महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

!! मी गुलाम नाही ? !!

प्रा.आकाश

वरील तीन शब्द मला लागू होत नाही ! असं बहुतेकांना वाटत असेल. पण मी म्हणतो, वाटू द्या ! थोडासा का होईना फरक पडू द्या. साखळीने बांधलेला किंवा पिंजऱ्यात ठेवलेला किंवा मुकाट्याने आज्ञा पाळणारा म्हणजे गुलाम या पूर्वग्रहदूषित विचाराला जरा फाटा फोडून घ्या. मी गुलाम आहे, आणि नसेल तर गुलाम व्हायला तयार आहे असं काहीसं आता स्वाभिमानाने सांगण्याची सवय करून घ्या.

धर्मधिष्ठीत व्यवस्थेला मानणारे लोकं देशाचा विकास करू शकत नाही. कायम स्वतःचा विकास बघणारे समाजाचा विकास करू शकत नाही. जिथपर्यंत हे दोन लोकं अस्तित्वात आहेत तिथपर्यंत समाजात समान न्याय स्थापीत होऊ शकत नाही आणि समाजात समान न्याय नसेल तर अशा समाजात मालक आणि गुलाम ही अवस्था निर्माण झालीय असं समजावं.

संपूर्ण आयुष्य गहाण टाकायला एक मोहाचा क्षण पुरेसा असतो. मग तो व्यसनाचा असो, व्यभिचाराचा असो, कर्जाचा असो, मतदानाचा असो की धर्माचा असो. आपलं आयुष्य आपण गहाण टाकत चाललोय. सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा आपल्या व आपल्या लेकरांच्या आयुष्यावर विपरित परिणाम पडतो पण हे दिसत असतांनाही केवळ “माझ्या पक्षाची सरकार” या भावनिक मोहामुळे आपलं आयुष्य आपण आपल्या राजकीय पक्षाच्या चरणी गहाण टाकतोय.

लोकशाहीत मी जबाबदारीचा गुलाम आहे. पण मला जबाबदारीच्या गुलामगिरीतून धार्मिक गुलामगिरीत कोणी जायला भाग पाडलं ? असा प्रश्न आता स्वतःला विचारण्याची वेळ आलीय. संकटाशी लढायचं की सरकारशी ? असा प्रश्न भारतात बहुतेक नागरीकांना पडत असेल ! पण मग, काहीच करता येत नाही म्हणून गप्प बसायचं, असंच आपण जगत आलोय आणि जगत आहोत.
अशा जगण्याच्या अवस्थेला राजकीय पक्षनिष्ठ मानसिक गुलामी शब्द देता येईल.

समान न्याय जर समाजात अस्तित्वात नसेल तर आपण गुलाम आहोत असं समजावं. समान‌ संधी जर समाजात नसेल तर स्वतःला गुलाम समजावं. उज्वल भविष्याची स्वप्न बघण्याचा मला अधिकार नाही असं वाटत असल्यास आपण गुलाम समजावं. अन्याय होत आहे असं दिसत असल्यावरही माझ्यावर होत नाही म्हणून गप्प बसल्यावर स्वतःला गुलाम समजावं. लोकशाहीत मताचा योग्य वापर करता येत नसल्यास आपल्याला गुलाम समजावं. स्वतःच्या समस्येला सोडवायला कुणीतरी येईल अशी आशा बाळगणाऱ्यांनी स्वतःला गुलाम समजावं. व्यसनातून बाहेर पडता येत नसल्यासही गुलाम समजावं. विकास करणे सरकारचं काम आहे असा भ्रम बाळगणाऱ्यांनी स्वतःला गुलाम समजावं. व्यवस्थेनुसार जगणे गरजेचे आहे असं जर जगत असल्यास स्वतःला गुलाम समजावं. वारंवार कर्ज घेणाऱ्यांनीही स्वतःला गुलाम समजावं. दुकानात गेल्यावर अनावश्यक वस्तू खरेदी करणाऱ्यांनीही स्वतःला गुलाम समजावं. वारंवार वाढता कर व किमती का भरू ? असा प्रश्न न विचारता निमूटपणे कर भरणाऱ्यांनी स्वतःला गुलाम समजावे. माझा राजकीय पक्ष निवडणूक जिंकला म्हणून फटाके फोडणाऱ्यांनी व मिरवणूकीत नाचणाऱ्यांनी स्वतःला गुलाम समजावे. पगार मिळणे सुरू झाल्यावर समाजापासून अलिप्तता स्वीकारल्यास स्वतःला गुलाम समजावं. असे कितीतरी उदाहरणं देता येतील पण मूळात प्रश्न हा आहे की, लोकशाहीत माझा हा अमूक अमूक राजकीय पक्ष आहे असं मतदार कसं काय ठरवू शकतात ? आणि असं ! ठरवून मतदान करणाऱ्यांनी स्वतःला मानसिक व वैचारिक गुलाम समजावं. या देशाचं दुर्भाग्य हे आहे की, बहुसंख्य मतदार थोपविलेली राजकीय पक्षाची गुलामी स्वीकारून जगत आहेत व स्वतःच स्वत:साठी व पर्यायाने समोरच्या पिढीसाठी समस्या निर्माण करत आहेत.

भारतात बघ्याची भूमिका घेणारे गर्दीत दिसतील व वेगळी वाट निवडणारे या संपूर्ण गर्दीला मूर्ख वाटतील अशी गर्दी जेव्हा राजकीय पक्षाची गुलाम बनते तेव्हा त्यांचा राजकीय पक्ष त्यांच्याच समाजाची नासधूस करण्यास सुरुवात करतो व नेहमीच्या सवयीप्रमाणे हीच गर्दी परत बघ्याची भूमिका घेत असते. मणीपूर हा या गर्दीसाठी धडा होता व एखादा कप जिंकल्यावर रस्त्यावरची गर्दी ही बघ्याची भूमिका घेणाऱ्यांची गर्दी होती.

पालक त्यांच्या मुलांना शिकवतात की, नाही समजल्यास किंवा न पटल्यास शिक्षकांना प्रश्न विचारा पण हेच पालक सरकारचं चुकीचं दिसत असतांनाही आपल्या राजकीय पक्षाला प्रश्न विचारत नाही. ही या पालकांची स्व-स्वीकार्य गुलामी आहे. आपल्या लेकरांचं खोटं बोलणं आपल्या जिव्हारी लागते पण आपण निवडून दिलेला नेता जेव्हा आपल्यासमोर धडधडीत खोटं बोलतो तेव्हा आपण बेशरमासारखे हसतो आणि खऱ्या अर्थाने तेव्हा आपण निर्लज्ज होतो.

या सर्वांची सुरूवात आपणचं‌ केलीय, या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत आपण आपल्या राजकीय पक्षाचे, भांडवलदारांचे, सजवलेल्या दुकानांचे, गरज नसलेल्या वस्तूंचे, निर्माण केलेल्या व्यवस्थेचे, आपल्या रंगाच्या झेंड्याचे, आपण पैसे ठेवत असलेल्या बॅकांचे, आपण निवडून दिलेल्या नेत्याचे, स्वतः निर्माण केलेल्या समस्यांचे, धर्म नावाच्या षड्यंत्राचे, मुलांच्या शाळेच्या रिपोर्ट कार्डचे, मिळणाऱ्या वेतनाचे, सरकारने दाखवलेल्या विकासाचे, वारंवार भराव्या लागणाऱ्या कराचे, आपण कधी गुलाम झालो आपल्याला कळलेच नाही.
अशी जगण्याची सवयच पडल्यामुळे मूळात हे आपल्याला कधी चुकीचे वाटलेच नाही. चला जाऊ द्या, आपण असेच जगत राहू. या स्वतंत्र देशातील लोकशाहीत “मी कुणाच्या बापाचा गुलाम नाही” असं छाती ठोकून सांगत राहू.

©प्रा.आकाश
नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी
profakash123@gmail.com
7/7/2024

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!