संत गाडगेबाबा (महाराज) भाग – १.

(सांस्कृतिक/संत वाणी)
अशोक सवाई.
आपल्या महाराष्ट्राला संत परंपरां, महापुरुषांचे मजबूत पुरोगामी विचार आणि वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. संस्कृती लाभलेली आहे. तेच विचार तिच संस्कृती साऱ्या देशात बहुजनांपर्यंत पोहचलेली दिसत आहे. काही बहुजन अजूनही मनुवादी विचारांचे, संस्कृतीचे(?) किंवा परंपरेचे वाहक आहेत. ताजेच उदाहरण द्यायचे झाले तर इलाहाबाद हाय कोर्टाचे जज्ज शेखर कुमार यादव यांचे देता येईल. जज्ज शेखर कुमार यादव हे मनुस्मृती प्रमाणे शुद्र ठरतात. तरीही ते मनुवादी विचारांचे ओझे वाहत आहेत. ज्याप्रमाणे काही शिक्षित/उच्च शिक्षित माणसं विवेकी किंवा सुसंस्कृत नसतात त्याचप्रमाणे सर्वच अशिक्षित माणसं देखील अविवेकी किंवा असंस्कृत असू शकत नाही. गाडगेबाबा याच पठडीतील होते. हे लक्षात घेतले पाहिजे. असो.
तेराव्या शतकातील संत नामदेव यांचा जन्म १२७० चा आहे असे इतिहासाचे अभ्यासक सांगतात. तर संत गाडगेबाबांचा जन्म १८७६ म्हणजे एकोणिसाव्या शतकातील. नामदेवांपासून ते संत गाडगेबाबा पर्यंत असी फार मोठी संत परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे. पहिले संत नामदेव तर शेवटचे संत गाडगेबाबा. संत म्हणजे आपला स्वतःचा कोणताही स्वार्थ/लोभ न ठेवता लोकांच्या भल्यासाठी, त्यांच्या प्रबोधनासाठी, त्यांचे अज्ञान दूर होण्यासाठी, त्यांचे जीवन सुसह्य जगण्यासाठी, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतलेले असते किंवा मानवी जीवनाच्या पलीकडे पाहणारे असतात. ते संत या उपाधी पर्यंत जावून पोहोचतात. आणि तेच खरे संत असतात. पुढे भविष्यात या देशात असे संत जन्माला येतील किंवा नाही हे सांगता येत नाही. मानवी जीवन सुखी होण्यासाठी दृश्य/अदृश्य पणे संतांकडे आलेले अंशतः ज्ञान स्त्रोत हा तथागत गौतम बुद्धांकडून आलेला असावा असे मला वाटते. असो.
आपल्या महाराष्ट्रात जबरदस्त विद्रोही संत म्हणजे संत तुकोबाराय तर दुसरे नास्तिक संत गाडगेबाबा. लोकांचे प्रबोधनात्मक किर्तन करताना तुकोबारायांचे वाद्य होते तंबोरा आणि चिपळ्या. तर गाडगेबाबांचे वाद्य होते. खंजेरी (खंजीर नव्हे नाही तर आत्ताच्या पिढीत खंजेरी च्या बाबतीत काहीतरी गैरसमज निर्माण होईल) खंजेरी म्हणजे पूर्वी एका चार इंच रुंदीच्या जाड पितळेच्या किंवा लोखंडी गोलाकार पट्टीला एका बाजूला ढोराचे चामडे ताणून घट्ट बसवलेले असते. व दुसऱ्या बाजूचा भाग मोकळा असतो. गोलाकार पट्टीवर लोखंडी किंवा पितळेच्या गोल पातळ चकत्या ठराविक अंतरावर लोखंडी तारेत ओवून ती तार खंजेरी च्या जाड पट्टीवर घट्ट बसवलेली असते. खंजेरी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने ताणलेल्या चामड्यावर थाप मारली की त्या आवाजा सोबतच ओवलेल्या चकत्यांचा छनछनाट होत असे. (सरगम या चित्रपटातील ऋषी कपूरची डफली बघा, फरक एवढा आहे की डफली मोठ्या आकाराची असते खंजेरी छोट्या आकाराची) वरील वाद्यांवर या दोन संतांचे किर्तन चालत असे. संत तुकाराम विद्रोही होते. तरी ते किर्तनात विठलाचा नामजप करत असत. तर संत गाडगेबाबा नास्तिक होते तरीही ते आपल्या किर्तनात 'देवकीनंदन गोपाला' चा गजर करत असत. वरील दोन्ही संतांनी लोकांच्या मानसिकतेची नस बरोबर पकडली होती. पूर्वीचे लोक अतिशय देवभोळे होते. आपले नसीबच त्यांनी देवदेवतांच्या हवाली केले होते. किर्तनाच्या सुरवातीलाच जर संत तुकोबांनी आपला विद्रोहीपणा व संत गाडगेबाबांनी नास्तिकता दाखवली असती तर त्यांच्या कीर्तनाला एकही माणूस आला नसता. सुरवातीला देवतांचा नामजप करून मग माणसं जमली की, हळूहळू कीर्तनातून त्यांच्या प्रबोधन कौशल्याने पुढच्या प्रबोधनाला खरा रंग चढत असे. व लोकांनाही हळूहळू ते पटत असे. इथे एक गोष्ट सांगितली पाहिजे. डेबूजीच्या मनावर लहानपणापासूनच संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा प्रभाव राहिलेला होता, आपल्या किर्तनात ते मोठ्या खुबीने त्याचा उपयोग करून घेत असत.
मनुवाद्यांनी या संतांमध्ये सूक्ष्म भेदभाव पेरून ठेवला. काही उदाहरणे पाहू १) चोखा=महार २) गोरोबा=कुंभार ३) सावता=माळी ४) नरहरी=सोनार असे बरेच. प्रत्येक संताच्या मागे या लोकांनी त्यांची जात चिकटवली. का तर प्रत्येक जातींनी आपापल्या जातीतील संतांना श्रेष्ठ मानावे. व जातीजातीत कलह निर्माण व्हावा व त्यांचे विभाजन होऊन ते एकमेकां पासून दूर राहावे. जर हे एकत्र आले तर आपण अतिअल्प असलेले ब्राह्मण त्यांचा कोणत्याही बाबतीत मुकाबला करू शकणार नाही/त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही
यासाठी हा त्यांच्या छद्मीपणाचा, कपटनितीचा, किंवा षडयंत्राचा सुप्त उद्देश होता व आजही आहे. यासाठी ते फक्त मार्ग बदलतात उद्देश तोच असतो.
संत गाडगेबाबांचा जन्म अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील शेणगांव या खेडेगावात दि. २३ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. या दिवशी महाशिवरात्री असल्याचे अभ्यासक सांगतात. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी जाणोरकर उर्फ वट्टी होते. वट्टी ही काही जात नसून त्यांना पडलेले पडनाव होते. ते परीट म्हणजे धीबी समाजाचे होते. पण त्यांचा धोबीचा व्यवसाय नसून ते शेतकरी होते, तर गाडगेबाबांच्या आईचे नाव सखुबाई होते. सखुबाईचे माहेर दापुरे. दापुरे हे लहानसे गाव मूर्तिजापूर तालुक्यात अकोला जिल्ह्यातील आहे. इकडे झिंगराजी जवळ बरीच जमीन होती. जमीन कसदार होती. त्यात झिंगराजीची मेहनत या द्वयीमुळे जमीनीतील पिकांच्या उत्पन्नातून झिंगराजीच्या खिशात बराच पैसा खळखळू लागला. त्यांची सधन शेतकऱ्यात गणना होवू लागली. पण माणसाच्या खिशात पैसा खेळू लागला की त्या पैशाला अनेक वाटा फुटतात असे म्हणतात. तसेच झिंगराजीचे झाले. ते मरीआई, आसराई, मसोबा, विरोबा या देवांच्या नादी लागून तेथे कोंबड्या, बकऱ्यांचा नैवेद्य चढवू लागले सोबत दारूही होतीच. त्यामुळे झिंगराजीला सुद्धा दारूचा चस्का लागला. तो पुढे इतका वाढला की झिंगराजीने आपली जमीन गमावली. कर्जबाजारी झाले. व दारूच्या व्यसनापाई शेवटी त्यांनी १८८४ मध्ये शेवटचा श्वास घेतला. तेव्हा गाडगेबाबा केवळ आठ वर्षाचे होते. जमीन गेल्यामुळे सखुबाई व छोट्या डेबूजीवर हलाखीचे जीवन जगण्याची पाळी आली. हे सखुबाईचे वडील चंद्रभानजी यांना कळल्यावर ते सखुबाई व छोट्या डेबजीला दापुरे या आपल्या गावी घेऊन गेले व त्यांचे पालनपोषण केले.
गाडगेबाबा लहान असतांना त्यांचे पोट मोठे होते. म्हणून त्यांचे समवयीन असलेले इब्लिस पोरंसोरं त्यांना ढेब्या म्हणून चिडवत असत. विदर्भात ढेरपोट्याला ढेब्या किंवा ढेबू म्हणतात. पुढे गाडगेबाबा ढेबूचे डेबूजी झाले. पण मला वाटते त्यांचे डेबूजी हे टोपणनाव नाव असावे. मूळ नाव वेगळे असावे. कारण डेबूजी नाव सर्वश्रुत झाल्यामुळे तेच प्रचलित झाले असावे आणि मूळ नाव मागे पडले असावे असे मला वाटते. त्यांच्या मूळ नावाचा शोध घ्यायला पाहिजे.
गाडगेबाबा जरी अशिक्षित असले तरी त्यांची विवेकबुद्धी उच्च दर्जाची होती. ही त्यांना नैसर्गिक देणगी लाभली असावी. पुढे त्या देणगीच्या जोरावर बाबा कीर्तनातून लोकांचे प्रबोधन करू लागले. प्रबोधनातून लोकांचा विवेक/चेतना जाणवू लागले. आता गाडगेबाबांना लोक गाडगेबाबाच का म्हणत हेही थोडक्यात पाहू. गाडग्याचा तोडांकडील भाग अर्ध्यातून कतरून उरलेला भाग एखाद्या मोठ्या वाडग्यासारखा वाटे. बाबा थिगळ्यांचे वस्त्र वापरीत. चेहरा उघडा ठेवून आपली थिगळ्यांची गोधडी डोक्यापासून पांघरूण घेत व त्यावर ते वाडग्यासारखे गाडग्याचे खापर आजच्या हेल्मेट सारखे उबडे ठेवत. सदानकदा त्यांचा हाच पेहराव असे. त्या गाडग्याच्या खापरामुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले. पुढे ते गाडगेबाबा किंवा गाडगे महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. ते शहराच्या ज्या गल्लीत जात तिथे प्रथम आपल्या खराट्याने गल्लीची साफसफाई करत नंतर जवळच्या ओढ्यावर किंवा विहीरीवर जावून हातपाय धूवून स्वच्छ होत. नंतर ते त्या गल्लीतील एखाद्या घराजवळ जावून आपल्या डोक्यावरील गाडग्याचे खापर समोर करून म्हणत माय... शिळा भाकर तुकडा वाढा वो माय... काही काळाने गाडगेबाबा सर्वांच्या परिचयाचे झाले. काही सद्गृहीणी बाबांना ताजे जेवण देत. नाही तर खास त्यांच्यासाठी बनवून देत. कारण त्यावेळी माणसांमध्ये माणूसकी ओतप्रोत भरलेली असे. बाबा जिथे जात तिथे त्या गावाची किंवा शहराची स्वच्छता करत व रात्री त्यांचे लोकप्रबोधनाचे किर्तन चालत असे. अशाप्रकारे निस्वार्थीपणे बाबांचे लोकप्रबोधनाचे कार्य सुरू झाले. आणि ते डेबूजीचे गाडगेबाबा किंवा गाडगे महाराज झाले.
पुढे संत गाडगेबाबा हे तर अख्ख्या महाराष्ट्रभर फिरणारे चालते बोलते तत्त्वज्ञानाचे संस्कारपीठ/ विद्यापीठच झाले होते. त्यांच्याजवळ त्यांच्या ठेवणीतला खास वैदर्भीय शब्द भंडार होता. हा भंडार त्यांच्या स्वतःच्या मालकीचा होता.
बाबा किर्तनाची सुरवात गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला… या गोपाल गजरात करत. मग लोकांसाठी खऱ्या प्रबोधनाच्या रंगात रंगून जात असत.
“सोन्याचांदीचा देव त्याले चोराचं भेव… लाकडाचा देव त्याले इस्त्याचं भेव… मातीचा देव त्याले पाण्याचं भेव… ह्या देवाले देव पण नाही रे… त्याले सोताचं राखन करता येत नाही रे”… मंग सांगा बावहो ज्याले सोताचं राखन करता येत नाही तवा तो तुमचं राखन कारन काय? यावर जमलेले लोक म्हणत “नाही”. मग पुन्हा गाडगेबाबा प्रश्न विचारत. मंग मले सांगा बापहो या दुनियेत देव हाय काय? लोक पुन्हा उत्तर देत “नाही” मंग बोला ” गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला” लोकही त्यांच्या मागून गोपालाचा गजर करत असत. अशाप्रकारे हा प्रश्नोत्तराचा सिलसिला रात्री उशिरापर्यंत चालत असे. एक प्रकारे गाडगेबाबा आपल्या ठेवणीतल्या शब्दांचे एक एक तीर मनुवादी ब्राह्मणांच्या मर्मावर सोडून त्यांना घायाळ करत. अशाप्रकारे ते कीर्तनातून लोकांचे प्रबोधन करून त्यांच्यात विवेकाचा जागर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असत.
बाबा पुढील किर्तनात म्हणतात *"खरा देव ओयखा. अन् त्याचीच पूजा करा बाप हो. देव तीर्थात नाय, मुर्तीत नाय तो तुमच्या समोर दरिद्री नारायणाच्या रूपात उभा हाय, त्याचीच पिरमाने (प्रेमाने) सेवा करा"...*
गाडगेबाबांनी बहुजनांना दहा अमर संदेश देवून ठेवले आहेत.
१) भुकेल्याला अन्न द्या.
२) तहानलेल्याला पाणी द्या.
३) गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत करा.
४) बेघरांना आसरा द्या.
५) अंध व पंगू लोकांना औषधोपचार करा.
६) बेकारांना रोजगार द्या.
७) उघड्या नागड्यांना वस्त्रे द्या.
८) पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय द्या.
९) गरीब तरुण-तरूणींचे लग्न लावून द्या.
१०) दु:खी व निराशांना हिंमत द्या.
हाच आमचा रोकडा धर्म आहे. हीच खरी भक्ती व देवपूजा आहे.
(क्रमशः)
अशोक सवाई.
91 5617 0699. (सांस्कृतिक/संत वाणी)
————————————–
संत गाडगेबाबा (महाराज) भाग – २.
अशोक सवाई.
गाडगेबाबा जेव्हा १६-१७ वर्षाचे झाले होते तेव्हा चंद्रभानजीने दापुरे या त्यांच्याच गावाजवळ असलेले कमलापूर या गावी सोयरीक जमवून आणली. त्याकाळी मुलाचे वय १६-१७ अन् मुलीचे वय १२-१३ वर्षाचे झाले की, घरच्या मंडळींना त्यांचे लगीन लावून देण्याची घाई सुटत असे.
मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबा (चरित्र आणि विचारधन) या ग्रंथाचे लेखक डॉ. उद्धव रसाळे आपल्या ग्रंथाच्या पान नं. २५९/२६० वर म्हणतात “बाबांच्या धर्मपत्नीचे नाव कुंताबाई. तिचा जन्म कमलापूर येथील धनाजी परिटाच्या घरी झाला. कुंताबाईंनी बाबांच्या प्रपंचाला सन १८९२ पासून सुरवात केली. कुंताबाईंना एकूण चार मुले झाली अलोकाबाई, कलावती या दोन मुली. मोठा मुलगा मुद्गल लगेच वारला. धाकटा मुलगा गोविंद, बाबांनी ज्या वेळी गृहत्याग केला त्या वेळी गोविंद तीन महिन्यांचा पोटात होता. बाबांच्या त्यागानंतर कुंताबाईचे आणि मुलांचे खूप हाल झाले पण तिने असेल त्या परिस्थितीशी तोंड देऊन दिवस काढले. जगाच्या दृष्टीने कुंताबाई फार मोठ्या भाग्याच्या ठरल्या. बाबांच्यासारख्या महापुरुषांची पत्नी होने यासारखं दुसरं भाग्य कोणतं? बाबा स्वभावाने जेवढे मवाळ तेवढेच कठोर. मवाळ वात्सल्य दुसऱ्यासाठी तर कठोरता निर्दयता स्वतःच्या कुटुंबासाठी, बाबांच्या या हेकेखोर स्वभावामुळे कुंताबाईंना खूप त्रास झाला. कुंताबाईचा विचार करता संत तुकारामांच्या जिजाबाईची आठवण आल्याशिवाय राहात नाही. दोघींच्या प्रपंचात कमालीचे साम्य. फरक एवढाच की, श्रीसंत तुकाराम शांत मवाळ नम्र तर जिजाबाई चिडखोर खंबीर स्वभावाची. बाबा कठोर खंबीर, कुंताबाईं शांत मवाळ स्वभावाची. संत तुकारामांच्या वैराग्यानंतर त्यांच्या कुटुंबाची जी अवस्था झाली तीच अवस्था बाबांच्या वैराग्यानंतर त्यांच्या कुटुंबाची झाली. त्याग वैराग्यानंतर दोघांच्याही बायका-मुलांची हेळसांड झाली. दोघांचेही प्रपंच दुर्लक्षित राहिले. दोघांचेही प्रपंच त्यांच्या धर्मपत्नींनी सांभाळले” हा बाबांच्या वैवाहिक प्रपंचाचा अंशतः भाग.
बाबा १९०५ ते १९१७ असे बारा वर्षे अज्ञातवासात होते. ते का गेले? कुठे गेले? कसे गेले हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. परंतु १२ वर्षाच्या कालावधी नंतर ते हातात खराटा घेऊन गावाची, शहराची दिवसा साफसफाई व रात्री प्रबोधनात्मक किर्तन असा वसा घेतल्या प्रमाणे त्यांचे लोकसेवेसाठी कार्य सुरू झाले ते त्यांच्या जीवनाच्या अखेर पर्यंत.
वरील ग्रंथाचे लेखक पुढे पान नं. २६४ वर म्हणतात "गोविंदाला पिसाळलेल्या कुत्र्याची बाधा झाली हे उशिरा कळले. होता होईल तेवढे उपचार करण्यात आले पण त्याला फारसे यश आले नाही. या विकारात चि. गोविंदाचे ५ मे सन १९२३ रोजी रात्री निधन झाले. ही अल्प वयातील घटना ऐकून सर्वांना दु:ख झाले पण ईश इच्छेपुढे इलाज नसतो, त्या दिवशी बाबांचे किर्तन रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण येथे होते. बाबांना तार पाठवून कळविण्यात आले. किर्तनापुर्वी एक गृहस्थ तार घेऊन बाबांच्याकडे आला. त्या गृहस्थाला पाहून बाबा म्हणाले, 'भूक लागली आहे. भाकर आणली की नाही?' बाबांचा तो प्रश्न ऐकून त्या गृहस्थाला काय बोलावे समजेना. बाबांच्याकडे पाहत त्या माणसाचे डोळे भरून आले. तो रडत असलेला पाहून बाबा म्हणाले, 'बाप्पा रडायला काय झाले ते तरी सांग!' बाबांनी विचारताच त्या गृहस्थाने गोविंदांच्या मृत्यूची माहिती दिली. बाबा निर्विकारपणे उद्गारले. 'असे मेले कोट्यानुकोटी। काय रडू एकासाठी ।।' ही गोविंदांच्या मृत्यूची बातमी हां हां म्हणता साऱ्या किर्तनात पसरली. लोक दु:खाने हताश झाले होते पण बाबांनी काहीच घडले नाही अशा आवेशात किर्तन केले. शेवटी ते एवढेच म्हणाले, ऐसे मरता अनंत।' एकाची करू का खंत।।' अशा तऱ्हेने एकुलत्या एक कुलदीपकाचे निधन होवूनही बाबा विरक्त राहिले. हळहळ नाही की कळकळ नाही".
माणूस जन्मल्या जन्मल्या संत किंवा महापुरुष होत नाहीत. लोक सेवेसाठी सर्व सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडे असणाऱ्या अनेक मोठ्या अग्निदिव्यातून गेल्यावरच तो माणूस संत किंवा महापुरुष अशा गौरवशाली पदापर्यंत जावून पोहोचतो. आणि जगात आपल्या कारकिर्दीने अमर होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपल्या अस्पृश्य बांधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपले चार अपत्ये गमवावे लागले. संसारिक जीवनाच्या अर्ध्या वाटेवर आपली सोन्यासारखी पत्नी गमवावी लागली. संत किंवा महापुरुष यांच्या ध्येयपूर्तीची वाट सरळ सोपी नसते. काट्याकुट्यांनी, दगड धोंड्यांनी भरलेली असते. कधी कधी डोंगराएवढे संकटं उभे राहतात. असे अग्निदिव्य फक्त संत किंवा महापुरुषच पार करू शकतात. कितीही मोठे त्यांच्यावर संकटं आलीत तरी ते आपल्या ध्येयापासून कधी ढळत नाहीत. म्हणूनच कुण्या एका तत्ववेत्त्याने म्हटले आहे. *'इस दुनिया में किसीको भी इंसान प्यारा नही होता जनाब... उसका काम प्यारा होता है।'*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा हे समकालीन असले तरी गाडगेबाबा वयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा १४ वर्षांनी मोठे होते तरी ते बाबासाहेबांना डॉक्टर साहेब म्हणत असत. ते एकमेकांना अनेक वेळा भेटले. ते एक दुसऱ्यांचा आदर करत. सन्मान करत. दोघांनाही शिक्षणाचे महत्त्व कळले होते. म्हणूनच गाडगेबाबा लोकांना उपदेश करताना म्हणतात 'बापहो तुमच्या घरी जेवाले ताट नसल तं नवीन ताटं घेवू नोका हातावर भाकर घेवून खा. बायकोले नवीन लुगडं घेवू नोका तिले लुगड्याला दांड घालून नेसायला सांगा. अन् ते पैसे पोराच्या शिक्षणासाठी लावा बापहो तरी लेकराले शिकवा'. वाचक हो बघा गाडगेबाबांचे शिक्षणासाठीचे विचार. इथे गाडगेबाबा अशिक्षित, निरक्षर तर त्याउलट डॉ. बाबासाहेब उच्च विद्याविभूषित होते. शिक्षणातील हे अंतर जमीन आस्मानचे होते. तरी त्या दोघांचेही विचार व कार्य एकमेकांसाठी पूरक होते. संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाविषयीचे विचार किती कळकळीचे व तळमळीचे होते. हे या तिघांनाही वाचल्याशिवाय आजच्या पिढीला कळणार नाही. म्हणून माझे आजच्या पिढीला कळकळीचे सांगणे आहे बहुजन महापुरुषांना वाचा त्यांचा इतिहास वाचा तरच आजच्या व येणाऱ्या भविष्य काळात तुमचा निभाव लागेल.
गाडगेबाबांना त्या काळातील मोठमोठ्या प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याचे कधीही आकर्षण वाटले नाही. ना कधी त्यांचे प्रसिद्धीसाठी कार्य होते. त्यांची प्रसिद्धी आपोआप 'माऊथ ॲडव्हरटाइज' म्हणजे लोकांकडूनच सांगोवांगीच्या पध्दतीने होत असे. बाबा दर आषाढी यात्रेला पंढरपूरला जात असत परंतु त्यांनी कधीही पांडुरंगाचे किंवा विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. ते तेथे फक्त साफसफाई करण्यासाठी जात असत. एकदा असेच ते आषाढी यात्रेला गेले त्यावेळी गटार तुंबून पाणी रस्त्यावर पसरले होते. बाबा गटारातील घाण काढून गटार साफ करत होते. कमरेएवढ्या पाण्यात उभे राहून घाण उपसायचं काम चालू होतं. वारकरी गर्दी करून बघत होते. जवळून पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या संत तुकडोजी महाराजांनी बाबांना पाहिलं होतं. तुकडोजी महाराजांनी चंद्रभागेत स्नान केले. बाहेरूनच पांडुरंगाचे दर्शन घतलं आणि ते तडक बाबांकडे आले. 'बाप्पा दरसन झालं ईठ्ठलाचं?' बाबांच्या प्रश्नानं तुकडोजी महाराज भानावर आले. 'लय लवकर दरसन झालं?' ... 'आज खरं दर्शन झालं बाबा'. कमरेएवढ्या पाण्यात उभं राहून पांडुरंग घाण उपसत होता. बाबांना नमस्कार करून तुकडोजी महाराज कृतकृत्य झाले. पुढे तुकडोजी महाराज कधीच देवळात गेले नाहीत. बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दरिद्री नारायणाची सेवा करू लागले,
असे म्हणतात संत, महंत, महर्षी, महापुरुष यांना त्यांचे मरण जवळ येत असल्याची जाणीव होते. तसेच गाडगेबाबांच्या ही बाबतीत घडले असावे. ग्रंथाचे लेखक पान नं. २८६ वर म्हणतात "वांद्रे पोलीस लाईन मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्याची सांगता दि ८/११/१९५६ रोजी सत्यनारायण महापूजेने झाली. या कार्यक्रमानिमित्त बाबांचे किर्तन असावं, अशी या चाळीतील श्रध्दाळू भक्तांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी बाबांना विनंती केली. बाबांची तब्येत बरी नव्हती. ते झोपूनच होते पण लोकांची श्रद्धा पाहून बाबांनी आहे या परिस्थितीत किर्तन करायचं ठरविलं. तसा होकार दिला.
शेवट तो होता तुझियाने गोड। म्हणऊनी चाड धरीतसे।।
ठरल्याप्रमाणे बाबांनी किर्तन केले. किर्तनाच्या शेवटी सर्वांना भजन म्हणायला लावले.
‘गोपाला गोपाला। देवकीनंदन गोपाला।।’
आज वांद्र्याच्या मंडळीचे मला दर्शन झाले. मी तुमच्यापुढे भजन केले असेल, आपण मला डोळ्यांनी पाहिलं असेल, कल्पना असते गाडगेबुवा, गोधडेबुवा पाहिले नाही. आज भेट झाली. आता ही माझी शेवटची भेट आहे. माझं मरण माझ्यापुढे उभं आहे. आता येथून जावं लागेल. तुमचे पाय दिसले माझ्यावर उपकार आहेत. रेल्वे पोलिस वांद्रा स्टेशन या मंडळीनं मला तुमचे चरण दाखविले, तुम्ही गाडगेबुवा, गोधडेबुवा पाहिले नसेल तर भेट झाली.
किर्तन आटोपले. 'मी बोलता बोलता चुकलो आशीन तर माझ्या चुकीची क्षेमा करून जा. बोलणारा चुकते. त्याचे बोल त्याला दिसत नाहीत. ते दुसऱ्या माणसाला सापडतात. नवरा आला बाहेरून. घरात रडत होतं मूल. नवरा म्हणे बायकोला त्याला पाज. बायको म्हणे गडबड करू नका. पीत नाही. नवरा गप्प बसला. पुन्हा मूल रडून उठलं. नवरा तपला. अरे तुला मघापासून सांगितलेलं बहिरी आहे का तू? त्याला पाज. बायको म्हणे पीत नाही. नवरा म्हणे त्याचा बाप पिईल. चुकलं अशील तर क्षमा करा. बोलणारा चुकत असते. मी अन्यायी आहे. माझ्या अन्यायावर माफी द्या. किर्तन आटोपल. माझी तब्येत बरी नाही. संध्याकाळ पासून पडून होतो. आजच आणखीन कुठं किर्तन असतं तर नसतो गेलो. किर्तन आटोपलं एकदा भजन करा अन् सरळ सरळ मग उठा!"
‘गोपाला गोपाला। देवकीनंदन गोपाला।।’
(क्रमशः)
अशोक सवाई.
91 5617 0699. (सांस्कृतिक/संत वाणी)
—————————————-
संत गाडगेबाबा (महाराज) भाग – ३.
अशोक सवाई.
शिक्षण प्रेमी/स्वच्छता प्रेमी गाडगेबाबांचे महान कार्य.
संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय मानवाला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या उद्धारासाठी दोघेही जीवनाच्या अखेरपर्यंत झटत राहिले.
गाडगेबाबांनी नुसते किर्तन करून महाराष्ट्रभर फिरून प्रबोधनाचेच कार्य केले नाही तर त्यांनी महाराष्ट्रात राज्याच्या राजधानी पासून अनेक मोठ्या शहरात, निमशहरात शिक्षण संस्था उभ्या केल्या. येथे विस्तार भयामुळे त्या संस्थांची व शहरांची नावे लिहिण्याचे टाळत आहे. दोन चार संस्था असत्या तर यांची नावे मी नमूद ही केले असते परंतु त्या कैक आहेत. तसेच धर्मशाळा उभारल्या. त्यांनी अनेक आणि अफाट सामाजिक कार्य करून ठेवले आहेत. त्याचा पूर्ण तपशील एका लिखाणात घेता येणार नाही.
त्यांच्या वरील चरित्र ग्रंथाचे लेखक उद्धव रसाळे पान नं. २१२ म्हणतात "बाबांचे कार्य हिमालयासारखे उतुंग आणि सागरा प्रमाणे विशाल असून त्याचे मूल्यमापन मूठभर मेंदूने करणे शक्य नाही. त्यांच्या कार्याचा ठसा जनमानसावर उमटून तो चिरकाल टिकणारा आहे. या भूतलावर जोपर्यंत मानव उभा राहिल तोपर्यंत बाबांच्या कार्याचे पडसाद आणि तरंग पसरत राहतील. त्यांनी कण कण झिजून वणवण भटकून कोट्यवधी रुपये जमविले. हे सर्व पैसे जनताजनर्दनासाठी खर्च करून अद्वितीय कार्य केले. जे काम करायला शासनाला अनेक पंचवार्षिक योजना राबविल्या लागल्या असत्या ते काम बाबांनी सहज करून थक्क केले". वरील प्रमाणे लेखक म्हणतात त्याप्रमाणे बाबांनी कोट्यवधी रुपये जमविले परंतु बाबांनी त्यातून स्वतःसाठी साधी झोपडी देखील बांधली नाही. सर्व पैसा त्यांनी जन सेवेसाठी खर्च केला.
बाबांचे महान कार्ये
१) गावोगावी दसऱ्याला रेडे-बकऱ्याचे बळी देण्याची प्रथा कीर्तनातून बंद केली.
२) हुंड्याच्या घातक पध्दतीला आळा घातला.
३) सावकारशाही मोडून काढली.
बाबांचे विशेष कार्य
गाडगेबाबांनी महाराष्ट्रात धर्मशाळा सदावर्त, पाणपोया, जनसेवा, गोरक्षण, नदीवर घाट, विहिरी, तलाव, औषधालय, कुष्ठसेवा, ग्रामसफाई. इत्यादी.
जनजागृती
किर्तन, भजन, संस्कार केंद्र, साहित्य प्रकाशन, प्रसार, प्रचार, अंधश्रद्धा निर्मूलन, पशुहत्या बंदी, अस्पृश्यता निवारण प्रचार, नशाबंदी प्रचार इत्यादी.
जीवन शिक्षण
आदिवासी आश्रम शाळा, भटक्या जमाती आश्रम शाळा, मागासवर्गीय मुला-मुलिंचे वसतीगृहे, विद्यालय, धर्मशाळा, अनाथ बालकाश्रम, बाल मंदिर, पाळणा घर, वृद्धाश्रम इत्यादीं द्वारे कृतीभक्तीचे समाजोद्धाराचे कार्य केले. आतापर्यंतच्या शासन काळात वरीलपैकी किती अस्तित्वात आहेत? असतील तर ट्रस्ट मार्फत त्याची डागडुजी किती झाली? त्याची देखभाल होते का? होत असेल तर कोणाच्या अखत्यारीत अन् कशी केली जाते? असे प्रश्न हल्ली पडायला लागले.
महाराष्ट्र मंत्रीमंडळात जेव्हा म्हणजे २७ आक्टोबर १९९९ पासून आर. आर. उर्फ आबा पाटील यांची वर्णी लागली तेव्हा त्यांच्याकडे ग्रामविकास, पाणीपुरवठा, व स्वच्छता खाते आले. अभ्यास, जिद्द, चिकाटी, कष्ट आणि कार्यक्षमता या जोरावर आबांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्याचे अक्षरशः सोने केले. वरील खात्याचे मंत्री झाल्यावर आबांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या कामाची दखल घेऊन *'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान'* सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून जगाच्या ८६ देशात बाबांचे कार्य पोहोचविण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. तेव्हा आबांचे सहकारी आबांना आधुनिक गाडगेबाबा म्हणत असत.
संत गाडगेबाबा यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजे १ मे १९८३ या दिवशी नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून अमरावती शहरात *श्री संत गाडगेबाबा विश्वविद्यालयाची स्थापना केली.* त्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील खेड्यापाड्याच्या विद्यार्थ्यांची उच्च शैक्षणिक सोय झाली. एक प्रकारे बाबा गेल्यावर त्यांचा मुख्य उद्देश सफल झाला. असेच म्हणावे लागेल.
केंद्र सरकारने सुद्धा गाडगेबाबांच्या महान कार्याची दखल घेऊन सन १९९८ मध्ये त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवसी म्हणजेच २० डिसेंबरला त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट जारी केले. हा केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा केलेला गोरव आहे. बाबा अशिक्षित असूनही त्यांचे कार्य देश विदेशात पोहोचले ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
(क्रमशः)
– अशोक सवाई.
91 5617 0699. (सांस्कृतिक/संत वाणी)
————————————–
संत गाडगेबाबा (महाराज) भाग – ४.
अशोक सवाई.
संत गाडगेबाबांचे महानिर्वाण
गाडगेबाबांचे वांद्रे पोलिस लाईन मध्ये जे किर्तन झाले होते तेव्हा पासून बाबांची तब्येत ठीक राहत नव्हती. नरम गरम झूल्यावर त्यांची तब्येत झोके घेत होती. त्याही स्थितीत त्यांनी भक्तांच्या भक्तीयुक्त आग्रहाखातर पंढरपूरला किर्तन केले. सततच्या १७-१८ तासांच्या परिश्रमाने बाबा थकून गेले होते. शरीर ठणकत होतं. त्यातच त्यांना थंडी वाजून ताप आला. बाबा अस्वस्थ झाले. त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक होते. बाबांनी पंढरपूर येथील लाखो भक्तांना प्रेमाचा निरोप दिला अन् त्यांची गाडी पुण्याकडे निघाली. रात्री ८ वाजता बाबांची गाडी पुण्यात आली. पुण्यात त्यांच्यावर रात्रभर औषधोपचार करण्यात आले. पण बाबांची प्रकृती अधिक अस्वस्थ असल्याने पुण्याच्या डॉक्टरांनी मुंबईला घेवून जाण्याचा सल्ला दिला. बाबांना मुंबईला आणून त्यांना सेंट जॉर्ज हाॅस्पिटल (हे हाॅस्पिटल इंग्रज सरकारने भारतीयांसाठी निर्माण केले) मध्ये ॲडमिट करण्यात आले. तेथे तज्ञांकडून औषधोपचार करण्यात आले. भक्त मंडळींना बाबा दवाखान्यात असल्याचे कळल्यावर ते त्यांना भेटायला दवाखान्यात गर्दी करू लागले. पण इतर रुग्णांना त्रास नको म्हणून बाबांनी दि २१/११/१९५६ ला हाॅस्पिटल सोडले. गाडगेबाबा हाॅस्पिटल मध्ये ॲडमिट असल्याचे दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कळले तेव्हा तेही अस्वस्थ झाले. मुंबईला गेलो की पहिले बाबांची भेट घ्यावी असे त्यांनी नक्कीच ठरवले असणार.
बाबांनी हाॅस्पिटल सोडल्यावर ते विश्रांतीसाठी त्यांचे भक्त असलेले नाम. तापसे नावाच्या गृहस्थाकडे थांबले होते. तेथेच त्यांच्यावर डाॅक्टर उपचार करत होते. तेथे त्यांना आराम वाटला. नंतर भक्तांच्या गाठीभेटी साठी ते गिरगाव येथील त्यांचेच भक्त असलेले शेट्ये या गृहस्थाकडे थांबले. तेथून पुढे अधिक विश्रांती साठी राजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी राहिले. बाबांची फार दिवसापासून इच्छा होती. आपण आपला देह नागरवाडी येथे ठेवावा. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी हे गाव सातपुड्याच्या डोंगर कुशीत वसलेले निसर्गरम्य ठिकाण. सतत हिरवीगार वनश्री. पशुपक्ष्यांचे मंजुळ आवाज आणि गाईगुरांचे कळप यामुळे तेथे बाबांचे मन रमून जात असे. बाबांनी या आदिवासी भागात खपून नंदनवन केले होते. नागरवाडीला बाबाच्या गोशाळा, आश्रमशाळा होत्या. त्यामुळे नागरवाडीला बाबांचा अधिक ओढा होता. दिल्लीमध्ये ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अचानक हे जग सोडून गेल्याची बातमी जेव्हा गाडगेबाबांना कळली तेव्हा ते कमालीचे अवस्थ झाले. बेचैन झाले. त्यात ते स्वतःशीच पुटपुटले 'ते काही काळ राहायला पाहिजे होते. अजून लयी काम त्यांच्या हातून होवाचे राहिले हाय' डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाण्याने त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. खारेपाटणला किर्तनात जेव्हा त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या निधनाची बातमी कळल्यावर ते अगदी विरक्त होते. पण आज डॉ. बाबासाहेबांच्या जाण्याने फारच अस्वस्थ झाले. बघा दिन दुबळ्या लोकांसाठी देह झिजवणारे महापुरुषांचे मनं असे असतात. ते बराच वेळ आपल्याच तंद्रीत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाण्याने त्यांच्या मनाची चलबिचल स्थिती झाली. त्यांच्या मनात एकदम काय आले कोण जाणे? त्यांनी आपल्या सोबतच्या मंडळींना नागरवाडीला निघण्याची तयारी करण्याचे सांगितले. आपण येणार असल्याच्या तारा नाशिक, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती येथे पाठवल्या. बाबांना त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली असावी म्हणून त्यांनी ठरवले भक्तांना शेवटचे दर्शन देऊन जावे. आणि मुंबईवरून निघाले. वाटेत लोकांना दर्शन देत देत दि. ७/१२/१९५६ रोजी बडनेराला पोहोचले. तेथे पुन्हा भक्तांना दर्शन देऊन अमरावतीला रवाना झाले. रस्त्यात नवाथे नावाच्या भक्ताकडे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. ८/१२/१९५६ रोजी बाबांची गाडी अमरावतीला आली,
अमरावतीला आल्यावर तेथे श्री राठोड यांच्या आग्रहामुळे त्यांच्या कडे थांबले. बाबांच्या अंगात तापाची कणकण होतीच. तेथे डॉ. शहांकडून औषधपाणी केले गेले. बाबा अमरावतीत आहेत हे कळल्यावर तेथे लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांच्या दर्शनासाठी येवू लागल्या. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर ताण पडू लागला. दि. १३/१२/१९५६ रोजी बाबांची तब्येत जास्तच बिघाडली. तेव्हा डॉ. शहांच्या आग्रहावरून त्यांना इर्विन हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. (इर्विन हे आताचे जिल्हा रुग्णालय आहे. इंग्रज सरकारच्या काळात अमरावतीचे इर्विन नावाचे इंग्लिश गव्हर्नर होते. त्यांच्याच नावाने हे हाॅस्पिटल आहे) तेथे सावदे नावाचे निवासी डॉक्टर त्यांच्या सहकारी डॉक्टरांसोबत बाबांवर उपचार करू लागले. तेथेही भक्त मंडळी गर्दी करू लागली. तेव्हा बाबा आता आपल्याला बरे वाटण्याचा बहाणा करून तेथून सटकले. आपल्या सहकाऱ्यांना नागरवाडीला घेऊन जाण्यासाठी सांगितले. त्यांची गाडी चांदूरबाजारच्या दिशेने धावू लागली. आपण लोकांसाठी आपले सारे जीवन रस्त्यावर जगलो तेव्हा आपले मरणही रस्त्यावर यावे असे ते आपल्या सोबतच्या मंडळीजवळ बोलत होते. चांदूरबाजारला येत असतांना अर्धा कच्चा रस्ता खूप खराब होता त्यामुळे चांदूरबाजारला आल्यावर बाबांची तब्येत फार गंभीर झाली. तिथल्या डाॅक्टरांनी सांगीतले की बाबांची तब्येत फार गंभीर आहे तुम्ही नागरवाडीला जावू नका थेट इर्विन मध्ये घेऊन जा. गाडी पुन्हा इर्विन च्या दिशेने धावू लागली. अमरावती चांदूरबाजार मार्गावर वलगाव आहे. तिथे पेढी नदीच्या पुलावर बाबांचे प्राण पखेरू उडून गेले. तो क्षण होता २० डिसेंबर १९५६ रात्री बाराचा. आणि गाडीत सहकारी मंडळींचा रडण्याचा एकच आक्रोश सुरू झाला. पण त्यांची पत्नी कुंताबाईचे दुर्भाग्य बघा त्यांच्या हातचे घोटभर पाणीही बाबांना पाजता आले नाही. बाबांनी लोकांच्या कल्याणासाठी अखेरपर्यंत रस्त्यावर आपला देह झिजवला अन् अखेर रस्त्यावरच देह ठेवला.
बाबांच्या निधनाची वार्ता हां हां म्हणता वाऱ्यासारखी साऱ्या महाराष्ट्रभर पसरली. अमरावतीला शेवटचे संस्कार आहे असे समजताच लोकांचे जथ्थेच्या जथ्थे अमरावतीकडे येवू लागले. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच्या बाहेरून लाखो लोक मिळाल त्या साधनाने अमरावतीला येवून धडकले. दि. २१/१२/१९५६ ला बाबांचे अंत्यसंस्कार होणार होते. बाबांच्या जाण्याने सारा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्र एका महान संताला मुकला, देश एका रत्नाला पालखी झाला होता. बाबांच्या महा निर्वाणानंतर बाबांचे पार्थिव शरीर लोकांना अंतदर्शनासाठी रोठोडच्या बागेत ठेवण्यात आले. बाबांचे अंत्यसंस्कार कुठे करायचे यावर बराच खल झाला. शेवटी अच्युतराव दादांनी श्री किसनराव राठोड यांच्या बागेतील एक एकर जमीन नाममात्र खरेदी करून अमरावती येथे राठोड बागेत अंत्यसंस्कार उरकण्याचा निर्णय घेण्यात घेतला. बाबांच्या निधनाची वार्ता समजताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची अंत्यसंस्कारला येत असल्याची तार आली. भारत सरकारचे कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, श्री. कन्नमवार, नाईक निंबाळकर, आचार्य अत्रे, श्री. तापसे, कर्मवीर भाऊराव पाटील आदी हजारो चाहते, भक्तांनी बाबांच्या पार्थिव शरीरावर पुष्पचक्र वाहिले. लाखो लोक अंत्यसंस्कारासाठी जमले होते.
बाबांची अखेरची यात्रा
दुपारी ठीक एक वाजता राठोड बागेतून अंतयात्रेस सुरवात झाली. फुलांनी सुशोभित केलेल्या ट्रकवर बाबांना आसनस्थ स्थितीत ठेवले. कारण बाबा आसनस्थ होत किर्तन करत असत. कुंताबाई आणि आप्त नातेवाईक एका बाजूला बसले होते. अंतयात्रेपुढे शेकडो भजनी मंडळी, दिंड्या, बॅंड पथके बाबांचे भजन धून वाजवत होते. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची एकच गर्दी झाली होती. सर्वत्र माणसांचा महापूर उसळला होता. ही यात्रा वाजत गाजत तब्बल ९ तासांनी राठोड बागेत परत आली.
“सुनी खबर की संत गाडगेबाबा हमको छोड गये।
धडक भरी छाती में, हमको पलभर तो होश न रहे।।”
या काव्य सुमनांनी श्रद्धांजली वाहताना संत तुकडोजी महाराजांनी गहिवरल्या शब्दाने साऱ्या जनसमुदायाला पुन्हा एकदा रडवले. चंदनाची लाकडे, तूप, कापूर, सुवासिक द्रव्ये यांनी बाबाची चिता सजवली होती. सर्व तयारी झाल्यानंतर रात्री २ वाजून १० मिनिटांनी बाबांचे नातू श्री. वासुदेव सोनवणे यांनी बाबांच्या चितेला अग्नी दिला. बाबांच्या पार्थिव शरीराचा अखेरचा निरोप घेऊन जनसमुदाय जड अंत:करणाने माघारी परतला. पुढे ज्या ठिकाणी बाबांचे अंत्यसंस्कार झाले तिथे बाबांचे स्मारक उभारण्यात आले.
जिथे बाबांचे स्मारक उभारण्यात आले. आज तिथल्या आजूबाजूच्या परिसराला गाडगे नगर म्हटले जाते. हे गाडगे नगर अमरावती शहराच्या मध्यभागी आहे आणि मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग नं. ६ ला लागूनच आहे. याच गाडगे नगर वरून थोडे पुढे गेले की, श्री संत गाडगेबाबा विश्वविद्यालय आहे. हाच राज्यमार्ग पुढे नवसारी वरून अमरावती-चांदूरबाजार या मार्गाला जावून भेटतो. तेथून उजवीकडे वळले की पेढी नदीच्या पुलावरून वलगावकडे जाता येते. वलगाव वरून हा मार्ग पुढे चांदूरबाजारला जातो तेथून बाबांचे आवडते ठिकाण नागरवाडीला जाता येते. वलगाव वरून एक किलोमीटर पुढे गेल्यावर एक फाटा फुटतो. तो दर्यापूरला जातो. दर्यापूर वरून बाबांचे जन्मगाव शेणगावला जाता येते. बाबांच्या जन्मामुळे शेणगाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे. (समाप्त)
अशा या महाराष्ट्राच्या महान संताला त्यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त नतमस्तक होवून आमचे अभिवादन।
संदर्भ: मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबा (चरित्र आणि विचारधन) लेखक: डॉ. उद्धव रसाळे.
– अशोक सवाई.
91 5617 0699.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत