बुद्धांचा धम्म निराशावादी आहे काय? भाग २५

जगातील सर्व प्राणी दु:खाने पिडलेले आहेत. कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने ते दु:खी झालेले असतात. मनाच्या विरुध्द कुठली गोष्ट घडली की झाला दु:खी ! सर्व संसार दु:खाच्या समुद्रात गटांगळ्या खात आहेत. जेथे जेथे जीवन आहे तेथे तेथे दु:खही दु:ख भरलेले आहे.
केवळ मनुष्यप्राण्याच्या बाबतीत जरी विचार केला तरी माणसां-माणसात झगडा, कलह, भांडण, वाद-विवाद अशा गोष्टींचा जिकडे तिकडे बोलबोला दिसून येईल. जिकडे तिकडे आतंकवाद, फुटिरतावाद, वर्णवाद, वर्गवाद, जातीवाद, धर्म-पंथवाद, भाषावाद, प्रांतवाद, राष्ट्रवाद अशा गोष्टी बोकाळलेल्या दिसतील. जिकडे तिकडे चोरी, लुटमार, फसवणुक, हिंसाचार, भ्रष्टाचार, खोटेपणा याच गोष्टींचा भरमार दिसून येईल.
लोकं कोणत्या ना कोणत्या तरी भीतीने ग्रस्त झालेला असतो… थंडी वाढली तरी भीती … गरमी वाढली तरी भीती… खूप पाऊस पडला तरी भीती… कमी पाऊस पडला तरी भीती… कुणाला भुकेची-तहानेची भीती… कुणाला रोगराई, बिमारी, मरणाची भीती… कुणाला म्हातारपणाची भीती… कोणी तलवार, चाकु बंदुका काढल्या की भीती…कोणी चोरी, लुटमार करेल का म्हणून भीती… कुणाला लढाईची भीती… बॉंबस्फोटात मरण्याची, जखमी होण्याची भीती… आगिची, अपघाताची भीती…. दहशतवादी, नक्षलवादी लोकांची भीती…भीतीच भीती…जो तो भीतीने पछाडलेला असतो. याचे पर्यवसान त्याला दु:ख निर्माण करण्यात होत असते.
कोणी भुकेने तडपतो आहे. कोणी तहानेने व्याकुळ होतो. कुणाकडे शरीर झाकण्याकरीता पुरेसे वस्त्र नाहीत. कुणाला ऊन, वारा, पावसापासून वाचण्यासाठी आच्छादन नाही. कोणाकडे दवाई-पाणी घेण्याकरीता पुरेसे पैसे नाहीत. कोणी आपल्या मुला-बाळांना शिकवू शकत नाही. कोणी गरिबीपुढे हात टेकले आहेत. कोणाकडे पैसा असुनही मानसीक समाधान नाही. म्हणजेच दु:खाला पारावार नाही !
कुठे पती व पत्नीमध्ये भांडण, कुठे वडील व मुलांमध्ये भांडण, कुठे आई व मुलामध्ये भांडण, कुठे मुलां-मुलांमध्ये भांडण, कुठे सासु व सुनांमध्ये भांडण, कुठे शेजार्यां-पाजार्यांशी भांडण, कुठे मोहल्या-मोहल्यात, गावां-गावांत भांडण. कुठे जाती-जातींमध्ये भांडण. कुठे धन-संपत्तीसाठी भांडण, कुठे जमिन-जुमल्यासाठी, कुठे मानसन्मानासाठी भांडण, कुठे हुंड्यासाठी भांडण. भांडणाला काही अंत नाही. पुढे हे भांडण विकोपाला जावून मारामारी, खुन, जाळपोळ, हिंसाचार इत्यादी प्रकार घडतात. मग हे प्रकरण पोलीसांपर्यंत, कोर्टापर्यंत जाते. त्याची परिणीती म्हणजे मानहानी व पैश्याची नासाडी… कोर्टाच्या निकालानंतर तुरुंगवास अथवा फाशीची शिक्षा… म्हणजेच भांडणाचा शेवट हा दु:खांमध्येच परिवर्तीत होते.
कोणी आपल्याला हिंदु म्हणोत, बौध्द म्हणोत, ख्रिचन म्हणोत, शिख म्हणोत, जैन म्हणोत अथवा कोणी मुसलमान म्हणोत. कोणीही या दु:खापासून मुक्त नाही. कोणताही मनुष्य मग तो गरीब असो की श्रीमंत, गृहस्थी असो की गृहत्यागी-सन्यासी, अशिक्षित असो की सुशिक्षित , राजा असो की रंक अशा सर्वांनाच
दु:खापासून सुटका नाही.
दु:ख काय आहे? दु:खामागील कारणे काय आहेत?
दु:खाला लोक वारंवार बळी का पडतात? दु:खाचे निवारण करणे शक्य आहे काय? जर असेल तर त्याचे उपाय काय आहेत? दु:ख निर्माण होण्यापूर्विच त्या मागील कारणाला रोखणे शक्य आहे काय? इत्यादी अनेक प्रश्न सर्वांनाच पडते. कित्येकांनी त्याचा शोध घेऊन पाहिला असेलही! कित्येकांनी याच्या मागे देव, ईश्वर, परमात्मा यासारखे शक्ती असल्याचे कारणे सांगून स्वत:ची जबाबदारी झटकून टाकली आहे. त्यासाठी त्यांनी देवपुजा, देवभक्ती, आहुती देणे, नैवद्य देणे, बळी देणे, लाच देणे, इत्यादी दु:खमुक्तीचे अगदी सोपे उपाय सांगितले आहेत. जीवनात केलेल्या दुष्कृत्याच्या पापाची डागे गंगा, गोदावरी सारख्या तथाकथीत पवित्र नदीमध्ये व कुंभमेळ्यामधे स्नान करुन धुवून काढता येते अशी शिकवण धर्मभोळे लोकांना सांगितले आहे. परंतु भगवान बुध्दाने मात्र याचा शोध शास्त्रिय व वैज्ञानीक दृष्टिकोनातून घेतला आहे. दु:ख, दु:ख निर्मिती, त्याची कारणे, त्यावर उपाय इत्यादी सर्व बाबींचा सखोलपणे अभ्यास करुन त्यानी सविस्तर अशी मांडणी केली आहे.
भगवान बुध्दांचा प्रथम धम्मचक्र प्रवर्तनापासून तर आतापर्यंत आणि भविष्यात सुध्दा जे कोणी धम्म सांगतील ते दुसरे-तिसरे काही राहणार नसून ते चार आर्यसत्याचाच सार राहील असे ठामपणे म्हणावे लागेल. भगवान बुध्दांने याला उत्तम शरण असे म्हटले आहे.
भगवान बुध्द धम्मपदाच्या एकशेएकान्नव व एकशेब्यान्नवव्या गाथेत म्हणतात –
दु:ख दुक्खसमुप्पादं दुक्खस्स च अतिक्क्मं ।
अरियञ्चग्ङिकं मग्गं दुक्खूपसगामिनं ॥
एतं खो सरणं खेमं एतं सरण्मुत्तमं ।
एतं सरणमागम्म सब्बदुक्खा पमुच्चति ॥
याचा अर्थ, जो चार आर्यसत्यांना योग्य प्रकारे प्रज्ञेने पाहतो व दु:ख, दु:खाची उत्पत्ती, दु:खाचा विनाश व दु;खाचे उपशमन करणारा आर्य अष्टांगिक मार्ग याचे शरण ग्रहण करणे हेच कल्याणकारी आहे, हेच उत्तम शरण आहे. या शरणाला ग्रहण करुन मनुष्य सर्व दु:खातून मुक्त होतो. परंतु यासाठी तुम्हीच प्रयत्न केले पाहिजे असे भगवान बुध्द म्हणतात-
तुम्हेहि किच्चं आतप्पं अक्खातारो तथागता ।
याचा अर्थ, तुम्हीच प्रयत्न केले पाहिजे. तथागत केवळ मार्गदाता आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.६.१.२०२४
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत