महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ५५


बौद्ध जीवनमार्ग

मागील भागात ‘सत्, असत् आणि पाप,
लोभ व तृष्णा, क्लेश आणि द्वेष, क्रोध आणि वैर आणि मनुष्याचे मन आणि मनोविकार, आपण(स्वत्व) आत्मविजय आणि प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती’ याबाबतीत माहिती घेतली. या भागात ‘विवेकशीलता, एकाग्रता आणि जागरूकता’ याबाबतीत माहिती घेणार आहोत.

विवेकशीलता आणि एकाग्रता

प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जाणे. सावधान राहाणे, आस्थायुक्त आणि धैर्यशील राहात जाणे हा बौद्ध जीवनमार्ग होय.

आपण जे काही आहोत ते आपण केलेल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारांवर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचारांचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागेल, कृती करू लागेल तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहाते. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे.

अविचारी बनू नका. आपल्या विचारांवर लक्ष असू द्या चिखलात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो, त्याप्रमाणे असत् मार्गापासून आपली मुक्तता करा.

शहाण्या माणसांनी आपल्या विचारांची राखण करावी. कारण विचार हे कळायला कठीण, अतिशय धूर्त असून, जिकडे वाट मिळेल तिकडे ते स्वछंदीपणे धावत राहतात. सुरक्षित विचार हे सौख्य देणारे असतात.

कसेतरी शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहाते, त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थित शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही, त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही.

माझे मन एके काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते; परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने क्षुब्ध हत्तीला वळवित असतो, त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवित आहे, असाच विचार करावा.

दुर्निवार (अनिवार्य) आणि सैराट (स्वछंदी) अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. कारण काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे. दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे लोक काम-बंधनापासून विमुक्त होतात.

जर माणसाची श्रद्धा अचल, स्थिर नसेल, जर सद्धम्म त्यास माहित नसेल आणि जर त्याची मनःशांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही.

एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो, त्यापेक्षा जास्त उपद्रव वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्माण करते.

आईबाप, आप्तेष्टांपेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते.

जागरूकता

निष्काळजीपणाच्या अधीन होऊ नका. कामभोगापासून दूर राहा. जागरूक मनुष्य चिंतनशील असतो. हाच बौद्ध जीवनमार्ग होय.

शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या, शहाणपणाच्या शिखरावर चढतो.

निष्काळजी लोकामंध्ये जागरूक, निद्रितांमध्ये जागृत असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा अडेलतट्टूला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करीत असतो.

दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरविलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये. एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा. धम्मानुसार आचरण करण्याच्या ध्येयापासून ढळू नका.

सावधान-चित्त राहा. आळस सोडा. सम्यक् मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक् मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो.

आळशीपणा म्हणजे अपयश, सुस्तपणा म्हणजे अपवित्रता. सतत प्रयत्न आणि सम्यक् दृष्टी ह्यांच्या साहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणाचा विषारी बाण उपटून काढा.

दोषात (प्रमाद) फसू नका. विषयोपभोगात आसक्त राहू नका. अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा.

जो उन्मत्त, गर्विष्ठ (अप्रमत्त) नाही आणि जागरूक आहे, स्मृतिमान आहे, सुविचारपूर्वक काम करणारा आहे; जो संयमी आहे, जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे, अप्रमत्त आहे व धम्मानुसार जीवन जगतो–अशा माणसांना यश प्राप्त होत असते.

संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड चवथा भाग तिसरा
क्रमशः
आर.के.जुमळे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!