भगवान बुद्धांची शिकवण-भाग ७८

भिक्खू आणि ब्राम्हण हे एकच आहेत काय?
ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे.
ह्या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही. ती सर्वत्र विखुरलेली आहे; परंतु भिक्खू आणि ब्राम्हण यांमधील भेद सारांशरूपाने असे देता येतील:-
ब्राम्हण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे आनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्याचे विधिपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे- या कल्पनांमुळे, त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले.
या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे. उलटपक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यांवर विश्वास ठेवीत नाही. ह्यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही.
ब्राम्हण हा जन्माने ब्राम्हण असतो. भिक्खू हा जन्माने भिक्खू नसतो तर बनावा लागतो.
ब्राम्हणाला जात असते. भिक्खूला जात नसते.
ब्राम्हण हा सदोदित ब्राम्हणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राम्हणाचे ब्राम्हणत्व लोप पावत नाही.
परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही. भिक्खू हा बनविला जातो. म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर त्याचे भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते.
ब्राम्हण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. त्याच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते ती ही की, त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी.
भिक्खूची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे.
ब्राम्हणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमविण्याची सवलत आहे. भिक्खूला मात्र तसे करता येत नाही. हा दोहोंतील भेद लहानसहान नाही. मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचारविचारांना नियंत्रित करते. ती आचार-विचारांमध्ये संघर्ष निर्माण करते; म्हणून ब्राम्हण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात. कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश ठरतो. भिक्खू हा संपत्तिरहित असल्याने तो मानसिक व नैतिक दृष्ट्या स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणा आणि सचोटी यांच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही.
प्रत्येक ब्राम्हण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही. आपले नियमन तो आपण स्वतःच करणारा. आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधानी बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात.
उलटपक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतःसारखे करीत नसून तो संघाने नियत्रित असतो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. (The Sangh is a spiritual organisation.)
भिक्खू आणि उपासक
धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यांत विशेष भेद करण्यात आला आहे.
भिक्खू हा ब्रम्हचर्याला बांधलेला आहे. ही गोष्ट उपासकाची नाही. उपासकांना लग्न करता येते.
भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही. ह्याच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब असते.
भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही. उपासकाला ती ठेवता येते.
भिक्खूला हत्त्या न करण्याचा निर्बंध आहे. उपासकाला तसा निर्बंध नाही.
पंचशीलाचे नियम दोघांनाही पाळावयाचे असतात. परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञारूप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो. उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगे नीतिनियम किंवा तत्त्व या स्वरूपाचे असतात. (Precepts to be followed.)
पंचशीलांचे परिपालन हे भिक्खूच्या बाबतीत सक्तीचे असते. उपासकाच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असते.
तथागतांनी असा हा भेद का केला असावा? काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय ते असा भेद करणार नाहीत. भगवंतांनी त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते. काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक आहे. आपल्या धम्माच्या साहाय्याने या जगात सदाचरणाचे राज्य स्थापन करावे असा बुद्धांचा उद्देश होता यात संशय नाही. म्हणूनच तर तथागतांनी आपला धम्म भिक्खू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना शिकविला. परंतु बुद्धांना माहीत होते की, सामान्य माणसाला केवळ धम्म शिकविल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही.
आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे. एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणाने यथार्थ पटविले पाहिजे. तेव्हाच लोक त्याच्यासाठी झटतात आणि तो कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करतात. ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटविण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक आहे.
संघ म्हणजे भगवंतांनी शिकवलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा नमुना आहे.
म्हणूनच भगवंतांनी भिक्खू आणि उपासक ह्यांच्यामध्ये भेद केला. भिक्खू म्हणजे बुद्धांचा आदर्श समाजाचा मार्ग दाखविणारा प्रकाश आणि शक्यतो त्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२९.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड पाचवा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत