दहा पारमिता भाग ४१
मागील भागात दहा पारमितांपैकी शील, दान व उपेक्षा या तीन गुणांची माहिती घेतली. आता त्यापुढील गुणांची माहिती घेऊया.
४) नैष्कर्म
नैष्कर्म म्हणजे ऎहिक सुखाचा त्याग करणे होय.
राजपूत्र गौतमाने राजगृह सोडले. सर्वच ऎहीक सुखाचा त्याग करुन मानवाच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटलेत.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वतेचा उपयोग केवळ स्वत:साठी न करता समाजाच्या व देशाच्या उत्थानासाठी केला. त्यांनी ऎहिक सुखाचा त्याग करुन आयुष्याच्या शेवटपर्यंत कष्टमय जीवन जगले. यालाच नैष्कर्म म्हणतात
नैष्कर्म पारमिताचा अर्थ जीवनातील भोग प्रवृत्तीचा त्याग करणे होय. शरीरातील सहा इंद्रियांना सुखद संवेदना देणाऱ्या सर्वच भौतिक वस्तूपासून अनासक्त राहणे म्हणजे नैष्कर्म होय. जीवनातून कामभोग प्रवृत्तीचे उच्चाटन करणे म्हणजे नैष्कर्म होय. शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूप्रति अनासक्त असणे, त्यागी असणे म्हणजे नैष्कर्म पारमिता होय. वस्तू मिळाली की खूप आनंदून न जाने, नाही मिळाल्या कि दुःखी न होने होणे म्हणजे नैष्कर्म पारमिता होय.
५) विर्य
विर्य याचा अर्थ प्रयत्न करणे होय. योौग्य प्रयत्न करणे होय,
विर्य म्हणजे योग्य (सम्यक) प्रयत्न. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे विर्यपारमिता होय. स्वत:च्या बौध्दिक, शारीरिक व मानसिक सामर्थ्यावर अतुट श्रध्दा असणे म्हणजे विर्य पारमिता होय.
स्वत:हाती घेतलेले कार्य सर्वस्व पणाला लावून करणे, विचलित न होणे, धैर्य खचू न देणे, पळपुटेपणा न करणे, सर्व शक्तीनिशी हाती घेतलेले उत्तम कर्म करत राहणे म्हणजे विर्यपारमीता होय. मानसिक व शारीरिक बळ असणे म्हणजे विर्य पारमिता होय. मन व शरीरसामर्थ एकवटून योग्य कृती करणे म्हणजे विर्यपारमिता होय. आपल्यामधील शक्तीला पूर्णपणे जागृत करणे, विरता, साहस व उत्साहपूर्वक कार्य करणे म्हणजे विर्यपारमिता होय.
भगवान बुध्दांनी आपल्या मनाला स्थिर ठेऊन उद्दीष्टाची पूर्तता केली. थोर व्यक्ती कितीही कष्ट पडलेत तरीही ध्येयपूर्तीसाठी पूर्ण शक्ती पणाला लावून यशाचे शिखर गाठतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गोलमेज परिषदेतील सहभाग, त्यातील विद्वतापूर्ण व तर्कशूध्द भाषणे व अस्पृष्यांसाठी मिळविलेले राजकीय हक्क हे ‘विर्य’ या पारमिताचे उदाहरण म्हणून देता येईल.
तसेच त्यांचेवर घटना समितीने सोपविलेले स्वतंत्र भारताचे संविधान लिहण्याचे महत्वाचे व अत्यंत जिकिरीचे काम प्रकृती चांगली नसताना सुध्दा २ वर्षे, ८ महिने व १३ दिवसात लिहून पूर्ण केले. हे त्यांचे अद्वितीय स्वरुपाचे काम दुसरे उदाहरण म्हणून देता येईल. तसे त्यांच्या जीवनात अशा प्रकारच्या कार्यकर्तृत्वाचे अनेक घटना होऊन गेल्या आहेत.
ते अठरा-अठरा तास अभ्यास करीत असत. बॅरिस्टरचा आठ वर्षाचा कोर्स त्यांनी दोन वर्षात पूर्ण केला. ते जगातील सहा विद्वानापैकी एक विद्वान म्हणून गणल्या जात होते. अमेरिकेने त्यांचा बुध्यांक काढला तेव्हा ६५ वर्षाच्या वयात ६५० वर्षाचे काम त्यांनी केल्याचे आढळले. ऎवढा दांडगा उत्साह त्यांच्यात होता.
६) शांती
शांती म्हणजे क्षमावान होणे, क्षमाशील होणे, शत्रूप्रतीही उदार होणे, क्रोध रहीत होणे, दयावान होणे. अहिंसेने हिंसेला जिंकणे म्हणजे शांती होय. मनात अंशाती, चंचलता, क्रोध, व्देष, गर्व नसणे, चिंता, ओढ नसणे म्हणजे शांती पारमिता होय. शांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेष वाढत असते. द्वेषाने द्वेष शमत नाही. तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो.
भगवान बुध्द म्हणतात-
नही वेरेन वेरानी सम्मन्तीध कुदाचनं।
अवेरेनच सम्मन्ति एस धम्मो सनन्ततो ॥ (धम्मपदातील पांचवी गाथा)
याचा अर्थ, वैराने वैर कधीच शमत नाही. ते अवैरानेच शमते, हाच जगाचा सनातन नियम आहे.
तसेच धम्मपदात तिसर्या गाथेत म्हटले आहे की-
अक्कोच्छि मं अबधि मं अजिनि मं अहासि मे।
ये च तं उपनय्हन्ति वेरं न सम्मति॥
याचा अर्थ, ‘मला शिवी दिली’ ‘मला मारले’ ‘मला हरविले’ ‘मला लुबाडले’ जो अशा गोष्टींचा विचार करीत असतो, त्याचे वैर कधीच शमन पावत नाही.
तसेच धम्मपदात चौथ्या गाथेत म्हटले आहे की-
अक्कोच्छि मं अबधि मं अजिनि मं अहासि मे।
ये तं न उपनय्हन्ति वेरं तेसूपसम्मति ॥
याचा अर्थ, ‘मला शिवी दिली’ ‘मला मारले’ ‘मला हरविले’ ‘मला लुबाडले’ जो अशा गोष्टींचा विचार करीत नाही, त्याचे वैर शमन पावते.
वैराने वैर आणखी वाढत जाते. म्हणून अशांती सोडून बंधुभाव जोडा असा आशय या गाथेचा आहे. वैरावर प्रेमानेच मात करता येते. म्हणून ‘शांती’ ही पारमिता अत्यंत महत्वाची आहे.
जगामध्ये जेव्हा युध्दसदृश्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा शांततेने वाटाघाटी करुन आपसातील भांडणे मिटवील्या जाऊ शकतात. युध्दामुळे होणारी जीवीतहानी, वित्तहानी रोखल्या जाऊ शकते.
भगवान बुध्दांनी गृहत्याग करण्यापूर्वी त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. सिध्दार्थ गौतम शाक्य संघाचे वयाच्या २० व्या वर्षी सभासद झाले होते. ते २८ वर्षे वयाचे झाले असताना त्यावर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या मध्ये वाहणार्या रोहिणी नदिच्या पाण्यावरुन मोठा संघर्ष निर्माण झाला होता. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युध्द पुकारण्याचा ठराव संघाच्या अधिवेशनात मांडला. सिध्दार्थ गौतमांनी या ठरावाला विरोध केला. त्यांनी सांगितले की, “युध्दाने कोणताही प्रश्न सूटत नाही. युध्द करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसर्या युध्दाची बीजे रोवली जातील. जो दुसर्याची हत्त्या करतो त्याला त्याची हत्त्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसर्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसर्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. म्हणून संघाने कोलियांच्या विरुध्द युध्दाची घोषणा करण्याची घाई करु नये, असे मला वाटते. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे.”
सिध्दार्थ गौतमांनी मांडलेली सुचना त्यावेळेस मान्य करण्यात आली नव्हती. परिणामत: सिध्दार्थाला परिव्रजा घेऊन देशत्याग करावा लागला होता. मात्र त्यानंतर सिध्दार्थांनीच मांडलेल्या सुचनेनुसार शाक्यवासीय लोकांच्या चळवळीचा दबाव येऊन हा प्रश्न सामोपचाराने व शांततेच्या मार्गानेच लवाद नेमून नेहमीकरीता सोडविल्या गेला होता.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२३.१.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत