देशधमचक्र प्रवर्तन दिन विषेशांकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

कल्याणकारी जगण्याचे मार्ग दाते

नंदू वानखडे
मुंगळा जि. वाशिम-९४२३६५०४६८.

जीवन अनमोल आहे. या जीवनाला ‘ वन्स मोर’ नाही. ज्या भागात, प्रदेशात ,जंगलात रानावनात आणि जिथे कुठे, ज्या योनीतून आपल्याला ‘जन्म’ मिळाला आहे. तिथली भौतिक, भौगोलिक परिस्थितीत आपल्याला शरीराच्या वाढीबरोबर ,’जगणं, वागणं शिकवत असते. कुठलाच एखादा’ गर्भ अथवा ‘अर्भक ‘आपला उद्देश घेऊन जन्माला येत नाही. त्याला कुठला लक्षांक ,साध्य करायचा असतो असेही नाही. ज्या कारण, घटकांनी ,त्याला जन्म घेण्यासाठी भाग पाडलं, त्यांचाही आपल्या निर्मितीमागचा काही हेतू असला पाहिजे, असंही नाही वाटत? सृष्टी निर्मितीचे कारण शोधतांना अनेक ‘संशोधक- वैज्ञानिकांनी’ आपापले तर्क लावलेत. मातीच्या कणांपासून तर भूगर्भात अतिखोलवर जाऊन, तसेच चंद्र सूर्य ग्रह, उपग्रहापर्यंत पोहोचण्याची मजल मारली. तरीही जीव निर्मितीच्या उद्देशाचं खरं कारण काय असावं? या कामगिरीपर्यंत पोहोचता आलं नाही. आजवर सदर अभ्यासात आपली संपूर्ण हयातच’ खर्ची’ घालवलेल्या वैज्ञानिकांनी, आपआपल्या वैज्ञानिक पुराव्यासह ‘तत्व चिंतन’ मांडले. काहींनी अर्ध्यावरच सोडून, आपल्या सोयीच्या मार्गाने अर्थ काढून आपले ‘स्वच्छंदी जीवन’ व्यतीत केले .काहींनी या जीवनाला अतिशय मौल्यवान समजून, या जीवनाचे ‘आयुष्यमान’ कसे वाढवता येईल? यासाठी जंगल, दर्या,खोऱ्यात, डोंगर पायथ्याशी, समुद्राच्या तळातही, आपलं ‘अन्न’ शोधून बदलत्या अवस्थेनुसार ,काळानुसार,त्यातही बदल करून, हे जीवनमान कसं वाढवता येईल, या दिशेने पाऊल टाकले. आपल्या स्वयंनिर्मितीचं ‘रहस्य ‘काय असले पाहिजे ? हे जीवन, अधिक काळ टिकवण्यासाठी, बदलत्या पर्यावरणाला तोंड देण्यासाठी, आपल्या प्रतिकारशक्तीला वाढवण्यासाठी ‘जोर ‘दिला. साडेचार ‘अब्ज कोटी’ वर्षापासून ही पृथ्वी ‘हयात’ आहे. याचे दाखले दिल्या गेलेत. ‘जगण्याचं साधन’ शोधत आपण जगण्याचं प्रयोजनही काय असलं पाहिजे? हे शोधत राहिलो. त्याबद्दलचे तर्क- वितर्क, अनादी काळापासून ‘ग्रंथालयात’ कैद आहेत. संदर्भाकरिता म्हणून काही ‘गरजवंत ‘ते वाचत राहतात. या तर्क वितर्काच्या, शुद्ध -ज्ञानाच्या कसोटीवर ‘काही विचार’ टिकले तर काही काळाच्या ओघात संपले. जिथे कुठे, वैज्ञानिक आधार संपत आला किंवा सापडत नसला तेव्हा माणसांनी कल्पनेच्या भराऱ्या मारल्यात. भय, अज्ञानापोटी, निसर्गाच्या सर्वच घटकांशी ‘हात जोडणारी’ पिढी वाढत असतांना, आपल्या ‘चाणाक्ष्य’ बुद्धीचा वापर करून, यातून काहीतरी मिळवता येईल का..? म्हणून संभ्रमित विचार मांडलेत. परंपरा, संस्कृतीच्या नावाखाली अवैज्ञानिक विचारांनी आपल्या ‘तर्कशुद्ध’ विचारावर कुरघोडीच केली. आणि इथेच माणसाच्या खऱ्याखुऱ्या बुद्धीचा पराभव झाला.भयाने चिंतित, माणसांनी भयमुक्तीच्यासाठी आराधना, प्रार्थना, याचनांचा आधार घेत, निसर्गाच्या निर्मितीचा ‘सूत्रधार’ मनात धरीत त्याला ‘विविध नावाने, सजविले. त्यातल्या ‘बुद्धीचातुर्य’ समुदायाने आपल्या प्राबल्यासाठी, त्यांच्यावर राज्य गाजवून आपल्या उपजीविकेसाठी नानाविध अधिष्ठान, प्रतिष्ठान स्थापनेचा ‘उद्योग’ सुरू केला. या सर्व कल्पनेच्या व इतिहास कथनीच्या प्रभावाच्या, प्राबल्ल्याच्या, माणसाच्या लोकांच्या इर्षाच्या, अति महत्वकांक्षेच्या आणि सर्व जगच केवळ आणि केवळ आपल्याच ताब्यात घ्यावसं वाटणाऱ्या राजा, महाराजा, सम्राटाच्या अनेक कहाण्यांचे वादळ, वारे आपल्या कानावर आजही घोंगावत असतात.’ सत्यता ‘पडताळणीच्या दिशेने तथागताची, पडलेली पाऊले आपण अधोरेखित केली असता, आपल्या असं लक्षात येईल की, ह्या जीवनाचा ‘खरा उद्देश’ काय आहे? ह्या दुःख सुखाच्या आणि इथल्या प्रत्येक जीविताच्या जीवनमृत्यूचं ‘कालचक्र’ कस चालत असावं? तथागत गौतम बुद्ध एका वैज्ञानिकाच्या भूमिकेतून ‘बुद्धत्व’ प्राप्तीकडे शिरतात… आणि त्या ‘बुद्धत्व प्राप्तीच्या’ पहिल्या अवस्थेच्या दालनात पोहोचतात. त्यानंतरच्या ह्या सर्वच अवस्था पार पाडत बुद्ध हे ‘अरहंत ‘पदाला पार करतात. त्यातली ही पहिली अवस्था ‘सोतपन्ना’ अवस्था असते. बुद्धांनी या अवस्थेला चार वर्गात वर्गीकृत केलेले आहे. ते म्हणजे स्वतः सकादगामी, अनागामी आणि अरहंत हे सर्व बुद्धाने, ‘स्व’अनुभवाचे आधारित वर्गीकृत केलं. वैशाखी पौर्णिमेला असं कोणतं ज्ञान, (बुद्धत्व )बुद्धाला प्राप्त झाले. तर ते ‘ज्ञान’ हे, बोध अनुभूतीच्या मार्गाने प्राप्त झालं होतं. वास्तविक ह्या
एका आंतरिक प्रक्रियाच्या माध्यमातून, बुद्धाला एका ‘जागृत’ अवस्थेत आणलं. ती एक आंतरिक अवस्था असते. या अवस्थेत माणसाला सर्व काही समजलेले असते. यामध्ये कुठलीच समस्या, प्रश्न, बाकी राहत नाही. या प्रबोधनप्राप्तीस बुद्ध ज्या ‘अवस्थेमध्ये ‘वर्गीकृत करतात .त्यातली पहिली अवस्था ‘सोतपन्ना ‘ होय ! सोतपन्ना अवस्था म्हणजे ज्ञानाच्या प्रवाहात पडणे. म्हणजेच, या प्रवाहात आले की, जसे एका प्रवाहाचे ‘पाणी’ पुढे पुढे वाहत नदीकडून समुद्राकडे निघून जाते. या अवस्थेमध्ये आपण जगाला आणि स्वजीवनाला जाणण्याची, त्याची सत्यता पडताळणी करण्याची, ही अवस्था आहे, मी कोण? माझं ‘मन ‘काय आहे ? मला कोणाकडून नियंत्रित केले जात आहे? माझा या जगण्यासी काय संबंध आहे ? त्यासाठी मला चिंतन करावे लागते. माझे शरीर म्हणजे काय ? माझे वास्तविक अस्तित्व आणि व्यवहार काय आहे? जग काय आहे ? कसे चालते? जग कसे घटत आहे ?आणि मी जगाशी कसा जुळलो आहे,हे जाणून घेण्याची अवस्था, म्हणजे ‘सोतपन्ना’ अवस्था आहे, ही एक अनुभूती आहे आणि हे एकांतात चिंतन मनातून आपली वर्तमान अवस्था काय आहे ?आपल्या जगण्याचे प्रयोजन, उद्देश काय आहे ? हे जगातून चित्र घडत आहे .जे आपण बघतो आहे ..सकाळी उठणे, जाणे परिश्रम करणे, याची आम्हाला संतुष्टी मिळते का? याची कारणं शोधणे आणि आजच्या कार्यामुळेही आम्ही संतुष्ट होणार नाही. मग जर हे सर्व नाही, तर आपल्या जीवनात काय ऊरते ? जे मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, ते आम्हाला खरोखरच मिळते का? आणि मिळाले तरी आम्ही संतुष्ट का होत नाही ? हे सर्व मिळवता मिळवता आणि ती गोष्ट मिळवल्यानंतरही आम्ही पुन्हा काहीतरी मिळवण्यासाठी ‘इच्छा’ ठेवतो आणि हे सर्व आपल्याला व्याकुळ करते. आणि अशातच जीवन केव्हा संपून जाते, हेही आम्ही ‘समजू’ शकत नाही. शेवटी काय अशी गोष्ट आहे की, आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु संतुष्ट आम्ही होत नाही आहोत? काय ख़ुशी ,आनंद आमच्या बाहेर आहे का? आत आहे? कितीक वेळा या गोष्टीचा गुंतागुंतीचा, दलदलीच्या खेळाचा, आम्हाला ‘मेळच’ लागत नाही. अशा प्रकारे आमच्या ‘मनोवृत्ती’ बदलत राहतात पण आम्हाला ‘पत्ताच’ लागत नाही. जसे आपणच रचलेल्या एखाद्या खेळामध्ये हरलेला माणूस दुःखी,तर जिंकलेला माणूस आनंदी ..! आणि ज्याला हा ‘खेळ ‘समजलाच नाही, तो माणूस ना आनंदी, ना दु;खी होत …! हा घटनाक्रम एक असूनही आम्ही तिन्ही लोकांकडे जे ‘मन ‘आहे. पण त्या मनाच्या प्रतिक्रिया का वेगवेगळ्या आहेत ? बऱ्याच काही काळ मंथन नंतर आपल्याला हा ‘शोध’ लागतो की, प्रत्येकाच्या ज्या काही इच्छा आहेत. त्या वेगवेगळ्या आहेत, परंतु त्या पूर्ण होत नाहीत.डोळे, मन, मस्तीष्क यांच्या सर्वांच्या ‘तृष्णा’ वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आमच्या मनात सुखदुःखाचे ‘तरंग’ उठत असतात. त्यानंतर आमच्या डोळे, नाक, तोंड, त्वचा… द्वारे आम्हाला स्पर्शातून जाणवतात. तेव्हा आम्हाला संवेदना किंवा वेदनाची अनुभूती होते. त्या ‘तृष्णा’ आणि ‘प्रबळ इच्छा ‘या दुःखाला उत्पन्न करतात. हे ओळखण्याची, या मनस्थितीची, अनुभूतीची, ‘जाणीव’ होणे,असा हा घटनाक्रम घडत असतांना, हे अनुभवाच्या ‘स्तरावर’ आपण समजू लागतो, या अवस्थेला ‘सोतपन्ना’ अवस्था असे म्हणतात. बुद्ध या अवस्थेतून जात असताना प्रत्यक्ष अनुभूतीतून जातात. म्हणून ते आपल्या अनुभूतीने जे शिकवले त्यालाच ‘साक्ष’ मानून जगण्यामधल्या दुःखाच्या कारणांचा ‘शोध’ घेतांना त्यावर दु:खनिरोधही काय असावा, याचाही शोध घेतात आणि त्या शोधातूनच पंचशील, अष्टशील, सम्यक मार्ग त्यांना सापडतो. म्हणून बुद्ध निसर्ग निर्मितीच्या कार्यामध्ये कुठल्याच चमत्कारला ‘दैवी शक्तीला’ स्थान देत नाहीत. तर सरळ सरळ या मित्थ गोष्टी,कपोल- कल्पित कहाण्यांना नकार देतात. आणि या जीवनाच्या कल्याणकारी मार्गाचे खरे मार्ग दाते ठरतात. स्व जाणिवेतून स्वतःचा शोध घेतात, इतरांचेही ‘अतं दीपं भवं’ या मौलिक संदेश्याकडे ‘लक्ष’ वेधून घेतात. स्वतःच दीपा सारखे ज्ञानाने प्रज्वलित व्हा .. स्वतःच स्वतःचे दीपक बना आणि मार्गक्रमण करा.. खऱ्या खोट्याची तर्कशुद्ध बुद्धी कसोटीवर तपासणी करा मगच त्याचा अवलंब करा, म्हणजे जीवन सुखकर होईल ..! ‘ म्हणून इतरांपेक्षाही बुद्ध हे खरे जीवनाचे ‘मार्गदाते’ म्हणून अवघ्या विश्वामध्ये लौकिक पावतात. निब्बानाचा ‘खरा मार्ग’ दाखवतात. ते कुठेच विचाराने संभ्रमित नाहीत. त्यांच्या जीवन मार्गामध्ये ज्या, ज्या, अवस्थेतून ते गेलेत, त्या त्या अवस्थेत सखोल ‘ज्ञान बोधाची ‘अनुभूती घेऊन जगासमोर ,उपदेशासाठी येतात.
ते सम्यक संबुध्द होऊन…
आणि या कल्याणकारी जीवनाचे ‘मार्गदाता’ म्हणून संबोधले जातात. आपण फक्त सोतपन्ना या अवस्थेला चिंतनात्मक स्पर्श करून जात आहोत. सखोल अभ्यासाअंती ‘अभ्यासकांना ‘या आपल्या जीवन मार्गाचे सखोल ज्ञान’ ज्ञात होईल .या कल्याणकारी मार्गाचे पादचारी बनून अवघी’ मानव जात ‘सुखाने जीवन व्यतीत करू शकते. अवघ्या मानव- जातीसाठी हाच कल्याणकारी मार्ग आहे.’

       --- नंदू वानखडे

मुंगळा जि. वाशिम 9423650468

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!