मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
मराठवाड्याचा समृद्ध वारसा! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त लेख…
डॉ. श्रीमंत कोकाटे
आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आपण १५ ऑगस्ट रोजी साजरा करतो, परंतु मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वतंत्र झाला, त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मराठवाड्यावर हैदराबादच्या निजामाचे राज्य होते आणि तो भारतात विल्ली होण्यासाठी अनुत्सुक होता, परंतु तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुसद्दी आणि धाडसी धोरणामुळे मराठवाडा भारतात विलीन झाला. अन्यथा देशांतर्गत एक देश झाला असता आणि ते सुरक्षितता आणि सार्वभौमत्वासाठी धोकादायक होते. या सर्व पार्श्वभूमीवर १७ सप्टेंबर या दिवसाचे केवळ मराठवाड्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मराठवाडा हा केवळ भूभाग नाही, तर तो एक महान सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय असा ऐतिहासिक वारसा आहे. गोदावरी, मांजरा, तेरणा, पैनगंगा इत्यादी नद्यांनी मराठवाडा पोसला आहे. मराठवाड्याला खूप मोठा प्राचीन असा समृद्ध वारसा आहे. प्राचीन काळातील सोळा महाजनपदांपैकी एक जनपद महाराष्ट्रात होते. ते गोदावरीच्या खोऱ्यात नांदेडच्या पंचक्रोशीत होते, यालाच अश्मक असे म्हटले जाते. मराठवाड्याचा थेट व्यापार रोम साम्राज्याशी चालत होता. त्याच्या पाऊलखुणा आताचे तेर, भोकरदन, पैठण(प्रतिष्ठान) इत्यादी ठिकाणी प्रकर्षाने दिसतात. भारतातील महत्त्वाची राजसत्ता सातवाहन यांनी सुमारे दोनशे वर्षे महाराष्ट्र, आंध्रप्रदेशवर राज्य केले. त्यांची राजधानी प्रतिष्ठान तथा पैठण होती. एकेकाळी पैठण ही महाराष्ट्राची राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक राजधानी होती. सर्वज्ञ चक्रधरांच्या माहानुभाव पंथाचे आणि संत एकनाथाच्या वारकरी संप्रदायाचे पैठण हे महत्त्वाचे केंद्र होते. धार्मिक निवाड्याचे ते न्यायालय होते.
महाराष्ट्राचा महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा मराठवाड्यात आहे. मराठवाड्यात सातवाहन, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकूट आणि यादव यांनी प्राचीन काळात राज्य केले. त्यांच्या काळात मराठवाड्याचा सांस्कृतिक विकास मोठ्या प्रमाणात झाला. अजंठा, वेरूळ इत्यादी जगप्रसिद्ध लेणी हा जागतिक वारसा मराठवाड्यात आहे. वेरूळ येथील कैलास मंदिर हे अखंड पाषाणात कोरलेले मंदिर हे एक जागतिक आश्चर्य आहे. घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ इत्यादी देवस्थान ही देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाची ज्योतिर्लिंग आहेत. यांच्या दर्शनासाठी देशभरातून दरवर्षी कोट्यवधी भाविक मराठवाड्यात येतात. अजंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक मराठवाड्यात येतात.
आई तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलदेवता आहे. ती प्राचीन काळातील स्त्रीराज्याची महाराणी होती. छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूरच्या भवानीचे निस्सीम भक्त होते. मराठवाड्याला जैन, बौद्ध आणि शीख धर्माचादेखील खूप मोठा वारसा आहे. कुंथलगिरी हे जैन धर्माचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मराठवाड्यातील अनेक लेण्या जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाची साक्ष देत आहेत. नांदेड येथील गुरुद्वारा हा गुरुगोविंदसिंग यांच्या पराक्रमाची, त्यागाची आणि राष्ट्रभक्तीची साक्ष देत आहे. दक्षिण भारतावर मोठा प्रभाव असणाऱ्या बसवन्नाच्या लिंगायत धर्माचादेखील मोठा प्रभाव मराठवाड्यातील धाराशिव, लातूर नांदेड या सीमावर्ती भागामध्ये आहे.
पेशावरपासून तेलंगणा, आंध्र प्रदेशापर्यंत प्रभाव असणाऱ्या महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ चक्रधरांचे प्रदीर्घ वास्तव मराठवाड्यात झालेले आहे. सर्वज्ञ चक्रधरांनी जीव उद्धाराचे महान कार्य केले. समता, स्त्रीस्वातंत्र्य आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारांचा त्यांनी प्रसार केला. त्यांनी वर्णव्यवस्था नाकारली. अस्पृश्यतेला तिलांजली दिली. महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले. अहिंसेचा प्रचार केला. अशा क्रांतिकारक चक्रधरांचा महत्त्वपूर्ण कालखंड मराठवाड्यात गेला. नांदेड, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर इत्यादी जिल्ह्यात त्यांचे प्रदीर्घकाळ वास्तव्य होते. त्यांच्या महत्त्वाच्या शिष्यगणापैकी नागदेवाचार्य, महदाईचा, उमाईसा, धानाईसा, इंद्रभट, सारंगपंडित, दादोस(रामदेव), राणाईसा, नागुबाईसा, आबाईसा, देमाईसा इत्यादी शिष्यगण मराठवाड्यातीलच होते. आपला महत्त्वाचा कालखंड चक्रधरानी मराठवाड्यातच व्यतीत केला. ते कटक देवगिरी येथूनच उत्तरापंती गेले, अशी महानुभावपंथीयांची श्रद्धा आहे. सर्वज्ञ चक्रधरांच्या कार्याने, विचाराने, तत्त्वज्ञानाने आणि पदस्पर्शाने मराठवाड्याची भूमी पावन झालेली आहे. मराठीतील पहिला ग्रंथ लीळाचरित्र लिहिणारे म्हाइंभट हे मराठवाड्याचे सुपुत्र आहेत. लीळाचरित्रात तत्कालीन मराठी भाषा, मराठी संस्कृती प्रकर्षाने दिसते. महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, व्यापार, आहार, कृषिव्यवस्था आणि भाषिक वारसा जतन करून ठेवण्याचे महान कार्य लीळाचरित्रने केलेले आहे. लीळाचरित्र हा मराठवाड्याचा महान वारसा आहे.
वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर हे मराठवाड्याचे सुपुत्र होते. औंढा नागनाथ हे संत नामदेवाचे गाव, तर तर संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे मूळ गाव आहे. संत जनाबाई या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील आहेत. संत बहिणाबाई शिऊरकर, संत गोरोबाकाका, संत एकनाथ, संत भगवानबाबा इत्यादी संत मराठवाड्यात जन्मले, परंतु त्यांचे कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक असे आहे. वारकरी संप्रदाय हा मराठवाड्याचा समृद्ध वारसा आहे.
दक्षिण भारतावर राज्य करणाऱ्या यादवांची राजधानी मराठवाड्यातील देवगिरी येथेच होती. खिलजी, तुघलक, निजाम, मोगल, आदिलशहा आणि कुतुबशाहाच्या पाऊलखुणा मराठवाड्यात आहेत. किल्ले देवगिरी, किल्ले धारूर, किल्ले परंडा, नळदुर्ग, रामलिंग, किल्ले कंधार, माळेगावचा खंडोबा इत्यादी मराठवाड्याचा महत्वपूर्ण वारसा आहे.मलिकांबराच्या कार्याची साक्ष छत्रपती संभाजीनगरात दिसते. पाणचक्की, बिबिका मकबरा हा महत्त्वाचा वारसा आहे.
मोगल,आदिलशहाची जुलमी सत्ता नष्ट करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ हे आहे, किंबहुना वेरूळचे भोसले हे इतिहास प्रसिद्ध घराणे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजी भोसले यांनी वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांचे पुत्र मालोजी आणि विठोजी यांनी सर्वदूर पराक्रम गाजविला. मालोजींचे पुत्र शहाजीराजे आणि शरीफाजीराजे यांनी पराक्रमाची शर्थ केली. शिवाजीराजेंनी शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले, असे जगविख्यात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भोसले घराणे मूळचे मराठवाड्यातीलच आहे, असा हा मराठवाड्याचा समृद्ध वारसा आहे.
आधुनिक मराठवाड्याच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे, बलभीम कदम, भाई उद्धवराव पाटील, भाई केशवराव धोंडगे, शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे इत्यादी लोकनेते यांचे मोलाचे योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगर येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद महाविद्यालय सुरू केले, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली, त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले. बलभीम कदम, भाई उद्धवराव पाटील, भाई केशवराव धोंडगे, शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी राजकीय, शैक्षणिक, सहकार, औद्योगीकरण क्षेत्रात मोलाचे कार्य केलेले आहे. विशेषत: मराठवाड्याची जीवनदायनी जायकवाडी धरण उभारून शंकराव चव्हाण यांनी मराठवाड्याचा कायापालट केला.
आज मराठवाड्यात औद्योगीकरण अत्यल्प प्रमाणात आहे. मराठवाड्यात दळणवळणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत. मराठवाड्यात शैक्षणिक सुविधा कमी प्रमाणात आहेत. मराठवाड्यात जलसिंचनाचे प्रमाण अल्प आहे. मराठवाड्यात पावसाचा दुष्काळ मोठ्या प्रमाणात आहे, परंतु मराठवाड्यात सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक आणि ऐतिहासिक दुष्काळ अजिबात नाही. मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ आहे, परंतु माणुसकीचा दुष्काळ अजिबात नाही. माणुसकी, आतिथ्य, पाहुणचार, प्रेमळपणाचा आणि सामाजिक-सांस्कृतिक लढ्याचा प्रामाणिक आणि निर्भीड असा समृद्ध वारसा मराठवाड्याला लाभला आहे. मराठवाड्यातील लोक इतके माणुसकीचे आहेत की, चोर जरी चोरी करायला आला तरी चोरालादेखील जेऊ घालतील इतकी माणुसकी मराठवाड्यात आहे. मराठवाडा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाया आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आधार म्हणजे मराठवाडा आहे. महाराष्ट्र संस्कृतीचा मौल्यवान संदर्भ म्हणजे मराठवाडा आहे. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे, त्यानिमित्त सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- डॉ. श्रीमंत कोकाटे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत