बाबासाहेबांना वकिलीची पहिली केस मिळाली ती नाशिकच्या आडगावमधून!

बाबासाहेबांना वकिलीची नाशिकने दिली संधी!
नाशिक : श्री काळाराम मंदिराचा सत्याग्रह आणि येवल्यातील धर्मांतराची घोषणा यासह वेगवेगळ्या चळवळींमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाशिकशी ऋणानुबंध जुळत गेले. मात्र, बाबासाहेबांच्या जडणघडणीत नाशिकचाही वाटा मोठा राहिला, असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको. बॅरिस्टर होऊन लंडनहून परतलेल्या बाबासाहेबांनी १९२३ मध्ये वकिलीस सुरुवात केली. मात्र, त्यांना कोणी केसच देईना. अशावेळी बाबासाहेबांना पहिली केस मिळाली ती नाशिकच्या आडगावमधून!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२२ मध्ये लंडनच्या ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेऊन दि. ३ एप्रिल १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्यासह वकिली करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्च न्यायालयात ५ जुलै १९२३ रोजी त्यांना सनद मिळाली. मात्र, वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या अनेक वकिलांनी त्यांना सहकार्य करणे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकिलाने आंबेडकरांना वकिलीसाठी सहकार्य केले. वकील होणे एकवेळी सोपे, पण केस मिळविणे अवघड, याचा अनुभव डॉ. आंबेडकरांनी घेतला. त्यावेळी त्यांना नाशिकने साथ दिली.
नाशिकच्या आडगावमधील पुंजाजी नवासाजी जाधव यांनी आपल्या जमिनीसंदर्भातील केस बाबासाहेबांकडे सोपवली. या केससंदर्भात बाबासाहेब अनेकदा आडगावला गेले. ही बाबासाहेबांच्या आयुष्यातील पहिली केस ठरली. ही केस वर्षभर चालली आणि बाबासाहेबांनी ती जिंकलीही. केसची फी म्हणून बाबासाहेबांना सहाशे रुपये मिळाले. वकिलीतून घरखर्च भागत नसल्याने त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले. मात्र, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही, अनेक महत्त्वपूर्ण खटले त्यांनी लढले. बाबासाहेबांनी जे खटले लढले ते गोरगरिबांसाठी व समाजातील वंचितवर्गासाठी सामाजिक भावनेने लढले.
आडगावमध्ये स्तुपाची उभारणी
पुंजाजी नवासाजी जाधव यांच्या जमिनीच्या केसनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आडगावशी ऋणानुबंध जोडले गेले. या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे बाबासाहेब जेव्हा जेव्हा नाशिकमध्ये येत तेव्हा ते आडगावात जाधव यांच्या घरी जात असत. काळाराम मंदिर सत्याग्रहादरम्यानही बाबासाहेब या जीवलग मित्राकडे राहायला होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जाधव यांनी त्यांच्या अस्थी आडगावला आणून साडेनऊ वर्षे जतन केल्या. ७ एप्रिल १९६६ रोजी ब्रह्मदेशातून आलेले भदंत वज्रबोधी यांच्या हस्ते स्तूपरुपी स्मारक उभारले. यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवडदेखील उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत