महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ

ज.वि.पवार यांच्या जन्मदिनी जविकिरण काव्य मैफलीची स्थापना



मुंबई दिनांक १५ जुलै:
दलित पँथरचे सहसंस्थापक, व ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी ज. वि. पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आंबेडकर भवन दादर, मुंबई येथे साहित्यिक, कवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या एका देखण्या कार्यक्रमात जविंच्या साहित्यिक ज्येष्ठतेचा गौरव म्हणून ‘जविकिरण काव्य मैफली ‘ ची स्थापना करण्यात आली.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या काव्य मंच स्थापनेची घोषणा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांनी केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार भागवत बनसोडे हे होते.


‘जविकिरण’ संकल्पनेचे प्रवर्तक प्रा. आनंद देवडेकर ही संकल्पना समजावून सांगताना म्हणाले की, जसे शंभर वर्षांपूर्वी कवी माधव ज्युलियन यांच्या प्रेरणेने मराठी साहित्यात रविकिरण मंडळ स्थापन होऊन मराठी कविता नव्या जोमाने प्रवाही झाली तद्वतच ‘ जविकिरण काव्य मैफल ‘आंबेडकरी प्रेरणेनं काव्य लेखन करणाऱ्या नवोदितांना सहाय्यभूत व्हावी. सुमारे शंभरेक पुस्तकांना प्रस्तावना लिहून नवोदितांना प्रोत्साहित करणाऱ्या व स्वतः ख्यातनाम कवी असलेल्या जविंच्या नावानं स्थापन होत असलेला हा काव्य मंच म्हणजे जविंच्या साहित्यिक ज्येष्ठतेचा गौरव तर आहेच परंतु या काव्य मंचाला ज.वि. पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळावे हाही या मंचाचा उद्देश आहे. बुद्ध आंबेडकरी मूल्यपोषक दर्जेदार काव्य निर्मितीसाठी हे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
याच कार्यक्रमात आंबेडकरराईट असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका अर्थात ‘आना ‘ या संस्थेने ज.वि. पवार यांना जाहीर केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारतातील ‘आना ‘ चे प्रतिनिधी कवी के. पुरुषोत्तम, आयु. नूतन पोळ व भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते जविंना प्रदान करण्यात आला.
‘आंबेडकरराईट असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका ‘ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्याची माहिती नूतन पोळ यांनी दिली.
यावेळी जविकिरण काव्य मैफिलीत प्रा. उत्तम भगत यांच्या दमदार सूत्रसंचालनात संपन्न झालेल्या पहिल्याच कवी संमेलनात कवी सुधाकर सरवदे, सदा बांबुळकर, कवी गजानन गावंडे, गझलकार सुनील ओवाळ, डॉ. संजय खैरे, कवी अनंत धनसरे, बाळासाहेब झोडगे, के. पुरुषोत्तम, अशोक चाफे, अशोक कांबळे, राजेश शिर्के, वासुदेव जुवाटकर, राजेंद्र बनसोडे, धम्मकिरण चन्ने,भागवत येलवे, विनायक अजगणकर, विनिशा धामणकर, विकास पवार, संतोष नरवाडे इ. कवींनी आपल्या दर्जेदार कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांच्या गझल सादरीकरणाने कवी संमेलनाची सांगता झाली. जविकिरण काव्य मैफलीचे निमंत्रक धम्मकिरण चन्ने यांनी आभार प्रदर्शन केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!