आरोग्यविषयकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

झिंगणाऱ्या तरुणाईला जबाबदार कोण?

ॲड. शीतल शामराव चव्हाण

संवेदनशील मनांच्या आर्त हाका कुणी ऐकणारे आहे काय?

नुकतीच पुण्यात एका धनाढ्य उद्योजकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या अलिशान कारखाली रस्त्यावरील दोघांना चिरडल्याची घटना घडली. याआधी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये शेकडो कोटी रकमेचा अमली पदार्थांचा साठा सापडला. पुण्यातील एका टेकडीवर मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी सकाळच्या पाऱ्यालाच नशेत तर्र असल्याचा व्हिडिओ सबंध महाराष्ट्राने पाहिला. महाराष्ट्रासह देशभरातील शहरांत झिंगणारी तरुणाई आपण सर्रास पाहत आहोत. पण मग ग्रामीण भाग याबाबतीत मागे आहे काय? तर नाही. गावोगाव देशी, विदेशी दारुचे गुत्ते, बार्स, परमीट रुम्स कुठल्याही वेळेला खचाखच भरलेले आढळतात. व्यसनामूळे लग्न न झालेल्या, अल्पवयातच मृत्यू ओढावलेल्या, कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाल्याच्या प्रकरणांतील वाढ झपाट्याने होते आहे. तरुणाई झिंगण्यासह डान्स बार्स, पब्स, तमाशा थिएटर्स अशा ठिकाणी थिरकताना दिसत आहे. बेहोशी आणि बेफिकीरीचे चरम गाठण्याची अशी उर्मी तरुणांत का निर्माण होत आहे? त्यांना सतत नशेत, शुद्ध आणि भान हरवलेल्या अवस्थेत का रहावे वाटत आहे?, व्यावहारिक जगाची सगळी बंधनं तोडून त्यांना बेफाम, बेलगाम व्हावे असे का वाटत आहे? या सगळ्यांचा मानसशास्त्रीय अंगाने, बदलत्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्थेचा मानवी मनावर होणाऱ्या परिणामांच्या अंगाने विचार व्हायला हवा. पण या विषयाची खोलात जावून चर्चा होताना दिसत नाही. सगळे चर्चाविश्व गढूळ झालेल्या राजकारणाच्या आणि राजकारण्यांच्या एकमेकांवरील चिखलफेकीच्या घटनांवरील वरवरच्या विश्लेषनाने व्यापले आहे.
जग सुंदर आहे, जीवन सुंदर आहे असे आपण म्हणतो तर मग या सुंदर जगात, या सुंदर जीवनात दारु पिवून अगर अमली पदार्थ घेवून शुद्ध हरवावी, बेशुद्ध अगर बेधुंद व्हावे अशी तीव्र ईच्छा तरुणाईच्या मनात का निर्माण होत असावी? नशेचा फार मोठा इतिहास मानवी समाजाला आहे. पण अशा प्रकरणांत दिवसेंदिवस का वाढ होत असावी? काही क्षणासाठी नाही तर सततच तरुणांना नशेत रहावे असे का वाटत असावे?
आजच्या जगाचे वास्तव हे मानवी मनाला आनंद देणारे, आल्हाददायक, उत्साही राहिलेले नाही हे यामागील खरे कारण आहे. मानवी नातेसंबंध हे मैत्रीपूर्ण, करुणापूर्ण, जिव्हाळ्याचे राहिलेले नाहीत. भांडवली व्यवस्थेने सगळ्या क्षेत्रांचे बाजारीकरण केलेले आहेच पण माणसाचे आणि त्याच्या भावनांचे झपाट्याने वस्तूकरण देखील होत आहे. माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा यासह ज्ञान देणाऱ्या, संस्कार व विचार देणाऱ्या, जगाकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या, प्रेमाची, ममतेची भूक पूर्ण करणाऱ्या वातावरणाची आवश्यकता असते. हे वातावरण आजच्या तरुणाईला मिळत आहे काय? शिक्षणाच्या वाढलेल्या खर्चाने आणि शिक्षणाच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अघोरी स्पर्धेने पालक, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक असे सगळ्यांचेच संतुलन बिघडत चालले आहे. पुस्तकांतील माहितीच्या ओझ्याने आणि गुणपत्रीकेवरील गुण वाढवण्याच्या धास्तीने दबलेले, सिकुडलेले मानवी सापळे, मानवी यंत्र आपण सर्वत्र पाहतो आहोत. माणसाला जगण्याच्या साधनांसह प्रेमाची, जिव्हाळ्याची, मैत्रीची प्रचंड मोठी भूक आहे. जगाच्या बाजारात या भूकेची पूर्तता कुठेही होत नाही. करिअरच्या चिंतेने ग्रस्त असणाऱ्या, करिअरची संधीच नसणाऱ्या, चांगले शिक्षण घेवू न शकल्याने स्वप्न कोलमडलेल्या, चांगले शिक्षण घेवूनही चांगले जीवनमान जगता येईल अशा कमाईच्या संधी न मिळालेल्या, चांगल्या कमाईची नोकरी मिळूनही कामाच्या ठिकाणी प्रचंड शोषण आणि कुचंबना होत असलेल्या, सामाजिक-राजकीय क्षेत्रात आपल्या क्षमतांना योग्य वाव न मिळाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या तरुणांच्या आर्त हाकांना ऐकणारे कुणी आहे काय? जगातील क्रूर व्यवहारांचा सामना करीत असताना या तरुणाईचे समुपदेशन करणे, त्यांच्या आयुष्यात निखळ आनंदाचे चार क्षण निर्माण करणे, प्रत्येकाच्या क्षमतांना बहरण्यास योग्य वाव देणे, मानवी नात्याला व्यवहाराच्या पलिकडे नेत आनंददायी बनवणे यासाठीची काही तजवीज समाजाकडून होते आहे काय?
व्यसनाधीनतेचे समर्थन कुठल्याही कारणाने होवूच शकत नाही. तसे करणे योग्यही नाही. पण आजच्या झिंगणाऱ्या तरुणाईला झिंगण्याच्या मार्गावर का जावे लागत आहे याचा खोलात जावून विचार झाला नाही तर या प्रकारांत लक्षणीय वाढच होत राहिल.
कोरोनाच्या संकटात ‘वर्क फ्रॉम होम’चा शोध लागला. अनेकांना ‘घरबसल्या काम’ही संकल्पना अतिशय सुखावह वाटली असेल पण हे काम करणाऱ्यांच्या व्यथा ऐकून कुणी यावर आवाज उठवला आहे काय? ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखली देशी-परदेशी नफेखोर कंपन्या आपल्या देशातील तरुणाईचे प्रचंड शोषण करीत आहेत. कामाचे निश्चित तास उरले नाहीत. कधीही, कितीही वाजता, परदेशी कामाच्या वेळात आणि इकडच्या झोपण्याच्या, आरामाच्या वेळातही सॉफ्टवेअर ‘कामगारांकडून’ मान मोडून काम करुन घेतले जाते. तहान, भूक हरवून काम करणाऱ्या या पोरा, पोरींच्या मनावर तासंतास ‘लॅपटॉप’समोर बसल्याने, कामाचा सतत ताण असल्याने काय परिणाम होत असेल? मग आठवड्यातले पाच दिवस कामाच्या ओझ्याने, मानसिक ताणाने ग्रस्त झालेले हे तरुण ‘विकेंड पार्ट्यांत’ झिंगतात, थिरकतात. हळूहळू आठवड्यातून एक-दोन वेळा झिंगण्याची, थिरकण्याची ही सवय नित्याची होवून जाते. मग व्यसनाच्या आहारी जावून शरीर, पैसा आणि कुटुंब उध्वस्त होत जाते.
ग्रामीण भागात तरुणाईच्या हाताला काम नाही. राजकारणाच्या नादी लागलेल्या पोरांना नेत्यांची, नेत्यांच्या पोरांची हुजरेगिरी करण्यापलिकडे व एका विशिष्ट पायरीपलिकडे वाव नाही. मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीने माहितीचा विस्फोट झाला आहे. शहरातील चंगळ, सोईसुविधा गावातही माहिती होवून त्या मिळवण्याची आस गावकरी तरुणांतही निर्माण होत आहे. पण या सोयीसुविधा उपभोगण्यासाठी पैसा नाही. मग दोन नंबदरचे, अवैध धंदे, गुंडगीरी, टगेगीरी, हाफ्तेखोरी, लूटमार, फसवाफसवी, व्याजीबट्टी, शेती अगर सोनेनाणे विकणे असे प्रकार करुन उपभोगाची ही भूक भागवली जात आहे. या सगळ्या प्रक्रियेत मानवी व्यवहार अतिशय क्रूर होत चालले आहेत. शहर असो अगर ग्रामीण भाग अखंड देशच कमालीची आर्थिक विषमता, त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता, व्यवहारातील अमानवी क्रूरता, पैसे कमावण्याचा अतिरेकी हव्यास, अघोरी, जीवघेणी स्पर्धा या विकाराने ग्रासला आहे. या सगळ्याला नफेखोरीवर आधारित भांडवली, नवसाम्राज्यवादी व्यवस्था आणि या व्यवस्थेपुढे लोटांगण घालणारे देशातील राजकारणी जबाबदार आहेत.
भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांसह शिक्षणाचे, माणूस म्हणून जगण्याचे अधिकार बहाल केले आहेत. संविधानात लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेला बळकटी देण्यावर भर आहे. पण संविधानातील मूल्यांची राखरांगोळी करुन मनमानी, लुटारु, जीवघेणा कारभार या देशात बोकाळला आहे.
देशात गरीबी-श्रीमंतीतील वाढत जाणारी तफावत, वाढती महागाई आणि त्या तुलनेत न वाढलेले उत्पन्न यामूळे निर्माण झालेली असुरक्षितता, सामाजिक-सांस्कृतिक दहशत, शिक्षण-संस्कार-विचार-जगण्याडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या साधनांचा व वातावरणाचा अभाव यामूळे कमालीच्या धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणात संवेदनशील मनांची घुसमट होत आहे. त्यांच्या आर्त हाका ऐकणारा कुणीही वाली उरला नाही. या सगळ्यांच्या परिणाम स्वरुप तरुणाईच्या मनात दाटलेली आग झिंगण्याच्या, थिरकण्याच्या, बेधुंद, बेफाम, बेफिकिर होण्याच्या मार्गाने बाहेर पडू पाहत आहे. ही अवस्था अशीच राहिली आणि या बेलगामीने उद्रेकाचे टोक गाठले तर अराजक आल्याचे आपल्याला पहायला मिळेल. ते न होवो यासाठी आपल्या सगळ्यांना विविध पातळ्यांवर कार्यरत व्हावे लागणार आहे हे निश्चित.

© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!