पहिली राज्यस्तरीय लोकशाही गणराज्य परिषद सापगाव येथे उत्साहात संपन्न
सापगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे रविवारी (ता.२८ जानेवारी) लोकशाही गणराज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिषदेसाठी महाराष्ट्रभरातून नागरिक उपस्थित होते. सापगावकर ग्रामस्थ यांनी सदर परिषदेचे यशस्वी आयोजन केले.
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे- जगातील सर्वात मोठे लोकशाही गणराज्य अशी जगात भारताची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे आणि सर्व भारतीयांना याचा सार्थ अभिमान देखील वाटतो. म्हणूनच 26 जानेवारी हा प्रजासत्ताक अर्थात लोकसत्ताक दिन संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
भारतातील लोकशाही ही सर्व भारतीयांच्या सहजीवनाची जीवन पद्धती आहे या विषयावर या परिषदेमध्ये विचार मंथन करण्यात आले. अनेक मान्यवर विचारवंत लेखक या परिषदेमध्ये सहभागी झाले. यामध्ये ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक उत्तम कांबळे ,सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प श्यामसुंदर महाराज सोन्नर ,भदंत आर्यनाग थेरो ,रेवरंड धर्मेंद्र वानखेडे ,मौलाना सलीम खान ,मुख ग्रंथी युवराज सिंग आदी मान्यवरांनी सहभाग घेतला आणि आपले विचार व्यक्त केले.
सापगाव सारख्या छोट्याशा खेड्यामध्ये या परिषदेला नागरिकांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सापगाव पंचक्रोशी ,त्रंबकेश्वर तालुका ,नाशिक शहर जिल्हा ,त्याबरोबरच महाराष्ट्राच्या इतर भागातूनही नागरिक बंधू-भगिनी या परिषदेसाठी उपस्थित होते. सापगावकरांनी या सर्वांचे विशेष आदरातिथ्य केले. उपस्थित सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था ही करण्यात आली होती.
सापगावकरांचे कौतुक
परिषदेच्या यशस्वी आयोजनामध्ये सापगावचे श्री मधुकर कांबळे यांनी मोलाची भूमिका बजावली. सोबतीला त्यांचे कुटुंबीय व दिवे , कांबळे ,आणि बेंडकोळी परिवार यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थित मान्यवरांनी या सर्वांचेच विशेष कौतुक केले. आयोजक ग्रामस्थांपैकी कोणीही उच्चशिक्षित नाही अथवा पैशानेही फार श्रीमंत नाही. तरीही त्यांनी ज्या उदात्त हेतूने हे कार्य केले त्याला तोड नाही अशी भावना व्यक्त केली.
लोकशाही म्हणजे काय…..
मंचावरून बोलत असताना मान्यवरांनी , वक्त्यांनी जे विचार व्यक्त केले त्यामध्ये प्रामुख्याने लोकशाही म्हणजे काय यावर विशेष चर्चा झाली. केवळ निवडणुका म्हणजे लोकशाही नव्हे शासन प्रशासन व्यवस्था म्हणजे लोकशाही नव्हे तर लोकशाहीची संकल्पना खूप व्यापक आहे. देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन सर्व प्रकारचे भेद विसरून एक आनंददायी , परस्पर सहकार्याचे , समन्वयाचे , सामंजस्याचे सहजीवन जगणे म्हणजे खरी लोकशाही होय. जिथे कोणता भेद नाही कोणता कलह नाही , कोणती विषमता नाही अशी आदर्श व्यवस्था म्हणजे लोकशाही होय.लोकशाही केवळ शासन प्रशासनाची व्यवस्था नाही तर ती देशवासियांच्या सहजीवनाची जीवनपद्धती आहे अशा पद्धतीचे विचार मंचावरून व्यक्त करण्यात आले.
मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना…
लोकशाहीमध्ये लोकांच्या यशस्वी आणि आनंदी सहजीवनासाठी धार्मिक सलोखा असणेही गरजेचे आहे असे मत सर्वच धर्मगुरूंनी व्यक्त केले. वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरूही परिषदेमध्ये सहभागी झाले होते.भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात भारतीय लोकशाहीने सर्व नागरिकांना आपल्या धर्माच्या आचरणाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. कोणताही धर्म परस्पर सहकार्य प्रेम बंधुता आणि उदात्त मानवी मुल्यांची शिकवण देतो , असे सर्वांनी नमूद केले.
एकंदर लोकशाही गणराज्य मंच आयोजित पहिली राज्यस्तरीय लोकशाही गणराज्य परिषद उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वीरीत्या संपन्न झाली
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत