महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंत रविदास महाराजसामाजिक / सांस्कृतिक

संत शिरोमणी गुरु रविदास जी लेख शृंखला – 3

मन ही पुजा मन ही धूप …

वैदिक काळापासून भारतात उच्चवर्णियांनी शुद्रांना व स्त्रियांना शिक्षणा पासून व मंदीर प्रवेशा पासून वंचीत ठेवले होते.जाती भेद वर्ण भेद ब्राम्हणी व्यवस्थेचा अविभाज्य घटक होता. चुकून सुद्धा संस्कृत ऐकणे हा गुन्हा होता . अमानुषपणे त्या गुन्ह्याला दंडीत करण्याची अघोरी प्रथा होत्या..अश्या धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक दहशतीच्या वातावरणात रविदास महाराजानी त्या व्यवस्थेविरुद्ध बंड केले. चरा चरात मुक्त असलेले देवसुद्धा कर्मकांड, ढोंगा सोंगाने जनसामान्यांना भिती दाखवून पंडितांनी पोट भरण्यासाठी देवळात कृत्रिमपणे बंदिस्त करून ठेवले होते.
अश्या देवळातील बंदिस्त देवमुक्तीचे एक जबरदस्त आंदोलन संत रविदासानी उभे केले होते.शुद्रांना व महिलांना पंडित देवळात येऊ देत नव्हते ? त्यानी शुद्रांना व महिलांना तुम्हीच देवळातल्या देवाकडे जाऊ नका.असा संदेश दिला .संदेश काय ती गुरू आज्ञाच होती…! देवळात घंटा वाजवायला किंव्हा मशिदीत अजाण देयला देव, अल्ला काय बहिरा आहे का? असा बहिरा देव तुमचे काय ऐकणार ? , देव सर्वत्र आहे. तो गरीब,पित्याच्या चरण सेवेत आहे.भुकेकंगाल गरीबात आहे.प्रेमात आहे. घरा घरांत आहे. मना मनांत आहे.

मन ही पुजा मनही धुप,मन ही सेऊं सहज सरूप!

मनांतल्या देव्हारयात आत्मारामाला भुंग्याने दुषित झालेली फुले फळे ,वासराने उष्टे केलेले गायीचे दुध ,मासे खेकडे बेडकांनी मल मुत्राने गलिच्छ झालेल्या पाण्याने अभिषेक करण्याची जरूरी नाही.फक्त शुद्ध, निर्मळ मनाने त्याची आराधना करा.हाच खरा ज्ञान मार्ग आहे व भक्तीमार्ग ही आहे. तुम्हाला राम मिळेल. श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला म्हणतात “सर्व शंका कुशंका सोडून तू मला शरण ये मी तुझा उद्धार करतो”. तथागत गौतम बुद्ध ईश्वर,.. आत्मा,… मोक्ष …,मी कोण आहे. ?….जग कोणी निर्माण केले?.असल्या प्रश्नांना थाराच देत नसत.ते म्हणत . अशा प्रश्नांना उत्तर देण्यासाठी “सर्वज्ञता” असायला पाहिजे.जे काही जाणण्याजोगे आहे ते मी सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकत नाही.एकावेळी सर्वच जाणण्याची इच्छा करतो तेव्हा आपण ते सर्वच जाणलेले असते असे नाही सदा काहीतरी अज्ञात रहातेच.या जगात दुःखाचे कारण दारिद्र्य आहे. तुम्ही दुःख मुक्तीसाठी” बुद्धं शरणं गच्छामी ,धम्मं शरणं गच्छामी , संघम शरणं गच्छामी” म्हणत धम्मात या मी दुःखमुक्तीसाठी मार्गदर्शन करतो. तथागत बुद्धाच्या विचाराप्रमाणे माणसाच्या मर्यादा दिसतात. संत रविदास वरील प्रश्नाना बगल देत नाहीत. मर्यादा मानत नाहीत. ते या प्रश्नांची उकल मनाच्या साहाय्याने करतात. मन अनंत आहे दिव्य आहे. मन प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते असे सागतात. मनुष्य जन्माला ध्येय आहे ते ध्येय ईश्वर प्राप्ती आहे असे सांगून शुद्ध पवित्र निर्मळ मनाच्या पुजनाने आत्मसाक्षात्कार होतो हे सांगतात. मन हे माणुसकी तत्वाचे अदृश्य बिज असून त्याचे अस्तित्व आहे आंब्याच्या झाडाला आंबेच लागतात कोयीमधील जनूक ही त्या आंब्याचे बी आहे.तसे माणसाच्या पोटी माणूसच जन्मतो मन हे माणसाचे जनूक आहे हे ते पटवून देतात. मनाची मशागत करण्याने म्हणजे काम, क्रोध, मद, मोह लोभ, मत्सर विकारांचे निर्मूलन ,नांगरणी करून सदविचारांची पेरणी करून,जोपासना करून कोणीही मन सुपिक करू शकतो .आधुनिक शास्त्रात ही एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे. मनांत कित्येक सत्ये लपलेली आहे.त्याचा पुर्णपणे शोध लागला नाही.”सत्यस्वरूप” हे गुप्त धनासारखे मनाच्या खोलीत लपलेले आहे. फक्त जप केल्याने ते वर येणार नाही. त्यासाठी कष्ट , संघर्ष करून मनाला खणले पाहिजे.हे “खणणे” म्हणजे ही मन पुजा आहे.ही पुजा आत्ममंथन आहे. मृत्युनंतर काहीच नाही असे समजून धन कमवून त्यातून मौजमजा करणारे दुःख मुक्त होऊन सुखीअसतात असे ते मानत नाहीत. मन हे अनुभवगम्य आहे. कान, त्वचा, डोळे, जीभ, नाकाने ध्वनी,स्पर्श , रूप,चव व गंधाचे अनुभव येतात .पण पाय असून चालता न येणारे ,जीभ असून बोलता न येणारे डोळे असणारे अंध आपण पहातो त्याचे कारण मेंदूत असते. मन हे संवेदनांचे ज्ञान करून देणारी मेंदूची दिव्य शक्ती आहे.बाह्य इंद्रिये बोधाची साधने आहेत. शोध हे साध्ये आहेत .शोध मनाला आलेले अनुभव आहेत. त्या जाणीवा आहेत .मनशक्तीचा शंभर टक्के उपयोग केल्यास व्यक्ती “सर्वज्ञ ” होऊ शकते..! रविदास सर्वमान्य सर्वज्ञ होते.सिद्ध पुरुष होते.ब्रम्हज्ञानी होते याची प्रचिती खालील पदावलीतून येते.

मन मेरो सत्त सरूप विचारं!
आदि अंत अनंत परमपद सूशा सकल निवारं !!

रविदासानी निर्मळ मनाने सत्य स्वरूपाचा विचार केला आहे.त्या स्वरूपाला आदि व अंत नाही हे समजल्याने त्यांचा संशय दूर झालेला आहे.

जस हरि कहिये तस हरि नाही,है अस जस कछु तैसा !
जानत जानत जान रह्यो सब,मरम कहो निज कैसा!!

पंडित वेगवेगळ्या रूपात चित्रात मुर्तीत हरि कसा आहे ते सांगतात तसा तो नाही. तो कसा आहे हे शब्दात सांगता येत नाही मर्म न जाणता तो कसा आहे हे सांगता येत नाही. जानत म्हणजे अनुभव .प्रत्येकाला वेगळा अनुभव येतो.त्या अनुभवांवरून निष्कर्ष निघतात.

करत आन अनुभवत आन ,रस मिलै न बेगर होई!
बाहर भिऔर प्रगट गुप्त,घट घट प्रति और न कोई!!

आपण दाखवितो ईश्वर एक आणि अनुभवतो दुसरा.रसज्ञान होत नाही त्यामुळे दोन मनात गोंधळ होतो.आत बाहेर गुप्त असा प्रभु घटाघटात व्यापून राहिलेला आहे. इथे प्रभुशिवाय दुसरा कोणी ही नाही.

आदिहु एक अंत पुनि सोई मध्य उपाइ जू कैसे !
अहै एक पै भ्रम सूं दूजौ कनक अलंक्रित जैसे !!

आरंभी तोच होता शेवटी ही तो एकच रहाणार मधेच तो कसा उत्पन्न होणार?परंतू भ्रमामुळे तो दूसरा वाटतो. जसे सोने व अलंकार यात अलंकाराच्या फक्त आकाराने फरक असतो.

कह रैदास प्रकास परमपद,का तप जप विधी पुजा !
एक अनेक एक हरि ,कहौ कौन विधी दुजा !!

तो प्रभू प्रकाशरूप परमपद आहे.त्यासाठीआता असे आत्मसाक्षात्कार झाल्यावर जप तप ,पूजाविधी काय कामाची आहे? नाना रूपात तो मला एकच दिसतो त्यास मी दुसरा कसा म्हणू.? कोणीही स्त्रि पुरूष त्या सत्यस्वरूपाचा अनुभव घेऊ शकतो …! धन आणि तारुण्याच्या कैफात घमेंडीत नशेत न फिरता प्रभूचा शोध घेऊन जीवन सार्थक करू शकतो . परमेश्वर प्राप्तीसाठी मंदीरात जाऊन मुर्ती पुजा नवस पूजा पाठ विधी करण्याची आवश्यकता नाही.ती मनातून करता येते. मंदीर प्रवेश नाही म्हणून हताश होऊ नका.मंत्र श्लोक येत नाहीत म्हणून खचून जाऊ नका. मनातील षड्रिपू निग्रहाने पळवून लावा. सेवा करा . रविदास म्हणतात प्रभूचा शोध घेता . तो मनातही आहे मग मंदीरात जाऊन त्याचा शोध कश्याला घेयचा.रविदासाची मंदीराचे व पंडीत पुजार्‍यांचे महत्त्व कमी करण्याची क्रांतीकारी चळवळ ही ऐतिहासिक चळवळ होती ..!

लेखक अँड आनंद गवळी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!