उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार- मराठवाड्याला सावधानतेचा इशारा
मुंबई : राज्याच्या काही भागांमध्ये तापमानाचा आकडा हवामान बदलांमुळं कमीजास्त होताना दिसत असून, सध्या कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्र सूर्याच्या तीव्रतेनं होरपळून निघताना दिसत आहे. अवकाळीचं सावट अधूनमधून डोकावत आहे पण राज्यात उकाडा प्रचंड वाढताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
सध्याच्या घडीला विदर्भ, कर्नाटकसह तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळं दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळीसुद्धा उन्हाच्या झळांची उष्णता दाणवचत आहे. दुपारच्या वेळी तापमानात होणारी लक्षणीय वाढ रात्रीपर्यंत कायम राहत असल्यामुळं ही परिस्थिती उद्भवत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. याच धर्तीवर धाराशिव, नांदेड, लातूर आणि सोलापूरात उष्ण रात्रीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात सध्या सुरु असणारा एप्रिल आणि ऐन उन्हाळ्यातला मे महिना अधिक उष्ण राहणार असून, यादरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत उष्णतेच्या लाटा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील उष्णतेच्या लाटेचा काळ दोन दिवसांपासून आठ दिवसांपर्यंत असू शकतो. त्यामुळं दैनंदिन कामं आणि सध्या सुरु असणारी निवडणुकांची रणधुमाळी पाहता या काळात विशेष काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागानं केल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत