माझी दहा भाषणं आणि शाहिरांचं एक गाणं बरोबरीचं ! – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माझी दहा भाषणं आणि शाहिरांचं एक गाणं बरोबरीचं आहे’, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. ते खरंही आहे. स्वत: बाबासाहेबांना शाहिरीची ताकद माहीत होती. त्यामुळेच ते कलावंतांची कदर करायचे. त्याकाळात अनेक शाहिरांना बाबासाहेबांचा सहवास लाभला. यातुन आपल्याला शाहिरांचे महत्व अधोरेखित होते.
ज्यावेळी बाबासाहेबांचा इथल्या व्यवस्था परिवर्तनाचा लढा सुरू होता त्यावेळी चळवळीत असणाऱ्या संसाधनांच्या अभावामुळे बाबासाहेबांचे विचार अनुयायांपर्यंत पोहचायला मर्यादा होत्या, अशावेळी बाबासाहेबांचे विचार – संदेश आपल्या कविता आणि गीतातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचविण्याचे महान कार्य चळवळीच्या शाहिरांनी केले.
दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने बाबासाहेबांच्या भाषणाच्या ठिकाणी सर्वच लोकांना ईच्छा असुनही जाता येत नव्हते. अशावेळी चळवळीतले शाहीर भिमाचा सांगावा गावोगावी जाऊन लोकांना सांगत असत. असंख्य अशा अडीअडचणींना तोंड देत या शाहिरांनी बाबासाहेबांचे विचार आपल्या लेखणीतून आणि सादरीकरणातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचविण्याचे महान कार्य केले.
बाबासाहेबांचे विचार स्वतः समजून आणि उमजून घेत स्वतःच्या लेखणीतून समाजाला दिशा देण्याचे काम करून वेळोवेळी चळवळीला दिशा दिली.
शाहिरांची गाणी ही फक्त गाण्यापुरती मर्यादित नाहीत, त्यातून बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व, महती, कार्य, त्यागाची जाणीव करून देणारी आहेत. ज्यावेळी शाहीर म्हणतात, “तुला भिमान माणुस केलं, तुझ्यासाठीच श्रम घेतलं, नको विसरू भिमाचे मोल,बोल गर्वाने जय भीम बोल” त्यावेळी खऱ्या अर्थाने मानसिक गुलामगिरी झटकून ऊर्जा देण्याच कार्य होतं.
एखाद्या लहान मुलाला बाबासाहेब पुस्तकाच्या अगोदर शाहिरांच्या गाण्यातून भावतात एवढे थोरपण शाहिरांचे आहे.
जगात सर्वात जास्त गीते कोणत्या महामानवावर लिहिली असतील तर ती बाबासाहेबांवर आहेत. एवढं अगणित अतुलनीय कार्य शाहिरांचे आहे.
बाबासाहेबांच्या प्रत्येक लढ्याचा संघर्ष गीतात गुंफून आणि त्यातून चळवळीला मार्गस्थ करण्याचे कार्य शाहिरांनी केलं आहे. आंबेडकरी चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात या शायर, गीतकारांच योगदान अमूल्य आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत