महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

सीबीएसई, आयसीएसई, स्टेट बोर्ड असा भेदभाव न करता एक देश, एक पाॅलिसी, एक अभ्यासक्रम लागू करावा. __ मेश्राम बी. बी.

शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करने कितपत योग्य आहे? या विषयावर ५० वी वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संपन्न.

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : समाज जीवनात कार्यरत बुद्ध फुले शाहू आंबेडकराईट विचारधारेच्या हितचिंतकांना जागृत करून वैचारिक आंदोलनाचा कारवाँ पुढे घेऊन जाण्यासाठी समग्र आंदोलन समजून घेत असताना फुले शाहू आंबेडकरांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका आणि त्यावेळी व्यक्त केलेले विचार समजून घेणे आवश्यक आहे. सोबतच वर्तमानकाळात काही विपरीत घडतय का? याकडे लक्ष दिले तर आपल्या लक्षात येईल की, सध्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, भगवद्गीता व मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या अनुषंगाने अभ्यासक्रम मंडळाने आक्षेप मागविले आहेत. म्हणून मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करने कितपत योग्य आहे?” या ज्वलंत विषयावर 2 जून 2024 ला फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल व दि आल इंडिया नाग असोसिएशन (आईना) च्या संयुक्त विद्यमाने वैचारीक प्रबोधनात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जेणेकरून वर्तमान काळात आपण कुठे आहोत? समग्र चळवळीचे नेतृत्व, कार्यकर्ते, पक्ष, संघटना, संस्था नेमकेपणाने काय करीत आहेत? आपली काय भूमिका असावी? याची जाणीव होऊ शकेल.
या प्रसंगी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना सत्येंद्र तेलतुंबडे म्हणाले की, त्यांना चार चाकी गाडी घ्यायची होती. पण नवीन गाडी घेणे आवाक्याबाहेर असल्याने जुनी गाडी घ्यावी असे ठरले. त्यामुळे जुनी गाडी विक्रेत्यांकडे गेल्यावर ती गाडी एखाद्या मेकॅनिकला दाखवावे म्हणून गाडी चालविता येत नसल्याने गाडी मालका सोबत मेकॅनिकच्या गॅरेजला गेले. तेव्हा त्यांनी हाॅर्न सोडून सर्व पार्टस वाजतात, असे मत व्यक्त केले होते. तशीच स्थिती आपल्या चळवळीची झाली आहे. आपण ज्यांना आदर्श मानतो नेमके आमच्या कार्यात त्या आदर्श महापुरुषांचे तत्त्वज्ञानच नसते. ज्ञान कशाला म्हणतात? हे गाडगेबाबा कडून शिकले पाहिजे. तर मनू मताला शूद्र जाळतील असे फुले म्हणाले होते. परंतु शूद्रांनी ती जाळली नाही मात्र अतिशूद्रांनी ती जाळली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका असा संदेश देताना कलम 21 प्रमाणे मोफत व शक्तीचे शिक्षण दिले पाहिजे, अशी तरतूद केली. आपली शिक्षण व्यवस्था चार्वाकांनी निर्माण केली, ज्यात शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड एकसारखाच होता. हे समतेचे द्योतक आहे. वर्तमानात जास्त श्रम करणा-याला कमी पगार मिळतो तर कमी श्रम करणा-याला जास्त पगार मिळतो. तर मग समतामूलक समाज कसा स्थापित होईल? शिक्षण व्यवस्थेतील शिक्षक प्रगल्भ नसल्याने नवनिर्मितीला वाव उरला नाही. करिता शिक्षण व्यवस्थेला छेद दिला पाहिजे. मनुचे नांव येईपर्यंत आपण गाढ झोपेत होतो. बुद्धाचे पंचशील नष्ट करण्यासाठी भगवद्गीता लिहिण्यात आली आहे. मनू आपल्या मनात रुजलेला आहे, ज्याला उखडून फेकू शकलो नाही. अनेक आशीर्वाद गाथेत “नांव नव-याचे, पोरं सोय-याचे” अशी अवस्था आहे.
याप्रसंगी महादेव डांबरे म्हणाले की, प्रदीप गोखले यांनी ‘विषमतेचा पुरस्कर्ता’ मनू हे पुस्तक लिहून मनुचे कारनामे उघड केले आहेत. एक पुस्तक प्रेमी माणूस मनुस्मृती जाळतो म्हणजे ती किती भयानक असेल. मनुस्मृती ही शेणातील शेंगदाण्यासारखी आहे. एड. विलास रामटेके म्हणाले की, मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होने अयोग्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला एक मनुप्रणित कायद्याचे पुस्तक जाळून पुढे दुसरे कायद्याचे पुस्तक लिहिले आहे. जातीव्यवस्थेमुळे बहुसंख्यांक हे अल्पसंख्याक झाले. राहूल मेश्राम म्हणाले की, मनू म्हणजे विषमतावादी विचार येणे, हे धोकादायकच आहे. डॉ. आर. डी. बडगे म्हणाले की, आपण जागृत आहोत किंवा नाही हे तपासण्यासाठी त्यांनी खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. किमान समान कृती कार्यक्रम ठरवून आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. संघदीप रोडगे म्हणाले की, मानवी मेंदू ला जागृत केल्यामुळे सत्य असत्याची जाणीव होते. शिकलेल्या लोकांना एकत्रित आणणे शक्य होत नाही. करिता मान्यवर कांशीराम, डी. के. खापर्डे यांनी अधिकारी पदाच्या नौक-या सोडल्या. शिक्षणाचा अर्थ केवळ पोट भरणे एवढाच नाही. बाबासाहेब केवळ सोयीनुसार सांगून चालणार नाही. ओबीसींना विनाअट संघटनेत समाविष्ट करावे. साधू आनंद म्हणाले की, एलपीजीचा प्रभाव थांबविता आला असता तर ही वेळ आपणांवर आली नसती. एड. प्रविण जाधव म्हणाले की, जी मनुस्मृती देशातील सामान्य माणसापर्यंत लिखित स्वरूपात पोहोचली नाही तिचा आजच समावेश करण्याची आवश्यकता का भासली आहे? सचिन निकम म्हणाले की, आपल्या विविध पक्ष संघटनांकडे किमान दहा बाय दहा चे कार्यालय नसावे, ही आपली दुरावस्था आहे. ज्याला या स्टडी सर्कल च्या माध्यमातून साकार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे महत्वपूर्ण आहे. जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक म्हणा की अनवधानाने, मनुस्मृतीवर प्रहार केले, ज्यामुळे या विषयाला व्यापकता आली. ब्राह्मणवादी मानसिकतेचे संचालक असणाऱ्या शिक्षण संस्थात पूर्वीपासूनच मनुस्मृती शिकविली जाते. त्यामुळे मनुस्मृतीचा शिरकाव केव्हाच झाला आहे. आयटीआय मध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे हा त्याचाच एक भाग आहे. मनुस्मृतीत नेमके काय आहे? याची जाणीव होणे आवश्यक आहे.
प्रमुख वक्ते एड. निलेश खडकीकर म्हणाले की, भारतात भौगोलिक रचना चांगली असून शांततापूर्ण वातावरण असल्याने आर्य बाहेरून भारतात आले, ज्यामुळे त्यांनी राज्य करण्यासाठी वेद, स्मृती, पुराणांची अंमलबजावणी केली. महिलांनी भ्रष्ट पुरुषांची सुद्धा सेवा केली पाहिजे, असा दंडक लावून मनुस्मृतीने महिलांना घटस्फोट नाकारला होता, तो मात्र भारताचे संविधानाने बहाल केला आहे.
कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप करताना फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे संचालक बी. बी. मेश्राम म्हणाले की, दैनंदिन जीवनात आपणाकडून अनुक्रमांक लिहित असताना इंग्रजीत नंबर ऐवजी थोडक्यात एनओ लिहिले जाते, ज्यात नंबर मध्ये ओ कुठे दिसत नाही. तर हा शब्द मुळात लॅटिन भाषेतील न्युमिरो आहे ज्यात ओ आहे. अशाप्रकारे आपणास आपल्या सर्व समस्यांचे मूळ शोधून ओ दिला पाहिजे करिता रचनात्मक कार्य करावे लागेल. अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा विरोध करण्यापेक्षा आंबेडकरवादाचा समावेश कसा केला जाऊ शकेल? यावर ऊर्जा लावली पाहिजे. रामजी बाबा कबीर पंथीय असल्याने हिंदू धर्म ग्रंथात काय लिहिलेले आहे? ते माहीत पडण्यासाठी रामायण, महाभारत भीमरावांना वाचनासाठी उपलब्ध करून दिले होते. ब्राह्मणवाद केवळ भारतात नव्हे! तर जागतिक स्तरावर कार्यरत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आज एक बातमी आली ती अशी की, दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या पुढाकाराने 1994 पासून अस्तित्वात असलेल्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेस चे सरकार अल्पमतात आले आहे. भारताचा इतिहास दुसरे तिसरे काही नसून बुद्धवाद व ब्राह्मणवादातील लढाई आहे. असे बाबासाहेब म्हणाले होते. करिता ब्राह्मणवादी त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. आपण मात्र आपल्या आदर्श महापुरुषांच्या मूल्यांना समजून घेऊ शकलो नाही. परिणामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 9 मार्च 1924 ला “शिकवा (शिका), चेतवा (संघर्ष करा) आणि संघटीत व्हा.” असा संदेश दिला असताना आंबेडकराईट संघटनांचे नेतृत्वातील अनेक जण मात्र ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा.’ असा संदेश देत असतात. परिणामी संघटीत होण्यासाठी संघर्ष करावा लागतो, हे ध्यानी मनी नसल्याने आपण संघटीत होण्यापासून कोसो दूर आहोत. या दूरगामी परिणामांची चिकित्सा केली पाहिजे. जेणेकरून मूळ संदेशाचे मर्म आपणास कळेल. 19 ऑक्टोबर 1882 ला राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी हंटर आयोगाला सादर केलेल्या निवेदनाप्रमाणे कनिष्ठ व वरिष्ठ शिक्षण प्रणाली कशी असावी? हे समजून घेतली पाहिजे. करिता अभ्यासक्रमात सीबीएसई, आयसीएसई, स्टेट बोर्ड, नवोदय असा भेदभाव न करता एक देश, एक पालिसी, एक अभ्यासक्रम देशभरात लागू करावा.
या कार्यशाळेला महादेव डांबरे, एड. निलेश खडकीकर, एड. विलास रामटेके, डॉ. आर. डी. बडगे, डॉ. जीतेंद्र पाँचगावकर, राहूल मेश्राम, सत्येंद्र तेलतुंबडे, सचिन निकम, संघदीप रोडगे, साधू आनंद, एड. प्रवीण जाधव, बी. बी. मेश्राम, सुष्मिता खडकीकर इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. अशाप्रकारे आभार प्रदर्शनाने हर्षोल्हासात कार्यशाळेची सांगता झाली.

शब्दांकन : बी. बी. मेश्राम, संचालक : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र।
संपर्क : 9421678628
stdbbm@gmail.com

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!