महाराष्ट्रमुख्यपान

भारतीय संविधानावर ;पाश्चिमात्यतेचा आरोप होतो ! – प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार माननीय रनजितजी मेश्राम.

भारतीय संविधानावर पाश्चिमात्यतेचा प्रभाव आहे असा मोठाखोटा आरोप सतत होत असतो. खुद्द बाबासाहेब आंबेडकर हे पाश्चात्य संस्कृतीने प्रभावित होते असेही आडूनपुढून आरोपित केले जाते.
खरेच हे खरंय ? भ बुध्दाच्या प्रभावाबद्दल बाबासाहेब अनेकदा बोललेत ! याशिवाय या आरोपात दम नसण्याचे पुरावे आहेत.
बाबासाहेबांइतका भारताचा अभ्यास दुसऱ्या कोणत्या नेत्याने केला हे तरी सांगावे !
त्यांनी जग नक्कीच समजून घेतले. पण अभ्यासविषय मात्र भारत राहीला !

ते क्रमशः सांगता येईल.

पदवीप्राप्तीनंतर ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात एम ए साठी दाखल झाले. १९१५ ला. तिथे त्यांच्या शोधनिबंधाचा अभ्यासविषय होता Administration and finance of the East India Company : ईस्ट इंडिया कंपनीची शासनयंत्रणा आणि वित्तव्यवस्था.
या शोधप्रबंधात १७९२ ते १८५८ या कालखंडात भारतातील उपरोक्त विषयाचा अभ्यास आहे. १८५८ साली ईस्ट इंडिया कंपनी ला ब्रिटिश साम्राज्याने बरखास्त केले होते.

१९१६ ला बाबासाहेबांनी त्याच विद्यापीठात आयोजित मानववंशशास्त्र परिषदेत Caste in India, their mechanism, genesis and development भारतातील जाती, त्यांची कार्यपद्धती, उदगम आणि विकास हा संशोधनात्मक निबंध वाचला. तेव्हा ते २६ वर्षाचे होते.

  १९१७ ला पीएच डी साठी प्रबंध लिहिला. विषय होता The Evolution of provincial finance in British India ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्तव्यवस्थेचा विकास

भारतातील ब्रिटिश सरकार व तत्कालीन संस्थाने शिवाय घटक राज्ये यांच्यातील आर्थिक संबंधांचा अभ्यास या प्रबंधात आहे.

         १९१८ ला बाबासाहेबांनी Journal of Indian Economics Society च्या विशेषांकात Small holdings in India and their remidies हा महत्त्वाचा लेख लिहिला.

भारतातील लहान तुकडे असलेल्या शेतजमिनी व त्यातून उदभवलेल्या समस्या यावर या लेखात मुलभूत स्वरुपाचे भाष्य आहे.

         यानंतरचे शिक्षण बाबासाहेबांचे लंडन ला झाले. तिथे १९२३ ला त्यांनी डी एससी साठी प्रबंध लिहिला. विषय होता The problem of ruppe : it’s origin and solution : रुपयाचा प्रश्न, उदगम आणि उपाय.

या प्रबंधात भारतीय चलन आणि बॅंकिंग चा अभ्यास उदघृत आहे.

         पूढे बाबासाहेबांनी १९३६ ला बहुचर्चित असे Annihilation of caste : जातीचे निर्मुलन हे पुस्तक लिहिले.

भारतातील जातीव्यवस्था व चातुर्वर्ण्य याचा चिकित्सक अभ्यास या पुस्तकात आहे.

         याच काळात बाबासाहेबांनी आत्मचरित्राच्या स्वरुपाचे Waiting for VISA : व्हिसा च्या प्रतिक्षेत हे अप्रकाशित पुस्तक लिहिले.

यात कठोर बालपण व जातीय वेदना नमूद आहे

१९३९ ला बाबासाहेबांचे Federation versus Freedom : संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य हे पुस्तक आले. हेही बाबासाहेबांनी दिलेले व्याख्यान आहे.

संघराज्य शासन प्रणालीच्या संदर्भात भारताचा संदर्भ देऊन या पुस्तकात मांडणी आहे.

         १९४० ला Thoughts on Pakistan : पाकिस्तान वर विचार हे पुस्तक लिहिले.

स्वातंत्र्याआधी फाळणीच्या गंभीर समस्येचा सर्वस्पर्शी आढावा या पुस्तकात आहे. तेव्हाच्या सर्व अग्रणी नेत्यांना हे पुस्तक दिशादर्शक ठरले.

         १९४३ ला Ranade, Gandhi and Jinnah : रानडे, गांधी आणि जीना हे पुस्तक आले.

हे बाबासाहेबांचे गाजलेले भाषण आहे. भाषणाची नंतर पुस्तिका निघाली. तिन्ही प्रमुखांची मनोवेधक तुलना यात केलेली आहे.

         १९४५ ला बाबासाहेबांनी What Congress and Gandhi have done to the Untouchables : कांग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले ? हा ग्रंथ लिहिला.

जे वास्तव आहे तेच अत्यंत परखडपणे मी पुस्तकात मांडले असे प्रस्तावनेत सांगून विषयाची मांडणी या पुस्तकात केलेली आहे.

         १९४६ ला Who were the Shudras ? How they came to be the Fourth Varna in Indo Aryan Society : शूद्र पूर्वी कोण होते ? हा चर्चित ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला.

संविधान निर्मितीच्या आधीचा हा ग्रंथ आहे. शुद्र वर्णावर झालेल्या अन्यायाचा सांगोपांग अभ्यास या ग्रंथात आहे.

         १९४७ ला बाबासाहेबांनी The Untouchables : Who were they and why they become Untouchables ? :  अस्पृश्य : ते पूर्वी कोण होते आणि का अस्पृश्य झाले ? हे पुस्तक लिहिले.

हिंदूतील अस्पृश्यतेचा अत्यंत चिकित्सक व सुक्ष्म अभ्यास यात आहे.

         १९४७ लाच States and Minorities : संस्थाने आणि अल्पसंख्याक हे पुस्तक आले.

राज्यकारभार कोणत्या दिशेने व्हावा याचे दिशानिर्देश यात आहेत. याशिवाय राज्य समाजवादाची स्पष्टता आहे.

         १९५० ला बाबासाहेबांनी The rise and fall of Hindu Woman : हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हा लघुशोधनिबंध लिहिला.

‘इव्ह्ज वीकली’ या इंग्रजी साप्ताहिकात तो छापून आला.

याशिवाय भारतीय संसदेत त्यांनी सादर केलेले ‘हिंदू कोड बिल’ हेही अत्यंत अभ्यासपूर्ण होते.

         १९५४ ला बाबासाहेबांनी The Riddles in Hinduism :  हिंदुत्वातील कूटप्रश्न हा ग्रंथ लिहिला.

या ग्रंथावर खूप प्रतिक्रिया उमटल्या.

         याच काळात बाबासाहेबांनी Revolution and counter revolution in Ancient India : प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ लिहिला.

पुष्यमित्र शृंग याचे नेतृत्वात झालेली प्रतिक्रांती व तिचे परिणाम याशिवाय आधीचे बौध्द साम्राज्य याचे विवेचन यात आहे. हा एक नैतिक संघर्ष कसा याचा उलगडा यातून होतो.

         १९५६ ला बाबासाहेबांचा Buddha or Karl Marx : बुद्ध की कार्ल मार्क्स हा ग्रंथ येतो.

यात स्वीकारासाठी विचारसरणीसह तुलना, विरोधाभास व निवड याची सुंदर मांडणी आहे.

         शेवटी बाबासाहेबांनी १९५६ ला The Buddha and his Dhamma : बुद्ध आणि त्यांचा धम्म हा मौलिक ग्रंथ लिहिला.

हा ग्रंथ बौद्ध धर्मियांचा धम्मग्रंथ ही स्वीकारार्हता या ग्रंथाची मौलिकता दर्शविते.

         अर्थात हे केवळ लिहिणे होते का ? खचितच नाही. भवतालाचा कस आहे. पुढच्या पिढ्यांचा मुक्तीश्वास आहे.

ती केवळ पुस्तके कशी ? जीवन आलेखासह प्रशस्ततेची वाट आहे. अभ्यासाच्या अंगअंगासह कानकोपरा आहे. एकही तंतू सुटत नाही. ती वाट निदानद्वार खुले करुनच पूढे सरकते.

तरीही म्हणावे या माणसावर भारतीय प्रभाव नव्हता. तो पाश्चात्याने प्रभावित होता. खरेतर हा माणूस भारताला जेव्हढे समजून होता तेव्हढे दूसरा कोणीच नव्हता. हे खरे आहे. हे भक्तीवाक्य नाही. हे वास्तव आहे.

हाच होता म्हणून संविधानाला तसे पाहण्याचे डोळे मिळाले हेही सत्य आहे !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!