महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

राजेश कोळंबकर यांची कवितासंत तुकोबारायांच्या भाषिक सहजतेशी नातं सांगणारी

‘ब्लॅक अ‍ॅन्ड ब्लू’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
– प्रा. आनंद देवडेकर
मुंबई दि. ३० मे ( प्रतिनिधी): राजेश कोळंबकर यांची कविता मुक्तछंदात असली तरी लय आणि आशयासह काव्याचा प्रत्यय देणारी आहे. समष्टीच्या वास्तविक आकलनाचा बेस असलेली ही कविता सहज स्वाभाविक भाषेत आहे. समाजातील अनिष्टतेवर उपरोधिकपणे प्रहार करणाऱ्या या कवितेत कवीची जन्मजात काव्यप्रतिभा अधोरेखित होतेच; परंतु भाषा प्रभुत्वासह कवीच्या शब्दावरील हुकमतीची प्रचिती देणारी ही कविता संत तुकोबारायांच्या भाषिक सहजतेशी नातं सांगणारी वाटते असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा.आनंद देवडेकर यांनी मुंबईत बोलताना केले.
उद्गार प्रकाशनातर्फे राजेश कोळंबकर यांच्या ‘ ब्लॅक अ‍ॅन्ड ब्लू ‘ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर, मुंबई येथे संपन्न झाला. त्यावेळी प्रा. देवडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे होते.
ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, परिवर्तनवादी चळवळीतील कवितेतून आढळणाऱ्या भाषा,प्रतीकं आणि रूपकं यांचा तोचतोचपणा राजेशच्या कवितेत आढळत नाही. शिवाय या कवितेत विद्रोह सुद्धा संयत भाषेत आविष्कृत होतो हे राजेशच्या कवितेचं वेगळेपण आहे.
डाव्या पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या व प्रेरक ललकारी मासिकाच्या संपादक मंडळ सदस्या असलेल्या कवयित्री योगिनी राऊळ या प्रसंगी बोलताना म्हणाल्या की, डाव्या – पुरोगामी चळवळीत सक्रिय असणारा राजेश अस्वस्थ पण संवेदनशील कार्यकर्ता आहे. या संवेदनशीलतेमुळेच त्याच्याकडून चौफेर लेखन होऊन आतापर्यंत त्याची दर्जेदार आठ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
काही अपरिहार्य कारणास्तव प्रकाशन सोहळ्यास उपस्थित न राहू शकलेले ‘ब्लॅक अ‍ॅन्ड ब्लू ‘ काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ व आतील चित्रे तयार करणारे सुप्रसिद्ध चित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी पाठवलेल्या संदेशाचं वाचन चित्रपट पटकथा लेखक आणि अभिनेता योगेश मार्कंडे यांनी केलं तर प्रसिद्ध चित्रकार सुभाष तेंडले यांनी पाठवलेल्या संदेशाचं वाचन प्रदीप नाईक यांनी केलं.
पत्रकार भगवान निळे, वंचित बहुजन आघाडीच्या रेखाताई ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर साहित्य रसिक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सीमा निकम-शिरोडकर यांनी केलं तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रदीप नाईक यांनी केलं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!