दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय
26 जानेवारीच्या निमित्ताने ….!

समाज माध्यमातून साभार
26 जानेवारी हा आमचा प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान देशभर लागू झाले , म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
आमचे संविधान ; भारतीयांना स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय याची खात्री देते. या मूल्यांचा घटनात्मक अर्थ समजण्यासाठी भारतीय संविधानातील निदान जाहीरनामा व मार्गदर्शक तत्त्वे यांचे आकलन व्हायला हवे. ज्या नागरिकांना हे समजेल त्यांनाच भारतीय संविधानाचे महत्त्व समजेल.
संविधानातील स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय या मूल्यांना वास्तविक स्वरूप देण्यासाठी देशातील सामान्य जनतेने काय करायला हवे ? या जटील प्रश्नाचे सोपे उत्तर आहे : ‘भारताच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करायला हवा !’ हा अर्थसंकल्प , भारताच्या वित्तमंत्री येणाऱ्या 1 फेब्रुवारी 2025 रोजी लोकसभेत सादर करणार आहेत. याच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय या मूल्यांना वास्तविक स्वरूप देऊ शकतो. म्हणून हा अर्थसंकल्प समजून घेणे खूप गरजेचे आहे.
भारताच्या तमाम नागरिकांना हा अर्थसंकल्प समजू नये म्हणून ब्राह्मणी प्रसारमाध्यमे कमालीची एकजुट दाखवतात. ही मनुवादी प्रसारमाध्यमे आयकर , रेल्वे भाडे , बस भाडे , स्वयंपाकाचा गॅस व पेट्रोल - डिझेलचे भाव असे इनमिन पाच सहा मुद्दे लोकांना चर्चेसाठी सोडून देतात. शिकले सवरलेले लोकही त्यांवरच चर्चा करतात. तथापि , या अर्थसंकल्पांत अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास वर्ग यांच्यासाठी पुरेसा निधी आहे का , या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी आवश्यक ती तरतूद केली आहे का , कोरोना महामारीचा अनुभव घेतल्यानंरच्या काळामध्ये अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरीव निधी उपलब्ध केला आहे का , या अर्थसंकल्पात भारतातील उद्योगपतींना काय मिळाले आहे , देशावरील कर्ज फेडण्यासाठी किती तरतूद आहे , ‘नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स’ म्हणजे बॅंकांच्या अनुत्पादक कर्जांची समस्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत ; या अशा प्रश्नांचा ही मनुवादी प्रसारमाध्यमे कधीही “इश्यु” करीत नाहीत. जोपर्यंत भारतातील सर्वसामान्य जनता असे प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधणार नाही तोपर्यंत भारतीय संविधानातील स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय या मूल्यांना वास्तविक स्वरूप येणार नाही.
सबब , येणाऱ्या 1 फेब्रुवारी रोजी सादर होणारा अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी किमान 2 फेब्रुवारी 2025 रोजी प्रकाशित होणारी अर्थविषयक दैनिके न चुकता विकत घ्यायला हवीत. बिझनेस स्टॅंडर्ड , इकॉनॉमिक टाईम्स , मिंट , बिझनेस लाईन , फिनॅन्शियल एक्सप्रेस ही देशातील काही प्रमुख अर्थविषयक इंग्रजी दैनिके आहेत. सामान्यतः इंग्रजी दैनिकांत अधिक तपशीलवार माहिती आढळते. यांसोबतच ; हिंदू , टाईम्स ऑफ इंडिया , इंडियन एक्सप्रेस , हिंदुस्तान टाईम्स ही इंग्रजी दैनिकेदेखील विकत घ्यावीत. आणखी हौस असली तर लोकसत्ता , महाराष्ट्र टाईम्स , लोकमत , सकाळ ही मराठी दैनिकेही घ्यावीत.
ज्यांच्या खिशाला परवडू शकते त्यांनी 1 फेब्रुवारी 2025 ते 8 फेब्रुवारी 2025 या आठ दिवसांतील सगळी आर्थिक दैनिके विकत घ्यावीत. ज्यांना आणखी अभ्यास करायचा असेल त्यांनी अर्थसंकल्पाशी संबंधित ‘आऊटलुक मनी’ , ‘बिझनेस वर्ल्ड’ , ‘इकॉनॉमिक ॲंड पॉलिटिकल वीक्ली’ ही नियतकालिके विकत घ्यावीत. तथाकथित मुख्य प्रवाहातील दैनिके व नियतकालिके यांच्यावर यांहून अधिक पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही.
ही दैनिके व नियतकालिके आपणांस अगदी सुरूवातीला विचारलेले प्रश्न सोडवण्यास मदत करू शकतात. यांतून जी काही उत्तरे मिळतील ती आपणांस या देशातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत. जे या दिशेने कार्यरत राहतील ते भारतीय संविधानातील स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय या मूल्यांना वास्तविक स्वरूप देण्यासाठी प्रयत्नशील आहेत , असे मानले जाईल. हेच नागरीक 2025 च्या प्रजासत्ताक दिनाचे योग्य मूल्यमापन करू शकतील. अन्यथा , 26 जानेवारीचे कर्मकाण्ड करण्यात मनुवादी तुमच्याहून किती तरी पटीने अधिक तरबेज आहेत !
तर अशा या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना आगाऊ हार्दिक हार्दिक मंगल कामना ! या प्रजासत्ताक दिनी आपणां सर्वांस स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय या मूल्यांना वास्तविक स्वरूप देण्याची प्रेरणा मिळो , अशीदेखील मंगल कामना !
सर्वांचे मंगल होवो …..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत