समस्या अशोक चव्हाण नाही : घराणेशाहीचे सुभेदार ही समस्या आहे

हेरंब कुलकर्णी
अशोक चव्हाण महाशक्तीशरण झाल्यावर संघटितपणे भाजप विरोधी लढणाऱ्यांना वाईट वाटणे अगदीच स्वाभाविक आहे.विशेषत: पुरोगामी संघटना कोणतीही मागणी न करता आज भाजपशी लढणाऱ्या पक्षांच्या पाठीशी उभे राहताना किमान या नेत्यांनी प्रामाणिकपणे लढावे अशी किमान अपेक्षा असते. ‘भारत जोडो ‘चे नांदेड जिल्ह्यात स्वागत करताना पुरोगामी संघटना, साहित्यिक, कलावंताचे अशोकराव असे स्वागत करत होते, त्या नांदेडच्या विराट सभेत असे बोलत होते की फॅसिझमविरुढची लढाई जणू तेच पुढे नेणार आहेत…
पण तरीही
मला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की घराणेशाही तून ज्यांच्या राजकारणाचा जन्म होतो ते पुरोगामी नसतात आणि प्रतिगामी ही नसतात. घराणेशाही हाच यांचा पक्ष असतो. त्यामुळे भ्रमात राहण्यात अर्थ नसतो. यांना फक्त यांची सुभेदारी सांभाळायची असते. ते सांभाळण्याची जो हमी देईल तो यांचा पक्ष आणि तोच यांचा विचार असतो…
१९८६ नंतर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण यांना पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात त्यांच्या वडिलांनी निवडून आणले. गावोगावी जाऊन शंकरराव लोकांना विनंती करत होते. निवडणूक प्रतिष्ठेची केली. तेव्हा माधव गडकरी
यांनी लोकसत्तात ‘ शंकरराव, सन्मानाने निवडून या..’ असा अग्रलेख लिहिल्याचे मला अजून ही आठवते…
घराणेशाहीतून पुढे आलेल्या नेत्यांनी कोणताही संघर्ष केलेला नसतो. तळागाळात जनतेशी नाते नसते. सारे काही सहज मिळालेले असते. सरंजामी वृत्ती असते. संस्थांचा पसारा त्यातून मिळणारा पैसा आणि त्या संपत्तीतून मिळालेली सत्ता असे त्यांचे नेतृत्व समोर आलेले असते. अशावेळी एखादा व्यापारी आपला व्यवसाय सांभाळतो तशीच मानसिकता यांची असते..वैचारिक भूमिका वगैरे केवळ त्या व्यवसायाची मार्केटिंग जाहिरात असते. त्यालाच आपण फसतो….आजपर्यंत व्यवसाय काँग्रेस मुळे तेजीत होता म्हणून ते काँग्रेस मध्ये होते इतके सोपे गणित त्यांच्यासाठी असते..व्यावसायिक नफा तोटा बघुन खरेदीचा डीलर बदलतो असे यांचे असते.
त्यामुळे फॅसिझमविरोधी लढाई यांच्या भरवशा वर लढण्याचा भ्रम करायला नको…
याउलट घराणेशाही चे सुभेदार कोणत्याही पक्षात असोत ते पराभूत करायचे…इतकेच ठरवायला हवे…घराणेशाही हटाव हाच नारा असायला हवा.
काल हे सारे काँग्रेस राष्ट्रवादीत होते आज हे भाजप सोबत आहेत…मी स्वतः २०१९ च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत घराणेशाही चे किती उमेदवार होते. किती कारखान्यांचे किती चेअरमन घराणेशाहीचे आहेत..जिल्हा परिषद चेअरमन आहेत हा सारा १४ जिल्ह्यांचा अभ्यास करून त्याचा अहवाल मी प्रसिद्ध केला होता..त्यामुळे
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वपक्षीय घराणेशाही चे सुभेदार पराभूत करणे हाच अजेंडा तरुणाईचा व्हायला हवा…त्याशिवाय लोकशाहीचे पाणी वाहते होणार नाही…गरीब कुटुंबातील तरुणांना राजकारणात संधी मिळणार नाही…
तेव्हा हे पुरोगामी आणि प्रतिगामी नसतात. घराणेशाही हाच यांचा पक्ष असतो आणि तोच पराभूत करायला हवा…
हेरंब कुलकर्णी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत