
रणजित मेश्राम लेखक ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत
भाजप जगातील सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून मिरवितो. संघाने सुध्दा श्रीमंतीला सोबत घेतले. नुकतेच संघाने श्रीमंतीचे दर्शन दिले. पण सोबत सरकारला घ्यायचे टाळले.
संघाने दिल्ली येथे १२ माळे असलेले अत्याधुनिक ‘केशव कुंज संघ कार्यालय’ उभारले आहे. दिनांक १९ फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवत यांचे हस्ते या भव्य भवनाचे उदघाटन झाले. संघाचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांचे नावावरुन केशव कुंज हे नाव ठेवले आहे. याप्रसंगी श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज व दिल्ली येथील उदासीन आश्रमचे प्रमुख संत राघवानंद महाराज हे हजर होते.
याप्रसंगी बोलतांना सरसंघचालक म्हणाले, संघाचे भव्य कार्यालय तयार झाल्यावर स्वयंसेवकांचे काम संपत नाही. ते अधिक वाढते. विरोध आणि उपेक्षा आपल्याला नेहमीच सतर्क करीत असतात.मात्र अनुकूलतेचे वातावरण असल्यामुळे आम्हा सर्वांना जास्त सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. हीच वेळ पुरुषार्थ दाखविण्याची आहे असेही ते म्हणाले.
सदर कार्यालय राजधानी दिल्ली येथील झेंडेवाला भागात आहे. हे नवीन पुनर्निर्माण आहे. ३.५ एकर क्षेत्रावर ही निर्मिती आहे. कार्यालयाच्या नमनाला हेडगेवारांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
या कार्यालयाच्या नवनिर्मितीला १५० कोटी रुपये खर्च आला. ही कोटींची सर्व रक्कम देशभरातील संघ स्वयंसेवकांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून गोळा झाल्याचे सांगण्यात आले. या कुंजमध्ये लहान मोठे ३०० कक्ष व कार्यालये आहेत. ५ खाटांचे रुग्णालय आहे.
अधिक आसनांचे सभागृह आहेत. ८५०० पुस्तकांचे वाचनालय आहे. शिवाय ५०० कारसाठी पार्किंगची सोय केली आहे. याशिवाय नियमित शाखेसाठी मोकळे मैदान सोडलेले आहे.
ज्या ज्या शहरात संघ सुस्थितीत आहे तिथे असे भव्य कार्यालय होणे ही शक्यता बळावली आहे. संघाच्या शंभरीवर हे श्रीमंती दर्शन झाले. काहीतरी ठरवून असेल. संघ कात टाकतोय हे ध्वनित होते. आज देश संघाच्या प्रभुतेत आहे. नागपुरात जन्मलेल्या संघटनेने चमत्कार केला. सदर वास्तुप्रवेशात सरकारातील कुणीही नव्हते. हेही विशेष. हा संघप्रतिमेचा (image) मुद्दा असावा. आंतरिक संबंधाला (mutual understanding) प्रसिध्दीची गरज नसावी. असणे व दिसणे यात फरक ठेवले.
दस्तुरखुद्द प्रधानमंत्री हे संघाचे प्रचारक राहीलेले आहेत. संघात सारेच स्वयंसेवक असतात. पण सारे प्रचारक नसतात. प्रचारक ही फार वरची जबाबदारी आहे. ते पद नसते. ते व्रत आहे.स्थिती असते. जबाबदारीशी तादात्म्यता म्हणजे प्रचारक. ते पूर्णकालीन असते. तिथे निवृत्ती नाही. ऐन तारुण्यात प्रचारकाचा प्रारंभ होतो. कोणत्या प्रचारकाला कोणती जबाबदारी द्यायची हे संघ निर्णित करतो. आजही प्रधानमंत्री मनातून प्रचारक असावेत.
ऐन तारुण्यात प्रधानमंत्री प्रचारक झाले. त्यांना संघाने राजकारणाला दिले. ते संघातून भाजपात आले. ते यशस्वी होत गेले. मुख्यमंत्री .. प्रधानमंत्री झाले. पण आधी ते स्वयंसेवक-प्रचारक होते. बरीच वर्षे होते. दिल्लीच्या झेंडेवाला संघ कार्यालयाशी त्यांच्या अनेक आठवणी जुळल्या असतील. ते कार्यालय बरेच जुने आहे. प्रधानमंत्री संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गासाठी नागपूर संघ मुख्यालयात सलग एक महिना राहीलेले आहेत. गडकरी वा फडणवीस हे संघ विचारातून भाजपात आले आहेत. संघातून व संघविचारातून भाजपात येणे गुणात्मक फरक आहे.
संघ आणि सरकार यांचे बिनसले असे खूपदा येत असते. वास्तवात ते खरे असावे काय ? संघप्रचारक देशाचे प्रधानमंत्री आहेत याचा संघाला अभिमानच असेल.
सध्याच्या प्रधानमंत्र्यांना अंगावर घ्यायची भारी हौस आहे. मजा करायचीही तेव्हढीच हौस आहे. संघानेही ठरविले असेल .. अजेंडा राबवा ! चहुबाजूचा रोखही झेला. संघासाठी हे घडणे तोट्याचे नाही. सर्व रोखातून संघाला शिताफीने सुटता येते. तरीही आंतरिक मतभेद नसतीलच असे नाही. पण आतच ठेवावे ही संघशैली आहे. त्यांचे ठायी डावपेचाला जास्त महत्त्व आहे. माणसं येतील जातील. संघाला वयाची मर्यादा नाही. मधल्या काळात एक आवई उठली होती. प्रधानमंत्री नागपुरात येतात पण संघ मुख्यालयात जात नाहीत. बरेच कयास बांधले गेले. पण दम दिसला नाही. मार्गनिश्चिती असल्याने मोदी-भागवत व्यक्तिगतता उरत नाही. त्यांचे अजिबात संवाद संबंध नाहीत असेही नसावे.
घटना अशा वेगाने घडताहेत. संघ आता श्रीमंतीकडे चाललेय हे स्पष्ट झाले. संघाच्या संघपूरक विविध संस्था कार्यरत आहेत. त्यांच्या नवनवीन इमारती आता लवकरच दिसतील. विस्तिर्ण जागेवर निर्माण झालेल्या त्या दिसतील. दिल्लीचे झेंडेवाला संघ कार्यालय हा प्रारंभ आहे.
एक आठवते, प्रधानमंत्री हे मुख्यमंत्री असतांना त्यांनी संघावर व स्वघडण्यावर पुस्तक लिहिले आहे. ज्योतिपुंज. पुस्तकाला सरसंघचालकांची प्रस्तावना आहे. पुस्तकातून त्यांचे संघसमर्पण लक्षात येते. या पुस्तकात सरसंघचालक यांचे वडील मधुकरराव भागवत यांचेवर लेख आहे. वडील हे संघप्रचारक होते. तिथे लेखक (नरेंद्र मोदी) लिहितात, वीस वर्षाचा असतांना त्यांचेशी ओळख झाली. तेव्हा गुजरातमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम नसल्यासारखेच होते. अशा स्थितीत त्यांनी (मधुकरराव भागवत) आपल्या तारुण्यात आपले घरदार, गाव सोडून वैचारिकदृष्ट्या ओसाड अशा गुजरातच्या जमिनीवर पाऊल ठेवत संघविचाराचे बीज रोवले. आपल्या अदभूत संघटनकौशल्याने गुजरातच्या ११५ गावांमध्ये संघकार्याचा मजबूत पाया घातला. ते संघटनशास्त्राचे जिवंत विद्यापीठ होते.
यावरून संघ आणि सरकार हे ठरवून एक आहेत यात शंका नको असे वाटते. संघ आणि सरकार हे द्वंद्व नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत.
खरेतर हे संघसरकार आहे !
परंतु आपला सारा रोख सरकारवर असतो. तो असावाही. पण संघ सुटू नये. सुटू देऊ नये. नजरेत असावा. संघ काय करतो हे अग्रस्थानी घ्यावे.
हिंदूंना संघटित करायचे, एकत्रित करायचे म्हणजे काय हे विचारले जावे. कशासाठी एकत्रीकरण हा प्रश्न पडावा. कुणावर राज्य करायचेय ? हिंदूंना कोण लक्ष्य करतेय हे विचारावे. बुध्दकाळात संघ होता. त्या संघाचे उद्दिष्ट बहुजन हिताय बहुजन सुखाय होते. यांचे काय ?
एकीकडे जातपुरुषांचे महिमामंडन करायचे. जात अस्मिता तीक्ष्ण करायची. वर्गिकरणाला प्रोत्साहित करायचे. आरक्षणधारकांना ‘मुफ्तखोर’ हिणवायचे. ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ उचकवायचे. एकाच्या विरुद्ध दुसरा करायचा. ४० टक्के मतांवर लक्ष ठेवायचे. सत्ताखेळीत पूर्ण सहभागी व्हायचे.
तरीही हिंदू एकत्र करायचा. संघटित करायचा.
खंडित मनाने समग्र चिंतन .. समग्र भले होईल काय ?
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत