कायदे विषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपानवातावरण

मांसविक्रीवर बंदी हा जातीव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न!


‘आम्ही’ जे खातो ते आणि तेवढेच सात्विक आणि धर्ममान्य आणि ‘ते’ जे खातात ते निकृष्ट असे अवडंबर माजविणे हा आहाराच्या माध्यमातून जातीव्यवस्था घट्ट करण्याचा प्रयत्न होता. मांसविक्री बंदीतून पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती होत आहे…
मांसविक्रीवर बंदी हा जातीव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न!
डॉ. सागर कारखानीस
मुंबईनजीकच्या मीरा-भाईंदर महापालिकेने रविवार, २१ एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त चिकन-मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे भाईंदरमध्ये वाद निर्माण झाला. अर्थात ही काही पहिली घटना नव्हे. यापूर्वीही विशिष्ट काही सणांनिमित्त मांस-माशांची विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचा फतवा काढणे, मांसाहार करणाऱ्यांना घरे न देणे असे प्रकार घडले आहेत आणि वरचेवर घडत असतात. मुळातच या घटनेला अनेक पैलू आहेत. शाकाहार हा श्रेष्ठ आहार आहे, मांसाहार करणे हीन दर्जाचे आहे, ते आपल्या भारतीय परंपरेच्या विरोधी आहे, त्यामुळे आपल्या धर्माचे पावित्र्य धोक्यात येते किंवा आपली मूळ संस्कृती ही शाकाहाराची पुरस्कर्ती होती मात्र बाहेरून आलेल्या काही आक्रमक गटांमुळे आपल्याकडे मांसाहार रुजला, फोफावला असे अनेक विचार आज आपल्याला समाजात रुजताना किंबहुना जाणीवपूर्वक रुजवले जाताना दिसतात. भाईंदरमधील ही घटना याच विचारप्रवाहाचे अपत्य आहे.

माणसाने काय खावे, काय खाऊ नये, कसे खावे, का खावे या सर्वांचा विचार मानवी संस्कृतीच्या प्रत्येक टप्यावर केला गेलेला आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीच्या इतिहासाचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास केल्यास अगदी प्रागैतिहासिक काळापासून आपल्याला शाकाहाराबरोबरच मांसाहाराचेही अस्तित्व पाहावयास मिळते. शाकाहार म्हणजे नक्की काय? धान्ये, कडधान्ये, कंदमुळे, पाने-फुले-फळे यांचा उपभोग शाकाहारात घेतला जातो. तर मासे वगैरे जलचर प्राणी, पक्षी वगैरे खेचर म्हणजे आकाशसंचारी प्राणी आणि भूचर म्हणजे जमिनीवरील जनावरे यांच्या मांसाचा उपभोग मांसाहारात घेतला जातो. या दृष्टिकोनातून प्रागैतिहासिक मानवाच्या आहाराचा विचार करता, भटके जीवन जगणाऱ्या या अवस्थेत निसर्गतःच उपलब्ध होणारी फळे, कंदमुळे यांच्याबरोबरच लहान-मोठ्या प्राण्यांची- पक्ष्यांची शिकार करून त्यांच्या मांसाचाही उपभोग घेतला जात होता. याशिवाय मासेमारीही केली जात होती. त्या काळातील जी काही शैलचित्रे सापडली आहेत त्यामध्ये हरणाची, रानडुकराची शिकार व मासेमारीच्या चित्रांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील ‘लाख जावोर’ येथील मध्याश्मयुगीन काळातील शैलचित्रात एक माणूस शिकारीत मारलेले प्राणी एका गाठोड्यात बांधून ते गाठोडे पाठीवर टाकून चाललेला दाखवला आहे. त्याच्या हातात धनुष्यबाण असून त्याच्या गाठोड्यात मासे, उंदीर, हरीण इत्यादी प्राणी आहेत. हे सर्वच संदर्भ तत्कालीन मांसाहारावर प्रकाश टाकण्यास महत्त्वपूर्ण ठरतात. पुढे शेतीच्या शोधानंतर विविध डाळी, कडधान्ये, अन्नधान्यांचा समावेश मानवाच्या आहारात झाला असला तरी मांसाहार काही लुप्त झाला नाही. म्हणजेच येथे आपल्याला शाकाहार व मांसाहार दोन्हीचे सहअस्तित्व दिसून येते.

अनेकदा समाजात शाकाहाराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी व त्यायोगे हिंदू धर्माचे पावित्र्य जपण्यासाठी वैदिक परंपरांचा, आहारसंस्कृतीचाही संदर्भ दिला जातो. मात्र इथे एक मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे तो म्हणजे वैदिककालीन समाज हा काही पूर्णपणे शाकाहारी नव्हता. शाकाहाराबरोबरच मांसाहारही प्रचलित होता. घोडा, मेंढी, शेळी, म्हैस यांच्या मांसाच्या उपभोग घेतला जात होता. वेदांमध्ये जवळपास २५० प्राण्यांची वर्णने आली असून त्यापैकी ५० प्राणी खाण्यायोग्य मानले आहेत. ऋग्वेदात घोडा, बैल, म्हैस, मेंढा यांचा उल्लेख अन्नाच्या संदर्भात आला आहे. लग्नप्रसंगी भाकड गायीचा अन्नासाठी बळी दिला जात असे. पाहुण्यांसाठी किंवा पाहुणचारासाठी राखून ठेवलेल्या गायीला अतिथीग्व म्हटले जाई. मात्र कालांतराने जसजसा शेतीचा विकास होत गेला, शेती करण्यासाठी, नांगर चालवण्यासाठी बैलाची आवश्यकता असल्याने या बैलाच्या पैदाशीसाठी गाईची उपयुक्तता लक्षात आल्याने सुरुवातीला ‘गोघन्य’ असणारी गाय ‘अघन्य’ म्हणजेच ‘न मारण्यायोग्य’ ठरवली गेली. याशिवाय शतपथ ब्राह्मण आणि याज्ञवल्क्य संहितेत महोक्ष म्हणजे मोठा बैल आणि महाज म्हणजे मोठा बकरा यांचा पाहुण्यांसाठी बळी द्यावा असे म्हटले आहे. सोळा संस्कारांपैकी एक असणाऱ्या अन्नप्राशन संस्कारात मांसाहाराला महत्त्व दिलेले दिसते. वैदिकांच्या मते बाळ भविष्यात कसे निपजेल हे त्याच्या पहिल्या घासावर अवलंबून असल्याने त्याला भविष्यात सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून मेंढीच्या मांसाचा पहिला घास भरवावा असे गृह्य सूत्रात सांगितले आहे. एवढेच नव्हे तर श्राद्धाच्या जेवणात मांसाहाराला फार महत्त्व होते. बृहदोपनिषदात गर्भवतींसाठी जो आहार सुचवला आहे तो मुख्यत: मांसाहार आहे.

थोडक्यात मांसाहार हा काही वैदिक आर्यांना वर्ज्य नव्हता. मांसाहाराची हीच परंपरा पुढील काळातही सुरू राहिलेली दिसते. मात्र बौद्ध आणि जैन धर्माच्या उदयामुळे व त्यांच्या अहिंसेच्या तत्वामुळे त्यांनी वैदिक धर्मातील यज्ञयागाला व त्यानिमित्ताने होणाऱ्या प्राणीहत्येला कडाडून विरोध केला. यापैकी जैन धर्मीयांनी आपल्या अहिंसेच्या तत्वज्ञानात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य ठरवून आपली एक शाकाहार केंद्रित आहारसंस्कृती विकसित केली जी पराकोटीची होती. यासंदर्भात गौतम बुद्धांच्या भूमिकेचा विचार करता, त्यांचा यज्ञविधीतील प्राण्यांच्या आहुतीला कडाडून विरोध होता, मात्र त्यांनी मांसाहाराला विरोध केला नाही. मनाची शुद्धता आणि अन्न यांचा संबंध असतो हे त्यांना मान्य नव्हते. विनयपिटकात मांस आणि मासे खाण्यास परवानगी दिली होती. मात्र भोजनासाठी मुद्दाम प्राणीहत्या करू नये असे त्याचे ठाम मत होते. भिक्षेत मांस दिले तर ते स्वीकारण्यास, खाण्यास त्यांनी मनाई केली नव्हती. तसेच भारतातील वैष्णव पंथ, स्वामीनारायण पंथ यांसारख्या शाकाहारवादाचा पुरस्कार करणाऱ्या पंथांच्या प्रभावामुळे जरी समाजात शाकाहाराचे प्रस्थ वाढले असले तरी त्यामुळे मांसाहाराची परंपरा पूर्णपणे खंडित झाली असेही आपणास म्हणता येत नाही. कारण मुळातच रोजच्या आहारात मांसाहाराची सवय असलेल्या समाजाला एकदम शाकाहाराकडे वळणे सहज शक्य नव्हते हेही तितकेच खरे. किंबहुना म्हणूनच प्राचीन साहित्यात विविध प्राण्यांचे मांस, खाटीकखाने, मांस विक्रेते यांचे उल्लेख ठिकठिकाणी आढळतात.

अनेक मांसाहारी पदार्थांची नावे त्यांच्या पाककृतींसह आढळतात. त्यावरून ‘मांसोदन’ म्हणजेच मांस भातात शिजवून तयार केला जाणारा पदार्थ तसेच मांसाच्या गोळ्यात भात शिजवून तयार होणारा ‘पिष्टोदन’ नामक पदार्थ, भर्जित म्हणजे निखाऱ्यांवर भाजलेले मांस यांसारखे अनेक मांसाहारी पदार्थ आवडीने खाल्ले जात होते असे दिसून येते. फक्त डुकराच्या मांसापासून ‘शुण्ठक’, ‘कवचन्दी’, ‘पुर्यला’, ‘भडित्रक’ असे नानाविध पदार्थ रांधले जात होते. माशांचा विचार करायचा झाल्यास घोळ, मरळ, पाकट, वाम, रोहू, कटला, टोळ, मुशी, ढोम इत्यादी माशांचा आपल्या आहारात अगदी प्राचीन काळापासून समावेश झाल्याचे पुरावे आज उपलब्ध आहेत.

याशिवाय निसर्गातील गूढ शक्तीचे वाटणारे भय, देवदेवतांची अवकृपा व भुताखेतांची भीती इत्यादी गोष्टीसुद्धा प्राचीन काळापासून समाजात खोलवर रुजलेल्या दिसतात. त्यामुळे दैनंदिन जीवनात येणारे अडथळे, अतिवृष्टी, अवर्षण, रोगराई यांसारख्या घटनांवर उतारा म्हणून कुलदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपाल इत्यादी देवतांना प्रसन्न करण्यासाठी जे जे आपल्याला प्रिय ते आपल्या देवतांनाही प्रिय असणार, असले पाहिजे या विश्वासाने व श्रद्धेने भाजी-भाकरीपासून बोकड-रेड्यापर्यंत सर्व तऱ्हेचे नैवेद्य दिले जात. अर्थात देवासाठी बळी दिलेल्या प्राण्याच्या मांसाचा काही अंश इष्ट देवतेला अर्पण केल्यानंतर उर्वरित मांस खाल्ले जात असे. आजही आषाढात मरीआई, लक्ष्मीआई, म्हसोबा, सटवाई किंवा चौसष्ट योगींनीपैकी एकातरी योगिनीसाठी किमान कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा दिसून येते. तसेच काही ज्ञातींमध्ये भाद्रपदात गौरी पूजनासाठी, नवरात्रीत अष्टमीला सामिष नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे, जी परंपरेने चालत आलेली आहे.

भारतीय आयुर्वेदाच्या परंपरेनेही शाकाहार किंवा सात्विक आहाराचाच पुरस्कार केला आहे, अशी चुकीची धारणाही आज समाजात रूढ होताना दिसते. चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांगहृदय सारख्या ग्रंथांमध्ये आहार आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध अधोरेखित करताना ग्रंथकर्त्यांनी मांसाचे विविध प्रकार व गुणविशेष सांगितले आहेत. तसेच काही मांसाहारी पदार्थांच्या पाककृतीही दिल्या आहेत. उदा. चरकाने उत्तम आरोग्यासाठी ‘मांसरसा’ची शिफारस केली आहे. तर वाग्भट आपल्या अष्टांगहृदय या ग्रंथात म्हणतो, ‘मांसासारखा शरीराला पुष्ट करणारा दुसरा पदार्थच नाही. त्यातही मांसाहारी प्राण्यांचे मांस हे मांसावरच वाढलेले असल्याने ते विशेष पुष्टिदायक असते.’ आपल्या आयुर्वेदशास्त्रावरील ग्रंथात विशिष्ट प्राण्याचे मांस भक्षण केल्याने कोणते लाभ होतात याचे सविस्तर विवेचन आपल्याला पाहावयास मिळते. उदा. रानरेड्याचे मांस बलवर्धक तर पाळीव रेड्याचे मांस स्निग्ध आणि पित्तशामक असते. रानडुकराचे मांस बलवर्धक आणि वात दोष कमी करते. रानकोंबड्याचे मांस हे पचायला हलके, पुष्टिवर्धक आणी कफनाशक असते. मात्र याउलट पाळीव कोंबड्याचे मांस पचायला जड आणि कफदोष वाढवणारे असते. शेळीचे मांस रुचकर व पुष्टिवर्धक असते. ते वात-पित्त दोष कमी करते. मात्र ते पचायला जड असते. तर कोकराचे मांस शीत, पचायला हलके व शक्तिदायक असते. मेंढीचे मांस रुचकर असले तरी पचायला काहीसे जड व कफ दोष वाढवणारे असते. सशाचे मांस हे त्रिदोषनाशक, श्वसनाचे व कफाचे विकार दूर करण्यास मदत करते. सारस पक्षाचे मांस पचनसंस्था सुधारण्यास मदत करते आणि मूळव्याधीच्या आजारातही गुणकारी ठरते. एकूणच आयुर्वेदात ही जी मांसाची गुण-वैशिष्ट्ये अधोरेखित केली आहेत त्यावरूनही तत्कालीन समाजाचा मांसाहाराविषयीचा दृष्टिकोन समजतो.

आज कोण कसा वागतो याचा थेट संबंध तो काय खातो किंवा काय खात असावा याच्याशी सहजतेने जोडला जातो. पूर्वीही समाजव्यवस्थेत कोण काय खातो, त्याचे पूर्वज काय खात होते यावरून त्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा ठरवला जात असे आणि दुर्दैवाने तो आजही ठरवला जात आहे. आपल्या संस्कृतीत आजवर हिंदू समाजव्यवस्थेचा अविभाज्य भाग असूनही संस्कृतीच्या सत्ताधीशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे दास्याचे जिणे जगणाऱ्या वंचित समुदायाची खाद्यसंस्कृतीही त्यांच्याप्रमाणेच गावकुसाबाहेरच राहिली, किंबहुना ती तशीच राहील याची व्यवस्थाही केली गेली. त्यांच्या आहारात परंपरेने लादलेल्या गोवंश आणि महिषवंश मांसाचा समावेश असल्याने त्यांच्याकडे हीन दृष्टिकोनातून पहिले गेले. समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक कृतींचे नियंत्रण करणाऱ्या वरिष्ठ समुदायाने जातिव्यवस्थेतील आपले स्थान अबाधित राखण्यासाठी ‘पड’ खाणारे किंवा ढोर खाणारे म्हणून त्यांची हेटाळणी केली. म्हणजेच एका बाजूला गाय-बैलाचे मांस जे परंपरेने मान्य होते आणि जे कालौघात निषिद्ध आणि धर्माचरणाच्या विरोधी ठरले, तेच मांस सोयीस्करपणे एका विशिष्ट समुदायाच्या आहारात शतकानुशतके टिकवून ठेवायचे, त्यासाठी त्यांच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचे नियमन करायचे आणि दुसरीकडे आम्ही जे खातो ते आणि तेवढेच सात्विक, पवित्र, श्रेष्ठ आणि धर्ममान्य आणि ‘ते’ जे खातात ते निकृष्ट, अपवित्र असे अवडंबर माजवायचे, हा निव्वळ आणि निव्वळ आहाराच्या माध्यमातून जातीव्यवस्था घट्ट करण्याचा एक प्रयत्न होता, हेही लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. आणि आज अप्रत्यक्षरित्या आपले धार्मिक, आर्थिक श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा त्याच साधनाचा वापर केला जात आहे. मग त्यासाठी खाटीकखान्यांवर बंदी आणली जाते तर कधी मुख्य रस्त्यांवर मांसाहारी पदार्थांच्या विक्रीला मज्जाव करण्यात येतो तर कधी या विचाराचे टोक गाठत फक्त शाकाहारींनाच घरांची विक्री केली जाईल असे बेधडकपणे सांगितले जाते. मात्र हे करत असताना ज्या समाजाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो, ज्यांच्या उत्पन्नाचा हा मुख्य किंवा पूरक स्रोत आहे त्यांच्या भविष्याचा कोणीच विचार करत नाही, हे दुर्दैवी आहे.
मुळातच कोण्या एका समुदायाच्या धर्मामुळे दुसरा धर्म बुडत नसतो. प्रत्येकाचा धर्म स्वतंत्र असून त्याने काय खावे, काय खाऊ नये हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. ज्या महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकर यांनी समताधिष्ठीत समाजरचना तयार करण्यासाठी प्रयत्न केले तेथे शाकाहार आणि मांसाहार यांच्या आधारे सामाजिक विषमतेच्या भिंती उभ्या करणे योग्य नाही. व्यक्ती तेवढ्या प्रकृती आणि त्यांचे खानपान हे वेगवेगळे असते. त्याला कोणत्याही एका चौकटीत बसविण्याचे काम हे व्यक्तिस्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क यांना छेद देणारे ठरू शकते. त्यामुळे शाकाहार आणि मांसाहार या दोन्ही आहार संस्कृतींचा आदर करून समन्वयाचे धोरण प्रत्येकाने अवलंबले पाहिजे. कारण वर्षानुवर्षे भारतात एकोप्याने नांदणाऱ्या विविध धार्मिक, वांशिक, प्रादेशिक समुदायांमधील त्यांच्या खाद्यसंस्कृतीतील समन्वय हीच खरी भारताची ओळख आहे, हीच खरी भारतीय संस्कृती आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!