भीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

सर्व प्रश्नांवर एकच उत्तर ते म्हणजे आंबेडकर ! -डॉ.प्रतिभा जाधव


“महामानव इतिहास घडवतात पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर इतिहासच बदलून टाकला” शाळेत असताना ऐकलं होतं हे वाक्य! जे मनावर खोलवर कोरलं गेलं आणि जिज्ञासा जागृत झाली प्रज्ञासूर्याचा अवघा प्रवास समजून-जाणून घेण्याची. सावित्रीबाई वाचूनही अशीच भारावून गेले होते, तात्यासाहेब क्रांतीबाही वाचून, थोरांकडून ऐकून समजले, जवळचे वाटू लागले. शिवराय, शाहू महाराज म्हणजे राजा, नेता कसा असावा? याचे उत्तम उदाहरण! जिजाऊ वाचतानाही अवाक, नत व्हायचे त्या माऊलीपुढती! अण्णाभाऊंचे साहित्य वाचताना समजत गेले की, ‘मात्र दीड दिवसाची शाळा शिकलेला माणूसही एवढा उत्तुंग कमालीचा प्रतिभावान, वैचारिक प्रगत असू शकतो’ आणि आता ह्या टप्प्यावर अनेक उच्चशिक्षितांसोबत वावरते तेव्हा समजतंय की, ‘शिक्षण आणि वैचारिकता किंवा सदसदविवेकबुद्धीचा फारसा सबंध नसतो.’ अर्थात काही सन्माननीय अपवाद असतातही. जातीय चष्मे आणि धर्मिक दुहीचे ‘भोंगे’ सोयीने वापरणारे लोक उच्चशिक्षितात अधिक दिसतील. शिक्षणाने तुमच्यात ‘माणूसपणाचा’ मुलभूत विचार रुजवला नाही तर ते कसले शिक्षण? आणि तुम्ही कसले शिक्षित? अन्याय,असत्याबद्दल बोलण्याची धमक, अस्वस्थता शिक्षणातून निर्माण व्हायला हवी.
मुळात तुम्ही मोठे होताना, तुमचं भावविश्व समृद्ध होताना तुमच्या कुटुंबात काय वातावरण आहे? तुमचे सोबती कोण व कसे आहेत? तुमचे शिक्षक कसे आहेत? तुम्ही काय वाचता? कुणाला ऐकता? हे तुमच्या जडणघडणीस निश्चित प्रभावित करते. तुम्हाला सारासार विचार करायला, तर्कसंगत विचार करायला, अंधश्रद्धा नाकारायला, धर्म-जात-लिंग ह्यापल्याड ‘माणूस वा देशाचा नागरिक’ म्हणून जगायला शिकवते ते खरे शिक्षण आणि असे काही शिक्षणातून होत नसेल तर ती देशाच्या दृष्टीने अतीव चिंतेची बाब आहे असे मला वाटते. शिक्षणाची फलनिष्पत्ती काय असली पाहिजे? असं कुणी मला विचारलं तर माझे उत्तर असेल ‘आंबेडकरी विचार म्हणजेच मानवतावादी विचार आत्मसात करणे, आचरणात आणणे.’
बाबासाहेब खूप प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने, ध्येयासक्तीने शिकले, आई मातीआड गेली पण रामजी बाबांनी आईगत काळजी घेतली. कर्ज काढून ,जीव गहाण ठेवून बाबासाहेबांना पुस्तके पुरविली. भारताला बाबसाहेबांनी जे जे दिलं ते रामजीबाबांचा योगदानातून आलेय कारण त्यांनी भिवाला सदैव ध्येय गाठण्यास पोषक वातावरण, स्फूर्ती आणि पाठींबा दिला.
पावाच्या तुकड्यावर, भाजलेल्या पापडावर अर्धपोटी दिवस काढून सतत नजरेपुढे चातुर्वर्ण्य अमानवी व्यवस्थेत अनन्वित अत्याचार सहन करणारा समग्र भारतातील उपेक्षित, बहुजन समाज नजरेसमोर ठेवला. शिक्षण पूर्ण केले, कायदेपंडित झाले. ग्रंथ त्यांना प्राणाहून प्रिय त्यासाठीच तर त्यांनी बांधले आलिशान ’राजगृह’! पत्नी रमाईचे सान्निध्य नाही की, मुलांचे लाडकोड नाही, सतत ज्ञानयज्ञ धगधगत असे. कायदेपंडित होऊन आले तरीही जातीय चटके संपले नाहीत. मरणाच्या उन्हात तहान लागली ,पाणी वाढायला कुणी नाही म्हणून पाणवठ्यावर जाताच लाकडी दंडुका जोरदार पाठीत बसला. परदेशात असताना लेकरं अन्न-औषधाविना मरण पावली, पत्नीने शेण्या थापून दिवस काढले, आयुष्यभर सतत संघर्ष केला. इतर मुलांना विटाळ होईल म्हणून वर्गाबाहेर बसून शिक्षण घेतले. जात कळताच सवर्ण घरमालकाने अर्ध्यारात्री सामान रस्त्यावर फेकले, ‘महार बॅरिस्टरला प्याप्यला पाणी मिळणार नाही’ हॉटेलमालक ओरडतो आणि पाण्याविणा तळमळणारा जीव तसाच मार्गस्थ होतो पण काहीतरी निश्चय करूनच. त्यानंतर महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह तर जगभर गाजला.
‘महाडच्या चवदार तळ्याचे पाणी ओंजळीत घेऊन प्राशन केले, हा सत्याग्रह म्हणजे दलितांना जन्मदत्त पाण्यावरला हक्क नाकारलेल्या उच्चवर्णीयांच्या सणसणीत चपराक होती. जाब विचारला बाबासाहेबांनी, “भेदाभेद करणारा कोणता देव आहे तुमचा? आणि तोही तुमच्यासारखा जातीयवादी असेल तर आम्हीच नाकारतो त्याला. आम्हीही तुमच्यासारखेच ‘माणूस’ आहोत, आम्हीही हिंदू आहोत मग आम्हाला तुमच्यासारखे ना स्वातंत्र्य ना अधिकार! येसकरकी, गावकी, तराळकी, स्वच्छतेची सारी कामं आमच्या माथी. जीवावरली जोखीम पत्करून काळाराम मंदिर सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. अन्यायाकारी, विषारी विघातक मनुस्मृती दहन करून क्रांतिभूमी निर्माण केली. इथल्या प्रत्येक माणसासाठी त्यांचा लढा होता, हा देश अधिक विकसित, सशक्त, समृद्ध, शांततामय सहजीवनयुक्त करायचा असेल तर सर्वात आधी सामाजिक समता प्रस्थापित होणे नितांत गरजेचे आहे हे मत प्रथम बाबासाहेबांनीच मांडले. गढीमाडीवर राहणार्‍या शोषक तथाकथित उच्चवर्णीयांना काय कळणार विषमतेचे चटके? युगानुयुगे जातीय जीवघेणी होरपळ अनुभवणारेच समतेचे आग्रही असतात आणि समतेसाठी बोलणारे, लिहिणारे, मागणी करणारे यांना ही धूर्त व्यवस्था पुन्हा जातीय ठरवत असते हा केवढा विसंगत करुण विनोद आहे.
डॉ.आंबेडकर म्हणजे एक वादळ, एक झंझावात, प्रचंड संवेदनशील व्यक्ती.प्रचंड आत्मविश्वासाचे आगार, आपला अभ्यास आणि चिंतन यातून प्रभावीपणे व्यक्त होऊन भल्याभल्यांना निरुत्तर करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. हिंदू धर्मात जन्म घेऊनही आम्हाला माणसासारखी वागणूक मिळत नसेल तर त्या धर्माचे जोखड आम्ही का बाळगायचे? जो धर्म आम्हाला माणूस मानत नाही, दुहीचे तत्वज्ञान सांगतो तो धर्म आमचा कसा? म्हणत धर्मांतराची बुलंद घोषणा करणारे, अनेक धर्मांचा अभ्यास करून जागतिक प्राचीन समृद्ध अशा बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन साऱ्या उपेक्षित शोषित वंचित समाजाला सन्मानाचे जीवन देणारे, मुक्या गावकूसाला वाचा फोडणारे.
आईच्या ममतेने माऊल्यांच्या राहणीमानात सुधारणा सांगणारे, समाजातील साऱ्याच वंचित घटकांचे उद्धारकर्ते, समग्र महिलावर्गावर तर त्यांचे थोर उपकार आहेत. मजूरमंत्री असताना दि. ९ डिसेंबर १९४३ रोजी धनबाद (बिहार) येथील खाणकामगारांच्या वसाहतीला त्यांनी भेट दिली. खाण-कामगारांच्या अनेक वस्त्यांमध्ये फिरून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मजूरमंत्री म्हणून कामगारांसाठी किमान वेतन कायदा, वैद्यकीय सवलती, कामाचे तास, स्त्रियांना प्रसूतीसाठी पगारी रजा, सेवायोजन, कामाच्या ठिकाणी स्त्रियांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह,सुरक्षिततेच्या योजना, कामगार वसाहती, कामगारांच्या मुलांना सक्तीचे शिक्षण, सक्तीचा आयुर्विमा इत्यादी उपाययोजना केल्या व त्या अमलात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. त्याची फळे आपण सर्व आज चाखत आहोत. अस्तित्व, आत्मभान आणि आत्मजाणीव देणारा ‘न भूतो न भविष्यती’ असा महामानव म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेबांसारखे ‘महामानव’ युगायुगातून एकदाच जन्मास येतात. सार्‍या देशाने त्यांच्या कर्तुत्वाप्रती कृतज्ञ असायला पाहिजे कारण आजही सर्व प्रश्नांवर एकच उत्तर ते म्हणजे आंबेडकर !
हिंदू कोड बिलातून हितलाभ आणि सवलती उपभोगून, मानाच्या जागा, सन्मान पद भूषविणाऱ्या साऱ्याच स्त्रियांनी एकदा तरी फुले-आंबेडकर वाचावे, पूर्वग्रह झटकून ऐकावेत मग त्यांना कळेल की, पोथ्या आणि दगड गोटे पुजण्यात आपण ह्या पितृसत्ताक दांभिक अव्यवस्थेची गुलामी युगानुयुगे निष्कारण मानेवर वाहतो आहोत. वैचारिक विकास गरजेचा असतो कारण तो तुम्हाला ‘अस्सल माणूस बनवत असतो. जातीच्या उतरंडीत अस्सल प्रतिभाही खितपत पडते, क्षमता असूनही जाती-धर्माचे निकष लावले म्हणजे सुमार बुद्धीच्या लोकांना मानाच्या जागा आणि कुवत नसताना सन्मान मिळत जातात म्हणून जोवर संविधांनातील ‘आम्ही भारताचे लोक’ ही एकमेव जातधर्म उरत नाही तोवर हा जातीअंताचा लढा जारी ठेवावा लागेल ….
वर्गाच्या बाहेर वाळीत टाकलेला दलित मुलगा देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होतो, आपल्या बुद्धिवैभवाच्या जोरावर कमालीच्या प्रतिकूल सनातन, जातीवादी विखारी वातावरणात न्यायप्रिय सयाजीराजांच्या मोलाच्या मदतीने बॅरिस्टर होतो. भारतातील जातीव्यवस्थेचे उच्चाटन करण्यासाठी आपली आख्खी ह्यात , बुद्धि पणास लावतो तोच, न्याय-समता-स्वातंत्र्य-बंधुतेचा ध्यास घेऊन जागतिक स्तरावर उल्लेखनीय आदर्श अशी राज्यघटना लिहितो. स्वतंत्र भारताचा पहिला कायदेमंत्री होतो, केवढा काव्यात्मक वाटतो हा प्रवास!
अभ्यास, चिंतन, विवेक, जिद्द, चिकाटी, यशाचा तू महामेरू बापा! तू घटनातज्ञ , राजनितीज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, जलनीतीज्ञ मानववंशशास्त्रज्ञ,प्रकांडपंडित, कायदेतज्ञ, तत्वज्ञ, इतिहासकार, मुकनायक, लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, राष्ट्रभक्त, धर्मशास्त्रज्ञ, थोर संपादक, सत्याग्रही ,समाजसुधारक, क्रांतिकारक ,बौद्ध धम्मउत्थानी , वक्तादशसहेस्त्रेषु ,विद्याव्यासंगी , द्रष्टा विचारवंत एकमेवाद्वितीय केवळ ! तू दाखवलेल्या दिशेला विवेकवाटेवर चालत राहू हयातभर… तेजस्वी भारतरत्ना! कोटी कोटी प्रणाम बाबा!!
-डॉ. प्रतिभा जाधव,नाशिक

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!