आजचा ओबीसी विरूद्ध मराठा हा संघर्ष का उभा राहिला..

मंदार माने
आजचा ओबीसी विरूद्ध मराठा हा संघर्ष का उभा राहिला हे समजून घ्यायचे असेल तर सत्यशोधक समाजाच्या फुलेंनंतरच्या ब्राह्मण ब्राह्मणेतर तून वेगळे होऊन उभ्या राहिलेल्या मराठ्यांच्या पेशवाई विरूद्ध मराठेशाही अर्थात ब्राह्मण विरूद्ध मराठा या संघर्षाकडे पहावे लागेल. खालील एक उतारा त्या काळाकडे घेऊन जाईल. ब्राह्मणांकडून मराठेशाहीवर टीकेची झोड उठवली जात होती.
२२ जून १८९७ या चित्रपटात सुरूवातीला तालमीमधे चाफेकर बंधू जातात तेव्हां एक किरटा आवाज ब्राह्मणांची टिंगल करताना दाखवला आहे. त्यात दोघांची मराठेशाही आणि पेशवाईवरून बाचाबाची होते. चाफेकर त्याला सांगतात कि अटकेपार झेंडे कुणी लावले ? हा संवाद त्या काळचे मराठा विरूद्ध ब्राह्मण वातावरण दाखवण्य़ास पुरेसा आहे.
महाराष्ट्रात राज्य ब्राह्मणांचे असावे कि मराठ्यांचे या विचाराने मराठा संघटीत होऊ लागला होता. हिंदू या शब्दाचा राजकीय वापर करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यामुळे चिंतेत पडला होता. माधव गोळवलकर गुरूजी बाबासाहेबांकडे दिल्लीत गेले होते. त्यांनी आपण महाराष्ट्रात एक येऊयात म्हणजे सत्तेचा वाटा मिळेल असा प्रस्ताव ठेवला होता. सोहनलाल शास्त्री सांगतात कि बाबासाहेबांनी हा प्रस्ताव ऐकून संतप्त होत त्यांना बाहेर काढले होते. त्यांना ही समाजात फूट पाडण्याची खेळी वाटली होती. जर त्या वेळी महाराष्ट्रातले अस्पृश्य ब्राह्मणांच्या मदतीला गेले असते तर १३% फोर्स उभा राहिला असता. हा मुसलमानांच्या बरोबरीचा होता. मुसलमान कदाचित देश सोडून जातील असे बोलले जात होते. मराठा अद्याप पूर्ण पणे संघटीत झालेला नव्हता. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या डाव्या विचारसरणीकडे पश्चिम महाराष्ट्रातला मराठा संघटीत होत होता. शाहूंच्या पुरोगामी विचाराचा मराठा कॉंग्रेसकडे जात होता. तर जेधे जवळकर यांच्या तत्कालीन संभाजी ब्रिगेडसदृश्य संघटनेचा मराठा अद्याप कुंपणावर होता.
बाबासाहेब फुल्यांना मानत असल्याने सत्यशोधक समाजाशी द्रोह करण्याची शक्यता नव्हती. पण समजा असे झाले असते असे समजून चालू. तर ब्राह्मणांनी अस्पृश्यांच्या संख्येचा उपयोग करून महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली मांड जमा केली असती. ती ही कॉंग्रेसच्या ब्राह्मणांना शह देऊन. कॉंग्रेसचे ब्राह्मण हे बहुजन समाजाची भीती बाळगून त्यांना चुचकारून राज्य करत होते, तर आर एस एस चे ब्राह्मण हे हिंदू संघटीत करून त्यांचा नेता बनण्याचे राजकारण खेळत होते. कॉंग्रेसच्या ब्राह्मणांचा त्यांना छुपा पाठिंबा होता. असे नाही तर असे प्रयत्न करायला काय हरकत आहे ? यात एक गोष्ट झाली असती अस्पृश्यांच्या पुढार्यांना सत्ता मिळून अस्पृश्यांकडे धन, दौलत, जमीन आणि व्यापार आला असता. मात्र वापर करून झाल्यावर ब्राह्मणांनी पुन्हा अस्पृश्यांविरोधात हिंदू संघटीत केलाच असता. त्याने सामाजिक मागासलेपण दूर झाले नसते. हे न झाल्याने यशवंतराव चव्हाणांकडे कॉंग्रेसने ब्राह्मणेतर चळवळ कॉंग्रेसमधे आणण्याचे काम सोपवले. जर तसे झाले नसते तर नाना पाटील यांच्या मागे मराठा जाऊन शेतकरी कामगार पक्ष हा सत्ताधारी पक्ष झाला असता. चव्हाणांनी ही चळवळ कॉंग्रेसमधे आणताना मराठ्यांच्या राजकारणाबाबत जी काही आश्वासने दिली ती सध्या तरी उपलब्ध नाहीत. पण त्यातूनच संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर ब्राह्मण मुख्यमंत्री नको ही भूमिका मराठ्यांनी घेतली.
यामागे पेशवाई विरूद्ध मराठेशाही हा संघर्ष आहे.
सत्यशोधक समाजातून मराठे आपण सत्ताधारी आहोत या मिजाशीतून वेगळे झाले. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रावर मराठ्यांचेच राज्य हवे या महत्वाकांक्षेतून ते ब्राह्मणी कॉंग्रेसमधे येऊन लॉबींगच्या जोरावर सत्ताधारी झाले. दिल्लीच्या ब्राह्मणी नेतृत्वाने मराठ्यांसमोर सरेण्डर केले. तेव्हांच दिल्लीत ब्राह्मण मुंबईत मराठा हा करार कॉंग्रेसमधे झाला.
हे उलटवण्यासाठी भाजपने मंडल आयोगाचा वापर करत ओबीसींना आपल्याकडे ओढायला सुरूवात केली. हिंदू + मंडल या नीतीने भाजपने ओबीसी संघटीत केला. त्याला शह देण्यासाठी पवारांनी भुजबळांना समता परीषद काढून दिली. घाईत मंडल आयोगाची अंमलबजावणी केली.
हा संघर्ष आता भाजप आघाडी (महायुती) विरूद्ध महाविकास आघाडी असा झाला आहे. दोन्हीही आघाड्यांना आरक्षण द्यायचेच नाही. आरक्षणाचा फक्त वापर केला जात आहे. मनातून मराठ्यांना पूर्वी आपण सत्ताधारी असल्याच्या भावना आहेत, तर ब्राह्मणांच्या मनात पेशवाई आहे. पण बहुमत कुणाकडेही नसल्याने हे वाट्टेल त्या तत्वाचा उच्चार करून बहुमत जमवायच्या भानगडीत आहेत.
मविआला सेक्युलर म्हटले कि मुसलमानांची मते मिळतात आणि संविधान बचाव म्हटले की दलितांची. मात्र हिंदू मराठा पुन्हा आणण्यासाठी पवारांनी जरांगेंना पुढे करून मराठा आरक्षणाचा डाव खेळलेला आहे. तर भाजपच्या ओबीसी कार्डाला शह देण्यासाठी भुजबळांना महायुतीत पाठवून ओबीसी आरक्षणाचा लढा सुरू केला आहे. भाजपने त्यात आपली प्यादी घुसवलेली आहेत.
ओबीसी व्होटबॅंकेत अन्य कुणी येऊ नये यासाठी अॅड ससाणे, श्रावण देवरे यांच्यासहीत काही ओबीसी मुखंडांची नेमणूक केलेली आहे. याला पोझिशन घेणे असे म्हटले जाते. आता छगन भुजबळांच्या दोर्या भाजपच्या हातात आहेत.
या पार्श्वभूमीवर ओबीसींनी जागृत होत हा लढा स्वतंत्र बुद्धीने लढण्याची गरज आहे. त्यांनी आपला पक्ष काढावा. तसे ते संघटीत नाहीत ही शोकांतिका आहे. त्यामुळे किमान या निवडणुकीत शहाणपणाचा विचार म्हणून ओबीसी नेत्यांनी आकस बाजूला ठेवून प्रकाश आंबेडकरांच्या साथीने आरक्षण बचाव मोहीमेत सामील व्हावे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद त्या एकत्र येण्यात असेल.
किती दिवस पेशवाई विरूद्ध मराठेशाहीच्या भांडणात इतरांनी रगडले जायचे ?
मंदार माने
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत