रस्त्यांचे काँक्रीटीकरण पुन्हा एकदा सुरू

मुंबईतील शहर भागातील रस्त्यांची नवीन कामे वादात सापडल्यामुळे रखडलेली असली तरी एका बाजूला २०२१-२२ या आर्थिक वर्षात दिलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे शहर भागात सुरू झाली आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शिवसेनेची सत्ता महापालिकेत असताना दिलेल्या २२०० कोटींच्या कामांपैकी शहर भागातील ही कामे सुरू झाली आहेत. सहा हजार कोटींच्या नव्या निविदेतील कामेही पश्चिम आणि पूर्व उपनगरात काही ठिकाणी सुरू झाली आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडत असल्यामुळे महापालिकेने रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतला होता. त्या अंतर्गत दरवर्षी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात होते. मुंबई एकूण सुमारे २००० किमीचे रस्ते असून त्यापैकी पन्नास टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात पालिकेने २३६ किमीची २२०० कोटींची कामे हाती घेतली होती.
पालिकेची मुदत संपण्याआधी या कामांना मंजुरी देण्यात आली होती. दोन वर्षांची ही कामे ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाली होती. मात्र, मे २०२३ मध्ये पावसाळ्यात ही कामे थांबवण्यात आली होती. त्यातच राज्यात गेल्या वर्षी सत्तापालट झाल्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा एकदा ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या कामांसाठी ६,०७८ कोटींच्या म्हणजेच प्रथमच मोठ्या प्रमाणावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र हे वर्ष संपत आले तरी ही कामे सुरूच न झाल्यामुळे मोठा वाद झाला होता. शहर भागात तर एकाही रस्त्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे शहर भागातील कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली. तसेच त्याचे कंत्राटही रद्द करण्यात आले. त्यामुळे नव्या निविदेतील शहर भागातील रस्त्यांची कामे ठप्प आहेत. आता एका बाजूला आधीच्या निविदेतील कामे आता सुरू झाली आहेत. रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे.
शिवडीतील टी. जे. रोड येथील रस्त्याचे काम नवीन कंत्राटात समाविष्ट होते. त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. परंतु, त्याच्या आजूबाजूची आधीच्या कंत्राटातील कामे आता सुरू झाली आहेत, अशी माहिती शिवडीतील माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत