पुन्हा भीमा कोरेगावची लढाई – शांताराम ओंकार निकम

शांताराम ओंकार निकम
३१ डिसेंबर २०२३
भीमा कोरेगाव या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९२७ रोजी भेट दिली होती,त्यादिवसापासून आंबेडकरी अनुयायी दरवर्षी १ जानेवारी यादिवशी भीमा कोरेगाव येथे मोठया संख्येने भेट देत असतात.
१ जानेवारी १८१८ या दिवशी बॉम्बे नेटिव्ह आर्मी तुकडीच्या ५०० महार व इतर ३०० घोडदळ, व २४ तोफखाना प्रमुख सैनिकांनी दुसऱ्या बाजीरावाच्या २८ हजार सैनिकांचा पराभव केला होता.(२० हजार घोडदळ,८ हजार पायदळ,२ तोफखाना प्रमुख) त्यावेळी इंग्रजांकडून २७५ ठार जखमी किंवा बेपत्ता झाले होते तर पेशव्याचे ५०० ते ६०० लोक कामी आले होते, जखमी किंवा फरार झाले होते.
त्यात २० महार सैनिक शहीद झाले तर ५ जखमी झाले होते.त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी भीमा कोरेगाव येथे शूरवीर सैनिकांच्या बाबतीत आदर म्हणून जय स्तंभ उभारण्यात आला आहे.जय स्तंभाचे भूमिपूजन २६ मार्च १८२१ रोजी करून १३ डिसेंबर १८२४ त्याचे लोकार्पण करण्यात आले.त्या स्तंभावर लढाईत कामी आलेल्या ४९ शूरवीर सैनिकांची नावे कोरली आहेत त्यात २० शहीद महार व ५ जखमी महारांची नावे तसेच इतर जातीच्या सैनिकांची नावे कोरली गेली आहेत.
या स्तंभाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९२७ रोजी दिलेल्या भेटीमुळे आंबेडकरीअनुयायांमध्ये वेगळे महत्व निर्माण झाले.तेंव्हापासून न चुकता मोठया संख्येने आंबेडकरी अनुयायी १ जानेवारी रोजी या स्तंभाला भेट देतात,आंबेडकरी विचारांच्या विविध पक्षांच्या येथे सभा होतात. पहाटे या जय स्तंभाला समता सैनिक दलाच्या वतीने सलामी दिली जाते.
सलामी होते,भाषणे होतात,अनुयायी जत्रेचे स्वरूप अनुभवतात.काही लोकंसाठी हा इव्हेंट असतो ,काहींसाठी ही पिकनिक असते.काही श्रद्धेने येतात तर काही इव्हेंट म्हणून येत असतात.
कार्यक्रम झाल्यानंतर भीम अनुयायी सुखरूप घरी येतात.दूरचा प्रवास करून थकले असल्यामुळे लगेच झोप लागते.२ तारखेला उठतात.आणि आपापल्या कामाला लागतात.ज्यांनी इव्हेंट केलेला असतो,पिकनिक केलेली असते त्यांच्या दोन चार दिवस चर्चा चालतात ,आणि आपापल्या कामाला लागतात.त्यानंतर आठवण येते ती पुढच्या १ जानेवारीला.
पण अनेक भीम अनुयायांना माहीत नाही की,आपण ज्या भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला भेट द्यायला लाखोंच्या संख्येने जातो.ती जागा तेथील रखवालदार माळवदकर कुटुंबाने बळकावली आहे. जय स्तंभ सुद्धा पडण्याच्या तयारीत ते होते.भीम अनुयायांना तेथे येण्यास मज्जाव करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.न्यायालयात खटला सुरू आहे.गेल्या सहा वर्षांपासून दर १ जानेवारी रोजी भीम अनुयायांना अभिवादन करण्यास परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचना केली जाते.न्यायालय परवानगी देते आणि त्यानंतर सर्व सोपस्कार होतात.
अनेकांना माहीत नाही की,भीमा कोरेगाव या ठिकाणच्या विजय स्तंभ व त्याच्या आजूबाजूच्या जागेसाठी दादाभाऊ अभंग हे न्यायालयीन लढाई स्वखर्चाने लढत आहेत.त्यांनी मागे अपील केले होते,की न्यायालयीन लढाई लढण्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या कमी पडतात, त्यांना समाजाने आर्थिक मदत करावी ,पण बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांनी मदत केली,बाकीच्यांनी ‘असे कसे होईल?’कोण कसे अतिक्रमण करू शकेल? पैसे उकळण्याचे धंदे आहेत.’अशाप्रकारे टिपण्या केल्या. काही नेत्यांनी स्वतः तर काही केले नाही, पण हे क्रेडिट दादाभाऊंना मिळू नये म्हणून त्यांना आर्थिक मदत न करण्याचे आवाहन समाजाला केले.
पण काही लोक तनाची आणि धनाची पर्वा न करता आपले ध्येय साधण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. प्रसंगी आपल्या जवळील चीजवस्तू विकून आंदोलन पूर्ण करतात. आणि आपले ध्येय साध्य करतात.त्यातीलच दादाभाऊ अभंग आहेत.
कुटुंबाची पर्वा न करता ते सतत हे प्रकरण तडीस नेण्यासाठी २००९ पासून प्रयत्न करत आहेत.त्यांना आंबेडकरी जनतेने साथ देणे गरजेचे आहे.लढण्याची ताकद आणि उर्मी त्यांच्यात आहे.पण आर्थिक बाबतीत ते जर कमी पडत असतील तर समाजघटकांनी त्यांना त्यांनी स्थापन केलेल्या’भीमा कोरेगाव विजय स्तंभ संरक्षण व संवर्धन समितीला’ आर्थिक मदत केलीच पाहिजे .
पुणे दिवाणी न्यायालयात व मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरू आहे.चार ठिकाणी माळवदकर कुटुंबाची हार झाली आहे पण ते आणखी वरच्या न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडून भीमा कोरेगावच्या जय स्तंभाची ३ हेक्टर ८६ आर जागा आपल्या नावे व्हावी यासाठी लढत आहेत,त्या जागेच्या सात बारावर त्यांचे नाव आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरातील एक व्यक्ती (खंडोजी गणोजी माळवदकर) या लढाईत जखमी झाली होती.म्हणून जय स्तंभ बनवल्यानंतर त्याच्या देखभालीचे काम माळवदकर कुटुंबाकडे इंग्रजांनी सोपवले व त्यांचा उदरनिर्वाह चालावा म्हणून त्यांना मौजे पिंपरी,सांडस, वाडे, बोलाई, केसनंद व बाकोरी या गावांतील २६० एकर जमीन दिली.तरीही भीमा कोरेगावच्या जय स्तंभाजवळील जागेच्या सात बारावर आपले नाव नोंदवून तीही जागा मागत आहेत.
१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावच्या लढाईच्या २०० व्या स्मृतिदिनी काही जातीयवाद्यांनी आंबेडकरी अनुयायांवर हल्ला केला,अनेक गाड्या जाळल्या गेल्या,गावबंदी करण्यात आली.दुकाने बंद करण्यात येऊन आबेडकरी अनुयायांची कोंडी करण्यात आली.
करणी सेनेचा अध्यक्ष अजय सिंगर याने राज्य सरकारकडे अर्ज देऊन हा जयस्तंभ पाडण्याची विनंती केली आहे याच अजय सिंगरने ‘संविधान हे हिंदू विरोधी असल्यामुळे ते बदलावे.’अशीही मागणी केली आहे.
पत्रकार रामदास लोखंडे यांनी दैनिक सम्राट मधून या विषयाला वाचा फोडली तेंव्हा पासून आंदोलनाला सुरुवात झाली. त्याचे नेतृत्व दादाभाऊ अभंग करत आहेत.
तत्कालीन महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना १६ .९.२०१५ रोजी समितीने पत्र लिहून माळवदकर यांचे नाव जय स्तंभाच्या सातबारा वरून हटवण्याची विनंती केली.५.६.२०१७ रोजी हवेलीच्या उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी माळवदकर यांचे नाव सातबारा वरून काढले.पण त्याला त्यांनी वरील न्यायालयात आव्हान दिले,असे करत आता हा खटला उच्च न्यायालयात सुरू आहे.आणि दादाभाऊ अभंग व त्यांची समिती हा लढा लढत आहेत.
याच समितीच्या वतीने अंबरनाथ विधानसभेचे आमदार यांना माहिती दिल्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी तत्कालीन मंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहिले त्यांनी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांना पत्र लिहिले,धनंजय मुंढे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून या जागेचा सोक्षमोक्ष लावण्यास सांगितले,पण जिल्हाधिकारी न्यायालयात येत नाहीत. त्यामुळे सहा वर्षांपासून या जागेवर स्टेट्सको आहे.
२०१६ पासून प्रत्येक १ जानेवारी रोजी आंबेडकरी अनुयायांना जय स्तंभाला भेट देण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली जाते.न्यायालय ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पासून ते १ जानेवारी पर्यंत परवानगी देते.
या जागेवर नंतर माळवदकर कुटुंब कब्जा करते.
याच जागेवर माळवदकर कुटुंबाने चाळ बांधली होती,ती दादाभाऊ अभंग आणि समितीने सरकारला पाडण्यास भाग पाडले.
या भागाचे पालकमंत्री अजित पवार आहेत.ते दरवर्षी भीमा कोरेगाव येथे भेट देतात मोठमोठ्या घोषणा करतात आणि १ तारखेनंतर सगळे विसरून जातात.
शेजारी असलेल्या वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे २०० कोटींचे स्मारक बनत आहे.
भीमा कोरेगावसाठी धनंजय मुंढे यांनी १०० कोटी मंजूर केले होते पण ते अजूनही कागदावरच आहेत.
२०१६ पासून न्यायालय काही अटींवर विजयस्तंभाला भेट देण्यास परवानगी देत आहे,पण पुढे परवानगी मिळाली नाही तर काय करणार?
म्हणून सर्व भीम अनुयायांनी दादाभाऊ अभंग यांचे मनोबल वाढवले पाहिजे, तसेच न्यायालयाची लढाई लढण्यासाठी आर्थिक मदत त्यांच्या समितीला केली पाहिजे.
जर ही लढाई हरली तर त्यापुढे भीमा कोरेगाव येथील जयस्तंभ माळवदकर कुटुंब काढून टाकू शकतील,तेथे कुंपण मारून भीम अनुयायांना येणासाठी अटकाव आणू शकतील. अजूनही वेळ गेलेली नाही,भीम अनुयायांनी दादाभाऊ अभंग यांच्या सोबत राहू या.आणि दुसऱ्यांदा जय मिळवू या.
संदर्भ: दादाभाऊ अभंग यांची मॅक्स महाराष्ट्रवर पत्रकार किरण सोनवने यांनी घेतलेली मुलाखत,
गुगल
व दैनिक सार्वभौम राष्ट्र
अधिक माहितीसाठी दादाभाऊ अभंग यांच्याशी संपर्क साधा ,त्यांचे मोबाईल नंबर 97028 45000,
97028 46000
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत