मुंबईत अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचापहिला वर्धापन दिन संपन्न!

मुंबई: दिनांक २२ मार्च
माझ्या अस्ताकडे चाललेल्या आयुष्यक्रमात लिहित्या हाताच्या साहित्यिक विचारवंताना एकत्रित भेटण्याच्या मी पत्राद्वारे व्यक्त केलेल्या इच्छेला विविध बॅनरखाली कार्यरत असलेल्या साहित्यिकांकडून तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचा जन्म झाला, असे भावपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि दलित पँथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार यांनी मुंबईत बोलताना केले.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचा पहिला वर्धापन दिन ज. वि. पवार यांच्या अध्यक्षतेखाली भोईवाडा, मुंबई येथील बौद्धजन पंचायत समितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात ज. वि. पुढे म्हणाले की आता मजबूत खांद्याच्या माझ्या अपरान्त मधील सहकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात जे काम केलं आहे त्या कामाने मी धन्य आणि निश्चिंत झालो आहे.
कार्यक्रमात ऐनवेळी उपस्थित झालेले बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना आपल्या भाषणात म्हणाले की, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या स्थापनेनं मला आनंद झाला आहे. आता अपरान्त मधील साहित्यिक विचारवंतानी संशोधनपर साहित्य निर्मितीवर भर देऊन आपल्या धम्माशी संबंधित ऐतिहासिक संस्कृती उजेडात आणावी.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर, डॉ. श्रीधर पवार, उपाध्यक्ष प्रा. आशालता कांबळे, अपरान्तच्या पालघर जिल्हा शाखेचे अध्यक्ष भावेश लोखंडे इत्यादींची या कार्यक्रमात प्रसंगोचित भाषणं झाली.
नागराज मंजुळेंच्या ‘झुंड ‘ चित्रपटात अमिताभ बच्चनसह चित्रित झालेल्या रॅप चा गायक विपिन तातड याचा या कार्यक्रमात ‘अपरान्त ‘ संगीती विशेषांक देऊन ज. वि. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विपिननेही उपस्थितांना रॅपची झलक दाखवली.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे सरचिटणीस सुनील हेतकर यांनी संस्थेनं केलेल्या वर्षभरातील कामांचा सविस्तर आढावा घेणारी प्रस्तावना केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपरान्तच्या रायगड जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय खैरे यांनी केले. अपरान्तचे केंद्रीय कोषाध्यक्ष दीपक पवार, महाडचे कवी मारुती सकपाळ व अपरान्त सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे कवी प्रकाशकुमार जाधव हे खास वर्धापन दिन कार्यक्रमासाठी गावाहून आले होते.
बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत आणि संजय मोहिते, गोपाळ जाधव यांच्या विशेष सहकार्यानं बौद्धजन पंचायत समितीच्या वास्तूत प्रथमच संपन्न झालेल्या या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भावेश लोखंडे यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत