आर्यअष्टांगिक मार्ग भाग २९

प्रज्ञा
प्रज्ञा म्हणजे कुशल विचारांसहित आलेले पूर्ण ज्ञान की ज्यायोगे दु:ख आर्यसत्य, प्रतीत्यसमुत्पाद, आर्य अष्टांगिक मार्ग याचे यथार्थ ज्ञान होते. म्हणून सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प यांचा समावेश प्रज्ञेत केला जातो. वस्तुमात्र जसे आहेत तसे पाहणे, वस्तुमात्रांच्या वस्तुस्थिती संबंधीचा गोंधळ नष्ट करणे म्हणजेच प्रज्ञा. दु:ख नष्ट करण्यासाठी, निर्वाण प्राप्त करण्यासाठी किंवा अर्हतपद मिळविण्यासाठी प्रज्ञा, शील व समाधी यातील सर्वात महत्वाची पायरी म्हणजे प्रज्ञा आहे. सत्य व आर्यसत्य जाणणे, शोध घेणे, भ्रांतचित्त्त न होणे हे प्रज्ञेचे कार्य आहे. प्रज्ञेमुळे पुढील फायदे होतात. १) शीलाचे महत्व कळते, २) समाधीची अत्युच्च पायरी गाठता येते, ३) आर्य अष्टांगिक मार्गावर प्रगती करता येते, ४) विशुध्द जीवनाची फळे दिसू शकतात, ५) सर्व वस्तुमात्रांचे यथार्थ दर्शन होते, ६) पाखंडी मताचे यथार्थ ज्ञान होते व ७) लोभ, द्वेष व मोह याच्यापासून दूर राहता येतात.
प्रज्ञेचे चिंतनमय, श्रुतमय व भावनामय असे तीन प्रकार आहेत. चिंतनावर आधारलेल्या प्रज्ञेला चिंतनमय प्रज्ञा म्हणतात. जी दुसर्यांकडून शिकली जाते आणि जी पुस्तकी ज्ञानावर आधारलेली आहे तिला श्रुतमय प्रज्ञा म्हणतात. सततच्या अभ्यासाने बौध्दिक विकासातून जी स्वयंस्फुर्त येते ती भावनामय प्रज्ञा.
अष्टांगिक मार्गातील सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे मार्ग प्रज्ञामध्ये य़ॆतात.
१) सम्यक दृष्टी
अष्टांगिक मार्गातील पहिला मार्ग सम्यक दृष्टी हा आहे. सम्यक दृष्टीचा उद्देश अविद्येचा विनाश करणे हा आहे. मनुष्याला दु:खाचे अस्तित्व आणि दु:खनिरोधाचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच अविद्या होय. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चार आर्यसत्य समजणे म्हणजेच सम्यक दृष्टी होय. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. कर्मकांडावर विश्वास न ठेवणे, निसर्ग नियमाविरुध्द कोणतीही गोष्ट न करणे, काल्पनिक अनुमानावर विश्वास न ठेवता वास्तवतेच्या व अनुभवाच्या सिध्दांतावर विश्वास ठेवणे इत्यादी गोष्ठी सम्यक दृष्टीमध्ये येतात. सम्यक दृष्टी आपल्या मनाला योग्य त्या दिशेने घेऊन जाते आणि आपल्या मनाला योग्य वळण लावते.
भगवान बुध्दांच्या काळात ब्राम्हण तत्त्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानाचे निरनिराळे बासष्ट पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राम्हण तत्त्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान सहा पंथ तरी प्रमूख होते. परंतू ह्या पंथाची विचारसरणी मिथ्या दृष्टीवर आधारित होती. भगवान बुध्दाला या तत्त्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवनमार्ग पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्यांना वाटले होते. म्हणून त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त करुन आर्य अष्टांगिक मार्ग सर्वप्रथम पंचवर्गिय भिक्षूंना सांगितला. दु:ख, अनित्य, अनात्म व निर्वाण या मूलभूत सिध्दांतावर त्यांची विचारसरणी आधारलेली आहे. तीच सम्यक दृष्टी आहे. सम्यक दृष्टी हा प्रज्ञेचा मार्ग आहे. भगवान बुध्दाचा धम्म विज्ञानावर आधारित आहे. वास्तव आणि सत्यावर आधारित आहे. यालाच सम्यक दृष्टी म्हणता येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय राज्य घटनेत नागरिकांची काही कर्तव्य कलम ५१ (अ) मध्ये विशद केलेली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन व चिकित्साप्रवृती याची वाढ व जोपासना करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, अशी स्पष्ट तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच बौध्दिक विचार (Rational thinking) हे होय. ‘चिकित्सक बुध्दी वाढीस लावणे’ हा विज्ञानाचा पाया आहे. सत्यशोधन हा विज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. भगवान बुध्दांनी धम्माला पूर्णपणे विज्ञाननिष्ट बनविण्यावर भर दिला. त्यालाच त्यांनी ‘प्रज्ञा’ म्हटले आहे. प्रज्ञा हेच सम्यक दृष्टीचे तत्त्व असून भगवान बुध्दांच्या धम्माचे अधिष्ठान आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.११.१.२०२४
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत