
डॉ. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कोणतेच व्यसन किंवा कोणताच शौक केला नाही. तरीही त्यांना एक जबरदस्त व्यसन जडलं होत. (व्यसन म्हणजे जे आयुष्यभर सुटत नाही ते) आणि एक जबरदस्त शौक सुध्दा. व्यसन होतं पुस्तक वाचनाचा तर शौक होता चांगल्यात चांगले कपडे परिधान करण्याचा. शर्ट, जाकीट, टाय, कोट, पॅंट आणि बूट यातील त्यांचं कलर काॅंम्बिनेशन चाॅइस जबरदस्त होती. कोणत्या ठिकाणी, कोणत्या प्रसंगी, कोणती वेशभूषा परिधान करायची याचे त्यांना सूक्ष्म ज्ञान होते.
फोटो बायोग्राफी मध्ये डॉ. बाबासाहेबांनी एकूण चार प्रकारचे कोट परिधान केलेले आहेत. १) एस. बी. लॅपल कोट (सिंगल ब्रेस्ट लॅपल कोट) २) डी. बी. लॅपल कोट (डबल ब्रेस्ट लॅपल कोट) ३) जोधपूरी कोट (बंद गळ्याचा कोट) ४) शेरवानी (बंद गळा व गुडघ्याच्या खाली पर्यंत लांब) १) एस बी लॅपल कोट: लॅपल म्हणजे कोटाच्या काॅलरला जाॅइंट होवून व छातीवर दुमडून खाली निमुळता होत गेलेला भाग. आणि त्याच्या खाली कोटाचे दोन किंवा तीन बटण. कोटाच्या खालच्या दोन बाजूला अर्ध्या सेंटीमीटर जाडीच्या डबल पायपिन व कोटाचा आतील बाजूस असलेले दोन खिसे. वरच्या डाव्या बाजूला एक इंच जाडीचा पायपिन व आतल्या बाजूस असलेला मध्यम साईज चा खिसा. त्या खिशात कोटाच्या अपोझिट कलरचा रूमाल. त्या रूमालाची त्रिकोणीय घडी, त्या घडीचे दोन टोक खिशात व एक टोक साधारण दीड इंच खिशाच्या बाहेर असते. त्या रूमालाच्या घडीचे बाहेर दिसणारे टोक त्या कोटाची शान वाढवते. खिसा व लॅपलच्या मध्ये एक लुक्स असते ते लुक्स गुलाबाचे फूल अडविण्यासाठी असते. ते फूल कोटाच्या रुबाबात ‘चार चांद’ लावण्यचे काम करते. या कोटाच्या आतमध्ये जाकीट, जाकीटच्या आतमध्ये पॅंटमध्ये इन केलेले फूल बाह्यांचे शर्ट आणि काॅलरला टाय बांधली की किरकोळ व्यक्तीमत्वाला सुध्दा साहेबपण येते. म्हणूनच ‘एक नूर आदमी दस नूर कपडा ही म्हण प्रसिद्ध पावली. २) डी. बी. लॅपल कोट: या कोटाचे लॅपल मोठे व पसरट असते. या कोटाचा डावा भाग. उजव्या बाजूच्या भागावर अर्ध्या पर्यंत येतो. या कोटाचे खिसे बाहेरच्या भागावर खाली असतात. व वरच्या डाव्या बाजूच्या खिसा एस बी लॅपल कोटाप्रमाणेच असतो. या कोटामुळे व्यक्तीचे व्यक्तीमत्व फारच भारदस्त वाटते. इंग्लंडचे प्राइम मिनिस्टर, अमेरिकन प्रेसिडेंट प्रसंगानुरूप हे कोट परिधान करतात. विशेषतः थंडीच्या मौसमात. ३) जोधपूरी कोट: हा भारतीय कोट आहे. या कोटाची काॅलर म्हणजे गळ्याभोवती अडीच सेंटीमीटर किंवा एक इंचाची स्टॅंडपट्टी असते. तीला एक मोठा हुक असतो. डाव्या बाजूचा हुक उजव्या बाजूच्या लुक्स मध्ये अडकविला जातो. त्यामुळे गळा बंद होतो. म्हणून याला बंद गळ्याचा कोट म्हणतात. याची बटणे वर पासून खाली पर्यंत शर्टाप्रमाणेच पण मोठे असतात. या कोटाच्या खालच्या बाजूचे खिशे एस बी लॅपल कोट किंवा डी बी लॅपल कोट अशा दोन्ही प्रकारचे असतात. वरचा खिसा वरील दोन्ही कोटाप्रमाणेच असतो. यालाही फूलासाठी लुक्स असते. जेव्हा म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ ला डॉ. बाबासाहेबांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडे संविधान सोपवून ते देशाला अर्पण केले तेव्हा त्यांनी हाच जोधपूरी कोट परिधान केला होता. (तो फोटो बघा) जर त्यांनी त्यावेळी एस बी लॅपल कोट किंवा डी बी लॅपल कोट परिधान केला असता तर ते बिलकुल संयुक्तिक वाटले नसते. म्हणून त्यांनी भारतीय संविधान भारताला अर्पण करताना भारतीय जोधपूरी कोट प्रसंगानुरूप परिधान केला होता. यावरून प्रसंगानुरूप कोणती वेशभूषा परिधान करायची याचे त्यांना किती सूक्ष्म ज्ञान होते हे लक्षात येते. ४) शेरवानी: हा पुर्वी मुख्यतः मुस्लिम पेहराव मानला जात होता. ही शेरवानी गुडघ्याच्या खालीपर्यंत लांब असते. बंद गळ्याच्या शेरवानी ला कमरेच्या थोडे खालपर्यंत बटण असतात. शेरवानीच्या उजव्या/डाव्या भागावर कलर काॅंम्बिनेशनचे रेशमी नक्षीकाम केलेले असते. किंवा नसते. शेरवानी ही सुरवार वरच घालतात. बाबासाहेबांचा हाही पेहराव आवडता होता. मुस्लिम नेत्यांशी बोलताना प्रसंगानुरूप बाबासाहेब हा पेहराव परिधान करीत असत. आता हा पेहराव कुणीही परिधान करतात. स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू सुरवार आणि त्यावर शेरवानी ही त्यांची आवडती वेशभूषा असायची. आजचे नेते त्यांचे अनुकरण करताना दिसतात. आज धन्नासेठ चे लग्नाचे नवरदेव सुरवार त्यावर शेरवानी व डोक्यावर मानाचा फेटा अशा वेशभूषेत लग्न लावताना दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेश दौऱ्यावर असले की डी बी लॅपल कोट व इंग्लिश हॅटचा जास्त वापर करत असत. तेव्हा त्यांचे भरीव गोरे व्यक्तीमत्व इंग्लिश प्राईम मिनिस्टर व अमेरिकन प्रेसिडेंट यांनाही लाजवणारे असायचे. त्यांची इंग्लिश वेशभूषा व बुद्धीमत्ता पाहून प्राईम मिनिस्टर व प्रेसिडेंट प्रभावित होत असत. भारतात मात्र ते एस बी लॅपल कोट व जोधपूरी कोटाचा जास्त वापर करत असत. कोणत्या सुटावर कोणता बूट सूट होईल यावरही त्यांचे बारीक लक्ष असायचे. आपल्या दादरच्या राजगृहात मात्र ते बिन काॅलरचा सफेद तलम मलमलचा झब्बा व धोतर असा अस्सल भारतीय पेहरावाचा वापर करत असत. त्या पेहरावात आपल्या खास खुर्चीवर बसून पुस्तक वाचन करत असत तेव्हा ते स्वतःलाही विसरून जात होते. तर असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रूबाबातील भारदस्त व्यक्तीमत्व होते. भारदस्त व्यक्तीमत्व व बुद्धिमत्तेच्या जोरावर ते देश परदेशात अनन्यसाधारण ख्याती प्राप्त ठरले. आणि बहुजनांच्या गळ्यातील ताईत सुध्दा.
–अशोक सवाई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत