महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

कोणी कोणास अंधभक्त म्हणावे!

एच. बी. जाधव


मला केवळ “आंबेडकर”ह्या आडनावाच्या चळवळी संबंधी काहीही बोलायचे किंवा लिहावयाचे नाही. मला जे काही बोलायाचे आहे किंवा लिहावयाचे आहे ते “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसंबंंधी. सर्वत्र बोलले जात आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत गट पडले आहेत. गट पडले आहेत की निरनिराळ्या मनोवृत्तींचा वावर सुरू आहे याचा प्रथम विचार केला पाहिजे. माझ्या मते पहिल्यांदा मनोवृत्तींचा विचार करणे अगत्याचे आहे.त्यामुळे गट ह्या शब्दाचे अंतरंग कळून चुकेल किंवा दिसून येईल. एक मनोवृत्ती आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिध्दांतावर आणि तत्त्वज्ञानावर अतूट ,अढळ निष्ठा असणारी.दुसरी मनोवृत्ती आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिध्दांतावर आणि तत्त्वज्ञानावर अतूट ,अढळ निष्ठा नसणारी.मोकाट सुटलेल्या गोराढोरासारखी ह्या मनोवृत्तीची वाटचाल चालू आहे. ही मनोवृत्ती आहे जोगवा पध्दतीची. बाबासाहेब म्हणाले, “आम्ही झगडत आहोत इज्जतीकरीता” परंतु ह्या मनोवृत्तीत इज्जतीचा थांगपत्ता नाही. बाबासाहेब म्हणाले. “मी भारत बौध्दमय करीन” ही मनोवृत्ती आहे भारताला दलितमय करण्याची. ह्या मनोवृत्तीने निवडणुकीत सौदेबाजी करणे, मला दलित म्हणा अगर गाढव म्हणा अगर ढोर म्हणा अगर भंगी म्हणा पण मला खासदारकी द्या, आमदारकी द्या, मंत्रिपद द्या.आम्हाला लेखक, कवि, गायक म्हणून नावारूपाला आणा. बाबासाहेबांनी मांडली रक्तपातविरहीत राजकारणाची संकल्पना . पण ह्या मनोवृत्तीत दडली आहे रक्तरंजित राजकारणाची बीजे. उदाहरणार्थ दलित पँथरच्या वावटळीत कित्येक तरुणांचा नाहक बळी गेला. तर नामांतराच्या चळवळीत अगणित गोरगरीब बिचाऱ्या, दीनदुबळ्या लोकांचे अगणित रक्त सांडले.
बाबासाहेबांनी बौध्द धम्म स्वीकारण्या अगोदर आपल्या स्वत:च्या निवासस्थानाचे नांव ‘राजगृह’ ठेवले.पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे जी महाविद्यालये चालविली त्यास नांवे दिली ‘सिध्दार्थ’ व ‘मिलिंद’. सिध्दार्थ कॉलेजच्या दोन इमारतीना नांवे दिली आहेत ‘बुध्द भवन’ आणि ‘आनंद भवन’. मिलिंद कॉलेजच्या परिसराला नांव दिले आहे ‘नागसेनवन’.ज्या वर्षी त्यांनी बौध्द धम्म स्वीकारण्याचा निश्चय केला त्या वर्षी आपल्या नियतकालिकेचे नाव ‘प्रबुध्द भारत’ ठेवले.दादर-पूर्व(मुंबई) येथील आपल्या प्रिटिंग प्रेसला पहिले नांव दिले भारतभूषण व तदनंतर नांव दिले बुध्दभूषण. ही नांवाची यादी पाहिल्यानंतर धर्मांतरानंतर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या चळवळीची सहज कल्पना येते. बाबासाहेबांच्या पश्चात मात्र दलित पँथर,दलित साहित्य,दलित मुक्ती सेना,दलित मित्र, बामसेफ, डी.एस.कोर,बहुजन समाज पार्टी, मूलनिवासी, बहुजन बॅकवर्ड,दलित शोषित समाज संघर्ष समिती,वंचित बहुजन. ही नांवे पाहिले की हे बाबासाहेबांच्या चळवळीत वैचारिक गोंधळ माजविणारे महाराक्षस आहेत हे सहज लक्षात येते.अशी बाबासाहेबांच्या चळवळीची लाजिरवाणी प्रतिमा ह्या मनोवृत्तीने केली आहे.तिसरी मनोवृत्ती आहे घराणेशाहीची. ही मनोवृत्ती भावनात्मक असल्यामुळे ह्या मनोवृत्तीत जराही शहाणपणाचा लवलेश नाही. ही मनोवृत्ती इतर पक्षातील घराणेशाहीचे उदाहरण देते. परंतु ह्या मनोवृत्तीस कळत नाही की इतरांचे राजकारण आणि बाबासाहेबांचे राजकारण यात जमिन-अस्मा़नाचा फरक आहे. बाबासाहेबांच्या राजकारणात राजकीय लोकशाहीचा व सामाजिक लोकशाहीचा संगम दडलेला आहे.त्यास धम्मकारणाची (धर्मकारणाची नव्हे) झालर लाभलेली आहे. याचा अर्थ बाबासाहेबांचे राजकारण म्हणजे जातीविरहीत आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्व यावर आधारित असलेली मानवउध्दारक चळवळ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी संसदीय लोकशाहीच्याद्वारे राजेशाहीचा आणि घराणेशाहीचा बिमोड केला आहे. म्हणजे तळागाळातील सामान्य व्यक्ती असो किंवा घराण्यातील व्यक्ती असो यापैकी कोणी असो त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला वाव दिला पाहिजे. पण ती व्यक्ती जर बाबासाहेबांच्या चळवळीतील असेल तर ती व्यक्ती बाबासाहेबांच्या सिथ्दांतावर व तत्त्वज्ञानावर निष्ठा ठेवणारी पाहिजे. बाबासाहेबांच्या चळवळीचे मर्म जाणणारा पाहिजे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मकारणासाठी २२प्रतिज्ञा सांगितल्या आहेत त्याचप्रमाणे राजकारणात कोणते नियम पाळावे हेही सांगितले आहे. हे प्रकारे इशारेच आहेत.
१) इतरांच्या भूलथापांना ऐकून सैरावैरा धावत सुटू नका.
२) तुम्ही आपली मने विकारवश होऊ देऊ नका.
३)निवडणुकीच्या वेळेस असा प्रसंग येणार आहे की, इतर लोक पैसे देऊन आपल्या लोकांची मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील व आपल्यातील बेकार आणि स्वाभिमानशून्य असे काही पुढारी त्यांना मदतही करतील. तरी या गोष्टीपासून तुम्ही सावध असले पाहिजे. याबाबतीत आपल्या नकली व स्वयंमान्य पुढाऱ्यापासून तुम्ही सावध राहा.
४) डॉ. आंबेडकरांचे काम अडविण्यासाठी वरिष्ठ समाजाचे पुष्कळ लोक टपलेले असतात. असे लोक आपल्यातील लाचलुचपतीला चटावलेल्या लोकांना जवळ करणारच.
५) शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक अडचणी हे प्रश्न महत्वाचे आहेत. ही कामे करण्यास प्रसिध्दीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजेत. जो तो प्रसिध्दीच्या मागे आहे. त्यामुळे पाहिजे तसे काम होत नाही.
६)तुमच्यात नव्हे तर या देशात एक विचित्र विकृती दिसून येते, ती ही की, आज झाड लावले की, त्यास दुसऱ्या दिवशी फळ खावयास आले पाहिजे.राजकारणात अशी अपेक्षा धरणे चूक आहे.
७)राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे. आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा सूक्ष्मतेने अभ्यास केला पाहिजे. ज्यांना पुढारी व्हायचे असेल त्यांनी पुढाऱ्यांची कर्तव्यकर्मे व जबाबदारी काय आहे, याचा बारकाईने अभ्यास करणे जरूरीचे आहे.
८) आपले सामाजिक व आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे. क्रांतीचे घातपाती मार्ग वर्ज्य केले पाहिजेत. म्हणजेच सविनय कायदेभंग, सत्याग्रह व असहकार यांना मूठमाती दिली पाहिजे. जेव्हा सनदशीर मार्गाचा अवलंब करणे आपल्या स्वाधीन नव्हते, तेव्हा असनदशीर मार्गाचा अवलंब करणे यथायोग्य वाटत होते. परंतु सनदशीर मार्गानी आपले उद्देश साध्य करणे शक्य असतांना असनदशीर मार्गाचा जर कोणी अवलंब केला तर ते त्याचे कृत्य यथार्थ वाटणार नाही. हे असनदशीर मार्ग म्हणजे बेबंदशाहीचे उगमस्थान आहे.
वरील उतारे बाबासाहेबांच्या भाषणातून घेतलेले आहेत.त्याद्वारे हे सहज लक्षात येऊ शकते की, बाबासाहेबांना ज्ञात झालेले होते की,आपल्या सहकाऱ्यांच्यामध्ये धसपुस चालूआहे.म्हणूनच त्यांनी हे इशारे दिलेले आहेत.
बाबासाहेब Annihilation of Caste ह्या ग्रंथात म्हणतात, “जात एक असा महाकाय राक्षस आहे की,तो तुमच्या मार्गात आडवा येणारच. या राक्षसाचा खातमा केल्याशिवाय तुम्हाला राजकीय सुधारणा करता येऊ शकणार नाही, तुम्हाला आर्थिक सुधारणा करता येणार नाहीत.”
. “अस्पृश्य मूळचे कोण “ह्या ग्रंथात बाबासाहेब म्हणतात, “अस्पृश्य मूळचे बौध्द आहेत”
१४ जानेवारी १९५१ रोजी वरळी येथील सभेत बाबासाहेब म्हणतात, “हिंदु लोकांना बौद्ध दीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी हिंदू धर्माच्या दुष्कृत्याचा त्याग केला पाहिजे जातीला मानणारे लोक बौध्द होतात व बौद्ध धर्माला ब्राह्मणी धर्म बनवतात व बौद्ध धर्माचे मूळच नाहीसे करतात. सर्व वाईट चाली बरोबर घेऊन तुम्हाला बौद्ध धर्मात येता येणार नाही.”
दिनांक१८ मार्च १९५६रोजी आग्रा येथील भाषणात बाबासाहेब म्हणतात,” माझ्या बौध्द धर्म ग्रहणानंतर मी अस्पृश्य राहाणार नाही. आपण सर्व बौध्द झाल्यानंतर राखीव जागेचे अधिकार राहणार नाहीत आयुष्यभर राखीव जागा थोड्याच राहणार आहेत. शेवटी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहावे लागेल.शेवटी आपल्याला आपल्याच पायावर उभे राहावे लागेल राखीव जागाच्या पांगुळ गाड्यांच्या आधाराने आपण विशेष प्रगती करू शकणार नाही.”
१३ ऑक्टोबर १९५६ रोजी वृपत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत बाबासाहेबांनी जे मुद्दे प्रकर्षाने मांडले, ते असे-
१) सवलतीसाठी सदासर्वकाळ ‘अस्पृश्यच ‘राहावे काय?
२) बौध्दधर्मात प्रवेश केल्यानंतर मी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा सदस्य राहणार नाही.
३) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याचे नक्की ठरले आहे. त्या पक्षाची घटनाही तयार केली आहे. त्याच्या प्रिअँबलमध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या तत्त्वावर हा पक्ष आधारला राहील.
४) मी ‘मिशनरी होणार आहे. पण राजकारणाचा संन्यास घेणार नाही. निवडणुकीसाठी निश्चितपणे उभा राहीन.
१५ ऑक्टोबर १९५६ च्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, “तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. आपण उत्तमरीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये. म्हणून आपण दृढ निश्चय केला पाहिजे. हे आपल्यांना साधले तर आपण आपल्या बरोबर, देशाचा,इतकेच नव्हे तर जगाचा उधार करू. कारण बौध्द धर्माने जगाचा उध्दार होणार आहे.”
२५ नोव्हेंबर १९५६ रोजी सायंकाळी सारनाथ येथे मूलगमध कपटी विहाराच्या मैदानात महाबोधी सभेद्वारा बाबासाहेबांच्या स्वागताप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सारनाथचे पवित्र स्मृतीने भारावलेले वातावरण, सभोवार भक्तिभावाने बसलेली जनता(त्यामध्ये अस्पृश्य लोकांचा भरणा होता) आणि लंका, ब्रह्मदेश, जपान या देशातील काही लामा, भिख्खू व उपासक मंडळी हे सर्व वातावरण बघून की काय बाबासाहेबांचे मन भरून आले. कंठ किंचित सद्गदित झाला. पाणावलेल्या डोळ्यांनी आणि भरल्या कंठाने केलेले ते कारुणिक भाषण होते. बाबासाहेबांचा तो अंतिम संदेश होता. त्या संदेशात बाबासाहेब म्हणतात, “माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान तीन शब्दात सामावलेले आहे.स्वातंंत्र्य,समता आणि बंधुभाव.माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धम्मात आहे. माझे गुरु भगवान बुध्द यांच्या शिकवणीतूनच हे तत्त्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे.”
वर जे बाबासाहेबांच्या भाषणातील व लिखाणातील उतारे दिले आहेत त्यावरून सहज कल्पना येईल की बाबासाहेबांच्या चळवळीचा अंतिम उद्देश
तसेच बाबासाहेबांना धम्मदीक्षेनंचर कशाप्रकारे व कोणते राजकारण व धम्म्कारण अभिप्रेत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे “आंबेडकर वाद”नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे “अथांग ज्ञानाचे विद्यापीठ”. ह्या विद्यापीठात कोणताही “वाद”शिकविला जात नाही. ह्या विद्यापीठात मानवी जीवन मूल्याचे शिक्षण प्राप्त होते. बुध्दं सरणं गच्छामि हा मनुष्यमात्राच्या चैतन्याचा सिध्दांत शिकविला जातो. राजकीय लोकशाही यशस्वी होण्यासाठी सामाजिक लोकशाही़चे महत्त्व शिकविले जाते. लोकांच्या जीवनात रक्तपातविरहीत आर्थिक व सामाजिक क्रांतिकारक बदल घडवून आणणाऱ्या सरकारच्या प्रकारास व पध्दतीस लोकशाही म्हणतात ही लोकशाहीची व्याख्या शिकविली जाते.
तेव्हां प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथांग ज्ञानाच्या विद्यापीठाचे विद्यार्थी बना.म्हणजेच प्रथम बाबासाहेबांचे अनुयायी बना. आता काय परिस्थिती आहे जो तो आपापल्या पुढाऱ्यांचाअनुयायी आहे. बाबासाहेबांचे अनुयायी नाहीत. म्हणूनच ज्यांच्या त्यांच्या पुढाऱ्यावर टीका केली की ते दंड थोपटण्यास तयार होतात. कारण त्यांचा पुढारी त्यांना प्रिय आहे. त्यांना बाबासाहेब दुय्यम स्थानी आहेत. जो पर्यंत हे लोक आपल्या पुढाऱ्याऐवजी बाबासाहेबांचे अनुयायी बनत नाहीत तोपर्यंत त्यांना कळणार नाही की आपण जो पुढारी मानतो तो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथांग ज्ञानाच्या विद्यापीठाचा विद्यार्थी नाही. त्यामुळे त्या पुढाऱ्याला बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान व सिध्दांतांचे बिल्कुल ज्ञान नसते म्हणून तो मोकाट सुटलेल्या गुराढोरासारखा वागतो.बाबासाहेबांचे ते फक्त नाव घेतात. कारण आमिषयुक्त आणि प्रलोभनयुक्त पुढारपणासाठी बाबासाहेब “तारण” म्हणून हवेत. अशा प्रकारचे पुढारी एकमेकांना अंधभक्त बोलत असतात. यावरूनच गटातटाचे अंतरंग कळते.
मूळ तीन चार गटाचे ५२ गट कसे झाले. यातील किती गटांचा मूळ रिपब्लिकन चळवळीशी काय संबंध आहे? सन १९९५च्या एकीत दलित पँथरवाले घुसले खरे पण रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळे अधिवेशन घेऊन एकीला सुरूंग लावला.एकी फुटली. दलित पँथरमध्येही फाटाफूट झाली होती. दलित पँथरच्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी “रिपब्लिकन ” नावाने आपआपले गट तयार केले. बाबासाहेबांनी ज्या खुल्या पत्राच्या आधारे ज्या रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली त्या रिपब्लिकन पक्षाशी दलित पँथरच्या पुढाऱ्यांच्या रिपब्लिकन शब्दांशी काडीचाही संबंध नाही.बाबासाहेबांचे नाव घेऊन ज्या अन्य संघटना उदयास आल्या आहेत त्यांना स्वयंघोषित व्यासपीठ निर्माण करण्याची ताकद नाही. पुढारपणासाठी जे स्वत:चे व्यक्तिमत्त्व लागते ते त्यांच्यापाशी नाही. म्हणून ते बाबासाहेबांचे नाव घेतात. यावरूनही गटातटाचे अंतरंग कळू शकते.
एच. बी. जाधव

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!