराज
सुनील इंदुवामन ठाकरे,
गंगाराम कांबळेच्या हॉटेलात साक्षात छत्रपती शाहू महाराज चहा पीत होते. त्यांच्या घोडागाडीतील कर्मचारीदेखील चहा पीत होते.
हा सर्व प्रकार पाहण्यासाठी कोल्हापुरातील नागरिकांनी तोबा गर्दी केली. हॉटेलात चहा पिणं ही तशी साधी घटना; मात्र वर्तमानकाळात.
तो काळ होता जवळपास 100वर्षांपूर्वीचा. एका अस्पृष्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या हातचा चहा पिणंदेखील एक क्रांतिकारी पाऊलच होतं.
हे गंगाराम कांबळे महाराजांच्या पागेत मोतद्दार होते. त्यांनी पाण्याच्या हौदाला स्पर्श केला म्हणून त्यांना मारहाण झाली. महाराज तेव्हा कोल्हापुरात नव्हते.
परत आल्यावर जेव्हा त्यांना ही हकिकत कळली, तेव्हा त्यांनी मारहाण करणाऱ्यांना चांगलाच चोप दिला. गंगाराम कांबळे यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून देण्यास सर्वच पाठबळ दिलं.
समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळावा यासाठीचा हा छत्रपतींचा कृतिशील प्रयत्न. कांबळेच्या ‘सत्यसुधारक’ हॉटेलातल्या चहामागे अनेक पिढ्यांच्या संघर्षाचा इतिहास होता.
सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या महान छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 26 जून ही जयंती ‘सामाजिक न्यायदिन’ म्हणून साजरी केली जाते.
ब्रिटिशांनी आपली पाळंमूळं संपूर्ण भारतात पसरवली होती. अनेक संस्थाने खालसा केली. काही मांडलिक झालेत.
कोल्हापूरची गादीदेखील ब्रिटिशांची मांडलिकच होती. कोल्हापूर संस्थानचे राजे चवथे शिवाजी महाराज यांचं निधन झालं. त्यानंतर गादीला वारसा मिळावा म्हणून त्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी यशवंतराव यांना दत्तक घेतलं.
17 मार्च 1884 रोजी ते कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झालेत. पुढे 2 एप्रिल 1894मध्ये त्यांना कोल्हापूर संस्थानाच्या कारभाराचा अधिकार मिळाला.
यशवंतरावांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलयेथील घाटगे घराण्यात झाला. त्याचे वडील जयसिंगराव उपाख्य आप्पासाहेब तर आई राधाबाई.
यशवंतरावांचं दत्तक घेतल्यानंतर शाहू असं नामकरण झालं. सन 1889 ते 1893 या काळात धारवाड येथे शिक्षण सुरू झाले. त्यांचे प्रारंभिक शिक्षण फिटझिराल्ड या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या देखरेखीत सुरू झाले.
राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये 1886मध्ये त्यांना पाठवण्यात आले. याच वर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जनकपिता आप्पासाहेबांचे निधन झाले. तीन वर्षांचे असतानाच छत्रपती शाहूंचे मातृछत्र हरवले.
कुस्ती, मल्लविद्या, अश्वारोहण, नेमबाजी इत्यादींचे त्यांचे प्रशिक्षण सुरूच होते. ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्येदेखील जायला लागले. कोल्हापूर-मीरज रेल्वेची पायाभरणी 8 मे 1888मध्ये झाली.
हा त्यांच्या आयुष्यातला पहिला मोठा सार्वजनिक समारंभ होता.
फिटझिराल्ड यांच्यासह त्यांनी अनेक दौरे केलेत. उत्तर आणि दक्षिण भारताचाही त्यांचा अभ्यास झाला.
महाराष्ट्रातील, कोल्हापूर संस्थानातील विविध भागांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्यात. तिथलं जनजीवन समजून घेतलं. या क्षेत्राचा भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अंगांनी अभ्यास केला.
याचदरम्यान 1 एप्रिल 1891मध्ये बडोद्याचे सरदार गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्यासोबत छ. शाहूंचा विवाह झाला.
जनकपिता आबासाहेब हे पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी आपल्या कागल या छोट्याा जहागिरीत मोठी क्रांतिकारी पावलं उचललीत. त्यांनी मुलांच्या 11 शाळा, मुलींची एक शाळा आणि दोन इंग्रजी शाळा सुरू केल्यात.
शेतकऱ्यांपर्यंत विविध तंत्रज्ञान पोहचवण्याचं कार्य त्यांनी केलं. हाच वारसा पुढे छत्रपती शाहू महाराजांनी चालविला. कुस्तीवरील प्रेमदेखील ते त्यांना त्यांच्यकडूनच मिळालं.
कला, साहित्य, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. कोल्हापुरातील खासबाग आखाडा, नाटकांसाठीचं पॅलेस थिएटर, राधानगरी धरण, इंडस्ट्रियल ट्रेनिंग देणाऱ्या संस्था ही छत्रपती शाहूंची देण आहे.
एवढंच नव्हे तर त्यांनी सहकारी चळवळदेखील आपल्या कारकीर्दीत सुरू केली, हे विशेष.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि कृतीचा वारसा छ. शाहूंनी पुढे चालवला. प्रजेचं कल्याण हाच ध्यास त्यांनी शेवटपर्यंत ठेवला.
मुंबई इलाख्याचे गवर्नर लॉर्ड हॅरीस त्यांच्या राज्याधिकार प्राप्तीच्या दिवशी उपस्थित होते. यावेळी शाहू महाराजांनी एक जाहिरनामा काढला. त्यात प्रजेच्या सुख, समृद्धी, कल्याण, भरभराटीवर भर दिला. महाराज आपल्या संस्थानात प्रत्यक्ष दौरे काढीत.
अशाच एका दौऱ्यात त्यांना कुष्ठरोगी दिसलेत. त्यांनी 1897मध्ये ‘व्हिक्टोरिया लेपर असायलम’ ही संस्था काढली. विद्रूप देहाचे अनेक रोगी त्यांनी आश्रमवासी केलेत.
त्यांच्या कारकीर्दीत नैसर्गिक आपत्तींनी थैमान घालणं सुरू केलं. 1896-97 आणि 1899 -1900 या काळात भयंकर दुष्काळ पडला. त्या काळात त्यांनी रस्ते, विहिरी, तलाव, पूूल अशी दुष्काळी कामे काढलीत.
सरकारची कुरणे व जंगले गुरांसाठी मोकळी केलीत. अनेकांना अन्न-वस्त्र आणि रोजगार देऊन जीवनदान दिलं. प्लेगच्या साथीतही त्यांनी केलेले नियोजन आणि उपाययोजना आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या.
ब्रिटिशांनी संस्थानामध्ये त्यांचा पोलिटिकल एजंट नेमला होता. ब्राह्मण, युरोपीयन आणि पारशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा त्यात भरणा अधिक होता. त्यांच्याव्यतिरिक्त अधिकारी आणि कर्मचारी हे तुलनेने फार कमी होते.
स्थानिकांचा विचार केला तर शिकलेल्यांमध्ये जवळपास 80 टक्के ब्राह्मण होते. उर्वरित जैन, लिंगायत, मराठा आणि मुसलमान होते. यात पोलिटिकल एजंट आणि ब्राह्मणवर्गाचं वर्चस्व जास्त होतं.
कर्नल विल्यम रे या पोलिटिकल एजंटने तर विषप्रयोग केल्याचा प्रत्यक्ष महाराजांवरच आरोप केला. महाराजांना आपले निर्दोषत्व पुराव्यानिशी सिद्ध करावे लागले. आणि त्यांनी ते केलेदेखील.
राज्यारोहणानंतर महाराजांनी राजप्रतिनिधी मंडळ बरखास्त केले. त्याऐवजी प्रशासन मंडळ नेमले. हुजूर ऑफीस या महत्त्वाच्या खात्याची निर्मिती केली.
पुढे चालून युरोपियन आणि पारशी यांची मक्तेदारी लयास गेली. सुशिक्षित भास्करराव विठोबाजी जाधव यांची महसूल खात्यात नेमणूक केली.
दिवाण म्हणून प्रभू समाजातील सबनिसांची नेमणूक केली. दाजीराव अमृतराव विचारे या मराठा तरूणाची एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून नियुक्ती केली.
नंतरच्या काळात राणी व्हिक्टोरियाकडून त्यांना जी.सी.एस.आय. हा किताब मिळाला. राज्यकर्त्याचा एक महत्त्वाचा अधिकार होता, गुन्हेगाराला जीवनदान किंवा मृत्यूची शिक्षा देण्याचा. हा अधिकारदेखील त्यांना 1895मध्ये मिळाला.
छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील ‘वेदोक्त प्रकरण’ हे अत्यंत महत्त्वाचं ठरलं. किंबहुना त्यांच्या पुढील कार्याला दिशा यातून मिळाली, असे म्हणावयास काही हरकत नाही. हे प्रकरण ऑक्टोबर 1899मध्ये घडले.
कार्तिक महिना सुरू होता. महाराज नेमाने पंचगंगा नदीवर स्नानास जात. तेव्हा भटजी मंत्र म्हणत होता. ते मंत्र पुराणोक्त असल्याचं तिथे उपस्थित असलेल्या एका जाणकाराच्या लक्षात आलं.
त्याबद्दल महाराजांनी विचारणा केली. तो भटजी म्हणला की, वेदोक्त मंत्र हे शुद्रांसाठी नाहीत. अर्थात तो भटजी महाराजांना चक्क शूद्र म्हणाला. साक्षात छत्रपतींना त्याने वेदमंत्र नाकारलेत.
मग सामान्यजनांची काय अवस्था असेल, याचा विचार छत्रपतींनी केला. ती एक ठिणगीच होती. पुढे या ठिणगीचा वणवा झाला. ब्राह्मण समुदाय या घटनेचं समर्थन करू लागला.
बाळ गंगाधर टिळकांनी ‘केसरी’तून ‘वेदोक्ताचे खूळ’ नावाने दोन अग्रलेख लिहिलेत. ज्या वर्गाने महाराजांचे क्षत्रियत्त्व नाकारले ते छत्रपतींच्याच कृपेने समृद्ध झाले होते.
वेदोक्त अधिकार नाकारणाऱ्या शेकडो ब्राह्मणांची अनुदाने आणि इनामे जप्त करण्यात आलीत. याही पुढे जाऊन सन 1902मध्ये कोल्हापूर संस्थानाच्या प्रशासनात 50 टक्के आरक्षण ब्राह्मणेतरांना घोषित झाले.
वेदोक्त प्रकरणाचा संघर्ष जवळपास सहा ते सात वर्ष चालला. अखेर 1905मध्ये महाराज यात विजयी झालेत. वेदोक्त प्रकरणानंतर ते महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या ‘सत्यशोधक समाजा’कडे आणि आर्य समाजाकडे आकर्षित झालेत.
शिक्षणाअभावी हे शोषण होत असल्याचं महाराजांच्या लक्षात आलं. ब्राह्मणेतर समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम महाराजांनी केलं.
खेड्यापाड्यातील बाहेरगावचे विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतीगृह काढण्याचं कार्य सुरू केलं. 18 एप्रिल 1901 रोजी ‘व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग’ हे पहिले वसतीगृह सुरू झाले. पी. सी. पाटील हे या पहिल्या वसतीगृहाचे पहिले विद्यार्थी.
नावात जरी ‘मराठा’ असलं तरी ते वसतीगृह सर्वसमावेशक होतं. महारजांच्या प्रेरणेतून आणि काही ठिकाणी सहकार्यातून विविध जाती, धर्माची वसतीगृह सुरू झालीत. मुस्लिमांसाठी वसतीगृह काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच होते.
त्यांनी 1906मध्ये मुस्लिमांची एक सभा आयोजित केली. त्याच सभेत ‘मोहमेडन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना झाली. महाराज या सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष राहिलेत.
जातवार वसतीगृहे का काढलीत म्हणून त्यांच्यावर काहींनी आक्षेपदेखील घेतला. महाराजांना भविष्यातलं जे चित्र दिसत होतं, ते सामान्यजन पाहू शकत नव्हते.
याच वसतीगृहातून अनेक मोठी माणसं घडलीत. त्यांनी स्वतःसह आपल्या समाजालादेखील मोठं केलं.
शिक्षणाच्या बाबतीत महाराज प्रचंड आग्रही होते. गाव तिथे शाळा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवलंच पाहिजे असा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा नियम त्यांनी लावला.
पाल्यांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना एक रूपया दंडही ठेवला. काहींच्या सोयीसाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्यात. 28 सप्टेंबर 1919मध्ये संस्थानातील अस्पृष्यांच्या स्वतंत्र शाळा बंद केल्याचा आदेश जारी केला.
सर्वांना समानेच्या पातळीवर एकाच प्रवाहात आण्ण्याचा हा प्रयत्न होता. वैदिक आणि अन्य विधींवर ब्राह्मणांची मक्तेदारी होती. ती त्यांनी मोडीत काढली.
त्यासाठीचे प्रशिक्षण देणारे ‘श्री शिवाजी वैदिक विद्यालय’ काढले. क्षात्रजगद्गुरू पदाची निर्मिती त्यांनी केली.
अस्पृष्यमुक्तीचा पहिला आदेश त्यांनी 27 जुलै 1918ला मंजूर केला. कोल्हापूर गॅझेटमध्ये तो 3 ऑगस्ट 1918ला प्रसिद्ध झाला. महार, मांग, रामोशी आणि बेरड या जातीच्या लोकांना रोज हजेरी लावावी लागत असे.
ही प्रथा महाराजांनी बंद केली. वेठवरळा ही क्रूर व शोषण करणारी पद्धत महाराजांनी बंद केली. शूद्रातिशूद्र समजल्या जाणाऱ्या किंवा गुन्हेगार म्हणून ठपका लागलेल्या समाजाला त्यांनी आपल्या प्रशासनाच्या सेवेत घेतले.
भटक्यांना स्थिर केले. महार आणि कुळकर्णी वतनं त्यांनी संपविलीत. त्याचा योग्य मोबदलादेखील त्यांनी त्यांना दिला. शिकलेले तलाठी पगारीतत्त्वावर नेमलेत.
महाराजांनी अस्पृष्यता निवारणाची एक मोठी चळवळ सुरू केली. देश स्वतंत्र झाल्यावर घटनेने 17व्या कलमानुसार अस्पृष्यता नष्ट केली. पुढे 1955मध्ये तसा कायदाही करण्यात आला.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कीर्ती त्यांच्या कानावर आली. त्यांनी विपरित परिस्थितींचा सामना करून एवढ्या डिग्रीज मिळवल्यात, याचं महाराजांना कौतुक वाटलं.
सन 1919मध्ये छत्रपती शाहू महाराज स्वतः मुंबईला गेलेत. त्यांनी बाबासाहेबांची भेट घेतली. त्याच्या दुसऱ्या वर्षी डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र सुरू केलं. त्यालाही महाराजांनी सहकार्य केलं.
मार्च 1920मध्ये माणगाव येथे महाराजांच्या प्रेरणेतून अस्पृष्य समाजाची परिषद भरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या परिषदेचे अध्यक्ष होते. त्या परिषदेत त्यांना बाबासाहेबांमधील नेतृत्त्व दिसलं.
त्यांच्यावरचा विश्वास महाराजांनी बोलून दाखविला. ‘खरा पुढारी’ निवडल्याबद्दल परिषदेचं अभिनंदनदेखील केलं. महाराजांनी बाबासाहेबांसोबत सहभोजनाचा कार्यक्रम ठेवला.
कोल्हापुरी जरिपटक्याने बाबासाहेबांना त्यांनी सन्मानित केले. बाबासाहेब आणि महाराज यांच्यातील प्रेमभाव वाढता राहिला. शाहू महाराजांचा वाढदिवस अस्पृष्य समाजाने सणासारखा साजरा करावा, असा ठराव बाबासाहेबांच्या प्रेरणेने माणगाव परिषदेत झाला होता.
बाबासाहेबांच्या उच्चशिक्षणासाठी महाराजांनी मदत केली. रमाबाईंना त्यांनी धाकटी बहीण मानलं.
जातीभेद निवारणाचं कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केलंच. त्यासोबत अनेक गंभीर समस्यांवरदेखील त्यांनी काम केलं.
देवदासींना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून त्यांनी चळवळ उभारली. आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार त्यांनी केला. लग्नासाठी वर आणि वधूचं वय निश्चित केलं. जन्माने जात आणि व्यवसाय मिळत होता. ही व्यवसायबंदी त्यांनी मोडली.
सर्वांना व्यवसायाचे स्वातंत्र्य दिले. विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. पदडा पद्धतीचा निषेध केला. आपापल्या जातीतला नेता निवडावा. आपल्या उद्धारासाठीचे पहिले पाऊल आपणच टाकावे असा त्यांचा आग्रह होता.
चित्रकार आबालाल रहिहमान, गानसम्राट अल्लादियाँ खान साहेब, आनंदराव व बाबुराव पेंटर, नाट्यकर्मी बालगंधर्व, चित्रकार दत्तोबा दळवी, उद्योजक किर्लोस्कर, कुस्तीपटू, विविध वृत्तपत्रांचे संपादक या सर्वांना छत्रपती शाहू महाराजांचा फार मोठा आधार होता.
एवढेच नव्हे तर सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना ‘माणसातील राजा आणि राजातील माणूस’ म्हणून गौरविले. खरोखरच छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात माणसातील राजा होऊन सर्वसामान्यांच्या व्यथेला न्याय दिला.
राजातील माणूस होऊन त्यांना शक्य तेवढं आपल्या प्रजेसाठी केलं. राजा म्हणून छत्रपती शाहू महाराज मोठे होतेच.
माणूस म्हणूनदेखील त्यांचं कार्य सूर्यप्रकाशाएवढं तेजस्वी आहे. त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
सुनील इंदुवामन ठाकरे,
वणी जिल्हा यवतमाळ
मो. 8623053787
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत