प्रश्नांची मातृभाषा:मानवी सौंदर्याची सूर्यपौर्णिमा
“माणसं संभ्रमित झाले तर एकवेळ समजून घेता येईल पण कवीनं संभ्रमित होण्याची कोणतीही सोय कवी या शब्दात नाही. माणसं वीझली तर तेही एकवेळ समजून घेता येईल, पण कवीच विझणं कवि या शब्दालाच मान्य नाही. माणसं बेजबाबदार झाली तर एकवेळ समजून घेता येईल पण कवी या शब्दाच्या अर्थामध्ये कोणत्याही बेजबाबदारपणा बसतच नाही. त्यांन असंत्याच्याविरोधात आणि सत्याच्या बाजूने सतत बोलत राहिले पाहिजे. कवीचं हेच जन्म प्रयोजन आहे.” कवी यशवंत मनोहर यांनी कवीच्या जीवनाचे नवोनम्षेशन समजून सांगितले आहे. नेमका कवी कोणत्या दिशेने आपला मार्ग धरतो यावर त्याच्या कवीचे यश अवलंबून असते.
कवी युवराज सोनटक्के यांच्या प्रश्नांची मातृभाषा हा कवितासंग्रह मानवी मनाच्या भावविश्वाच्या तळाचा वेध घेत आहे. अग्नीशाळेच्या प्रगल्भ यशानंतर त्याचा हा दुसरा कवितासंग्रह प्रश्नांच्या उकलतेचे नवे क्रांतीसूत्र आहे. सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक विद्रुपता निर्माण करणाऱ्या मनोविकृतीविरुद्ध जबरदस्त बंड उभारते .
माणसाचे नाते हे एहीक सुखासाठी नाही तर माणसाच्या परिवर्तनासाठीच असते. यशवंत मनोहर यांनी या ग्रंथाला माणुसकीच्या मातृभाषेचे सौंदर्य असे म्हटले आहे. ते आपल्या प्रस्तावनेत लिहितात की, जेव्हा मनांची भूमिका विश्वाला कवेत घेतो तेव्हा प्रश्न ही वैश्विक होतात. सर्वांच्या हितासाठी निर्माण होणाऱ्या प्रश्नांची मातृभाषा वैश्विक माणुसकीचीच मातृभाषा होते संपूर्ण जगाचे रूपांतर एका मानवी कुटुंबात करणाऱ्या आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात अशा सलोख्याच्या प्रश्नांची आणि त्याच्या उत्तराच्या शोधाची गरज आहे” हे अवतरण अत्यंत क्रांतीदर्शी आहे.
मानवी जीवनातील गतिमानता इतकी प्रचंड वाढली आहे की मानवाला नव्या अविष्कारासाठी वेळ अपुरा पडत आहे. या आविष्कारातून मानवी समाजाला नवे उन्नयन जीवन मिळणार यात शंका नाही . पण खरंच या आविष्कारातून माणूस सुखी आहे की दुखी हे वर्तमानाच्या
अग्नीशाळेतून समजून घेता येऊ शकेल .
कवी युवराज सोनटक्के हे अतिशय भावुक व संवेदनशील कवी आहेत. भौतिकशास्त्राच्या ज्ञानगर्भातून मानवी समीकरणाची उकल शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. जग प्रश्नाने व्यापले असून या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम त्यांनी प्रश्नांची मातृभाषा या कविता संग्रहातून केलेली आहे. कवितासंग्रहाचे अंतरंग नव्या मूल्यसापेक्ष मातृत्वाची प्रचिती आणणारी आहे. कवी आपल्या मनोगतात लिहितात की,” प्रश्नांची मातृभाषा या कवितासंग्रहात मी भोगलेल्या या यथार्थाचा आउटपुट आहे . माझी कविता यथार्थाची अन्वेषक व उद्घाटक आहे. मी सत्याशी विमुख न होता त्याला सहर्ष स्वीकार करते. ती सत्याच्या शोधात व्यस्त असते. कवितेची सार्थकता ही वास्तविक स्थितीच्या प्रत्यक्षीकरणात असते असे मी मानतो.” हे त्यांचे विचार वर्तमान समाजाला नव्या वैचारिक प्रबोधनाचे चिंतनगर्भ व्यक्त करते. ही कविता फक्त युवराज सोनटक्के यांची राहत नाही तर ती शोषित ,पीडित, दु:खी व दारिद्री या समाजाचा बुलंद आवाज बनते. ही कविता महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्याचा अखंड प्रखर करणारी असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्रोही जाणिवांशी इमान राखणारी आहे.
आज नव्या कवितांमधून
एकसुरीपणाचा आह प्रकट होताना दिसतो. शब्दांची तिरकस मांडणी व शब्दजंजाळपणा यांनी आजची कविता ल्यालेली दिसतात पण प्रश्नांची मातृभाषा या कवितासंग्रहातील कविता सत्याचा शोध घेत असत्यावर आसूड ओढीत आहे .मूलतत्त्ववादावर लपून-छपून वार न करता ती उघड उघड प्रत्यक्ष रणांगणावर युद्धसज्ज बनली आहे.
आजचा काळ अत्यंत धाकधूकीचा आहे. कोरोना विषाणू महामारीने तो थोडा सावरला आहे .तोच नवे धार्मिक व जातीय ध्रुवीकरणाची विषारी व्यवस्था देशात निर्माण होत आहे. या विषारी व्यवस्थेला समाप्त करण्यासाठी अनेक लेखक व कवी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण वर्तमान शासकांनी अंधभक्तीची नवी अफू देऊन बहुसंख्य समाजाला अपंग केले आहे. मानसिक अपंग ग्रस्त मेंदूतून दंगलग्रस्त नवीन मेंदू देशात नंगानाच करत आहेत. माणसालाच माणूस न मानणारी ही व्यवस्था भारतीय संविधानिक व्यवस्था उलथडवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण काही भारतवादी विचारांची माणसे या व्यवस्था विरुद्ध दंड थोपटून उभे आहेत. या बंडात युवराज सोनटक्के आपल्या शब्द अंगाराचा निखारा घेऊन त्यांच्या छावण्या उध्वस्त करत निघालेले आहेत .यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.
प्रश्नांची मातृभाषा हा कवितासंग्रह भौतिक वादाच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडणाऱ्या न्यूटनला समर्पण केलेला आहे. बनावटगिरीच्या साऱ्या व्यवस्थेला लगाम लावण्यासाठी आयझॅक न्यूटन यांनी नव्या विचारांचे संशोधन केले. त्यांनी दाखवलेल्या सिद्धांतानुसार जग आधुनिक तंत्रज्ञानात मजल मारत आहे. आधुनिक जगाची बांधणी ही नव्या परिवर्तनवादी प्रबोधनातून झाली आहे.
या कवितासंग्रहात एकूण बावन कविता आहेत. कवितेचा आशय आणि पोत अत्यंत भारदस्त व वैचारिक परिवर्तनाचा सुजनत्व प्रकाश आहे .विज्ञानाचा विद्यार्थी असलेल्या या कवीने संवेदनात्मक मनाची परमार्शिकता प्रकट केलेले आहे. तंत्रज्ञान या सोबत साहित्याची जोड जीवनाला जशी प्रगतीपथावर घेऊन जाते तसेच समाजाला नवा मार्ग दाखवणारी असते .या कवितासंग्रहातील पहिलीची कविता ही प्रश्नांची मातृभाषा या शीर्षकाने प्रकट झालेली आहे .मातृभाषा ही आपली मायबोली असते पण आज भाषेपासून वादंग निर्माण होत आहेत. भाषा ही विचारांचे आदान प्रदान करणारे सशक्त माध्यम असते. कोणतीही भाषा असू द्या पण तिच्यातील अवीट गोडवा प्रत्येकाला मनोरंभ करते .मराठी अत्यंत क्रांतिकारी भाषा आहे .या मराठी भाषेने जगाला नवीन मूल्य दिली आहेत. नवीन वैचारिकता प्रधान केलेली आहे. पण आज मराठी भाषा फक्त ग्रामीण माणसाच्या सोबत आहे. शहरी भागातून ही हद्दपार होत आहे. प्रश्नांची मातृभाषा या कवितेचा भावार्थ उत्कट आहे. म्हणून मनोवेधक विचारगर्भ आहे .पृथगामित्वाचा सुजन अविष्कार आहे. ते या कवितेत लिहितात की,
हृदयाच्या नभात अश्रू होतात अक्षरे तेव्हा
माझी कविता मानवतेचे अंगार-गीत गाते.
समतामूलक समाजाचे स्वप्न बघते.
………………….
………………….
अशा शोषक- शोषितांच्या क्रौय- धैर्याचे मानवीकरण
प्रश्नांच्या मातृभाषेत माडंता येईल काय ?
पृ क्र २४
कवीने हा विचारलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले जगणे व मरणे यामधील क्रियान्वयन ही मातृभाषेतूनच व्यक्त करता येत . कारण मातृभाषा ही आपली आई भाषा असते .आईला आपण कितीही नटवतो म्हटले तरी ती आई असते. तिला फॅशनेबल कोणतेही लेबल लावू शकत नाही. मानवी हृदयाच्या जखमांना सांभाळून विश्व कल्याणाचा धम्म जागर करत आहे.
या कवितासंग्रहातील कविता या प्रेमयुक्त, संशोधनात्मक ,क्रांतीवेधक, परिवर्तनवादी ,संविधानात्मक , मनोविश्लेषणात्मक, भविष्यवेधी, सत्यान्वय या प्रक्रियेने प्रस्तुत झालेल्या आहेत. पर्जन्य ,अनामिक, सहचारिणी प्रियतमा लेखनी माझी या कवितेमधून अग्निकंकणिना ऊर्जा वाहिनी न्याहाळतो, रक्तीम वेदना, घायाळ हृदया या शब्दछटा वाचकाला अंतर्मुख करतात .अनामिक ही कविता कवीच्या मर्मबंधमनाचे नाते प्रयुक्त करते. ते लिहितात की,
भेटलीस अनामित जशी नदी सागरास भेटते
मधुर आपले अस्तित्व सहज अर्पित करते
मी प्रतिबंधित एकटा जसे चंद्राविना आकाश
प्रायोगिक प्रज्ञेखातर यावीस काढून अवकाश.
पृ क्र ९९
ही कविता मानवी मनाच्या विविध दृश्य-अदृश्य विचारांचे यथार्थता अवलोकन करते.
आज कवितांचे भरपूर पीक आलेले आहेत. कवीचे जथ्थेच्या जथ्थे निर्माण झाले आहेत. पण ते पुरोगामी आहेत की प्रतिगामी हे सांगता येत नाही. काही कवी शिघ्र आहेत. उदाहरणात संसदेत मनमौजी म्हणून कविता करतात. कवितेच्या आशयाला गालबोट लावतात .कविता ही मानवाच्या जीवनाला नवे क्रांतीत्व प्रदान करणारी असते. कविता हि फक्त कवीची नसते तर ती वर्तमान, भूतकाळ व भविष्यकाळ या काळाच्या क्रांतीपथाची निर्मिती करते. तोच कवी हा खरा कवी असतो. ते या कवितेत लिहितात की ,
प्रथित- प्रतिश्रुत कवी सामाजिकता बांधणारा
दिशाबंधन एक सेतू जन-संकल्प जोडणारा
जोखती जोश जोमाने जो सामान्य व्यक्तीच्या मनात
सर्वथा तोच कवी सच्चा सर्जक मानकरी शाश्वत .
पृ क्र ८९
कविता ही मानवीय भावनेचा नवा सृजनात्मक आविष्कार आहे. मुल्यनिरपेक्ष समाजाचा आरसा आहे.भय पसरवणाऱ्या कर्मठावर अंगार असते. अंधाऱ्या डोहात उजेडलेणी निर्माण करणारी असते. शब्दापासून कविता निर्माण होते .पण शब्द हेच जपून वापरले पाहिजेत. शब्द हे जगातील सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत. त्याने समाज घडतो व बिघडतो. आज देशात यावरून राजकारण सुरू आहे. राज नसलेले कारण घेऊन देशातील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामधून राजकीय पोळी शेकण्याची नवी यंत्रणा या देशात उभी झालेली आहे. कवीने शब्दालाच शस्त्र मानले आहेत .वैचारिक ऊर्जेची धग तेजस्वी करून विस्थापितवर हल्ला करत आहेत. ते शब्द या कवितेतून आपले विचार व्यक्त करताना लिहितात की,
दाहक शब्द संघर्षाचे घेतले सखे मी उधार
क्रांतीच्या हस्तांदोलनाने ठेवले मला उबदार ……
पृ क्र ९०
कवितेचा अर्थ योग्य असला तरी कवी हा कधीही उधारीवर जगात नाही .तो स्वः निर्मिती करणारा शिल्पकार असतो .त्यामुळे कवीने हे शब्द घेतले ते आंबेडकरी विचार जाणीवेतून घेतले आहेत. स्वतःला कंमकूवत मानू नये तर क्रांतीच्या अंगाराचा तेजोनिधी मानावा असे मला वाटते .
या कविता संग्रहातील अनेक कविता सामाजिक आशियाने परिपूर्ण ल्यालेले आहेत .सावित्री- ज्योतिराव फुले ,रमाई यामधील सामाजक्रांती मूल्यजागर व्यक्त झालेले आहे.रमाई ने आपला सारा देह झिजवला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ऊर्जा दिली. त्या ऊर्जेच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव झाले .असंख्य वेदना झेलून ती आई डगमगली नाही तर साऱ्या वंचितांची आई झाली. रमाईच्या कार्याचा संघर्ष अत्यंत भावुकपणे रेखाटलेला आहे. ते रमाई कवितेत लिहितात की ,
चांदण्या जळून खाक होणार नाहीत असा विश्वास देऊन गेलीस रमाई! अस्तित्वहीन म्हणून आलीस
अन अस्तित्व टिकवून गेलीस आई!!
पृ क्र ३७
माय ही कविता या कवितासंग्रहातील एक अप्रतिम कविता आहे. माय या विषयावर अनेक कवींनी कविता रचलेली आहेत. वामन निंबाळकर दीपक रंगारी ,यशवंत मनोहर ,संदीप गायकवाड यांनी आपल्या कवितांमधून आईचे क्रांतीत्व राखाटले आहे. युवराज सोनटक्के यांची माय ही कविता वेदनांचा अग्नीज्वाळ आहे. संघर्ष भरलेल्या जीवनात आईचे प्रेम व वात्सल्य कविला जगण्याची महाऊर्जा देते.आईचे कर्ज फेडू शकत नाही तू भिजलेल्या जखमांचे दुःख मी विसरू शकत नाही .ते माय कवितेत लिहितात की,
माय !
उजेडाची एक गतिहीन भेग
पडली तुझ्या डोळ्यात
अन् तुझे आयुष्य सापडले
संघर्षाच्या सापळ्यात..
…………….
माय ,अग्नीध्वजावर जेव्हा नोंदतो तूझे नाव
युवराजाचा मुकुट घातल्यासारखे वाटते मला …
पृ क्र ३०
अत्यंत भावूक व मनाला हेलावून टाकणारे ही कविता वाचकाच्या मनाचा वेध घेते. तथागत गौतम बुद्ध जगातील पहिला मानवतावादी वैज्ञानिक ज्याने विज्ञानाला प्रमाण मानलं त्याचा प्रतित्यसमुत्पाद सिद्धांतानुसार जगाच्या निर्मिती नवै तत्व विशद केले .कारण व कारणमीमांसा यांचे तत्वज्ञान मांडले. धम्म चेतनाच्या क्रांतीतून नवे मानवी नाते प्रस्थापित केले .सम्यक अन्वयकांची पाठशाळा निर्माण करून अमानवीय व्यवस्थेचे चारही खांब उध्वस्त केले. मानवाला नवे तत्त्वचिंतनात्मक विचार दिले. निब्बाणं परम सुखं हे सत्य समजावून सांगितले. हे जग नश्वर आहे .माणसाने तृष्णा मुक्त व्हायला हवे. पदार्थ संयोगजन्य सारे पतन शील आहे. हा सिद्धान्ताचे सुतोवाचन केले .धम्मविचारांच्या कार्यतत्परतेतून आज जगात माणूस सुखी आहे .पण अतृप्त विचारांमुळे फुलत असलेल्या बुद्ध सिद्धांतावर फार मोठे संकट कोसळले आहे . पण याच संकटाला आजचा माणूस घाबरणार नाही. कारण तथागत गौतम बुद्धाची क्रांती दर्शी विचार त्याच्या हातात, त्याच्या मनात असल्याने तो आज नवीन आव्हाने पेलू शकतो .
आजचे जग हे फसवे व मादक आहे. बनावटीचे नवनवीन कारखाने उभे झाले आहेत. अंबानी व अदानी यानी देशाला विकत घेतले असून मानवीय भारतीय मानवी मनाचा ताबा घेतला आहे. ही गुलामी नक्कीच देशाला खड्ड्यात घालणारी आहे .
बाजारवाद हा शब्दच मुळात फायदेमंद असतो. शोषणकारी प्रक्रिया निर्माण करून जनतेच्या क्रयशक्तीवर आपली तिजोरी भरणारी ही बाजारवादी वृत्ती नक्कीच शोषणाचे अड्डे बनले आहेत. माणसाला हद्दपार करुन वस्तू व पैसा यांचे समीकरण करून मानवाला उध्वस्त करत आहे. बाजारवाद हा समतामूलक मुळांना छाटून टाकतो आहे .माणसाला समाप्त करून माणसाचे शोषणाचे अड्डे निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे बाजारवाद होय. स्त्री बदनामीचे शस्त्र बाजारवाद या कवितेत कवीने मोठ्या खुबीने वर्तमानातील खाजगीकरणाचे वास्तव अधोरेखित केलेले आहे. ते लिहितात की,
फोफावताहेत बाजारवाद्यांचे कुटीर- उद्योग
मार्मिक मानवतेच्या पदरी हा बांधला भोक…
पृ क्र ४५
ही कविता बाजारभावाच्या चंगळवादी विकृत व्यवस्थित चिरफाड करते .भारत हा प्राचीन संस्कृतीने नटलेला देश आहे .बौद्ध संस्कृती या देशाची सभ्यता आहे .जागतिक समाजाला बुद्धांनी नवी वैचारिक क्रांती दिली आहे. पण आज संविधान व्यवस्थेला अच्छे दिनचे गाजर दाखवून मनुष्य त्याची नग्न सेज निर्माण केली जात आहे. आजची माणसे ही मानवी सभ्यता सोडून दुसऱ्या अमानवीय पक्ष्यांची पावले चाटत आहेत. पण इतिवृत्त घेऊन हा कवी ऊर्जाशील संपृक्त होऊन नव्या प्रज्ञा परीघांची निर्मिती करत आहे. ते इतिवृत्त या कवितेत लिहितात की ,
कॅनव्हासवर काळोखी रेखाटले उजेडगीत
सर्जनाच्या मूल्यकोशात शब्दांचे अर्थ विलुप्त….
पृ क्र १०६
ही भावना प्रकट केलेली आहे.
भारतीय संसद भारताला नवी दिशा दाखवणारी उजेडलिपी आहे .पण आज संसद अंधारमय झालेली आहे. पुराणाच्या अंधार गुहेत स्वतः शोधता शोधता कधी काळोख मग्न झाले ते समजलेच नाही. नरात्रीच्या काजव्यांनी उजेडाचा सूर्य थोपवून धरू शकणार नाही कारण नवे संदीप्त यथार्थ मूल्य क्रांतीची गर्जना करीत राहतील .शिखर पुरुष १ व २ मधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांची ध्वजा कवीने आपल्या खांद्यावर घेतलेली आहे.
हे क्रांतीच्या आगाध पुरुषा! दिली हाती शिक्षणाची कुंजी
शोषित पीडित जनतेसाठी सतत संघर्षाची पुंजी
काळाच्या समस्त भागीदारांस एक सार्थक हस्तक्षेप
अनुभवांच्या रचनात्मक स्तंभावरील प्रखर झेप…
…………….
बाबासाहेब !जे तुमच्या नावाचा करीत राहणे तिरस्कार
वा तुमच्या अवधारणेशी परिचित असल्यास नकार
ती आता फॅशन म्हणून नाव तुमचे घेऊ लागले
संविधानाच्या ऊर्जेत त्यांचे पाषाणहृदयी वितळले …..
पृ क्र ६३
ही कविता विचारांच्या व आशयांच्या बांधणीवर उत्कृष्टपणे रेखाटली आहे. शतकाच्या अंधाराला समाप्त करून क्रांतीचा सूर्यदीप ठरला आहे. संविधानाच्या ऊर्जेने नवीन माणूस निर्माण झाला आहे.
प्रश्नांची मातृभाषा हा कवितासंग्रह सौंदर्य भावाने प्रज्वलित झालेला आहे. शब्दांचे निखारे घेऊन उजेड लिपी निर्माण करण्याची त्यांची जिद्द आहे. मातृभाषेतून संवादीनी म्हणून ही कविता प्रश्नांच्या मुळांना अधोरेखित करते. ही कविता फक्त सामाजिक क्रांतीसाठी सज्ज करीत नाही तर राजकीय क्रांतीची नवी पहाट उभी करते. ही कविता सुंदर व उत्कृष्ट भावनांचा जाळ आहे. माणसाचा पराभव दिसत असताना माणसाला विजय प्राप्त करून देणारी आहे. या कवितेचा आशावाद नक्कीच प्रेरणादायी आहे. माणसाची लढाई लढणारे व्यक्ती कमी झाले आहेत. धर्म, जात, भाषाची लढाई लढत असताना युवराज सोनटक्के हे आपले सत्व टिकवून ठेवून समाज उत्थानाचा वसा मनी रुजवत आहेत .सारा देश हुकुमशाहीचा उदो उदो करत असताना हा कवी लोकशाहीच्या मुळांना द्रवरस देत आहे. हरितद्रव्याच्या नाविन्यपूर्ण पाचक रसांचे रसायन घेऊन समाजातील कर्मठ ,जातत्य व विकृत राजकारणावर तुटून पडत आहे. प्रश्नांची व्याप्ती सतत वाढत आहे पण उत्तर सापडत नाही. कवीने या कविता संग्रहातून प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत. मानवी मनाला नवसंजीवनी देणारी ही कविता बदलत्या मानवी समाजाला नवे रक्तचंदन देणारी आभाळमाया कविता आहे.प्रश्नांची मातृभाषा यातील कविता मानवी सौंदर्याची सूर्यपौर्णिमा आहे. विश्व कल्याणाचा मागोवा घेऊन समतामूलक देश बनवण्याची त्यांची जिद्द नक्कीच क्रांतीवर्धक आहे. युवराज सोनटक्के यांची कविता आज आणि उद्याच्या तरुणांना नवी दिशा देईल यात दुमत नाही . कवी युवराज सोनटक्के यांना पुढील काव्य प्रवासाकरीता चिंतीतो………..!
संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००
प्रश्नांची मातृभाषा
कवी- युवराज सोनटक्के
स्मिता पब्लिकेशन, गुहागर
मूल्य १८० रूपये
Show quoted text
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत